Nov 30, 2020
स्पर्धा

दुभंग भाग ९

Read Later
दुभंग भाग ९

 

दुभंग.. भाग ९

 

पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की तन्मय आणि समिधा एकमेकांच्या प्रेमात पडले होते.. समिधा त्याच्या प्रेमात अगदी वेडी झाली होती.. दोघेही पदवीधर झाले..नंतर तन्मयने एम बी ए(फायनान्स) केलं आणि मग मोठ्या चांगल्या कंपनीत असिस्टंट मॅनेजर(फायनान्स) या पदावर नियुक्त झाला..कालांतराने त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला आणि त्याने समिधाशी नातं तोडून टाकलं.. या दुःखाने खचून जाऊन समिधाने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आता पुढे...

 

दुभंग.. भाग ९

 

समिधा शांतपणे आजीच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून पडली होती..आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती..आजीने मायेने तिला गोंजारत म्हणाली," समिधा, बाळा..! मी तुझ्या इतकी शिकलेली नाही पण तरीही तुला सांगते, आयुष्य खूप मौल्यवान आहे..ईश्वराने आपल्याला जो मनुष्यदेह दिला आहे तो खूप दुर्मिळ आहे..आणि तोच तू नष्ट करायला निघाली होतीस.. तू असं का केलंस? मला माहीत नाही.. पण जे केलंस ते चुकीचं होतं.. असं काय घडलं होतं की तुला स्वतःला संपवावंसं वाटलं? इतकी तू हरलीस की आजीचा विचारही तुझ्या मनाला शिवला नाही? या म्हातारपणात तुझ्या आजीला तू यातना देणार होतीस? कोण आहे ग मला तुझ्याशिवाय? नसेन रक्ताची मी कोणी तुझी..!! पण मायेची, मानलेली तरी कोणीतरी आहे ना..!! की मी नाही कोणी तुझी?" आजीचे शब्द तिच्या कानावर पडत होते.. आजीच्या प्रश्नांनी समिधा हळवी झाली..ताडकन उठून बसत आजीच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली," नको ग आजी असं बोलू..!!मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय? तूच माझं विश्व आहेस..आईबाबा, मित्र मैत्रिणी सगेसोयरे सगळं तूच आहेस.. आजी मी हरले ग..सगळं मिळवता मिळवता सगळं हरवून बसले.. जीवनाच्या परीक्षेत अपयशी ठरले.." आणि मग समिधाने आजीला सर्व कर्मकहाणी सांगून टाकली.. काही तिच्या डोळ्यातल्या आसवांनी मांडली.. जे शब्दात मांडता येत नव्हतं ते दोन्ही हातांच्या ओंजळीत पडणाऱ्या अश्रूंनी सांगितली..

 

समिधाची सर्व कर्मकहाणी ऐकताना आजीचेही डोळे पाणावले होते.. "एवढासा जीव लहानपणापासून फक्त दुःखाचाच पाऊस झेलत होता.. कुठेतरी आनंदाचा झरा मिळाला अस वाटलं होतं पण तोही अदृष्य झाला..काय रे देवा..!!हे प्राक्तन.. कोणत्या जन्मीचे भोग रे देवा.. या पोरीच्या वाट्याला सुख नाहीच का? कसा रे देवा तुझा न्याय..!! असा कसा आंधळा झालास की तुला या जीवाची दया येत नाही?" आजीच्या मनात राहून राहून विचार येत होते.. विचारांच्या वादळाला दूर सारून आजीने समिधाला कुशीत घेतला..मायेने गोंजारत बोलू लागली," बाळा, विसरून जा सर्व काही..नशिबाचे भोग असतात ना..ते भोगावेच लागतात.. अशी वादळं येतात आयुष्यात.. म्हणून घाबरून जायचं नसतं ग..धीराने तोंड द्यायचं असतं.. तू त्याला विसरून जा.. तो तुला कधी भेटला? प्रेमाने काय काय म्हणाला होता? हे आठवण्यापेक्षा तो शेवटच्या भेटीत काय म्हणाला ते आठव? तो असं का वागला? मी योग्य नव्हते का? काय कमतरता होती माझ्यात? असा विचार करण्यापेक्षा तो तुझ्या प्रेमास पात्र होता का? हा प्रश्न स्वतःला विचारून बघ..दाखवून दे त्याला आणि या जगालाही तुझी योग्यता..उद्या मी असेन नसेन पण एक लक्षात ठेव!! जीवनात कधीही हार मानू नकोस.. कदाचित कालांतराने त्याला त्याची चूक कळेल.. वाट चुकलेलं पाखरू परत घरट्यात येईल पण ते परत यावंच असा अट्टहास करू नकोस..मी अडाणी काय सांगणार तुला? पण तरी तुला सांगते चुकांना सुधारून पुढे जायचं असतं.. शेवटी निर्णय तुझाच आहे..आयुष्य तुला जगायचं आहे.. पुन्हा एकदा नव्याने उभी रहा.. नव्याने हसायचं तुला.. मी आहेच तुझ्यासोबत कायम..ऐकशील ना बाळा माझं?" आजी कळवळून विचारत होती..तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं

 

आजीच्या शब्दांनी समिधा सद्गदित झाली.आजी कोणत्याही शाळेत गेली नव्हती..पण जीवनाच्या विद्यापीठात बरंच काही शिकली होती.. आजी संपुर्ण जीवनाचं सार सांगून गेली होती.. तिच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरला होता.. आणि तो प्रकाश समिधाला दिपवून टाकलं होतं.. तन्मयच्या या वागण्याने समिधा पूर्णपणे कोलमडून गेली होती.. पण साठीची आजी तिचा आधार बनली होती.. आजीमुळे समिधाला नवी ऊर्मी मिळाली होती.. पण का कोणास ठाऊक..!समिधाला अजूनही तन्मयविषयी ओढ वाटत होती..,तो परत येईल, आपल्या चुकांची क्षमा मागेल या आशेवर ती जगत होती.. तो वाईट आहे..,त्याने मला फसवलं ही गोष्ट तिला मान्यच व्हायची नाही.. पण तिच्या या विश्वासाला लवकरच तडा गेला.. ज्याच्यावर इतका विश्वास टाकला होता त्यानेच विश्वासघात केला..

 

समिधा पुन्हा वाचनालयात आपल्या कामावर रुजू झाली..पण आता तिच्या वागण्या बोलण्यात खूपच फरक जाणवत होता..सतत हसतमुख असणारी समिधा खूप शांत आणि उदास राहू लागली.. कदाचित जिवंतपणी विरहाच्या मरणयातना ती भोगत होती.. आणि एक दिवस तन्मय वाचनालयात आला..त्याला पाहून समिधाला खूप आनंद झाला.. बाहेर जाऊन बोलूया समिधाने त्याला खुणावलं.. परवानगी घेऊन ती तन्मय सोबत बाहेर आली.. ते जवळच्या बागेत जाऊन बसले.कोणीच बोलत नव्हतं.. मग समिधानेच सुरुवात केली," कसा आहेस तन्मय? आईबाबा, सायली कसे आहेत? सायलीचं काय सुरू आहे?" तो उत्तरला," मी ठीक आहे? आई बाबा सायली सर्वजण ठीक आहेत.. सायली पदवीधर झाली नोकरीच्या शोधात आहे..एक दोन ठिकाणी मुलाकतीसाठी गेली होती.. बघू काय होत ते? तू सांग तू कशी आहेस?फार त्रास झाला नाही ना..,समी तू वाटलं नसेल ना की आपण पुन्हा भेटू.. पण खरंच आपण भेटायला नको होतं ना.. का भेटायचं? उगीच मनाला त्रास करून घ्यायचा" 

 

तन्मयच्या बोलण्याने समिधा थोडी संभ्रमात पडली.. नक्की तन्मयच्या मनात आहे तरी काय? तिला काहीच समजेनासं झालं.. पण तरीही समिधा शांतपणे त्याच्याशी बोलत होती..समिधा डोळ्यांत पाणी आणून समिधा म्हणाली," तन्मय, असा का बोलतोयस? इतका परकेपणा कधी रे आला आपल्या नात्यात? आता विचारतो आहेस? मी कशी जगले तुझ्याशिवाय..नाही समजणार रे तुला.. पण मला खात्री होती.. तू नक्की परत येशील.. तन्मय तू तुझ्या निर्णय बदलतोयस ना..! आपण पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करू.. एकमेकांना समजून घेऊन सुखाचा संसार करू.. मी खरंच तुझ्याशिवाय नाही रे जगू शकणार.. प्लिज कृपा करून तुझा निर्णय बदल..काळजी करू नको..सगळं ठीक होईल.. आपण दोघे मिळून सगळं ठीक करू.." 

 

"नाही..!! माझा निर्णय अटळ आहे..तो मी कधीच बदलणार नाही.. मला वाटलं तू विसरली असशील.. पण तू पुन्हा तोच विषय काढतेय.. मला वाटलं आपल्यात निदान मैत्री तरी राहील पण ते आता मला शक्य वाटत नाही" तन्मय चिडून बोलत होता.. समिधा तरी शांतपणे म्हणाली," तन्मय, नक्की काय अडचण आहे? सांग न मला..आपण दोघे मिळून यातून मार्ग काढू ना रे.."  तन्मय रागात बोलत होता," नाही काही मार्ग..तुझ्यासारख्या सामान्य मुलीशी नाही लग्न करायचं मला..असं समज मी टाईमपास केला तुझ्यासोबत.. हेच पुन्हा पुन्हा बोलणार असशील तर माझ्याशी बोलू नकोस.. मला भेट नकोस या पुढे कधीच.." 

 

समिधा उमाळा आवरू शकली नाही.. डोळ्यांत आसवं होती.. पण त्या आसवांनी आता रागाची जागा घेतली होती.. तिच्या तन्मयवरील प्रेमाची जागा आता तिरस्काराने घेतली होती.. तिच्या बोलण्यात चीड दिसत होती," तन्मय, तू इतका कठोर असशील मला वाटलं नव्हतं कधी.. ज्या तन्मयवर मी प्रेम केलं तो तू नाहीसच मुळी.. ज्याच्यात माणुसकी नाही..प्रेम नाही..तो माझा तन्मय असूच शकत नाही.. अरे तू मला फसवलंस.. मी गरीब घरातली एक सामान्य मुलगी म्हणून? तुला फसवायचंच होतं तर बऱ्याच मुली होत्या रे.. मला फसवताना तुला काहीच वाटलं नाही..? खरंच विसरले होते रे.. आमच्या सारख्या गरीब घरातल्या मुलींनी प्रेम करायचं नसतं मी चुकले.. तुझ्या सारख्या मुलावर प्रेम केलं.. लहानपणापासून मी इतकं दुःख भोगलं पण कधीच कोणाचा तिरस्कार केला नाही.. पण तन्मय, आज मी तुझा तिरस्कार करते.. जा चालता हो.. तोंड काळं  कर.. तुला काय वाटलं मी मरून जाईन.. नाही..! जगेन मी.. तुझ्याशिवाय त्या दुबळ्या अवस्थेत.. विसरेन मी तुला.. पण तन्मय तू मला विसरू शकणार नाही.. देव असेल आणि हे जर तो पाहत असेल तर नक्कीच तो हा अन्याय करणार नाही.. जे मी दुःख भोगलंय, भोगतेय.. त्याची कधीतरी तुला जाणीव होईल..आणि तू क्षमा मागशील.. माझ्या भेटीसाठी व्याकुळ होशील.. पण तेंव्हा वेळ निघून गेलेली असेल आणि मीही तुला भेटणार नाही.. I hate you Tanmay.., Hate you.. " समिधा तावातावाने बोलत होती.. 

 

समिधा तडक जागेवरून उठली.. तिने तिचा सारा राग ओकला होता.. डोळ्यांतून अंगार ओसांडून वाहत होता.. ती तडक निघाली तन्मयविषयी घृणा घेऊन.. अगदी कायमसाठी.. 

 

तन्मय तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला.. पहिल्यांदा त्याने समिधाला इतकं चिडलेलं पाहिलं होतं..हीच चीड जणू त्याला तिच्या मनात निर्माण करायची होती.. समिधा तिथून निघून गेली.. पण तन्मय तसाच बसून राहिला.. डोळ्यांतून टपटप पाणी खाली सांडत होतं.. आणि त्याला त्या दिवशी घडलेला प्रसंग आठवला..

 

पुढे काय होतं? तन्मय समिधा सोबत इतकं विक्षिप्तपणे का वागला? पाहूया पुढील भागात..

 

क्रमशः 

©® निशा थोरे

Circle Image

Nisha Sanjay Thore

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.