Login

दुभंग..भाग २

Dubhang natyatla

दुभंग.. भाग २


 

पूर्वाध:- कथेच्या सुरुवातीला आपण पाहिलं की, आलेल्या वादळामुळे बरीच पडझड झाली होती.. समिधाच्या आयुष्यातही असंच एक वादळं येऊन गेलं होतं.. आज त्या वादळाची तिला तन्मयच्या आलेल्या पत्रामुळे आठवण झाली..पत्र वाचताना तिचे डोळे भरून येत होते आणि तिचं मन भूतकाळात गेलं..आता पुढे..


 

दुभंग.. भाग २

'समिधा' अगदी नावाप्रमाणेच गोड, गोंडस सुशील मुलगी.. सोनपरी..मितभाषी.. गोरा वर्ण..पाणीदार डोळे, इवलीशी जीवणी.. काळेभोर केस.. खूप सुंदर दिसायची.. अगदी परिकथेतील राजकुमारी.. पण या राजकुमारीला खळखळून हसताना कुणीही पाहिलं नव्हतं.. तीच निरागस बाल्य हरपून गेलं होतं.. घरात अठरा विश्व दारिद्य्र पाचवीला पूजलेलं.. रोज रात्री आईवडिलांच्या भांडणाचा आवाज.. आईला होणारी मारहाण,आईचा तो जीवघेणा आक्रोश, तिच्या बाबांचे अपशब्द,अर्वाच शिव्या रोज समिधाच्या कानावर पडायच्या.. दारू पिऊन आल्यावर तिच्या बाबांना काहीच सुचायचे नाही....तिचे बाबा आईला खूप मारहाण करायचे.. कायम टाकून बोलायचे..आपल्या वडिलांच्या अशा विचित्र वागण्यामुळे तिच्या इवल्याशा बालमनावर विपरीत परिणाम होत होता.. पण तिच्या वडिलांना कसलीच पर्वा नव्हती किंबहुना शुद्धच नव्हती..

समिधा तिच्या बाबांना खूप घाबरायची..आईला मारहाण करताना ती आईला घट्ट मिठी मारून बिलगून राहायची.. इवलासा जीव बावरून जायचा.  समिधाला  काहीच समजायचे नाही.. ती आईला नेहमी प्रश्न विचारायची..," आई, बाबा कसे असे करतात? त्यांना आपण आवडत नाही का? का ते रात्री तुला मारतात? मला त्यांची खूप भीती वाटते ग..!!" समिधा आईच्या कुशीत शिरून खूप रडायची.. तिची आई तिला पोटाशी घट्ट पकडून डोळ्यांतले अश्रू टिपायची.. मायेने तिच्या केसांवरून हात फिरवत आई समिधाला समजून सांगायची,"समी,, तुझे बाबा असे नव्हते ग..!! खूप प्रेम होतं त्यांचं आपल्यावर..अजूनही आहे.." मग तिची आई जुन्या आठवणीत रमून जायची.. समिधाला तिच्या बाबांविषयी सांगताना एक नवा उत्साह तिच्यात संचारलेला असायचा.बाबांनी दिलेला त्रास, मारहाण सारं काही विसरून जायची.. भूतकाळातल्या रम्य आठवणी सांगताना तिचा चेहरा फुलून जायचा..समिधालाही आईच्या तोंडून तिच्या त्या  जुन्या गोड आठवणी ऐकताना छान वाटायचं.. आईच्या  चेहऱ्यावरचा ओंसडून वाहणारा उत्साह पाहून तीही खुश व्हायची..

पूर्ण नाशिक शहरात "प्रभाकर जोगळेकर" हे नाव खूप प्रसिद्ध होतं..हे नाव ऐकताच अप्रतिम चित्रकला साऱ्यांच्या डोळ्यांसमोर यायची.. त्याच्या चित्रकलेने संपूर्ण कॉलेजला भुरळ पाडली होती.. प्रभाकर खूप सुंदर चित्र काढायचा.. कल्पेनेचे रंग भरायचा.. जादू होती त्याच्या रंगांच्या कुंचल्यात.. शाळा कॉलेजात त्याने अनेक राज्यस्तरीय बक्षिसे मिळवली होती..सारेजण त्याचं कौतुक करायचे..प्रभाकरला खूप आवडायचं..अगदी अंगावर मूठभर मांस चढल्यासारखं वाटायचं.. त्याने नुकतेच भरवलेल्या 'आर्ट गॅलरी' या प्रदर्शनात तर त्याच्या सर्व चित्रांची खूप प्रशंसा झाली होती.. लोकांची प्रशंसापत्रे आली होती.. त्यामूळे प्रभाकर खूप आनंदी होता.. याच प्रदर्शनात प्रभाकरची 'अदिती'शी ओळख झाली.. प्रभाकरने काढलेली पेंटिंग्स पाहून ती अगदी भारावून गेली होती.. खरंतर तिनेच प्रभाकरशी ओळख करून घेतली होती.. याच वर्षी तिने त्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.. आणि प्रभाकरच्या चित्रांची ती प्रचंड चाहती झाली..दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत असूनही कधी बोलण्याचा प्रश्न आला नव्हता.. आज पहिल्यांदाच ती त्याच्याशी बोलत होती..प्रदर्शनावरून घरी परत असताना प्रभाकरचाच विचार तिच्या मनात घोळत होता.. त्याचं ते लाघवी बोलणं, त्याचं वागणं,त्याचा तो रुबाबदार चेहरा पुन्हा पुन्हा तिला आठवत होतं..

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारत असताना कालच्या प्रदर्शनाचा, प्रभाकरचा विषय निघाला.. सर्वांनाच प्रदर्शन खूप आवडलं होतं.. तिच्या मैत्रिणीकडूनच अदितीला समजलं की, प्रभाकरचे आईवडील  त्याच्या लहानपणीच त्याला सोडून देवाघरी गेले होते..मामाच्या छत्रछायेखाली तो लहानाचा मोठा झाला होता..खूप हलाकीच्या परिस्थिती असतानाही त्याने त्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं.. अर्धवेळ नोकरी करून त्याने आपल्या शिक्षणाचा भार स्वतःच उचलला होता.. खूप कष्टाळू, प्रामाणिक मुलगा होता.. दिसायलाही देखणा, रुबाबदार होता.. कॉलेजमध्ये सर्व मुलींमध्ये तोच नेहमी आवडीचा चर्चेचा विषय बनला होता.. त्याच्याशी दोन शब्द बोलायलाही मुली धडपडायच्या..प्रभाकर खूप छान कविता करायचा.. खूप सुंदर शब्द पेरायचा.. जादू होती त्याच्या लिखाणात.. पुढे अदिती आणि प्रभाकरची ओळख वाढत गेली..भेटीगाठी होत गेल्या.. आणि कळत नकळत अदिती प्रभाकरकडे आकर्षित होऊ लागली.. त्याच्या चित्रांवर, त्याच्या कलागुणांवर प्रेम करता करता ती त्याच्या प्रेमात कधी पडली..!!तीचं तिलाच समजलं नाही.. अदिती प्रभाकरवर मनापासून प्रेम करू लागली होती.. प्रभाकरलाही अदिती आधीपासूनच खूप आवडत होती.. त्यानेही तिच्या प्रेमाचा स्वीकार केला..  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रभाकर एका खाजगी कंपनीत नोकरीवर रुजू झाला.. 

म्हणतात ना..!! "प्रेम आंधळं असतं.. गरीब श्रीमंत, उच्च- नीच, काळा-गोरा असा कोणताही भेद मानत नाही.. आपल्या जोडीदाराशिवाय कोणताच विषय मनाला शिवत नाही" अदितीच्या बाबतीतही तसच झालं..प्रभाकरच्या प्रेमात आंधळी झाली होती ती..अदिती प्रभाकरच्या प्रेमात अखंड बुडाली होती.. चित्रातल्या सुंदर रंगाप्रमाणे प्रभाकर आपल्याही जीवनात सप्तरंग भरेल..आपल्याला कायम आनंदी ठेवेल..असं तिला वाटलं.. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला..पण अदितीच्या घरी हा 'प्रेमविवाह' मान्य नव्हता.. गडगंज श्रीमंतीत वाढलेली एकुलती एक मुलगी आणि एका कफल्लकाशी लग्न..!! अदितीच्या वडिलांनी साफ नकार दिला.. पण अदिती हार मानायला तयार नव्हती.. प्रभाकरशिवाय ती दुसऱ्या कोणाचा जोडीदार म्हणून विचार करू शकत नव्हती.. मग अखेरीस आपल्या आईवडिलांचा विरोध पत्करून ती प्रभाकरशी विवाहबद्ध झाली.. सुसंस्कृत,श्रीमंत घरातली, लाडाकोडात वाढलेली अदिती एका गरीब, प्रामाणिक कलाप्रेमी युवकाच्या प्रेम बंधनात गुंफली गेली.. आलिशान बंगल्यात राहणारी अदिती छोटयाशा खोलीत राहू लागली होती.. पण तिची काहीही तक्रार नव्हती.. त्याही परिस्थितीत ती प्रभाकर सोबत आनंदात राहत होती.. 

अदिती आणि प्रभाकरने स्वतःचं एक वेगळं विश्व बनवलं होतं.. खूप आनंदी होती ती तिच्या विश्वात..प्रभाकरही तिच्यावर खूप प्रेम करायचा..काही दिवसांतच संसारच्या वंशवेलीला एक सुंदर पुष्प उमलले.. अदिती आई झाली.. तिने एका गोड मुलीला जन्म दिला होता..प्रभाकरने आपल्या इवल्याशा जीवाला हातात घेतलं..काळजाचा तुकडा होता तो..खूप प्रेमाने, कौतुकाने त्याने त्या चिमुकलीचं नाव 'समिधा' ठेवलं..

सारं काही छान होतं.. गोड सोनूलीचं करण्यात अदितीला दिवस पुरायचा नाही.. प्रभाकरही अदितीसोबत, आपल्या मुलीसोबत खूप आनंदात होता.. सुखात होता..पण काही दिवसांतच त्यांच्या या आनंदाला कोणाची दृष्ट लागली कोण जाणे..!! ऋतुचक्राने कुस बदलावी तशी सारी कालचक्रे उलटी फिरू लागली.. आणि त्यांचा सुखाचा संसार कोलमडू लागला.. नव्या नवलाईचे, आनंदाचे दिवस भुर्रकन उडून गेले..आणि खऱ्या संघर्षामय जीवनाची सुरुवात झाली.. अदितीच्या कल्पनेतलं जग, खेळातल्या पत्यांच्या बंगल्याप्रमाणे धाडकन कोसळलं.. स्वप्नांचे मनोरे डोळ्यातल्या आसवांत विरू लागले.. अदिती पूर्णपणे कोसळून गेली.. आतंरराष्ट्रीय स्थरावर चित्रकला स्पर्धेत आलेल्या अपयशाने प्रभाकर पुरता खचून गेला.. या स्पर्धेसाठी त्याने पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता.. आणि हा पराभवाचा धक्का तो पचवू शकला नाही..नैराश्यग्रस्त अवस्थेत तो भटकू लागला.. परभवाचं दुःख  विसरण्यासाठी त्याने व्यसनांचा आधार घेतला.. 

प्रभाकर खूप हळवा होता.. वैफल्यग्रस्त अवस्थेत तो दिवसरात्र दारूच्या नशेत घरीच पडलेला असायचा.. व्यसनाधीन झाला.. दारूच्या नशेपाई नोकरी गेली.. प्रभाकरला कामावरून काढून टाकण्यात आलं.. अदिती त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची पण नशेत धुंद असणाऱ्या प्रभाकरला काहीच समजत नव्हतं.. पैशांची चणचण भासू लागली.. त्यामुळे तो अजूनच चिडचिड करू लागला..नशेच्या धुंदीत तिला मारहाण करू लागला.. अदिती  रोजच्या या कटकटीला खूप कंटाळून गेली होती.. रोज भांडण, रोज मारहाण..ज्या प्रभाकरसाठी तिने ऐश्वर्याला, संपत्तीला, सुखी जगण्याला लाथ मारून आली होती..जन्मदात्या आईवडिलांचा त्याग केला होता..'तो हाच का?' तिचा तिलाच प्रश्न पडायचा.. तिने समजून सांगण्याचा कैकदा प्रयत्न केला होता..पण प्रभाकरवर काहीच परिणाम होत नव्हता..

अदिती दुःखी राहू लागली. तिला आईवडिलांना सोडून आल्याचा पश्चाताप होऊ लागला. कधी कधी भलतेसलते विचार मनात येत पण समिधाकडे पाहून ती सारं सहन करत होती.. तिच्यासाठी तिला जगायचं होतं.. ती एकटीच तिच्या जगण्याचं कारण होती.. पण प्रभाकर तिला खूप त्रास देऊ लागला होता.. दारूसाठी तिच्याकडे पैशांचा तगादा लावू लागला..नाही दिले तर शिवीगाळ, मारहाण करू लागला.. समिधा मोठी होत होती..अशा वातावरणाचा तिच्या मनावर खूप विपरीत परिणाम होत होता.. कायम ती स्वतःच्याच कोशात असायची.. कोणाशीही बोलायला घाबरायची.. अदितीशिवाय ती कोणाशीच बोलत नव्हती.. 

समिधा पाच वर्षाची झाली होती.. तिला शाळेत टाकायला हवं होतं..पण प्रभाकरला कशाचीच चिंता नव्हती..कायम नशेत.. एक दिवस तो खूप पिऊन घरी आला.. त्याला नीट बोलता येत नव्हतं..चालता येत नव्हतं.. त्याला त्या अवस्थेत पाहून अदिती खूप चिडली..संतापाने बोलू लागली,"समी मोठी होत चाललीय..बंद कर हे सगळं प्रभाकर..! दारू पिऊन काही साध्य होणार नाही.. उलट तुझ्याच शरीराला इजा पोहचतेय.. का कळत नाही रे तुला?..समीला शाळेत घालायला हवं.. माझा नाही निदान आपल्या मुलीच्या भविष्याचा तरी विचार कर..असंच अडाणी ठेवणार आहेस का तिला?" जीव तोडून अदिती प्रभाकरला समजावून सांगत होती.. पण तो तिचं ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हता.. दारूच्या नशेत धुंद असलेल्या प्रभाकरने," जास्त शहाणपणा करू नकोस.. मला नको शिकवू तू..!! मोठमोठ्याने तिच्या अंगावर ओरडायला सुरुवात केली  आणि त्याने तिच्यावर हात उचलला..अदितीला खूप मारलं... अगदी नाकातोंडातून रक्त येईपर्यंत तो तिला बडवत राहिला.. ती जोरजोरत किंचाळत होती.. समिधा घाबरून रडू लागली..

अदिती मार खात होती..आपल्या मुलीला लागू नये,इजा होऊ नये म्हणून तिने तिला शेजारच्या काकूंच्या घरी जायला सांगितलं.. समिधा शेजारच्या काकूंच्या घरी गेली.. मारून मारून दमल्यावर प्रभाकर पलंगावर आडवा झाला..अदिती रडत होती.. आपली नशिबाला दोष देत होती.. कायम समजून घेणाऱ्या अदितीचा पारा चढला होता.. आता मात्र अदितीच्या सहनशीलतेची मर्यादा पार झाली होती.. रोजच्या मारहाणीचा तिला वैताग आला होता.. ती जगण्याला कंटाळली होती.. रागाच्या भरात काय करतोय तिला उमजत नव्हतं.. आणि तिने एक मोठा निर्णय घेतला..रागाच्या भरात तिने गळफास लावून घेतला..दुःखी आयुष्याचा तिने अंत केला..मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिने आपल्या जीवनाचा शेवट केला..अदिती सर्वांना सोडून गेली..तिच्या लाडक्या समीला एकटी सोडून निघून गेली होती कायमची.. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी समिधा पोरकी झाली  होती..

पुढे समिधाचं काय होतं? प्रभाकर तिचा सांभाळ करतो का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©® निशा थोरे..

🎭 Series Post

View all