दुभंग.. भाग ७
पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर समिधा आजीसोबत तिच्या घरी राहू लागली.. तन्मय सायली कायम तिच्या सोबत होते..तन्मयला समिधा आवडू लागली होती.. त्याने समिधाला पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या.. आता पुढे..
दुभंग.. भाग ७
एक आठवडा उलटून गेला तरी समिधा तन्मयच्या घरी, घरी आलेली नव्हती.. तन्मय बैचेन झाला.."काय झालं असेल? माझ्या पत्राचा तिला राग आला असेल का? माझं काही चुकलं का?" या साऱ्या प्रश्नांनी त्याला घेराव घातला.. त्याला काहीच सुचत नव्हतं..तो रोज समिधा घरी येण्याची आतुरतेने वाट पहात होता.. पण समिधा काही आलीच नाही.. आता मात्र त्याचा त्याच्या सहनशीलतेचा बांध फुटुन ओसंडून वाहू लागला,..तन्मय तिच्या काळजीने पुरता खचला. दिवसरात्र तिचाच विचार.. कितीतरी रात्री त्याने तिच्या आठवणीत जागून काढल्या होत्या.. अन्नपाणी गोड लागत नव्हते.. कशातच त्याचं मन लागत नव्हतं.. या साऱ्या मानसिक तणावामूळे प्रकृतीची हेळसांड होऊ लागली.. एक दिवस याच तणावात गाडी चालवत असताना त्याचा अपघात झाला.. गाडीचा तोल जाऊन गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली.. तन्मय रक्ताच्या थारोळ्यात.. त्याला बराच मार लागला होता.. बघ्यांची गर्दी जमली.. मग काही लोकांनी तातडीने त्याला जवळच्या इस्पितळात दाखल केले.. तिथल्या डॉक्टरांनी लगेच त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली.. आणि अपघाताची केस असल्याने पोलिसांनाही कळवण्यात आलं. थोड्याच वेळात पोलीसही तेथे पोहचले.. त्याच्या गाडीतल्या कागदपत्रांवरून त्याचा पत्ता मिळाला आणि त्यांनी तन्मयच्या घरी कळवलं.. त्यांच्यासाठी ही खूप धक्कादायक बातमी होती.. तन्मयची आई रडू लागली.. तन्मयचे बाबा तिला समजावत होते..सावरत होते..दोघेही सायलीला घेऊन ताबडतोब इस्पितळात पोहचले..
रखमाआजीला ही बातमी समजली..तिला तन्मयची खूप काळजी वाटू लागली.. घरी आल्या आल्या तिने समिधाला तन्मयच्या अपघाताविषयी सांगितलं..समिधा एकदम स्तब्ध झाली..काय बोलावं तिला समजेना..डोळ्यात पाणी साठू लागलं..दोघी लगेच इस्पितळात पोहचल्या.समिधाला समोर पाहताच सायलीचे अश्रू अनावर झाले आणि ती तिच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली.. समिधा तिला समजावत होती.. आधार देत होती.. तन्मय अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता.. बरंच रक्त वाहिलं होतं..त्यामुळे आईबाबा खूप चिंतीत होते..आजी दोघांना धीर देत होती.. 'देवावर विश्वास ठेवा सगळं ठीक होईल' सारखं बजावत होती.. समिधाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं..ती सायलीला आधार देत होती.. मनोमन तिचे आराध्य गणपती बाप्पाला तन्मयच्या प्राणांची रक्षा करण्यासाठी विनवत होती.. प्रार्थना करत होती..
अखेरीस डॉक्टरांच्या दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश आलं.. आणि तन्मय शुद्धीवर आला..डॉक्टरांनी बाहेर येऊन ही आनंदाची बातमी दिली.. सगळ्यांना खूप हायसं वाटलं.. तन्मयच्या आईचा जीव भांड्यात पडला.. समिधाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.. तन्मय शुद्धीवर येताच समिधा पटकन गणपतीच्या मंदिरात गेली.. तिने मोठ्या श्रद्धेने हारफुलं वाहून बाप्पाला नमस्कार केला आणि त्याचे मनोमन आभार मानले.. मंदिरातून निघताना देवाचा प्रसाद सर्वांसाठी घेऊन आली..तोपर्यंत आई,बाबा, सायली, आजी त्याला भेटून आले.. समिधा इस्पितळात पोहचल्यानंतर तिने सर्वाना बाप्पाचा प्रसाद दिला..तन्मयच्या आईला ती म्हणाली,"काकू, तूम्ही घरी जाऊन या मी थांबते तन्मय जवळ.." तन्मयच्या आईने होकारार्थी मान डोलावली.. आणि त्या विश्रांतीसाठी त्या घरी परतल्या..
समिधा तन्मयला भेटायला त्याच्या खोलीत गेली.. तिला पाहताच तन्मयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले,"समी, तू कुठे गेली होतीस? काय चुकलं माझं? का रागवलीस माझ्यावर? सांग समी..!!" तो तिला काकुळतीला येऊन विचारू लागला.. त्याला शांत करत समिधा म्हणाली," नाही,, तू शांत झोप बरं.. तू पूर्णपणे बरा हो.. मग बोलू आपण त्या विषयावर..तू जास्त बोलू नकोस..त्रास होईल तुला.." थोडसं प्रेमळ रागाने धमकवल्यावर तो शांत झाला..समिधा रोज इस्पितळात येऊ लागली.. त्याची काळजी घेऊ लागली.. त्या थोड्या दिवसांत तन्मयबद्दल निर्माण झालेला जिव्हाळा..तिचं तिलाच आश्चर्य वाटत होतं.. सतत त्याला भेटावंसं वाटणं, त्याची काळजी वाटणं, त्याचं हसणं, बोलणं सारं तिला आवडू लागलं होतं.."हे प्रेम तर नाही ना..!! हे काय होतंय मला?" तिलाच प्रश्न पडत होते.. पण तिने स्वतःला सावरायचं ठरवलं..
तन्मयच्या प्रकृतीत सुधारणा होत होती.. त्याचे आईबाबा, सायली सारेजणच त्याची काळजी घेत होते..काही दिवसांतच तन्मय पूर्णपणे बरा झाला आणि डॉक्टरांनी त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितलं..तन्मय घरी आला..सर्वांनाच खूप आनंद झाला.. तन्मय पूर्वीसारखा चालू, फिरू लागला.. महाविद्यालयातही जाऊ लागला.. सगळं सुरळीत सुरू झालं होतं..आणि मग एक दिवस तिने तन्मयशी बोलायचं ठरवलं.. समिधाने त्याला भेटायला बोलावलं.. महाविद्यालयाच्या बागेत भेटण्याचं ठरवलं..
सोनेरी ती सायंकाळ..गवताच्या पात्यांवरचं दवंही सोनेरी भासत होतं.. एक नवचैतन्य संचारला होता जणू..! बागेतल्या फुलांमध्ये नवी टवटवी जाणवत होती..गुलाबी सलवार चुडीदारच्या वेषात समिधा एखाद्या परीसारखी भासत होती.. मोकळे सोडलेले केस, वाऱ्याने गालांवर रुळणारी ती केसांची बट तिला सारखी त्रास देत होती.. समिधा खरंच खूप सुंदर दिसत होती.. तन्मय तिच्याकडे पाहतच राहिला..तो तिला भेटायला आतुर झाला होता.. आज तिचा होकार मिळेल या कल्पनेने तो सुखावला होता.. समिधा त्याच्यासमोर येऊन बसली धीरगंभीर आवाजात बोलू लागली," तन्मय, आज तुझ्या सर्व प्रश्नांची उकल सोडवणार आहे..मी तशी का वागले? याचा उलगडा करणार आहे.. तन्मय, तुझं माझ्यावर प्रेम का आहे? मी का आवडते? मला माहित नाही कारण आपल्यात काहीच साम्य नाही..मी तुझ्या घरी घरकामाला येणारी मुलगी..तू एका मोठ्या श्रीमंत घरात वाढलेला मुलगा.. आपल्यात खूप अंतर आहे.. समाज हे नातं कधीच स्वीकारणार नाही.. देशमुखकाकांना काय वाटेल? काकूं काय म्हणतील? तन्मय, मी तुझ्यासाठी काहीही करेन.. अगदी माझे प्राण मागितलेस तरी देईन रे.. पण तन्मय मला तुझ्याशिवाय तुझ्या प्रत्येक नात्यावर प्रेम करायचं आहे.. हवाय आसरा बुध्दिजन्य प्रेमाचा.. करायचं प्रेम तुझ्यासह सर्वांवर.. मी काकाकाकूंच्या विश्वासाला कसा तडा जाऊ देऊ? काकू मला सून म्हणून कसं स्वीकार करतील? मला खूप भीती वाटते रे..!! मला आईसारखं नाही जळायचं या प्रेमाच्या धगधगत्या विस्तवात..मला तू आवडतोस अगदी मनापासून.. पण कर्तव्यापुढे माणसांचं काहीच चालत नाही बघ.. अगदी निराधार व्हायला होतं.. काकाकाकूंनी माझ्यावर खूप उपकार केलेत.. त्या उपकारांना मी कसं विसरू? त्यांच्या उपकाराची मी अशी परतफेड करू? खाल्या मिठाला मी जगायला नको का? मी असं वागले तर समाज काय म्हणेल? मी काय करू तूच सांग तन्मय?जर तू सोडून गेलास तर मी नाही जगू शकणार रे..!" बोलता बोलता तिचा गळा भरून आला आणि ती हुमसून हुमसून रडू लागली.
तन्मय शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता.. तिचा प्रत्येक शब्द त्याच्या मनावर सपासप वार करत होता.. तिचं बोलणं संपल्यावर तिचे डोळे पुसत तन्मय शांतपणे म्हणाला," समी, मला तुझ्यासोबत जगायचं आहे अगदी माझ्या अंतापर्यंत.. खूप खूप प्रेम करायचं आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.. एक लक्षात ठेव..! मी तुला सोडून कुठेही जाणार नाही.. जीवनात कितीही संकट आले तरी..अगदी साऱ्या जगाने विरोध केला तरी.. मला खात्री आहे, आईबाबा माझ्या सुखाच्या आड येणार नाहीत.. ते कायम माझ्या सुखाचाच विचार करतात पण समज त्यांनी आपल्या प्रेमाला विरोध केला तर आपण आपला वेगळा संसार थाटू.. तुझ्या आईच्या वाटेला आलेल्या दुःखाचा लवलेशही मी तुझ्या वाट्याला येऊ देणार नाही..मी कधीच तुझा विश्वासघात करणार नाही.. समी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग..!! मी कधीच तुला सोडून कुठेही जाणार नाही.. हा माझा शब्द आहे..आणि मी जिवंत असेपर्यंत तो मी नक्की पाळीन.. मी तुला कधीही फसवणार नाही..तुझ्या भावनांचा अनादर करणार नाही.. समी, मी तुला वचन देतो ग..!!" असं म्हणत तन्मयने समिधाचा हात हातात घेतला.. आपल्या शब्दांनी तिला आश्वास्त केलं..तिला धीर दिला, विश्वास दिला..
तन्मयच्या त्या पहिल्या हळुवार स्पर्शाने समिधा मोहरून गेली होती.. तन्मयने तिचा विश्वास जिंकला होता.. रोज भेटणारा तन्मय जणू आज नव्याने तिला भेटत होता.. आणि कळत नकळत समिधाने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं.., त्यानेही प्रेमाने तिला जवळ घेतलं.. त्याच्या प्रेमाने ती नव्याने उमलत होती.. फुलत होती.. आणि वेडी ती सांज त्या मोहरलेल्या क्षणांची साक्षीदार झाली..
पुढे काय होतं? समिधाच्या आयुष्यात अजून कोणत नवीन संकट थैमान घालणार होतं? पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
©® निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा