दुभंग..
आज सारं शांत झालं होतं.. दोन दिवसांनंतर आज पहिल्यांदा प्रभाकराने दर्शन दिलं होतं..दोन दिवस सतत मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या.. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट..वेड्यासारखा बेभान होऊन कोसळणारा पाऊस.. काल अचानक आलेल्या वादळाने सारं अस्ताव्यस्त करून टाकलं होतं.. बरंच काही वाहून नेलं होतं.. बरंच काही मागे राहून गेलं होतं.. बरीच पडझड झाली होती..बरीच झाडं उन्मळून पडली होती.. जणू निसर्गाने रुद्र अवतार धारण केला होता.. आणि स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलं होतं.. त्याच्या पुढे मानवाचं काहीच चालत नाही याचा साक्षात्कार झाला.. वादळं येतात वेगाने आणि जातातही तितक्याच वेगाने..पण काही निमिषात सारं काही उध्वस्त करून जातात..होत्याचं नव्हतं करून टाकतात..
प्रत्येकाच्या आयुष्यातही अशीच काही वादळं येतात..काही क्षणात शमतात पण काही जगणंच संपवून टाकतात..आणि त्याच्या येण्याच्या, वादळाच्या अस्तित्वाच्या खुणा मागे ठेवून जातात.. काहीजण या वादळात तटस्थपणे उभं राहून समर्थपणे त्यास तोंड देतात.. पुन्हा नव्याने उभं राहतात पण सर्वांमध्ये ती क्षमता नसते.. काहीजण कोलमडून जातात त्यांच्यात टिकून राहण्याचं बळ नसतं..वादळ अचानक येतं शरीराबरोबर मनालाही दुबळं करून जातं.. आणि मनाचा दुबळेपणा खरंच खूप भयानक.. मरणांत वेदना देणारा.. पंगूत्व आणणारा.. पण तरीही काहीजण जगतात.. तग धरून उभे राहतात.. संघर्षाची अग्निफुले तुडवत मार्ग काढतात..अगदी त्या दुबळ्या अवस्थेतही.. मरणदायी यातना भोगत..कपाळावर भळाभळणारी, चिघळणारी वेदनादायी जखम घेवून अगदी त्या अश्वत्थाम्यासारखं.. 'समिधा' ही अगदी तशीच.. समोरच्या झाडावरून कोसळून उद्धवस्त झालेल्या खाली पडलेल्या चिमणीच्या घरट्याकडे पाहतांना तिला खूप भरून आलं.. तिच्याही स्वप्नांचे मनोरे असेच उध्वस्त होताना तिने तिच्या डोळ्यांनी पाहिले होते..
कालच्या त्या वादळानं तिच्या जीवनात आलेल्या त्या भयानक वादळाची तिला आठवण झाली.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.. हातातल्या पत्राने मनाचा बांध अगदी तुटून गेला.. 'तन्मय'चं पत्र तिला काल संध्याकाळी ऑफिसमध्ये शिपायाने आणून दिलं होतं.. आज पाच वर्षांनी त्याने समिधाला पत्र लिहलं होतं.. आज अचानक त्याला आठवण झाली होती.."का बरं त्याने पत्र लिहलं असावं? काय लिहलं असेल?" समिधाच्या मनात प्रश्नाचं जाळं पसरलं.. कधी एकदा घरी जातेय आणि ते पत्र वाचतेय असं तिला झालं..लगबगीने ती ऑफिसमधून निघाली आणि तडक घरी पोहचली..
घरी आल्यावर समिधाने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली..पुन्हा पुन्हा त्या पत्रातल्या ओळी वाचताना डोळे भरून येत होते.. डोळ्यातलं तळं ओसंडून वाहत होतं.. त्या पत्रातल्या ओळींवरून, त्या अक्षरांवरून तिच्या हाताची बोटं आपसूक फिरत होती.. आणि त्याच्या प्रेमळ स्पर्शाची जाणीव होऊ लागली.. समिधाने पुन्हा एकदा पत्र वाचायला सुरवात केली..
प्रिय समिधा..
कशी आहेस? माझं पत्र पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल ना..!! इतक्या वर्षांनी तुला पत्र लिहतोय.. पण खूप प्रकर्षानं तुझी आठवण आली.. खरंतर आठवण यायला विसरलोच नव्हतो कधी.. तुझ्या जुन्या ऑफिसमध्ये जाऊन आलो..तेंव्हा समजलं ती नोकरी तू सोडलीस.. तुझी मैत्रीण विभावरी भेटली..तिला तुझ्याबद्दल विचारलं.. तिच्याकडे तुझा वैयक्तिक नंबर नव्हता..म्हणून मग तिने तुझ्या नवीन ऑफिसचा फोन नंबर आणि पत्ता दिला.. तुला बऱ्याच वेळा फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला.. पण संवाद होऊ शकला नाही.. तू ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलीस असं समजलं.. समिधा, आपल्या शहरापासून खूप दूर गेलीस ग..!! तुला भेटण्याआधी विचार केला पत्र लिहून तुझी अनुमती घ्यावी..म्हणूनच हा सारा शब्दप्रपंच..
समिधा..!! आजही तू तशीच आहेस ग मनात..! आजही माझं तितकंच प्रेम आहे तुझ्यावर.. नाही विसरता आलं मला.. तुझ्याशिवाय जगताना किती त्रास झाला असेल..! माझं मलाच माहीत ग..!! बुद्धीने विचार करता करता हृदयापूढे हतबल झालो.. आणि मग आयुष्यभराचा विरह सोसत राहिलो..
समिधा, इतकी रागवलीस माझ्यावर? खरंच तू मला विसरलीस का ग? माझ्यासाठी लिहलेल्या शब्दांना पुसून टाकलंस? हृदयातून झंकारलेल्या त्या प्रेमळ भावनांना तू पायदळी तुडवत निघून गेलीस..? इतकी कठोर का झालीस? हो..! मी चुकलो असेन.. तुझ्याशी वाईट वागलो असेन..पण तू समजून घेतलं असतं तर? तू वाईट नव्हतीस ना मी..!! आपली वेळ वाईट होती.. नियती आपल्याला नाचवत गेली.. आणि मी तसा वागत गेलो.. मी चुकलो ग राणी..!! मागच्या सर्व गोष्टी विसरून परत नव्याने सुरू करूया.. प्लिज मला माफ करशील? तुझ्यासाठी माफ करण्याइतक्या योग्यतेचा मी आहे ना?
समिधा, तुझ्या परत येण्याची माझ्यासवे सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत.. तुही सगळं विसरून आपल्या घरट्यात परतून ये..मला क्षमा कर..करशील ना समिधा.?
मला खात्री आहे तू नक्की परतून येशील.. मी वाट पाहतोय..
तुझाच.. फक्त तुझाच..
तन्मय..
पत्र वाचता वाचता समिधाचे डोळे भरून आले..आठवणींची गर्दी दाटून आली.. खरंच तन्मय आजही तितकंच प्रेम करत असेल? मग त्यावेळीस तो का तसं वागला? माझ्या वेदना का नाही दिसल्या त्याला? की माझंच चुकलं? प्रश्नांची मालिका फेर धरू लागली.. आणि मन भूतकाळात गेलं.. सारा जीवनपट डोळ्यांसमोर येऊ लागला..
कोण होती समिधा? काय घडलं होतं तिच्या आयुष्यात? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©® निशा थोरे..
मैत्रीणींनो माझ्या मागील सावत्र आई,लढा अस्तित्वाचा या कथांना भरभरून प्रेम दिलंत..छान प्रतिसाद दिलात.., मनापासून आभार.. 'दुभंग' ही नवीन कथा मालिका सुरू करतेय.. या कथेलाही तितकंच प्रेम मिळेल हीच अपेक्षा.. आपल्या प्रतिक्रिया माझं लिखाण प्रगल्भ करेल यात शंकाच नाही..
©® निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा