दोघींनी काही फळं घेतली. पैसे देऊन आणि आजीबाईंचा निरोप घेऊन त्या पुढे निघाल्या. गाडीत बसल्या बसल्या निकिता हसायला लागली.
"धनी ऽऽऽ, ओ ऽऽऽ, धनी ऽऽऽ. सो क्यूट हं ऋजुता." निकिता हसत हसत ऋजुताला चिडवत होती.
"जस्ट इमॅजिन हं ऋजू, विराज सर शेतात काम करताहेत, आणि ऋजू नऊवारी नेसून त्यांचा टिफिन घेऊन शेतात जाऊन लाजत लाजत त्यांना म्हणतेय,
"धनी ऽऽऽ, ओ ऽऽऽ, धनी ऽऽऽ शिदोरी आणलिया. वाईच भाकरी खाऊन घ्या."
आणि मग दोघे मिळून भाजी भाकरी खाणार. हाऊ रोमँटिक!" निकिता मिश्किलपणे तिला चिडवत होती.
"चूप ग तू. कुठल्याकुठे चाललीस? काहीही म्हणतेस." ऋजुता तिच्याही नकळत ब्लश करत होती.
"का, मी का चूप? आजीबाईंनी धनी म्हटलं तर स्वतःहून विराज सरांचं नाव सांगितलंस ना तू? " निकिता.
"हो, मग? अग , धनी म्हणजे मालक म्हणजे बॉस. आता त्यांना नसेल माहिती बॉस वगैरे." ऋजुता.
"ही ही ही ही." निकिताला हसू आवरत नव्हते.
"वेडी ग ऋजू, खूपच क्यूट आहेस तू. अग धनी म्हणजे नवरा, ग्रामीण भाषेत म्हणतात." निकिता.
"ओह माय गॉड! हो का? त्या अर्थाने म्हणाल्या का त्या? आजीबाई पण ना, काहीही म्हणतात. अन मी, मी पण काय त्यांना हो म्हणाले!" ऋजुता काहीशी खजील होत डोक्याला हात लावत म्हणाली.
"चल जाऊ दे, सीटबेल्ट लाव आता." ऋजुता ड्राइव्ह करत तिला दटावत म्हणाली तर खरी, पण तिचे ब्लश करणे निकिताच्या नजरेतून सुटले नाही.
"रागावते काय, लाजते काय? मन में तो लड्डू फूट रहे होंगे न?" निकिता .
"काय माहिती ग, लड्डू कसले, कदाचित अक्रोड फुटताहेत, टण टणा टण, डोक्यात अन मनातही. " ऋजुता काहीशा काळजीत म्हणाली.
"म्हणजे?" निकिताला कळलं नव्हतं.
"सगळा गोंधळच गोंधळ झालाय. काहीच सुचत नाही आहे मला. तुला म्हटलं होतं ना मी नाही येत." ऋजुता.
"अग पण झालंय काय? आज तू सोबत होतीस म्हणून खूप हिंमत आली मला. आपला एवढा मोठा रिलीज काही इश्यू ना येता पार पडला. तरी तू खूष का नाहीयेस आज नेहमीसारखी?" निकिता.
"रिलीजसाठी तर खूषच आहे ग मी, आय रिअली एप्रिशिएट युअर एफर्ट्स. त्यात काही शंकाच नाही. पण..." मग ऋजुताने तिला रोहितने लग्नासाठी विचारल्याचे सांगितले.
"काय? अरे बाप रे! हे सगळं कधी झालं? म्हणजे त्यांना तुझ्याबद्दल अशा फीलिंग्स कधीपासून?" निकिता तर आश्चर्याने उडालीच!
"मग आता काय करणार आहेस तू?" निकिता.
"माहिती नाही ग. " ऋजुता.
"ऋजू, तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नकोस हं. घाई करू नकोस. नीट विचार कर. तुझ्या मनाच्या तळाशी, खोलवर जाऊन बघ. तुला काय हवंय, काय आवडतंय ते बघ. नीट ओळख स्वतःच्या मनाला आणि नंतर ठरव." निकिता तिला तिच्या परीने सांगत होती. तिला एकीकडे मैत्रिणीच्या मनासारखे व्हावे असेही वाटत होते आणि दुसरीकडे विराजची काळजीही वाटत होती.
"हं." ऋजुता.
\"अरे देवा! हे काय झालं आता मधेच! हे विराज सर पण ना नको तेव्हा लंडनला गेलेत. कसं होणार आता त्यांचं. या वेडू ऋजूला कधी कळेल कोणास ठाऊक की तिचेसुद्धा विराजसरांवर प्रेम आहे. बघितलं ना, आताही आजींनी त्यांचे नाव काढले तर कशी लाजली. एवढी रोज आठवण येत असते तिला. आताशी तर जाणीव होतेय मॅडमना. आता या रोहित सरांनी मधेच हे काय आणलंय . विराज सर, कुठे आहात तुम्ही?\" निकिता मनात विचार करत होती.
"आता तू कसला विचार करते आहेस?" ऋजुता.
"काही नाही ग, ऋजू, एक करशील का, तुझं मनात ठरलं की त्यांना बोलण्याआधी सांगशील का मला?" निकिताला धाकधूकच होती.
"अग, आईबाबांना विचारल्याशिवाय थोडीच काही ठरवणार आहे ग. ते ठरवतील ना. मी तर लग्नाबिग्नाचा विचारही केला नव्हता अजून." ऋजुता.
"अग पण तुझी आवड, अपेक्षा, तुला कोण आवडतंय हे तर तुलाच विचारणार ना ते. ते म्हणतेय मी." निकिता.
"हं, ओके, सांगेन तुलाही." ऋजुता.
काही वेळात त्या ऑफिसमध्ये पोचल्या. निकिता आपल्या जागेवर जाऊन कामाला लागली. ऋजुता पुनीत सरांना PACE च्या रिलीजचे अपडेट्स द्यायला गेली. सरांशी बोलून ती घरी जायला निघाली. तसंही ऑफिस सुटायला थोडाच वेळ उरला होता.
गाडी चालवताना ऋजुता पुन्हा विचार करत होती. काही वेळाने ती घरी पोचली. चेहरा थकल्यासारखा वाटत होता. नेहमीसारखा उत्साह चेहऱ्यावर दिसत नव्हता. रेखाताईंनी विचारले,
"काय ग छकुली, दमलीस का बेटा? झाला का रिलीज? नीट झाला ना?"
"हे काय ग आई, किती प्रश्न विचारते आहेस एकदम? हो, रिलीज व्यवस्थित झाला. " ऋजुता.
"मग काय झालंय ? रिलीज झाल्यावर नेहमीसारखी नाचत नाही आलीस तू आज घरी आल्यावर. चेहरा बघ कसा ओढल्यासारखा दिसतोय. चहा घेतेस का थोडा?" रेखाताईंना जाणवलं की काहीतरी बिनसलंय आज हिचं.
"नको ग, थोड्यावेळापूर्वी घेतला त्या आजीबाईंकडे. मध्ये थांबलो होतो येताना. डोकं भणभण करतय ग मम्मा, काही सुचत नाहीये मला." ऋजुता.
"बरं, पुष्कळ धावपळ झालीय ना, इकडे ऑफिसला, मग तिथून तिकडे, मग परत, मग घरी. आणि आणखी भरीला काम . म्हणून होत असेल तसं . फ्रेश होऊन थोडा वेळ पड. बरं वाटेल. मी जेवायला बोलावेन थोड्यावेळाने तुला." रेखाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.
इकडे विराजकडे,
त्या दिवशी सकाळी विनीत आणि वीणाताईंना विराजने फोन केला होता.
"आई, तुझा राग गेला ना? तू होकार दिलास ना ऋजुतासाठी? " विराज.
"कोणती आई आपल्या मुलावर जास्त वेळ रागावून राहू शकेल? तसंही राग आला नव्हता रे, पण मला सांगितलं नाहीस म्हणून वाईट वाटलं होतं. अन तुला कोणी सांगितलं रे मी होकार दिला म्हणून?" वीणाताई.
"अग विधीने सांगितलं असेल. " विनीत.
"हं, ही विधी ना, जरा म्हणून पोटात राहत नाही हिच्या. आम्ही आज बोलणार होतोच न तुझ्याशी." वीणाताई.
"बरं ते जाऊ दे ना, आधी त्याला दोन्ही बाजू समजावून सांगू या. " विनीत म्हणाले.
मग काही वेळ त्यांनी विराजला त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली होती, ती सांगितली. वीणाताईंचा मुद्दाही सांगितला.
सगळं सांगून, बोलून झाल्यावर वीणाताई म्हणाल्या,
सगळं सांगून, बोलून झाल्यावर वीणाताई म्हणाल्या,
"संसारात काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते, कुटुंबाला प्राधान्य द्यायचं असतं. मग स्वप्न, इच्छा आकांक्षा, महत्वाकांक्षा वेगळे असतील तर तडजोड करताना त्रास होतो बेटा. तसं काही तिचं होऊ नये, असं वाटतं. कारण एकजण खूष नसेल तर पर्यायाने पूर्ण परिवारावर त्याचा परिणाम होतो. तू सांग, मी जे तुला आता सांगितलं, त्याचा विचार तू आधी केला होतास का?"
"खरं आहे तुझं, हा आणि तसा इतक्या दूरचा विचार तर मी नव्हता केला, पण आता करतोय तरी ती सगळं नीट सांभाळू शकेल असंच वाटतंय. मी पण करेन ना ग तुम्हाला मदत. करू ना आपण सगळे मिळून सगळं. जास्तीत जास्त काय होईल, थोडंसं मागेपुढे होईल. मी प्रॉमिस करतो, की मी भांडणार नाही, चिडणार नाही." विराज.
"हं." वीणाताई.
"पण आई खरंच मी दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत." विराज.
"बाळा, असं करून कसं चालेल? तिच्या मनात तसं काही नसलं तर काय करशील? हे बघ, तुला सगळ्या बाजूने विचार करायला सांगणं, समजावून देणं, पुढचाही विचार करायला सांगणं ही आमची जबाबदारी आहे. कारण हा निर्णय आयुष्यभरासाठी असणार आहे. माझा नकार नाही आहे तिच्यासाठी. पण होकारापर्यंत मी अजून पोचले नाहीये. तू येईपर्यंत विचार करेन. तिच्या मनात काय आहे ते कळतं का बघेन." वीणाताई.
"शेवटी आम्हालाही तुझं सुखच हवंय रे बेटा, दुसरं काही नाही. " विनीत.
"चल, त्याच्या ऑफिसची वेळ होईल, आटपून घेऊ दे त्याला त्याचं." ते वीणाताईंना म्हणाले.
"हं, काळजी करू नकोस हं, बघू या आपण. तू नीट रहा. छान रहा. अजिबात आजारी वगैरे पडायचं नाही." वीणाताई.
"हो. नीट राहीन, पण आई तुला सांगू का, मला बरं वाटत नव्हतं ना, तर रजतने इतकी काळजी घेतली माझी! सगळं त्याने एकट्यानेच केलं तेव्हा. प्रत्येक वेळी नीट वेळच्या वेळी खायला दिलं, चहा कॉफी, खिचडी, अगदी सूप वगैरेसुद्धा करून दिलं त्याने मला आणि तेसुद्धा स्वतःचं ऑफिस सांभाळून." विराज.
"हो का? छानच. बघ बरं, इतकं सगळं कसं जमतं त्याला. गुणी आहे वाटतं मुलगा. तसंही रेखाताईंचा मुलगा म्हटल्यावर चांगलाच असेल." वीणाताई.
"हो ग, खूप छान स्वभाव आहे त्याचा. इथे एकटा असूनही कटाक्षाने कोणत्याही व्यसनापासून दूर ठेवतो स्वतःला. अन मला तर मोठ्या भावासारखा सांभाळून घेतो. तू काळजी करू नकोस माझी." विराज.
"छान. असेच एकमेकांना सांभाळून घ्या." वीणाताई.
"हो. मी आटपतो आता. उशीर नको व्हायला. बाय." विराज.
सगळे आटपून विराज ऑफिसमध्ये गेला. काही वेळाने सकाळचे सगळे आवश्यक काम करून झाले. एकदोन मिटींग्सही आटपल्या. पण आज त्याला काहीसे अस्वस्थच वाटत होते. ऋजुताची आठवण येत होती. कदाचित वीणाताईंनी दुसरी शक्यता बोलून दाखवल्यामुळे होते, की इकडे ऋजुता कुठल्यातरी समस्येत असल्याचा त्याच्या सुप्त मनाला कुठेतरी सुगावा लागला होता, त्याचे त्यालाच माहीत! काही का असेना, पण परिणामी, त्याचं मन कामात नीट लागत नव्हतं.
"खरंच, असं असेल तर काय करणार मी? ऋजू, काय असेल ग, तुझ्या मनात? आता असं होतंय की कधी एकदा परत येतो आणि तुझ्याशी बोलतो." विराज विचार करत होता.
शेवटी त्याने तिच्या आवाजातले त्याने रेकॉर्ड केलेले एकुलते एक गाणे काढले आणि इअरफोन्स लावून, डोळे मिटून ते ऐकू लागला.
सलोना सा सजन है और मैं हूँ ...
जिया में इक अगन है, और मैं हूँ ...
सलोना सा सजन है और मैं हूँ ...
जिया में इक अगन है, और मैं हूँ ...
सलोना सा सजन है और मैं हूँ ...
पुन्हा पुन्हा ते गाणे ऐकताना तिच्या आवाजातल्या माधुर्यात हळूहळू त्याच्या मनाची अस्वस्थता विरत जाऊ लागली.
क्रमश:
© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक, कमेंट करून नक्की कळवा. अजिबात कंजुषी करू नका हं .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा