दुभंग भाग ६

Dubhang natyatala

दुभंग.. भाग ६

पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, समिधा दहावी उत्तीर्ण झाली.. देशमुखांच्या मदतीने तिने महाविद्यालयात प्रवेश घेतला.. वाचनाच्या छंदामूळे पुस्तकांची मैत्री झाली.. ती वाचनालयात ग्रंथपाल मदतनीस म्हणून अर्धवेळ नोकरी करू लागली.. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत समिधा यश संपादन करत होती.. राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत दुसरा नंबर पटकावून महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल केलं होतं..दारूच्या अतिसेवनामूळे प्रभाकरची प्रकृती ढासळली होती आणि एक दिवस त्याची प्राणज्योत मालवली..आता पुढे..


 

दुभंग.. भाग ६

आपल्या जन्मदात्याच्या मृत्यूमूळे समिधा खूप दुःखी झाली.. रक्ताची सारी नाती, सारे पाश तिला सोडून गेले होते..आता खऱ्या अर्थ्याने पोरकी झाली होती.. समिधा खूप रडली..अगदी डोळे कोरडे होईपर्यंत.. प्रभाकरचा अंतिमसंस्कार झाला.. आणि त्याचा देह अनंतात विलीन झाला.. आजी, सायली, तन्मय आणि त्याचे बाबा तिला सांत्वन करायला आले होते..तन्मयच्या वडिलांनी समिधाला खूप आधार दिला..  समिधाने डोळ्यांतलं पाणी पुसलं.. अश्रू आवरले.. रक्ताची नाती जरी संपली होती तरी काही मायेची, प्रेमाने जोडलेली, माणुसकीची  नाती अजून शिल्लक होती.. आणि आता तिला त्यांच्यासाठी जगायचं होतं.. आईबाबांना गमावण्याचं दुःख तिने त्या जोडलेल्या नात्यांसाठी विसरायचं ठरवलं..पुन्हा नव्यानं उभं राहण्याचा प्रयत्न करण्याचं ठरवलं.. आईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, निखाऱ्यावर चालत, अग्नीफुले तुडवत समिधा पुढे चालू लागली..

समिधाचा खडतर प्रवास सुरू झाला..प्रभाकर असताना समिधाकडे वाईट नजरेने पाहणारा घरमालक आता प्रभाकरच्या मृत्यूनंतर अजूनच चिथावला होता. त्याची मजल दिवसेंदिवस वाढत चालली होती..  घरमालक समिधाला त्रास देऊ लागला..एकटी पाहून तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करू लागला..  समिधा खूप घाबरली होती.. तिने आजीला सांगितलं.. आजी खूप चिडली..तिच्या घरमालकाला चांगलंच सुनावलं..घर मालकाने समिधाला खोली मोकळी करायला सांगितलं.. घरातून बाहेर काढलं होतं.. आजी समिधाला तिच्या सामानासमवेत आपल्या घरी घेऊन आली.. आजी आणि समिधा आता दोघी मिळून एकत्र राहू लागल्या.. दोघी एकमेकांचा आधार बनल्या.. 

या साऱ्या दुःखात सायली तन्मय आणि त्याचे वडील समिधा सोबत कायम होते..तन्मय तिला आधार देत होता.. तन्मय दिसायला रुबाबदार, राजबिंडा.. भावनाप्रधान, पुरोगामी आशावादी विचारांचा सुस्वभावी मुलगा.. गरीब श्रीमंत हा कोणताही भेदभाव न मानता तो कायम समिधा सोबत  तिच्या मदतीला उभा.. लहानपणापासून एकत्र असल्याने दोघात छान घट्ट मैत्री होती..  महाविद्यालयात जाताना एकत्र असायचे.. एकत्र अभ्यास करायचे.. एकमेकांचे प्रश्न सोडवायचे. कला, क्रीडा, राजकारण, चित्रपट अशा कोणत्याही विषयांवर चर्चा करायचे.. समिधावर कोसळलेल्या या दुःखात तन्मय कायम सोबत होता.. समिधाला तन्मयचा खूप आधार वाटायचा.. त्याच्यासोबत असतांना ती सारं जग विसरून जायची.. त्याच्या शब्दांत गुंतून जायची.. 

कळत नकळत तन्मयला समिधा आवडू लागली होती.. तिचं साधं राहणीमान, तिचं निरागस हास्य, तिचे बोलके पाणीदार डोळे,कधी तिचा लटका राग,तिचं लाघवी बोलणं, प्रेमळ संयमी स्वभाव, तिच्यात असलेली संकटाला सामोरं जाण्याची जिद्द सारं काही त्याला आकर्षित करत होतं.. तशा त्याला खूप मित्रमैत्रिणी होत्या.. पण समिधा  सर्वात जवळची होती.. तिच्या सोबत तो खूप आनंदी राहू लागला होता. तिच्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करू लागला होता.. जागेपणी, स्वप्नांत कायम तिचाच भास होऊ लागला होता.. ती त्याच्या जगण्याचं माध्यम बनली होती.. तो तिच्यावर प्रेम करू लागला होता.. पण कायम एक भिती मनात दाटून येत होती.. 'समिधाने माझ्या प्रेमाला नकार दिला तर..!' मी जगूच शकणार नाही तिच्याशिवाय? जीव जाईल माझा" अशा विचारांनी  तो सैरभैर होऊ लागला होता.. एक दिवस धीर करून त्याने सगळं सांगायचं ठरवलं.. पण बोलून दाखवण्याची हिंमत नव्हती..मग त्याने एक पत्र लिहिलं.. एका लिफाफ्यात टाकून बंद केलं.. तिच्या आवडीचं पुस्तक विकत घेतलं आणि त्यात ते पत्र ठेवलं.. महाविद्यालयातून घरी परतत असताना तन्मयने आपल्या हातातलं पुस्तक समिधाला दिलं आणि तो म्हणाला," समिधा, हे तुझ्या आवडीचं पुस्तक..तू शोधत होतीस ना..हे घे, माझ्याकडून तुला भेट.. नक्की वाच.." समिधाने आनंदाने ते पुस्तक घेतलं आपल्या पिशवीत ठेवून दिलं..

संध्याकाळी समिधा  घरी आली..सायंकाळी देवासमोर दिवा लावून देवाला आणि आईला नमस्कार केला आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली.. थोड्या वेळाने आजीही सगळी कामे उरकून घरी परतली..दोघींनी एकत्र बसून रात्रीचं जेवण उरकलं आणि झोपण्याची तयारी करू लागल्या.. समिधाला झोपण्यापूर्वी वाचन करण्याची सवय होती.. तिने तन्मयने दिलेलं पुस्तक उलगडलं..ते उलगडत असताना त्यातून एक बंद लिफाफा खाली पडला.. काय आहे? हे पाहण्यासाठी तिने लिफाफा फोडला. लिफाफ्यात तन्मयच्या हस्ताक्षरात लिहलेलं पत्र होतं.. समिधा पत्र वाचू लागली.. पत्रातला प्रत्येक शब्द न शब्द जणू जिवंत होत होता.. जणू काही तन्मय मनातलं गुज सांगत होता.

"प्रिय समिधा,

पहिल्यांदाच एका सुंदर मुलीला पत्र लिहतोय.. बोलून दाखवणं जमलं नसतं मला.. म्हणून शब्दांत व्यक्त होतोय.. रोज तुला सांगायचं ठरवतोय. पण धीर होत नाही. खूप बोलायचं असतं पण कळत नाही का? शब्द ओठांतच विरघळून जातात.. कधी हवेत तरंगत रहतात राहतात... मग आपण बुद्धीने विचार करता करता हृदयापुढे हतबल होऊन जातो.. म्हणून मनातलं सारं सांगणार आहे मी तुला..

समिधा, अगदी लहानपणापासून आपण एकत्र वाढलो, मोठे झालो.. आपल्यात एक घट्ट मैत्री होती.. आहे.. तेंव्हाही अगदी प्रत्येक गोष्टीत तू मला हवी असायचीस.. तुझ्याशिवाय चैन पडायचं नाही.. एक सुंदर नातं तुझ्यात न माझ्यात रुजत होतं..तू माझी काळजी घ्यायची.. मलाही आवडायचं ते.. कोणीतरी आपली काळजी घेणारी आहे.. ही भावना खूप सुखावून टाकायची मला…  तुझी प्रत्येक गोष्ट आवडायची मला तेंव्हा नीटसं कळत नव्हतं पण आता उमजू लागलंय..कदाचित हेच प्रेम असावं.. समिधा, तुझं असं माझ्या आयुष्यात येणं मला अगदी नवसंजीवन मिळाल्याचा भास होतोय.. माझं सारं आयुष्यच बदलून गेलेय.. समिधा,!! मला तू खूप खूप आवडतेस.. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. आणि  मला आपली मैत्री कायम अशीच  जपायची आहे. तूझ्या सर्व दुःखाना आपलं करायचं.. डोळ्यांतल्या तुझ्या आसवांना माझ्या डोळ्यांत साठवून ठेवायचं मला.. तू कायम मला प्रत्येक क्षणी माझ्या सोबत हवी आहेस.. म्हणून तुला विचारण्याचं धाडस करतोय.. समिधा, माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील? माझ्याशी लग्न करशील? 

समिधा,मी पत्र लिहताना खूप भाव विभोर झालोय.. आशा करतो तू माझ्या मनातल्या भावनांना समजून घेशील.. मी तुझ्या होकाराची वाट पाहतोय.. तुझ्या होकारावर माझं जीवन अवलंबून आहे ग..!!प्लिज समजून घे ग.!  समिधा माझ्या प्रेमाला होकार देशील ना..? हो म्हणशील ना..? वाट पाहू ना..?

तुझाच फक्त तुझा

तन्मय..

समिधा पत्रातल्या ओळी पुन्हा पुन्हा वाचत होती.. त्या ओळींवरून नकळत बोट फिरत होती.. सारं वाचून ती स्तब्ध झाली.. काय बोलावं ते कळेना..खरंतर समिधालाही तन्मय आवडत होता.. त्याच्या सोबत राहणं तिला छान वाटायचं.. पण असा हा त्याचा प्रस्ताव येईल असं काही तिला अपेक्षित नव्हतं..कधी तिने स्वप्नातही असा विचार केला नव्हता..  क्षणभर हृदयाची स्पंदनं बंद पडावीत अन हलकेच एक कळ यावी अगदी तसंच समिधाला होत होतं.. रोमारोमांत एक वीज चमकून गेली.. एक अनामिक हुरहूर मनात दाटून आली..  समिधा थरथरत होती.. 

तन्मय चांगला मुलगा होता..त्याचं समिधावर खूप प्रेम होतं..समिधा धास्तावली होती..तिच्या आयुष्यात आलेलं हे वादळं संपवून तर टाकणार नाही न..कायमच तिला पराभूत तर करणार नाही न..?? प्रश्नांची  शृंखला सुरू झाली.. "आपल्या आईसारखी माझी अवस्था झाली तर? अयशस्वी प्रेम? आणि समाज काय म्हणेल? लोकांच्या प्रश्नांना मी कशी सामोरी जाऊ? देशमुख काकांच्या उपकारावर वाढलेली मी त्यांची सून कशी होऊ शकते? तन्मय आणि माझा कसा मेळ लागू शकेल? प्रेम आहे म्हणणं खूप सोप्प आहे पण ते दोघांनाही निभावता येईल का? प्रश्नांचा ससेमिरा सुरू झाला.. नाही हे शक्य नाही..!! मनाला निक्षून सांगितलं.. ती देशमुखांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नव्हती.. त्यांचा विश्वासघात तिला करायचा नव्हता..यापुढे तन्मयच्या घरी जायचंच नाही.. म्हणजे तन्मय हळूहळू सारं विसरून जाईल.. आपण आपल्या भावनांवर अंकुश लावायला हवा.. तिने मनाशी एक निर्धार केला.. डोळ्यांत सारखं पाणी दाटून येऊ लागलं.. 

एक आठवडा होऊन गेला होता.. समिधा कॉलेजला गेली नव्हती.. तन्मयच्या घरीही ती आली नव्हती..तन्मय तिच्या घरीपण गेला होता पण ती घरात नव्हती.. तो खूप हिरमुसला.. तन्मयच्या वडिलांनी आजीकडे तिच्या तब्बेतीची चौकशी केली मोठ्या आस्थेने विचारपूस केली विचारलं.. तिच्या अभ्यासाचं कारण सांगून आजीने वेळ मारून नेली..तन्मयला खूप वाईट वाटत होतं..दिवसरात्र त्याच्या डोक्यात कायम समिधाचा विचार..काय झालं असेल? समिधाला आवडलं नसेल का? ती का मला टाळतेय? त्याला कारण समजत नव्हतं..तिच्या विचारांनी तो बैचेन होत होता.. 

काय होईल पुढे? समिधा तन्मयला होकार देईल का?  पाहूया पुढील भागात..

क्रमश:

निशा थोरे

🎭 Series Post

View all