दुभंग.. भाग ४
पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, समिधाला पोरकं करून तिची आई देवाघरी गेली होती.. प्रभाकर रात्रंदिवस नशेत धुंद असायचा.. समिधा एकटी झाली होती.. समिधाला पाहणारं कोणी नव्हतं.. अशावेळी शेजारी राहणाऱ्या रखमा आजी मदतीला धावून आल्या.. तिचा सांभाळ करू लागल्या.. समिधा रखमा आजीसोबत घरकाम करू लागली.. आजीला मदत करू लागली.. तिची शिकण्याची आवड, दुर्गम ईच्छा पाहून तन्मयच्या वडिलांनी तन्मय आणि सायली शिकत असलेल्या शाळेत समिधाचा प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आता पुढे..
दुभंग.. भाग ४
समिधा आज खूप आनंदात होती.. आज ती शाळेत जाणार होती.. सायली आणि तन्मय सोबत तीही नवनवीन गोष्टी शिकणार होती.. तन्मयचे बाबा समिधाला घेऊन शाळेत आले.. मुख्याध्यापकांच्या केबिनच्या बाहेर येऊन थांबले.. मुख्याध्यापकांनी त्या दोघांना आत बोलावलं.. जुजबी चौकशी केली.. त्यांनी समिधाला काही प्रश्न विचारले.. समिधानेही सर्व प्रश्नांची पटापट उत्तरं दिली.. मुख्याध्यापक साहेब खुश झाले.. तिचा चुणचुणीतपणा त्यांना खूप आवडला.. तन्मयच्या बाबांनी तिची सर्व कहाणी त्यांना सांगितली..त्यांनाही ते सारं ऐकून वाईट वाटलं.. समिधाकडे पाहून ते म्हणाले,"देशमुख साहेब, मुलगी हुशार आहे..पण वय जास्त असल्याने लहान मुलांच्या वर्गात बसवता येणार नाही..तिला चौथीच्या इयत्तेत प्रवेश घ्यावा लागेल.. त्यासाठी दोन महिन्यांनी तिची परीक्षा घेऊनच शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.. तुम्ही दोन महिने तिच्याकडून परीक्षेची तयारी करून घ्या आणि मग तिला घेऊन या.. ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली तरच पुढे प्रवेश देण्यात येईल" तन्मयच्या बाबांनी होकारार्थी मान डोलावली, "भेटू दोन महिन्यांनी" असं म्हणत त्यांचा निरोप घेतला..
घरी परतत असतांना तन्मयच्या बाबांनी समिधाला नीट समजावून सांगितलं..,"अभ्यास करावा लागेल..तरच शाळेत जाता येईल." समिधाने मान हलवून होकार दिला.. रानडे गुरुजी शिकवणीला आल्यावर त्यांनी समिधाच्या शाळेत जाण्याबद्दल सांगितलं..तिची दोन महिन्यांनी असणाऱ्या परीक्षेची तयारी करून घ्यायला सांगितलं.. समिधा खूप आनंदी होती.. रानडे गुरुजींनी तिला शिकवायला सुरुवात केली.. समिधाही अभ्यासाला लागली..मेहनत घेत होती.. मूलतः हुशार असल्याने, आणि आकलनशक्तीही खूप छान असल्याने ती खूप लवकर अभ्यासक्रम आत्मसात करत होती.. दोन महिने खूप अभ्यास केला.. आणि मग मुख्याध्यापकानी घेतलेल्या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली.. तिला चौथीच्या वर्गात प्रवेश मिळाला.. तन्मयचे बाबा,रखमा आजी आणि समिधाला खूप आनंद झाला होता.. समिधाचं शाळेत जाण्याचं स्वप्नं पूर्ण झालं होतं..सायली आणि तन्मयही खुश होते..त्यांची मैत्रीण त्यांच्यासोबत शाळेत येणार होती.. तन्मयच्या बाबांनी समिधासाठी नवीन दप्तर,वह्या पुस्तकं, पाटी पेन्सिल, गणवेश सारं काही आणून दिलं..ते सारं काही पाहून इवलासा तो जीव किती हरकून गेला होता..!!
समिधा दररोज शाळेत जाऊ लागली.. अभ्यास करू लागली.. दिवसेंदिवस समिधा प्रत्येक विषयांत तरबेज होऊ लागली होती.., प्रत्येक विषय आत्मसात करत होती.. हुशार होती..सारेच शिक्षक तिच्या बुद्धीमत्तेवर खुश होते..ती सर्वांची लाडकी विद्यार्थिनी बनली.. समिधालाही लहानपणापासूनच तिच्या बाबांप्रमाणे चित्रकलेची आवड होती.. खूप सुंदर चित्र काढायची..चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत तिचा पहिला क्रमांक ठरलेला..तीच विजेती असायची.. सर्व विद्यार्थ्यांना तिचं फार कौतुक वाटायचं..एक एक गड सर करावा तसं समिधा प्रत्येक वर्गात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होती पुढच्या वर्गात जात होती..
दिवस सरत होते.. समिधा आजीबरोबर चार घरचं घरकाम करून तिला मदत करून मग शाळेत जायची.. प्रभाकरमध्ये काहीच सुधारणा नव्हती.. दिवसेंदिवस तो जास्तच पिऊ लागला होता..दारू पिऊन कुठेही पडलेला असायचा.. सर्वाना आश्चर्य वाटायचं..एवढा मोठा शिकलेला..सुशिक्षित व्यक्ती व्यसनांमुळे कसा काय वाया जाऊ शकतो? मग त्या शिक्षणाचा काय उपयोग..!! जर ते शिक्षण विचारात प्रगल्भता आणू शकणार नसेल तर अशा शिक्षणाचा काय उपयोग..!! लोक त्याची खिल्ली उडवायचे.. मग समिधा शेजारच्यांच्या मदतीने त्याला घरी घेऊन यायची.. काहीजण समिधाबद्दल वाईट वाटून हळहळत असायचे.. आईविना, वडिलांविना पोरकी झालेली समिधा आसवं गाळत बसायची..
दिवस पुढे सरकत होते. समिधा ,सायली आणि तन्मय सारी मुलं मोठी होत होती..बालपण हळूहळू सरत होतं.. तारुण्यात पदार्पणाच्या दिशेने वाटचाल सुरू होती.. समिधाचं बालपण वडीलांना सावरण्यात जात होतं..काही दिवसांपूर्वी ऋतुचक्राचा कौल आला.. आईविना पोर.. आजीने मायेने जवळ घेत साऱ्या गोष्टी समजावून सांगितल्या.." आता स्वतःला अधिक जपावं लागेल तुला.." काळजीपोटी सूचना दिल्या.. समिधाच्या आयुष्यात एक आमूलाग्र बदल होत होता. आणि तो तिच्या वागण्या बोलण्यात दिसत होता..
यंदाच्या वर्षी समिधा दहावीच्या परीक्षेला बसली होती.. दिवसरात्र एक करून समिधा अभ्यास करत होती.. प्रभाकरच्या रात्रीच्या गोंधळात अभ्यास होणं शक्य नव्हतं.. मग तो झोपल्यावर पहाटे लवकर उठून ती अभ्यास करत होती.. प्रचंड मेहनत घेत होती.. एकीकडे तन्मय, सायली आणि समिधा यांची खूप छान गट्टी जमली होती..तिघे कायम एकत्र असायचे.. अभ्यासाला पण एकत्रच बसायचे.. आणि दुसरीकडे तन्मयच्या आईला आपल्या नवऱ्याचं, मुलांचं वागणं पटत नव्हतं..तन्मयच्या आईला नेहमी वाटायचं नोकरांना जास्त डोक्यावर बसवून घेऊ नये.. नाहीतर ते डोईजड होतात.. मग ते खाल्या मिठाला जागत नाहीत.. त्यांच्या लायकीप्रमाणेच वागावं.. नाहीतर ते त्यांची पायरी सोडून वागतात..त्यामुळे तन्मयची आई नेहमी समिधाचा राग करायची.. पण तन्मयचे बाबा खूप कडक शिस्तीचे होते..तन्मयच्या वडिलांसमोर त्यांचं काही चालत नव्हतं.. ते म्हणतील ती पूर्व दिशा असायची.. त्यांचे निर्णय अंतिम असायचा.. त्यामुळे त्यांच्या मनात नसतानाही, त्यांचा समिधाच्या शिक्षणाला विरोध असतानाही तन्मयच्या बाबांनी समिधाचं शिक्षण चालू ठेवलं होतं..
शालान्त परीक्षा झाल्या आणि निकालाची वेळ जवळ आली..तन्मय, समिधाच्या मनातली धाकधूक वाढली होती.. आणि अखेरीस निकाल जाहीर झाला.. तन्मय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता.. आणि समिधाचा निकाल घेऊन चक्क मुख्याध्यापक आणि तिचे वर्ग शिक्षक देशमुखांच्या घरी आले.. समिधाला ९५% गुण मिळवून नाशिक जिल्ह्यात तिसरी आली होती.. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला.. देशमुखांच्या अथक मेहनतीचं फळ मिळालं होतं.. समिधाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून येऊ लागले.. डोळ्यातलं तळ रितं होऊ लागलं..
पुढे काय होतं समिधाच्या आयुष्यात? पाहूया पुढच्या भागात..
क्रमशः
©® निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा