Nov 30, 2020
स्पर्धा

दुभंग भाग ८

Read Later
दुभंग भाग ८

 

दुभंग.. भाग ८

 

पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की तन्मयच्या पत्राचं काहीच उत्तर न मिळाल्याने तन्मय चिंतीत होता..त्याच तणावाखाली गाडी चालवत असताना त्याचा अपघात झाला..त्या दिवसांत समिधाने त्याची खूप काळजी घेतली..तू पूर्णपणे बरा झाल्यावर आपल्या मनातली व्यथा तिने तन्मयला सांगितली आता पुढे..


 

दुभंग.. भाग ८

 

तन्मयने समिधाला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं..समिधाचा विश्वास संपादन केला.. त्याच्या हळव्या शब्दांनी समिधा विरघळून गेली. आणि मग तिनेही तन्मयच्या प्रेमाचा मोठ्या आनंदाने स्वीकार केला..दोघेही खूप आनंदांत होते.. आता तन्मय आणि समिधा रोज भेटू लागले.. कधी पुस्तकांतून, कधी कवितेच्या माध्यमातून मनातल्या भावना व्यक्त होऊ लागल्या..एकमेकांच्या सहवासात ते जास्तीतजास्त वेळ रमू लागले.. तन्मयचं आयुष्यात येणं समिधाला स्वर्गीय सुख मिळाल्या सारखं वाटू लागलं होतं.. समिधा तन्मयच्या प्रेमात नखशिखांत नाहून जात होती.. तो तिचा श्वास बनला होता.. तन्मयशिवाय ती जगू शकत नव्हती.. जळी,स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त तन्मय दिसत होता.. कधी कधी स्वतःशीच बोलत राहायची..दोघांतल्या गंमतीजमती आठवल्या की तिच्या ओठांवर हसू आणि डोळ्यांत पाणी तरळायचं..प्रेमात ती अगदी वेडी झाली होती.. पण तरीही दोघांनीही अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही.. आपल्या भविष्याला करीयरला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं होतं.

 

खूप छान दिवस सरत होते..अगदी भिरभिरणाऱ्या फुलपाखराच्या मखमली पंखासारखे.. अगदी दृष्ट लागण्या जोगे सारे.. काही दिवसांतच समिधा आणि तन्मय पदवीधर झाले.. तिच्या कष्टाचं चीज झालं होतं.. तन्मयच्या वडिलांनी तिच्यासाठी घेतलेल्या श्रमाचं फळ मिळालं होतं..आजी आणि समिधा कायम त्यांच्या ऋणात राहिल्या..एका आईवाचून वाढलेल्या अनाथ मुलीने त्यांचे स्वप्नं साकार केलं होतं.. तन्मयनेही फायनान्सच्या अनुषंगाने कोर्स केला.. अजून दोन वर्षे शिकून तो एमबीए (फायनान्स) झाला…मग एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीकडून नोकरीसाठी त्याला बोलवण्यात आलं आणि त्याची निवड झाली..आणि तो फायनान्स असिस्टंट मॅनेजर या पदासाठी कंपनीत रुजू झाला.. सगळं स्थिरस्थावर झालं होतं.. तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येक मुलीच्या मनात ज्या आपल्या लग्नाच्या  भावना असतात.. तसंच काहीसं समिधाला वाटू लागलं होतं.. तन्मयशी लग्न करून आपणही आपला सुखी संसार थाटावा ही प्रबळ इच्छा निर्माण होऊ लागली.. आणि मग तिने तन्मयला घरी त्यांच्याबद्दल बोलायला सांगितलं.. समिधा तन्मयचं बोलणं ऐकण्यासाठी खूप आतूर झाली होती..तन्मयच्या आईवडिलांना आपल्या प्रेमाबद्दल समजल्यावर ते कसे वागतील? काय म्हणतील? माझा स्वीकार करतील का? या साऱ्या विचारांनी ती चिंतीत झाली.. आपल्या प्रेमाला कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागली..

 

पण काय झालं कोणास ठाऊक? त्या दिवसानंतर तन्मय तिला भेटलाच नाही.. घरी कितीतरी वेळा फोन केला तरी तो घरी नसायचा..ती जेंव्हा घरी यायची तो घरातून बाहेर निघून जायचा.. समिधाला जाणवू लागलं की तन्मय तिला टाळतोय.. एक दिवसही तिला न पाहता राहू न शकणारा तन्मय कित्येक दिवस झाले तिला भेटलाच नव्हता.. समिधाला खूप काळजी वाटू लागली आणि भीतीही.. भीती तन्मय तिला सोडून जाण्याची.. मग एक दिवस समिधा स्वतःच तन्मयच्या ऑफिसमध्ये भेटायला गेली.. तन्मय तिथेच होता..तिला पाहताच तो हातातलं काम सोडून धावत तीच्याजवळ आला.. तिचे तुडूंब भरलेले डोळे पाहून तोही दुःखी झाला..तो समिधाला ऑफिसच्या जवळपास असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिण्यासाठी घेऊन गेला.. एका कोपऱ्यातल्या टेबलकडे बोट दाखवून तिला बसायला सांगितलं, खुर्चीत बसत असतानाच समिधाने त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला," तन्मय, काय झालंय तुला? का मला टाळतोयस? तुला कल्पना नाहीये रे..! मी तुझ्याशिवाय कशी जगली असेन? का मला इतका मरणयातना दिल्यास? असं काय घडलं की  एकदाही तुला मला भेटावंस वाटलं नाही? माझी आठवणही आली नाही?" 

समिधाच्या डोळ्यांतून श्रावणधारा वाहत होत्या.. 

 

समिधाला शांत करत तन्मय बोलू लागला," समी, शांत हो..! मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.. माझी काही कारणं आहेत? जी मी तुला सांगू शकत नाही.. तुही मला विसरून जा.. एक भयानक स्वप्न होतं, तन्मय फसवा मुलगा होता असं समजून विसरून जा.. आणि असंही आपल्यात काही वावगं घडलं नाही की ज्यामुळे तुला शरमेने मान खाली घालावी लागेल.. समी, मला क्षमा कर.. मीच माघार घेतोय.. आयुष्यात अशा घटना घडतच राहतात..कालांतराने तुही विसरून जाशील सगळं.. माझ्याहून चांगला मुलगा तुझ्या आयुष्यात येईल लग्न कर..सुखी हो.. यापुढे मला भेटू नकोस..कधीही ऑफिसच्या नंबरवर फोनही करू नकोस.. जर अशीच भेटत राहिलीस तर आठवणी तशाच ताज्या राहतील आणि तुलाच त्याचा त्रास होईल..जमलं तर मला क्षमा कर.." समिधा आश्चर्यचकित झाली..अवाक होऊन त्याच्या कडे पाहू लागली..नेमकं काय बोलावं तिला उमजेना..डोळ्यांत आसवं उभी राहिली होती..तिने शेवटी तन्मयकडे पाहत इतकंच विचारलं," हा तुझा अंतिम निर्णय आहे?" त्याने होकारार्थी मान डोलावली.. समिधा ताडकन जागेवरून उठली..काही न बोलता तडक आपल्या घरी निघून आली..

 

घरी पोहचताच आपल्या खोलीत गेली..खोलीचा दरवाजा बंद करून खूप रडली..अगदी डोळे कोरडे होईपर्यंत.. तिला काहीच समजत नव्हतं.. नेमकं काय घडलं? तन्मय असा का वागला? काय कारणं होती त्याची? का माझा विश्वासघात केला? का एवढी घोर शिक्षा मला दिलीस? का तन्मय..!!" तिचं मन आक्रंदत राहिलं.." का जगू मी आता? आई आणि माझ्या जगण्यात काय फरक उरला? दोघींच्याही नशिबी फक्त उपेक्षाच? तन्मयसोबत फिरताना काय वाटलं असेल लोकांना? काय म्हणत असतील माझ्या बद्दल?  माझ्या माथी लागलेला हा कलंक मी कसा मिटवू? काय करू मी? आयुष्यभर फक्त अन फक्त दुःखच वाट्याला आली..,मग का जगावं मी? संपवून टाकते हे असलं कष्टप्रद आयुष्य.." एक अघोरी विचार तिच्या मनात चमकून गेला..

 

त्या रात्री समिधाने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं..आजी बाहेरच्या खोलीत निजली होती..म्हातारपणामूळे डोळा लागत नव्हता.. मनात विचार तांडव करू लागले होते, "आता या उतार वयात समिधा शिवाय कोणाचाच आसरा नव्हता.. पोटच्या मुलांनी तर कधीच साथ सोडली होती..समिधाच आता सर्वस्व होती..पण उद्या तिचं लग्न झालं तर माझं कसं होईल? कोण माझी आस्थेने काळजी घेईल? आजी आपल्याच विचारात मग्न झाली..झोप येत नव्हती म्हणून थोडा वेळ समिधाशी  गप्पा माराव्या म्हणून आजी समिधाच्या खोलीजवळ आली दार ठोठावलं.. पण समिधा दार उघडत नव्हती..आणि आतूनही काहीच प्रतिसाद येत नव्हता.. आजी समिधाला आवाज देत होती.. पण काहीच उत्तर मिळत नव्हतं.. आजीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.तिने आरडाओरडा करून शेजारच्या लोकांना गोळा केलं..समिधाच्या खोलीचा दरवाजा तोडून आत गेले.. समोरचं दृश्य पाहून आजीला तर भोवळच आली..शेजारच्या बायकांनी आजीला सावरले.. समिधा पलंगावर निपचित पडली होती..तोंडातून फेस येत होता.. खाली कसल्या तरी गोळ्या पडल्या होत्या.. सारे भयभीत झाले..कुणीतरी तिच्या नाकाला हात लावून पाहिलं.. श्वासोच्छ्वास सुरू होता.. सर्वांनी मिळून तातडीने तिला इस्पितळात दाखल केले..डॉक्टरांनी उपचार सुरू केले..झोपेच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने समिधा बेशुद्ध पडली होती.. आजीने देशमुखांच्या घरी शेजारच्या मुलाला निरोप द्यायला सांगितला.. देशमुख आणि सायली धावतच इस्पितळात पोहचले..आजीने सर्व वृतांत त्यांना कथन केला.. 

 

समिधा शुद्धीवर येत नव्हती.. डॉक्टर समिधाचा जीव वाचवण्यासाठी निकरीचे प्रयत्न करत होती.. पोलीस केस झाली होती.. देशमुखांनी सगळं प्रकरण शांतपणे हाताळले होते.. समिधाच्या जगण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती.. तिने स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता.. कायम दुःख भोगणाऱ्या जीवाचा अंत करण्याचा प्रयत्न केला होता.. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते..तिच्या नशिबाचे भोग अजून संपले नव्हते.. अजून तिला खूप काही सोसायचं होतं की काय..!! म्हणून देवाने तिला जीवनदान दिलं..डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आलं..आणि दोन दिवसांनी समिधा शुद्धीवर आली.. आजी तिच्या उशाशी बसून होते.. समिधाने डोळे उघडले..आजीला समोर पाहताच तिच्या डोळ्यातलं तळ रितं होऊ लागलं आजीला म्हणाली,"का वाचवलं मला आजी? नाही सहन होत मला..नाही जगायचं आता.. दमले मी आजी, हे सारं सोसता 

सोसता..!माझा जगण्याचा काहीच उपयोग नाही..का जगू ?कोणासाठी जगू?" आणि ती आजीच्या कुशीत शिरून धाय मोकलून रडू लागली..आजी काहीही न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरवत होती..मायेने गोंजारत होती.. तिला शांत करत होती.. इतक्यात डॉक्टर आले..औषधं दिली..पोलिसही आले.. तिची विचारणा केली..चुकून जादा डोस घेतला गेला असं सांगून तिने वेळ मारून नेली.. समिधाला विश्रांतीची नितांत गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यावर सर्वांची तिथून पांगापांग झाली.. 

 

समिधाची प्रकृती सुधारत होती.. एवढ्या दिवसांत एकदाही तन्मय तिला भेटायला आला नव्हता.. तन्मयचे बाबा आणि सायली आली.. सायली खूप रडत होती.. का असं केलंस? तिला विचारत होती..पण समिधा काहीच बोलली नाही..सायलीच्या  मनाला त्रास होऊ नये, त्यांच्या मैत्रीला तडा जाऊ नये म्हणूनच की काय..!! समिधा शांत राहिली.. तन्मय आलाच नाही..जणू सारी नाती संपली होती.. भावना हरवल्या होत्या.. "एवढ्या कठोर वागणाऱ्या मुलाच्या आपण कसे प्रेमात पडलो? आपली निवड चुकली? या प्रश्नांनी ती व्याकूळ झाली.. डोळ्यांतून मेघ झरत होते..प्रकृतीत सुधारणा होत होती..पण मन मात्र दुबळं बनत चाललं होतं..क्षीण होत चाललं होतं.. डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्याची परवानगी दिली.. इस्पितळातला सर्व खर्च तन्मयच्या बाबांनी केला होता.. समिधाला घरी आणण्यात आलं.. 

 

समिधा शांतपणे आजीच्या मांडीवर डोकं ठेवून डोळे मिटून पडली होती..आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती..

 

पुढे समिधाचं काय  होतं? तन्मय असं का वागला? पाहूया पुढील भागात..

 

क्रमशः

 

©® निशा थोरे

Circle Image

Nisha Sanjay Thore

Service

मला शब्दांच्या विश्वात रमायला खूप आवडते.