Login

दुभंग.. भाग ३

Dubhang natyatala

दुभंग.. भाग ३


 

पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, समिधाला आलेल्या तन्मयच्या पत्रामुळे तिचा भूतकाळ तिला आठवू लागला.. तिची आई अदिती आणि बाबा  प्रभाकर यांचा प्रेमविवाह झाला..पण आतंरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत आलेलं अपयशाने प्रभाकर खचुन गेला आणि व्यसनाधीन झाला..त्याच्या त्रासाला कंटाळून ती आत्महत्या करून हे जग सोडून निघून गेली.. आता पुढे..

दुभंग.. भाग ३


 

अदिती समिधाला पोरकी करून निघून गेली कायमचीच.. समिधा खूप एकटी पडली.. एवढ्या लहान कोवळ्या वयात..!! एवढ्या मोठ्या जगात ती एकाकी झाली होती.. शेजारीपाजारी म्हणायचे,"तुझी आई देवाघरी गेली.. देवाच्या घरी म्हणजे आकाशात गेली" समिधाला ते खरं वाटायचं.. ती आकाशाकडे एकटक पाहत बसायची.. रात्रीत एकटीच ती आईच्या आठवणीत रडत बसायची.. तिला वाटायचं," आई आकाशातून तिला पाहतेय.. हात पसरवून तिला बोलवतेय.रात्री आई स्वप्नांत यायची,.समिधाच्या केसांवरून हात फिरवायची.. कुशीत घेऊन तिला प्रेमाने थोपटून, अंगाईगीत गाऊन झोपवायची.. या आभासासमवेत ती मोठी होऊ लागली.. प्रभाकरला काहीच फरक पडला नव्हता.. कारण काही समजायला तो शुद्धीत तरी कुठे होता..कायम प्यायलेला असायचा.. आपल्याला एक मुलगी आहे हे तो पूर्णपणे विसरून गेला होता..सर्व नाती तो पायदळी तुडवून बेफिकीर झाला होता..त्याला कसलीच तमा उरली नव्हती.. प्रभाकर समिधाला सारखं रागावून, टाकून बोलायचा," तुझ्या आईसोबत तू का नाही गेलीस? माझ्या मागची पीडा गेली असती.." असंच काहीही बडबड करायचा.. कधी कधी तर रागाने तिच्यावर हातही उचलायचा.. समिधा निमूटपणे सारं सहन करायची.. तीचं तिच्या बाबांवर खूप प्रेम होतं.. आयुष्यात आलेलं अपयश आणि  आईच्या सोडून जाण्याने आपले बाबा असं कठोर वागत असतील ती स्वतःच्या मनाची समजूत घालायची.. त्याही अवस्थेत तिला बाबांना जपायचं होतं.. त्यांची आई बनून माया करायची होती..जणू आई तिच्या हातात बाबांना सोपवून गेली होती.. तिला शिकवून गेली होती.. निर्भीडपणे जगायला..संकटाशी झुंजायला.. त्यामूळे सारं सहन करण्या पलीकडे तिच्याकडे कोणताच मार्ग शिल्लक उरला नव्हता.. 

अंधाऱ्या रात्रीत दीपस्तंभ दिसावा.., बुडणाऱ्याला लाकडी काठीचा आधार मिळावा अशी एक व्यक्ती समिधाच्या जीवनात आली.. तिच्या जखमांवर फुंकर घातली ती म्हणजे तिच्या शेजारी राहणाऱ्या रखमा आजीने… आजूबाजूला राहणारे सर्वच शेजारी त्यांना 'आजी' म्हणायचे.. आजी समिधाला मायेने जवळ घ्यायची खाऊ पिऊ घालायची.. आईच्या मायेने जीव लावायची.. एवढ्या लहान वयात समिधाला आलेलं पोरकंपण..आजीच्या डोळ्यांत समिधासाठी पाणी यायचं.. समिधाची आई अदितीही रखमा आजीजवळच तिचं मन मोकळं करायची.. आजी तिलाही समजून सांगत असे..कायम आधार देत असे.. 'सगळं ठीक होईल तू काळजी करू नको..' आजी तिच्या प्रेमळ शब्दांनी अदितीला आधार द्यायची.. पण दुःखाचा अतिरेक झाला आणि अदितीने असा भयंकर टोकाचा निर्णय घेतला होता.. दैव आणि दुसरं काय..!! आजीने  मनाची समजूत घातली..  आणि समिधाला आपली मुलगी मानून सांभाळ करू  लागली.. 

रखमा आजी फारच धीराचा होत्या.. आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपल्या दोन मुलांना त्यांनी कष्ट करून वाढवलं होतं.. शिकून सवरून समाजात मानानं जगण्याच्या योग्य बनवलं होतं.. आजीला दोन मुलं होती.. संजय आणि विजय.. संजय डॉक्टर झाला आणि विजय इंजिनिअर..ज्या मुलांसाठी तिने इतकं दुःख सोसलं.. मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं.. आपल्या पिल्लांना चोचीत अन्न आणून जगवलं..पिलांच्या पंखात बळ दिलं.. तीच तिची पिल्लं पंखात बळ आल्यावर उडून गेली.. त्यांची स्वतःची घरं झाल्यावर ती रखमा आजीला सोडून गेली होती.. स्वतःच्या संसारात त्यांना रखमा आजीकडे पाहायला वेळ नव्हता.. रखमा आजीला समिधाबद्दल कणव वाटू लागली.. त्या तिच्यावर आई होऊन माया करू लागल्या.. तिचा सांभाळ करू लागल्या.. हळूहळू समिधा मोठी होत होती.. समिधानेही कधी आजीला त्यांच्या मुलांची आठवण होऊ दिली नाही.. तिनेही पोटच्या मुलांइतकीच माया लावली होती.. 


 

साऱ्या अडचणींना तोंड देत समिधा जगात होती.. रोज वडिलांचा मार, शिव्या सहन करत होती.. फक्त सोबत होती ती आईची प्रेरणा.. तिने दिलेले संस्कार.. समिधा आणि रखमा आजी दोघीही दुःखाने पोळलेल्या.. एकमेकांच्या घावावर फुंकर घालू लागल्या..रखमा आजी आणि समिधा एकमेकांच्या आधार बनल्या.. प्रभाकर काहीच काम करत नव्हता..पैसा कुठून येणार..उपासमार होऊ लागली.. आजीच्या जीवावर बसून खाणं तीला पटेनासं झालं.मग समिधा आजीबरोबर घरकाम करण्यासाठी जाऊ लागली.. वयाच्या सहाव्या वर्षी तिच्या इवल्याशा हातात झाडू आणि केर काढण्याची सुपली आली होती.. हेच प्राक्तन होतं.. न डगमगता ती आजीसोबत घरकामाला जाऊ लागली..  समिधाला लहानपणापासून शिकण्याची खूप आवड होती.. पण अशा वातावरणात ते शक्य नव्हतं..दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करून त्या दोघी आपलं पोट भरत होत्या.. रोजच्याच वाटेवर एक शाळा लागायची..समिधा खूप वेळ त्या शाळेकडे बघत बसत असे.. तिथे विद्यार्थ्यांना पाहून ती नाराज होत असे..आपणही शाळेत जावं, दप्तर,पाटी पेन्सिल, नवीन पुस्तके, नवीन गणवेश असावा सारखं वाटत होतं.. आजीला तिचं मन कळत होतं..पण इथे रोजच्या पोटाची भ्रांत होती, मग शिक्षण कुठून घेणार..!!  जवळ पैसा नसल्याने समिधाच्या मनाची घालमेल उमजूनही आजीही गप्प बसली होती..

दिवस पुढे सरत होते.. समिधा हळूहळू जगण्याचा प्रयत्न करत होती.. चार घरी घरकाम करून आपली उपजीविका करत होती.. अशा बिकट अवस्थेत समिधाला एक आधार, योग्य किनारा मिळाला.. रखमा आजी 'श्रीधर देशमुख' यांच्या घरी घरकाम करण्यासाठी जात असे.. समिधा सुद्धा आजीबरोबर जात होती.. देशमुखांना दोन मुलं होती.. "सायली आणि तन्मय" दोघेही हुशार, गोंडस, मनमिळावू.. आजीसोबत येणाऱ्या समिधाशी त्यांची मैत्री झाली.. ,त्यांनी कधी तिच्यासोबत वाईट वर्तन केले नव्हते.. आजी कामात असताना समिधाला ते त्यांच्या सोबत खेळायला घ्यायचे..आपल्या ताटातील घास तिला भरवायचे.. तिघांत खूप घट्ट मैत्रीचं नातं रुजत होतं.. समिधा त्यांच्या सोबत रमू लागली.. ग्रीष्मात एक हवेची झुळूक यावी आणि मनाला गारवा मिळावा तसंच काहीसं समिधाच्या आयुष्यात घडत होतं..वडिलांच्या त्रासाने रक्तबंबाळ झालेल्या समिधाला त्या दोघांकडून थोडासा प्रेमाचा ओलावा मिळायचा.. समिधा तेवढ्यातही आपली तृष्णा भागवून घ्यायची.. आनंदी रहात होती.. 

रोज संध्याकाळी सायली आणि तन्मयला शिकवण्यासाठी त्यांच्या शाळेतले शिक्षक,  रानडे गुरूजी  येत असत.. त्या दोघांना शिकवत असताना समिधा सारं लक्ष देऊन ऐकत असे.. सगळं आत्मसात करत असे.. समिधा खूप हुशार होती.. गुरुजींनी शिकवलेलं ती सारं आत्मसात करायची.. एक दिवस काय झालं..!! सायली आणि तन्मयला  गुरुजी शिकवत होते.. त्यांनी तन्मयला मराठीच्या कवितेतला प्रश्न विचारलं..तन्मयला उत्तर सांगता आलं नाही..समिधाने हळूच त्याच्या कानात उत्तर सांगितलं.. ही गोष्ट गुरुजींच्या लक्षात आली..त्यांनी तिला कविता म्हणायला सांगितली.. समिधाने पटापट साऱ्या कविता म्हणून दाखवल्या..   तन्मयचे बाबा हे सारं दूरून पाहत होते.. त्यांना समिधाचं कौतुक वाटलं.. त्यांना तिच्या डोळ्यांत एक वेगळी चमक दिसायची.. कधी कधी त्यांना तिचं खूप वाईटही वाटायचं.. समिधाच्या चिमकुल्या हातात पुस्तकं असण्याऐवजी केर काढण्याची झाडू सुपली आली.. पण समिधाची शिकण्याची इच्छा तिचा उत्साह तिच्या वागण्या बोलण्यात नेहमी दिसायची.. तन्मयच्या बाबांना तिच्या गुणांना असं वाया जाऊ द्यायचं नव्हतं.. आणि मग त्यांनी समिधाचं नाव तन्मयच्या शाळेत  दाखल करण्याचा निर्णय घेतला..

पुढे काय होतं? समिधा शाळेत जाऊ शकेल का? पाहूया पुढच्या भागात..