दुभंग.. भाग -अंतिम
पूर्वाध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, तन्मयने त्याच्या आईला दिलेल्या वचनामूळे अर्ध्या वाटेतच समिधाची साथ सोडून दिली होती.. समिधाच्या मनातल्या प्रेमाची जागा आता तिच्या रागाने घेतली होती..ती तिथून बाहेर पडली तीच मनात एक ईर्षा घेऊन.. आत पुढे..
समिधाने स्पर्धापरीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तम रीतीने सोडवल्या होत्या.. एकाग्र चित्तेने ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवत होती. प्रश्नपत्रिका सोडवत असताना जणू तिला आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता.. ध्येयाने झपाटलेल्या ध्येयवेड्या मुलीला दुसरं काहीच सुचत नव्हतं.. स्पर्धापरीक्षा उत्तम गेली होती. आता ती निकालाची वाट पाहत होती.. काही दिवसांतच स्पर्धापरीक्षेचा निकाल जाहीर झाला..आणि काय आश्चर्य..!! संपूर्ण महाराष्ट्रातून समिधा एम.पी.एस.सी.च्या स्पर्धापरीक्षेत पहिली आली.. नाशिकच्याच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व वर्तमानपत्रात ही बातमी झळकली.. "समिधा प्रभाकर जोगळेकर" हे नाव प्रत्येक वर्तमानपत्रात, टीव्हीवरच्या विविध न्यूज वाहिन्यांवर प्रक्षेपित होत होतं.. टीव्ही न्युज चॅनलवाले तिची मुलाखत घेण्यासाठी तिच्या घरी आले.. शाळा कॉलेजमधले शिक्षक,मित्रमैत्रिणी, वाचनालयातील ग्रंथपाल, रोज वाचनालयात येणारे, तिला ओळखणारे, वाचनालयाचे सदस्य सर्वजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षांव करत होते..देशमुखकाका सायली स्वतः अभिनंदन करायला घरी आले.. आजीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.. देशमुखकाका आणि आजीला नमस्कार करून समिधाने त्यांचे आशीर्वाद घेतले.. तिचा दैदीप्यमान जीवनप्रवास खरंच सर्वांनाच थक्क करणारा होता.. समिधा जोगळेकर हे नाव साऱ्या पंचक्रोशीत दुमदुमत होते.. पण समिधाचा चेहरा मात्र निर्विकार होता.. ती आनंदाने अजिबात हुरळून गेली नव्हती.. यावेळीसही सर्वजण येऊन गेले होते पण तन्मय मात्र आला नव्हता.. पण आता समिधाला काहीच फरक पडत नव्हता.. ती स्वतःच्या इच्छित ध्येयापर्यंत पोहचली होती.. तन्मयलाच काय..!!तर साऱ्या जगाला तिने तिचं अस्तीव दाखवून दिलं होतं.. गरिबीने गांजलेल्या, परिस्थितीने दुबळ्या झालेल्या, समाजाने नाकारलेल्या, प्रेमास पात्र न ठरलेल्या प्रत्येक मुलांसाठी समिधाने अथक परिश्रमाने स्वतःचा आदर्श घालून दिला होता.. इच्छा असेल तर नक्कीच मार्ग सापडतो.. हे तिने सिद्ध केलं होतं..
काही दिवसांतचं तिला मुलाखतीसाठी मुंबईला बोलवण्यात आले..आणि तिची 'असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स' या पदासाठी क्लास वन ऑफीसर म्हणून निवड झाली..आजवर तिने सोसलेल्या दुःखाचा अंत झाला होता.. समाजात एक प्रतिष्ठित स्थान मिळालं होतं..तिला नाकारलेल्या प्रत्येकाला हे चोख सणसणीत उत्तर होतं.. नाशिकमध्येच राहण्याची संधी मिळत असतानाही समिधाने मुंबईच्या विक्रीकर विभागात काम करणं पसंत केलं.. आणि तिने मुंबईतील विक्रीकर विभागाची निवड केली.. कदाचित तिला तन्मयपासून, त्याच्या विचारांपासून दूर जायचं होतं म्हणूनच की काय..!! तिने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.. समिधा मुंबईला आली.. सरकारच्या विक्रीकर विभागाने दिलेल्या आलिशान बंगल्यात आजी आणि समिधा राहायला आल्या.. ये-जाण्यासाठी सरकारी लालबत्तीवाली गाडी आली.. भले भले आता तिला नमस्कार चमत्कार करू लागले होते.. समाजात मान होता, प्रतिष्ठा होती..
इतकं होऊनही समिधा देशमुख काकांना विसरली नव्हती.. तिच्या गावाकडून काही कामानिम्मित, मदतीची अपेक्षा घेऊन तिला भेटायला येणाऱ्या लोकांकडून ती त्यांची ख्वालीखुशाली विचारत असे.. तिचा निरोप गावकरी मंडळी देशमुखांपर्यंत पोहचवत असत.. तेही तिच्या आठवणींनी व्याकूळ होतं..पण समिधाचा कामाचा वाढता व्याप पाहून आनंदितही होतं.. अभिमानाने त्यांची छाती फुलून येत असे. त्यापैकीच कोणीतरी आज समिधाला सायलीच्या लग्नाची पत्रिका देऊन गेला होता.. तन्मयच्या वडिलांनी समिधाला खास आमंत्रण पाठवलं होतं.. समिधा फक्त आणि फक्त सायलीसाठी तिच्या लग्नाला आली होती.. आपली सफेद रंगाची आलिशान गाडी घेऊन समिधा गावात आली.. लग्नाच्या कार्यालयात पोहचली ..तिचा वाहनचालक पटकन गाडीतून खाली उतरला आणि तिला उतरण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला.. समिधा आपल्या आलिशान गाडीतून खाली उतरली..तिचा तो रुबाब पाहून सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून होत्या..सर्व गावकऱ्यांना तिचं कौतुक वाटत होतं.. श्रीमंती पायाशी लोळण घालत असूनही समिधा अगदी साध्या वेशभूषेत आली होती.. गळ्यात मोत्यांची माळ आणि हातात मोत्यांच्या बांगड्या इतकीच आभूषणे अंगावर चढवली होती.. इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असूनही तिला कशाचाच गर्व नव्हता.. सर्वांशी ती तशीच मिळून मिसळून बोलत होती.. आस्थेने चौकशी करत होती..लग्न मंडपात पोहचताच समिधाने देशमुखकाका काकूंना वाकून नमस्कार केला..तिचं पालटलेलं रूप पाहून तन्मयच्या आईला खूप नवल वाटलं..त्यांच्या घरी घरकामाला येणाऱ्या मुलीने त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.. समिधाला तुच्छ लेखण्याची, तिला हिनवण्याची चूक आईच्या आतापर्यंत लक्षात आली होती..किंबहूना पच्छाताप होत होता..पण आता वेळ निघून गेली होती..तन्मयही लग्न कार्यालयात होता..समिधाशी बोलण्याचा प्रयत्न केला.. पण समिधाने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.. तन्मयच्या वडिलांनी सायलीसाठी अनुरूप स्थळ पाहून सायलीचा विवाह खूप थाटामाटाने लावून दिला.. सायलीचे यजमान इंजिनिअर होते.. दोघेही सुशिक्षित असल्याने जोडी छान जमली.. सायली सुखात होती..सायलीसाठी आणलेली भेटवस्तू तिच्याकडे सुपूर्द करत तिच्या गळ्यात पडून कडाडून गळाभेट घेतली.. कोणास ठाऊक या नंतर कधी भेट होणार की नाही..!! माहीत नव्हतं.. लग्नसोहळा पार पडला आणि समिधा आपल्या घरी मुंबईला परतली..
त्यानंतर मात्र समिधाने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.. पुन्हा कधी नाशिकला जाण्याचा योग आला नाही.. मुंबईत आल्यावर समिधाला नवीन मैत्रिणी भेटल्या.. तिच्या सारख्याच परिस्थितीने गांजलेल्या, निराधार असलेल्या, समाजाने टाकून दिलेल्या..तिने त्यांना जवळ केलं..आपल्या घरात आसरा दिला.. नोकरी करता करता समिधाने स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं.. कालांतराने वृद्धत्वामूळे आजी खूप थकली होती.. आजरपणामूळे जर्जर झाली होती.. तिच्या आजारपणात समिधाला आजीची खूप शुश्रूषा केली.. काळजी घेतली.. पण पिकलं पान कधीतरी गळणारच होतं..अखेरीस आजीने प्राण सोडला.. ती पंचतत्वात विलीन झाली..शेवटचा रेशीमबंध तुटला.. रक्ताच्या नात्यांनी कधीच साथ सोडली होती एक मायेचं नातं होतं..तेही आज सोडून गेलं.. समिधा खूप रडली.. अगदी डोळे कोरडे होईपर्यंत.. पण तरीही एकाकी समिधा जगत राहिली..आजी तिला जगण्याची प्रेरणा देऊन गेली होती.. आजी तिला जगण्याचं कारण देऊन गेली होती.. आज तिच्या सोबत तिच्या बहिणी होत्या.. दुःखाशी नाळ जोडली गेली होती.. समिधा त्यांच्यासाठी उभी राहिली.. काही दिवसांत समिधाने आजीच्या स्मरणार्थ 'रखुमाई' नावाने वृद्धाश्रम सुरू केला..त्याचबरोबर "सावली" नावाचा अनाथाश्रम सुरू करण्यात आला.. गरजू मुलांसाठी सरकारी अनुदानाची सोय करून त्यांच्यासाठी लघुउद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या.. होतकरू मुलांना रोजगार मिळवून दिला..
समिधा स्वतःच्या कामासोबत समाजातील पीडित, परिस्थितीने गांजलेल्या लोकांसाठी कार्य करू लागली.. मुंबईतील काही समाजसेवी संस्थांशी ती जोडली गेली होती.. तिथेच तिची ओळख 'प्रतीक देशमाने'या युवकाशी झाली. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या उद्धारासाठी तो काम करत होता.. त्या स्त्रियांच्या व्यथा तो समाजापुढे मांडत होता.. एक अनाथ मुलगा पण स्वकष्टांने शिकला..मोठा झाला.. हुशार,कुशाग्र बुद्धिमत्ता, संवेदनशील व्यक्ती म्हणून सारे त्याला ओळखत होते.. चांगल्या सरकारी नोकरीची संधी असतानाही प्रतिकने सामजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले होते..समाजसेवा करत असताना समिधाशी त्याची मैत्री झाली.. प्रत्येकाच्या दुःखाशी जोडला गेलेला प्रतीक व्यक्ती म्हणून तिला खूप भावला होता.. तो समिधाला तिच्या कार्यात मदत करत होता..सरकारी अनुदान योजनांची माहिती देणं,सगळे कागदोपत्री व्यवहार करणं, तिच्या गैरहजेरीत वृद्धाश्रमात जाऊन येणं, अनाथाश्रमाला भेट देणं ही सारी कामे प्रतीक न कंटाळता करत होता..त्यामुळे समिधाच्या मनात प्रतीकविषयी जिव्हाळा निर्माण होत होता..
आज इतक्या वर्षांनी आलेलं तन्मयचं पत्र वाचून भूतकाळातल्या घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणे समिधाच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या.. ज्या अर्ध्या वाटेवर तन्मय तिला सोडून गेला होता त्याच वाटेवर आज तो तिच्या परतण्याची वाट पहात होता.. पण आता वेळ निघून गेली होती.. ज्या प्रेमाची भुरळ पडून तिने आत्महत्येसारखा चुकीचा निर्णय घेतला होता..त्या प्रेमाला ती कधीच मागे सोडून आली होती.. तन्मयला कदाचित त्याला त्याची चूक समजली असेल.,तो बदललाही असेल पण परिस्थितीनुसार, वेळेप्रमाणे रंग बदलणाऱ्या प्रेमावर तिचा तसूभरही विश्वास उरला नव्हता..प्रेम हा एक फसवा आभास आहे.. ते क्षणभंगुर आहे असं तिला वाटून गेलं..आता ती परत फिरणार नव्हती.. प्रतिकच्या साथीने ती आयुष्यभर समाजसेवा करणार होती..समाज कार्यात स्वतःला वाहून घेणार होती..
समिधाच्या जीवनात आलेलं वादळं शमलं होतं.. बरीच पडझड झाली होती पण तरीही नवी उमेद अजूनही जिवंत होती.. समिधाने डोळे पुसले.. रात्र सरून साठलेले काळे मेघ दूर झाले होते.. आणि स्वच्छ कोवळं उन्ह पडलं होतं.. सारं वातावरण स्वच्छ झालं होतं.. पक्षांच्या किलबिलाटामूळे समिधा आपल्या विचारांतून जागी झाली..
आज तन्मयने कितीही बोलवलं तरी ती परतणार नव्हती.. त्याच्या शब्दांनी जे घाव तिच्या मनावर केले होते ते कदापिही भरून निघणार नव्हते.. मिटणार नव्हता हृदयावर पडलेला तो अविस्मरणीय दुभंग..
मनात घोंगावणारं वावटळ शांत झालं होतं.. बाकी सारं क्षेम.. निरर्थक.. निष्कारण.. सारं झटकून पुन्हा उभं राहायचं होतं.. जगायचं होतं नवी उमेद घेऊन.. जोपासायचा होता.. तो मनाचा.. कधीही न जुळणारा.. एक दुभंग..
पुर्णविराम..
©® निशा थोरे..
नमस्कार मैत्रिणींनो, सामाजिक विषयातून मी नेहमीच आपल्या भेटीला येत असते.. समाजात घडणाऱ्या गोष्टी मी कथारुपात तुमच्या समोर मांडत असते.. 'दुभंग' ही एक सत्यकथा.. दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखांची कथा.. एक परिस्थितीला हार मानून आत्महत्येसारखा अविचार करून आपली जीवनयात्रा संपवणारी अदिती आणि तिच्याच पोटी जन्म घेतलेली प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधत आयुष्याच्या वाटेवर पसरलेली अग्नीफुले तुडवत संकटांना हसत सामोरी जाणारी, प्रेमभंगासारख्या दुःखाने खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने जगायला शिकणारी समिधा..
छोट्या छोट्या कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या आजच्या पिढीसाठी खरंच समिधा एक उत्कृष्ट आदर्श आहे.. तिचा खडतर रक्तबंबाळ करणारा जीवनप्रवास कायम मनाला प्रेरणा देईल.. बस्स इतकंच…
आपली शब्दसखी
©® निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा