Login

दुभंग भाग ५

Dubhang natyatla


 

दुभंग.. भाग ५


 

पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, समिधाची शिकण्याची आवड पाहून देशमुखांनी समिधाला शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला.. प्राथमिक परीक्षा घेऊन तिला चौथीच्या वर्गात बसवण्यात आले.. समिधा आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर  एक एक पायरी चढत होती.. वरच्या वर्गात जात होती..आपल्या वडीलांप्रमाणे तीलाही चित्रकलेत रस होता..आणि त्यातही ती यश संपादन करत होती.. दहावीचा निकाल लागला.. आणि समिधा पूर्ण नाशिक जिल्ह्यात ती तिसरी आली होती.. आता पुढे..


 

दहावीचा निकाल पाहून तन्मयचे बाबा थक्क झाले.. "पोरीने नाव काढलं घराण्याचं.. " तोंडातून आपसूक कौतुकाचे शब्द बाहेर पडले.. सर्वानाच तिचं कौतुक आणि आश्चर्य वाटत होतं..आजीच्या डोळ्यांत पाणी आलं.. समिधाच्या कष्टाचं चीज झालं होतं.. आजीने सद्गदित होऊन तन्मयच्या बाबांचे पाय धरले.. आणि म्हणाली,"साहेब.., लई उपकार झालं..पोरीच्या समध्या आयुष्याचं कल्याण झालं.. कसं पांग फेडू साहेब..!!" डोळ्यांतून अश्रूंची धारा वाहत होती.. आजीला उठवत तन्मयचे बाबा म्हणाले," अहो मावशी.., हे काय करताय? मी काही उपकार केले नाही.. समिधामध्ये ते गुण उपजतच होते..तिच्या परिश्रमाचं फळ तिला मिळालं.. आणि  कर्ता करविता तोच आहे.. आपण फक्त निम्मितमात्र" समिधा त्यांच्या शब्दांनी भावविभोर झाली वाकून नमस्कार करत म्हणाली,"काका, तुम्ही जे केलंत ते माझ्या जन्मदात्यालाही करता आलं नाही.. तुम्ही देवासारखे पाठीशी उभे होतात म्हणूनच हे शक्य झालं.. खूप खूप उपकार झाले काका..!! मी कोण? कुठची? तुमच्या घरी काम करणारी एक मुलगी..!, पण तुम्ही वडिलांची माया दिलीत.. मला शाळेत घातलंत.. मी आयुष्यभर तुमचे हे उपकार विसरू शकत नाही" डोळ्यातल्या आसवांनी त्यांच्या पायावर अभिषेक केला.. स्मित हास्य करत समिधाला उठवत म्हणाले," खूप आनंदाची गोष्ट आहे ही..तुम्ही दोघेही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालात.. तन्मय, जा मिठाई घेऊन ये मला सर्वांना वाटायची आहे..खूप आनंद झालाय..आणि उठा आता..मस्त गोड जेवणाचा बेत करा..की आज फक्त कौतुकाने पोट भरणार आहात माझं?" त्यांच्या या वाक्याने घरात सर्वत्र हशा पिकल्या..

सर्व कामे उरकून समिधा आपल्या घराकडे वेगाने परतत होती.. तिला खूप आनंद झाला होता..कधी एकदा घरी पोहचतेय आणि आपल्या बाबांना सांगतेय..! असं झालं होतं तिला.. झपाझप पाऊलं टाकत होती.. वाटेत येताना तिने मिठाईच्या दुकानातून थोडी मिठाई घेतली आणि देवाला वाहण्यासाठी फुलांचा हार आणि फुलं घेतली.. घरी पोहचली.. पहाते तर काय..!! प्रभाकर दारू नशेत पलंगावर उताणा पडला होता..समिधा आपल्या बाबांना आवाज देत होती.. पण प्रभाकर शुद्धीत नव्हता..त्याच्यापर्यंत तिचा आवाज पोहचतच नव्हता.. समिधाचा आनंद मावळून गेला..ती देवघराजवळ येऊन बसली.. देवाच्या मूर्तीला फुलांचा हार घातला..तिच्या आईच्या प्रतिमेलाही हार घातला.देवापुढे दिवा लावला.. आणलेली मिठाई देवापुढे ठेवली..

समिधाला आईची खूप आठवण झाली..बराच वेळ ती आईच्या फोटोजवळ जाऊन आसवं टिपत बसली.. आईशी मनातलं गुज सांगू लागली....,"आई ग..! का गेलीस ग मला सोडून..! खूप आठवण येतेय ग तुझी..!!  बघ तुझी समी दहावी पास झाली जिल्ह्यात तिसरी आली..तू आज असायला हवी होतीस ग..!! माझं कौतुक करायला,मायेने मला कुशीत घ्यायला.. बाबांना बघ काहीच फरक पडत नाही..दारूच्या नशेपुढे काहीच सुचत नाहीये..आई, बाबा कधी ग चांगले वागतील..? कधी प्रेमाने मला जवळ घेतील? आई ग..!! मी खूप शिकणार आहे..तुझं स्वप्न पूर्ण करणार आहे..बाबांचंही स्वप्न पूर्ण करेन.. तू असशील ना माझ्यासोबत ? तुझा आशिर्वाद राहील ना ग? " समिधा बराच वेळ आईच्या प्रतिमेशी मनातलं गुज सांगत होती.. डोळयातून आनंदाचे अश्रू झरत होते..

समिधाला आता पुढील शिक्षणाचे वेध लागले होते.. तिला पुढे शिकायचं होतं.. कलाक्षेत्रात नाव करायचं होतं.. पण मार्ग सापडत नव्हता.. याक्षणीही तन्मयचे बाबाच तिच्यासाठी अगदी देवासारखे धावून आले.. त्यांनी जवळच्या महाविद्यालयात कलाशाखेत समिधाला प्रवेश घेऊन दिला.. तन्मयने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला.. दोघेही एकाच महाविद्यालयात जाऊ लागले.. समिधाला पुन्हा एकदा नवसंजीवन मिळालं.. देशमुखांच्या कृपेने आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या हातांना बळ मिळालं होतं..ती मुक्तपणे स्वच्छंदी पाखरांप्रमाणे अवकाशात विहार करू शकत होती.. समिधाला वाचनाची खूप आवड होती.. तन्मयचे बाबा घराजवळच्याच एका वाचनालयाचे सभासद होते तिथून ते तिला पुस्तकं आणून देत असत.. समिधा एखादया अधाशासारखी सारी वाचून काढत होती.. पुस्तकांच्या विश्वात ती रमत होती.. ती पुस्तकांना मित्र मानून त्यांच्याशी संवाद साधत होती. सारा वेळ पुस्तकांत गुरफटून राहत होती पण तिची तृष्णा भागत नव्हती.. तिची ही वाचनाची भूक त्यांच्या नजरेतून सुटली नाही.. 'समिधासाठी अजून काय करता येईल?' ते विचार करू लागले.. अचानक त्यांच्या डोळ्यांत एक चमक आणि चेहऱ्यावर एक आनंदाची लकेर दिसली.. वाचनालयाच्या ग्रंथपालांशी समिधाविषयी बोलून घेतलं आणि तिच्यासाठी 'ग्रंथपाल मदतनीस' म्हणून वाचनालयात अर्धवेळ नोकरीसाठी विनंती केली.. त्यामुळे ग्रंथपालांना मदत होणार होती आणि समिधाची वाचनाची भूक शमणार होती.. तिला आर्थिक मदत होणार होती..देशमुखांच्या विनंतीला मान देत ग्रंथपालांनीही त्यांचा प्रस्ताव आनंदाने मान्य केली.. समिधाला वाचनालयात अर्धवेळ नोकरी मिळाली.. समिधाचा आनंद गगनात मावेनासा झाला..आता ती स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः भागवू शकत होती.. 

कालचक्र आपल्या गतीनं वेगात पुढे सरकत होतं.. समिधा सायली, तन्मय सारी मुलं हळूहळू मोठी होत होती..तिघांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत होती.. महाविद्यालयाचे सोनेरी दिवस..फुलपाखरांचे सुंदर मखमली दिवस.. झोपाळ्या वाचून झुलण्याचे दिवस..  मुळातच सुंदर समिधा तारुण्यात प्रवेश केल्यावर अजूनच छान दिसू लागली होती.. आजीला आता तिची जरा जास्तच काळजी वाटू लागली.. आजूबाजूला राहणाऱ्या द्वाड मुलांपासून काळजी घ्यायला सांगून आजी समिधाला सारख्या सूचना देऊ लागली.. आणि समिधा मग एक घट्ट मिठी मारून 'काही काळजी करू नको' म्हणत आजीला आश्वस्त करत होती..

महाविद्यालयातही समिधाने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली.. प्रत्येक विषयात प्राविण्य मिळवत ती यश संपादन करत होती.. आंतरमहाविद्यालयीन भरणाऱ्या चित्रकला स्पर्धेत समिधाला 'पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं.. आणि महाविद्यालयाचं नाव प्रकाशझोतात आणलं.. तिचं हे यश पाहून महाविद्यालयाने राज्यपातळीवर होणाऱ्या चित्रकला स्पर्धेत तिला महाविद्यालयाच्या वतीने भाग घेण्यासाठी नामांकित करण्यात आलं.. आपल्या महाविद्यालयाचं नाव त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचंही नाव   उज्जवल करत समिधा राज्यपातळीवर संपूर्ण भारतातून दुसरी आली.. किती मोठी गोष्ट..!!ज्या अपयशाने खचून जाऊन तिचे बाबा, प्रभाकर व्यसनाधीन झाला होता.. त्याचं ते अपयशाचा कलंक समिधाने पार पुसून टाकला होता..महाविद्यालयात समिधा सर्व शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा कौतुकाचा विषय बनली होती..तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वामूळे आणि लाघवी स्वभावामुळे ती सर्वांची आवडती विद्यार्थिनी बनली होती.. 

प्रभाकरला जेंव्हा आपल्या मुलीने मिळवलेल्या यशाबद्दल समजलं तेंव्हा त्याला खूप आनंद झाला..डोळ्यातून अविरत पाऊस बरसत राहिला.. समिधाच्या बालपणापासून तिच्यावर केलेला अन्याय, तिला दिलेला त्रास डोळ्यासमोर तरळत राहिला..पश्चातापाचे अश्रू डोळ्यातून वाहू लागले.. आणि त्याने आपल्या मुलीला समिधाला मायने जवळ घेतलं..तिची क्षमा मागितली..दोघांच्याही डोळ्यांत पाणी होतं.. आज समिधाने तिला हवं असलेलं सारं कमावलं होतं.. शिक्षण,यश, आजीची माया,आणि तिचा लहानपणी हरवून गेलेला तिचा बाबा सारं काही तिला मिळालं होतं..पण तिच्या या सुखाला पुन्हा एकदा ग्रहण लागलं.. लहानपणापासून दुःख सोसणाऱ्या समिधाचा वनवास अजून संपला नव्हता.. संकटांनी अजून पाठ सोडली नव्हती.. प्रभाकर व्यसनामूळे पुरता खंगला होता.. दारूच्या नशेने त्याचं शरीर पूर्णपणे पोखरून टाकलं होतं.. सतत दारू पिण्याने आता शरीर साथ देत नव्हतं.. खूप त्रास होत होता..दारूच्या व्यसनापायी संपूर्ण आयुष्य मरणयातना भोगत राहिला.. नात्याचीही किंमत केली नाही.. सोन्यासारख्या आपल्या पत्नीला गमावून बसला.. मुलीला कधीही माया लावली नाही..कायम तिचा द्वेष करत राहिला..पण तरीही समिधा कायम त्याच्यावर माया करत राहिली.. आताही त्याची काळजी घेत होती.. शुश्रूषा करत होती..औषधोपचार करत होती.. 

नियतीच्या मनात मात्र वेगळंच काही ठाण मांडून बसलं होतं.. आणि अखेरीस एक दिवस प्रभाकरने अंतिम श्वास घेतला.. प्रभाकरची प्राणज्योत मालवली.. तो सारं काही मागे टाकून निघून गेला..अदितीच्या वाटेने.. कदाचित तिला क्षमा मागण्यासाठी..!! समिधा पुरती कोसळली..एकमेव असलेलं रक्ताचं नातं आज तिला सोडून गेलं होतं..खऱ्या अर्थाने ती आज पोरकी झाली होती.. जिवंत असतांना कधीच तिला बाबांचं प्रेम मिळालं नाही..पण तिच्या मनात कुठेतरी त्यांच्या बद्दल मायेचा ओलावा होता..तोही आज संपुष्टात आला.. 

पुढे काय होईल? समिधा या दुःखातून कशी सावरेल? कोण असेल तिच्या साथीला? पाहूया पुढील भागात

क्रमशः

©® निशा थोरे..

🎭 Series Post

View all