दुभंग भाग १०

Dubhang natyatla

दुभंग.. भाग १०

पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की तन्मयच्या नकाराने समिधा खचून गेली होती.. स्वतःला संपवण्याचा तिने प्रयत्न केला होता.. आणि त्यातूनही ती बचावली होती.. आजीला सगळी कर्मकहाणी समजली तिने समिधाला सगळं विसरून नव्याने सुरुवात करण्याचा सल्ला दिला.. पण तन्मयचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि परत येईल या आशेवर ती जगत होती.. तन्मय परत आला पण त्याचा निर्णय ऐकून समिधा खूप चिडली होती आता पुढे...

दुभंग भाग १० 

तन्मय तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला..  समिधा तिथून निघून गेली.. पण तन्मय तसाच बसून राहिला.. डोळ्यांतून टपटप पाणी खाली सांडत होतं.. आणि त्याला त्या दिवशी घडलेला प्रसंग आठवला..

त्या दिवशी तन्मयला नोकरी मिळाली. समिधाही पदवीधर झाली..समिधाने त्याला त्यांच्या प्रेमाबद्दल घरी आईबाबांना विचारायला सांगितलं.तन्मयनेही आपल्या प्रेमाविषयी घरात आईबाबांना सांगायचं ठरवलं..मनात थोडी धाकधूक होतीच..तन्मय त्याच्या बाबांपेक्षा त्याच्या आईच्या जास्त जवळचा होता.. बाबा शिस्तप्रिय असल्याने थोडा त्यांना घाबरत असे.. तो आईशी जितकं मोकळेपणाने बोलू शकला असता तितकं तो वडिलांशी बोलू शकला नसता म्हणून त्याने आधी आईशी बोलयचं ठरवलं..घरी आल्यावर त्याने आईजवळ विषय काढला," आई, मला तुला काही सांगायचं आहे.. आता मी नोकरी करतोय, नोकरीत स्थिरावलो आहे.. स्वतःच्या पायावर उभा आहे." त्याला मध्येच थांबवत आई म्हणाली," अरे तन्मय, इतकं लांबण का लावतोयस..? मुद्याचं आणि स्पष्ट बोल.." तन्मय बोलू लागला," आई, मला एक मुलगी खूप आवडते..माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिचंही.. आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे.." हे ऐकून आईला खूप आनंद झाला.," अरे ही तर खूप छान, आनंदाची बातमी आहे? कोण आहे मुलगी? तुझ्या ऑफिसमधली की कॉलेजमधली? वडील तिचे व्यावसायिक आहेत का? की कोणत्या सरकारी खात्यात मोठ्या हुद्यावरचे ऑफिसर?" तन्मयच्या आईने प्रश्नांचा भडिमार सुरू केला.. 

"अग आई..!थांब सांगतो..किती प्रश्न? तिच्या प्रश्नांनी बावरलेला तन्मय हसून सांगू लागला,"आई, तू ओळ्खतेस तिला..आपल्या घरी येणारी समिधा.. ती आवडते मला.. आणि तिलाही मी आवडतो.. आम्हाला लग्न करायचं आहे.." हे ऐकताच तन्मयची आई जवळजवळ त्याच्या अंगावर किंचाळलीच," काय? ती समी,? आपल्या घरी घरकामाला येणारी ती मुलगी..? तिच्याशी लग्न करायचं तुला? वेड लागलय का तुला? हे कदापिही शक्य नाही.." 

"अग आई..! ऐकून तर घे माझं..समिधा खूप चांगली मुलगी आहे माझी मैत्रीण आहे लहानपणापासूनची..ती आपल्या घराला, घरातल्या सर्वांना छान सांभाळून घेईल ग.. तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल.. प्लिज आई समजून घे" तन्मय आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण आई त्याला अडवत ठणकावून म्हणाली," तिची लायकी आहे का देशमुखांच्या घरची सून होण्याची..चार घरची धुणी भांडी करणारी ती मुलगी.. देशमुखांची सून होण्याची स्वप्नं पाहतेय? मला माझ्या प्रतिष्ठेला शोभणारी सून हवीय..तालेवार, श्रीमंत घरातली मुलगी देशमुखांची सून होऊ शकते.. कोणत्या भिकाऱ्याची मुलगी नाही.. मी कोणत्याही रस्त्यावरच्या मुलीला आपली सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही" तन्मयची आई तावातावाने बोलत होती..

मग तन्मय शांतपणे आईला म्हणाला," मग असं असेल तर, ठीक आहे.., आई, तुला ती आवडत नाही मान्य..! पण मला तिच्याशीच लग्न करायचं आहे..तसं मी तिला वचन दिलंय.. मी जातो सगळं सोडून.. नको मला तुझी प्रतिष्ठा, संपत्ती.. मी माझं वेगळं विश्व निर्माण करेल.." आई रागाने जोरात ओरडली,"या घराची पायरी जरी ओलांडलीस तर माझं मेलेलं तोंड पाहशील.. मी जीव देईन..थांब आताच संपवते स्वतःला.. त्या दळभद्री मुलीला माझ्या घरात सून म्हणून पाहण्यापेक्षा मी मेलेलं बरं.. मग माझ्या मृत्यूनंतर कर तुला काय हवं ते" तन्मयची आई रागाने बडबडत होती.. आणि मग तन्मय समोर मुद्दाम हातातल्या चाकूने दुसऱ्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न करू लागली, किंबहूना तन्मयला तसं भासवू लागली.. तन्मय आईच्या वागण्याने विरघळला.. आईच्या हातातला चाकू काढून घेत जोरात ओरडला," आई काय करतेस? वेड लागलंय का तुला? नाही जाणार कुठे?तू आधी शांत हो.." तन्मय आईसाठी रडू लागला.. तन्मयची आई पहिल्यापासूनच समिधाचा दुःस्वास करत होती.. त्याच्या आईला समिधा कधीच आवडली नव्हती.. स्वतःची प्रतिष्ठा कायम तिच्यासाठी महत्वाची..  तन्मयच्या वडिलांचा नेहमीच तिला राग यायचा.. नोकरांना त्यांच्या पायरीप्रमाणे वागवावे.. असं तिचं मत होतं.. आणि मग तन्मयच्या आईने तन्मयला भावनिक ब्लॅकमेल करायला सुरुवात केली..रडारड, आकांडतांडव करून "समिधाशी कधीच लग्न करणार नाही"  असं तन्मयकडून वचन घेतलं.. 

तन्मयची 'इकडे आड तिकडे विहीर' अशी अवस्था झाली होती.. आणि मग त्याने आईचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्रेमाला तिलांजली देण्याचा निर्णय घेतला.. आईला दिलेलं वचन त्याला आपल्या प्रेमापेक्षा जास्त मोलाचं वाटलं.. कर्तव्याच्या बेड्या पायात पडल्या होत्या.. प्रेमाचा त्याग करणं गरजेचं होतं.. बागेत बसून आसवं टिपत बसलेल्या तन्मयला सारं आठवत होतं.. तन्मयला चांगलंच ठाऊक होतं की, समिधाचं त्याच्यावर खूप प्रेम आहे.. त्याच्यासाठी ती आपल्या प्राणांचीही आहुती देईल.. हेही माहीत होतं की,ही गोष्ट समिधाला सांगितली असती तर ती आजन्म अविवाहित राहिली असती..आणि तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाट पाहत राहिली असती.. आणि तन्मयला समिधाच्या आयुष्याची राखरांगोळी करायची नव्हती..काळ हे सर्व दुःखावरचं औषध आहे.. त्यामुळे  प्रेमभंगाचं दुःख ती विसरून जाईल.. आयुष्य जगायला पुन्हा नव्याने सुरुवात करेल.. ती कोणासाठी थांबणार नाही या विचाराने तन्मय फटकळपणे वागत राहिला..समिधाच्या मनात त्याच्याविषयी चीड, द्वेष, मत्सर  निर्माण होणं गरजेचं होतं.. आणि म्हणूनच तन्मय तिच्याशी विक्षिप्तपणे वागत होता.. तो तिला पुन्हा भेटला कारण तिच्या मनातल्या त्या भेटीच्या आशेचा, त्याच्याविषयी तिच्या मनात असलेल्या प्रेमाचा त्याला अंत करायचा होता.. आणि तन्मयने नाईलाजाने त्या प्रेमाचा अंत  केला.. सूर्य अस्ताला निघाला होता.. दिवस मावळून अंधार पडू लागला होता.. मोठ्या जड अंतःकरणाने तन्मय जागेवरून उठला आणि आपल्या घराच्या दिशेने चालू लागला..

समिधा घरी पोहचली.. आपल्या खोलीचा दरवाजा लावून बराच वेळ स्वतःला कोंडून घेतलं होतं. संतापाने ती अगदी थरथरत होती.. डोळ्यांतल्या आसवांनी अंगाराची जागा घेतली होती..," मी गरीब कुटुंबातली म्हणून त्याने माझा विश्वासघात केला.. मला तुच्छ लेखलं.. मला फसवलं तन्मय तू..!! दाखवून देईन तुला.. मी सामान्य नाही.. असामान्य व्यक्तिमत्त्व काय असतं तुला दाखवून देईन.." स्वतःशीच पुटपुटत राहिली आणि तिने स्वतःच्या मनाशी पक्का निर्धार केला.. समिधाने स्वतःला बदलवून घेतलं.. चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं होतं.. त्याची जागा फक्त रागाने घेतली होती.. आता फक्त ध्यास होता जिंकण्याचा.. असामान्य बनण्याचा ध्यास.. आणि त्या ध्यासाने तिला झपाटून सोडलं होतं आता तिला कोणाच्या आधाराशिवाय जगायला शिकायचं होतं.. सर्वांना दाखवून द्यायचं होतं.. तिचं अस्तित्व.. समिधा पुन्हा नव्याने अभ्यासाला लागली.. काही स्पर्धा परीक्षेला तिला बसायचं होतं.. वाचनालयातून स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आणली. खूप अभ्यास केला.. दिवसरात्र मेहनत घेतली.. यु.पी.एस.सी, एम.पी.एस. सी..च्या परीक्षेत तिला सर्वोत्तम यायचं होतं..खूप सारी पुस्तकं वाचली.. प्रत्येक क्षण ती परीक्षेचाच विचार करत होती..

परीक्षेची तारीख जवळ येत होती.. मुंबईत परीक्षेचं केंद्र होतं.. दादरच्या एका महाविद्यालयात समिधाचा नंबर आला होता.. आजवर जीने कधी तिच्या गावाची वेस ओलांडली नव्हती ती समिधा आज एकटी मुंबईला आली होती.. गावातल्या तिच्या एका मैत्रिणीने तिला पत्ता समजावून सांगितला होता..समिधा एस.टी स्थानकावर पोहचली.. आणि न घाबरता, न डगमगता ती एकटी मुंबईला आली.. रिक्षा करून ती परीक्षेच्या नियोजित वेळेनुसार ती परीक्षाकेंद्रावर पोहचली..घरातून निघाली तेंव्हा आजीने बळजबरीने अर्धी भाकरी खाऊ घातली होती.. त्यालाही आता बरीच घटिका उलटून गेली होती.. पोटात अन्नाचा एकही कण नव्हता..घरातून भरून आणलेली पिण्याच्या पाण्याची बाटली संपली होती.. घशाला कोरड पडली होती.. पण समिधाला कश्याचीच शुद्ध नव्हती.. तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहचायचं होतं.. तीन तासांची प्रश्नपत्रिका सोडवायची होती.. परीक्षा सुरू झाली.. समिधा प्रश्नपत्रिका सोडवू लागली.. 

पुढे काय होतं? समिधा स्वतःला असामान्य सिद्ध करू शकेल का? पाहूया पुढच्या भागात…

क्रमशः

©® निशा थोरे

🎭 Series Post

View all