दृष्टी आणि दृष्टिकोन भाग 60

वीणाताईंच्या मनात नक्की काय आहे?


मागील भागात...

"बेटा, तुलाही सांगतो. आईवडील हे तुमचे शत्रू असतात का? नाही ना? तुमच्या लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं तुम्हाला. मग ही जीवनभर प्रेमाने सांभाळ केलेली, जपणूक केलेली, लहानाची मोठी केलेली मुलं अशीच कशी कोणाच्याही हाती आम्ही सोपवणार ग? मुलं प्रेमात पडतात, पण प्रेम केलं तरी ते आंधळं असू नये. कधी कधी अल्लड वयामध्ये याची जाण मुलांना नसते. आपल्या प्रेमासाठी समोरची व्यक्ती पात्र आहे की नाही, हे आधी तपासून पहायला पाहिजे . तिचं बॅकग्राउंड काय, स्वभाव काय, वागणं कसं, हे नीट डोळसपणे बघितलं पाहिजे. थापांना भुलून जाऊ नये. खरोखर समोरची व्यक्ती सांगते तसं आहे की नाही याची खात्री करावी लागते, नाहीतर एखाद्या चुकीच्या अशा निर्णयाने आयुष्याची राखरांगोळी होते. असे होऊ नये यासाठीच आईवडील काळजी घेत असतात. जीवनाचा अनुभव त्यांना तुमच्यापेक्षा जास्त असतो. पण तुम्हाला वाटतं की ते कडक आहेत, रागावतात . मुलांनी परस्पर निर्णय न घेता आईवडिलांना विश्वासाने सांगायला हवे. त्यांच्या मदतीने निर्णयाची योग्यता तपासून पहायला हवी. "


आता पुढे...

"हो खरं आहे बाबा तुमचं. इतका खोलवर विचार तर आमच्याएवढ्या मुलामुलींना शिवलाही नसता. खरंच समोरचा जे सांगतोय तसं आहे की नाही हे तपासून पहायला हवं. गोड गोड बोलण्यालाच मुली भुलून जातात. समोरासमोर तर कोणीही चांगलंच वागणार. पण खरोखर ती व्यक्ती कशी आहे, स्वभाव कसा, घरचं वातावरण कसं आहे या गोष्टी पुढल्या दृष्टीने खूप मॅटर करतात." विधी.

"हं, म्हणून काळजी घ्यायला हवी. तू अजून लहान आहेस. दादाला आता या गोष्टी बऱ्यापैकी कळतात. तसा समजदार आहे तो. म्हणून आणि मुख्य म्हणजे ऋजुतासारख्या लाघवी, समजदार आणि हुशार मुलीवर त्याने प्रेम केलंय. म्हणून मला त्याच्या निवडीवर आक्षेप नाही आणि म्हणूनच रागावलो नाही मी. तिच्याऐवजी दुसरी मुलगी त्याने पसंत केली असती तर कदाचित वेगळं असू शकलं असतं."

"हं, पण बाबा, आता आई होकार देईल की नाही हो ऋजुतासाठी? दादाचं खरंच खूप प्रेम आहे तिच्यावर. कधीकधी खूप आठवण आली तर रडतो सुद्धा तो. मला दिसलाय. मला नाही वाटत तो दुसऱ्या कुणाचा विचार करेल." विधी.

"हं, वीणाच्या मनात आधीपासूनच ती तुझ्या मावशीने सांगितलेली मुलगी भरली होती. काही महिन्यांपूर्वी मावशीकडे गेली होती ना, तेव्हा बघितलं होतं तिला हिने. अन ऋजुताबद्दल हे असं अचानक कळलं ना तिला. तिने त्या दृष्टिकोनातून कधी ऋजुताला बघितलंच नव्हतं. आपण विराजला झुरताना बघितलंय ग, पण तिने नाही ना बघितलंय, त्यामुळे अंदाज नाही आहे तिला. आपल्याला माहिती होतं आणि तिला कोणी सांगितलं नव्हतं, आपणही नाही अन त्यानेही नाही. त्यामुळेही दुखावली गेलीय ती जरा. तिच्या बाजूने विचार केला, तर तिचंही बरोबर आहे. मुलांची लग्नं हे एक मोठं स्वप्न असतं ग आईवडिलांचं. मुलांना लहानाचे मोठे करताना कितीही कष्ट करावे लागले तरी आईवडील ते करतात. तुमच्या लहानपणापासूनच खूप कष्ट केले आहेत तिने, आजी आजोबा आणि आपण सर्वांना सांभाळताना, नीट एकत्र बांधून ठेवताना, तुम्हांला वाढवताना. मग तीच मुलं लग्नानंतरही सुखात रहावी, खूष रहावी, आपल्या मनासारखी सून मिळावी असं तिलाही वाटत असेलच ना." विनीत म्हणाले.

"हं, कळलं. किती कठीण आहे न हे सगळं? दादाचं ऐकलं तर आई नाराज होईल, अन आईचं ऐकलं तर दादाला त्रास होईल. अन बघितलं तर दोघेही आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत. काय करणार हो बाबा आता तुम्ही?" विधी.

"हो बेटा. हे आयुष्यभरासाठीचे निर्णय घेणं एवढं सोपं असणार आहे का? बघतो. थोडा वेळ द्यावा लागेल तिला. बोलेन मी तिच्याशी. ती जे वरवरचे कपड्यांचे वगैरे म्हणतेय ते काही खरं कारण नाही. तिचं काय म्हणणं आहे, खरं कारण काय आहे ते शांतपणे समजून घ्यावं लागणार आहे. " विनीत.

"हं, तुम्ही किती ओळखता ना आईला! किती छान आहे तुमचं नातं! तिचं म्हणणंही तुम्ही ऐकून घेता, तुमचा मुद्दा तिला समजावता." विधीला कौतुक वाटत होतं.

"हो ग बेटा, संसार हा दोघांनी चालवायचा असतो. संसाररथाची दोन्ही चाकं सारख्याच महत्वाची असतात. एकमेकांना घेऊनच दोघांनी पुढे जायला हवे. " विनीत. "कळेल तुलाही काही दिवसांनी. फार दूर नाही आता." ते हसून म्हणाले.

"बाबा, माझं लग्न तुम्ही मला न विचारता नाही ठरवणार ना? मला खूप भीती वाटतेय." विधी जरा घाबरत, चाचरतच म्हणाली.

"नाही ग वेडाबाई. तू तर आमचा छोटा लाडोबा आहेस. असं कसं तुला न विचारता लग्न ठरवू? उगाचच घाबरतेस. " विनीत तिच्या पाठीवर थाप मारत म्हणाले.


"हं, " विधीच्या चेहऱ्यावर हलकंच हास्य आलं होतं . "ते बघा आली आई इकडे."

"थांब मी बोलतो. तू बस तोपर्यंत इथे." विधीला बाकाकडे इशारा करत विनीत म्हणाले.

"काय बोलणं चाललंय एवढं बापलेकींचं?" वीणाताई त्यांच्याकडे येता येता म्हणाल्या.

"असंच बोलत होतो ग विराजबद्दल." विनीत.

विनीत वीणाताईंकडे येऊन त्यांच्याबरोबर शतपावली करता करता म्हणाले,

"वीणा, हे बघ मला कळतंय, तुझाही उद्देश विराजचा संसार सुखाचा व्हावा हाच आहे. बरोबर ना? "

"हो, दुसरं काय असणार? मी त्याची आई आहे ना, कोणी वैरी थोडीच आहे?" वीणाताई.

"हो ग, मी तेच तर म्हणतोय. मला माहिती नाही का वीणा, तू किती कष्ट केले आहेत मुलांना वाढवताना. तुझीही काही स्वप्न असतील, सुनेबद्दल काही तुझ्या मनात कल्पना असतील, मनसुबे असतील . सगळं मला कळतं अन मान्यही आहे मला. मी नाही तर कोण समजून घेणार तुला? हे बघ, तू म्हणतेस ती मुलगी चांगलीच आहे. तू म्हणतेस तशी घरही नीट सांभाळेल." विनीत.

"हं, ती तिचं स्वतःचं काम करते ना. नोकरी असली की वेळेचे बांधील असतो हो आपण. स्वतःचं असेल तर थोडीशी घरची सोयही बघता येते आणि आम्हा बायकांना तर बाहेर कितीही काहीही केलं तरी घरचं बघावंच लागतं ना? म्हणून म्हणत होते. " वीणाताई.

काहीसं थांबून त्या पुढे म्हणाल्या,
"कसं आहे, ऋजुता महत्त्वाकांक्षी आहे. हुशार आहे. ऑफिसमध्ये तिच्यावर भरपूर जबाबदारी असते. उगाच आपल्यामुळे, या सगळ्या घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला अडकून रहावं लागेल. हवा तसा तिकडे वेळ देता नाही आला तर तिचं नुकसान नको व्हायला आपल्यामुळे. शेवटी घर, परिवार म्हटलं की जबाबदाऱ्या येतीलच. पाय ओढल्यासारखं होईल हो तिला. आता इतक्यात काही वाटणार नाही, पण पुढे मुलं वगैरे झाली की घरच्या जबाबदाऱ्या वाढतील. आम्ही बायका सगळं काही करतो, पण महत्त्वाकांक्षा दाबून ठेवावी लागली की खूप त्रास होतो हो मनाला." शेवटचे वाक्य बोलताना वीणाताईंच्या डोळ्यात पाणी आले होते.

त्यांनी लगेच डोळे पुसले. त्यांना बघून विनीत गलबलले. त्यांनी वीणाताईंचा हात हातात घेतला.

"वीणा, या गोष्टीचा तुला अजूनही त्रास होतो? सॉरी ग, त्या वेळी मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. किती इच्छा होती ना तुला नोकरी करण्याची. पण बाबांना ते पसंत नव्हतं. त्यांना कधीच आवडत नव्हतं घरातल्या स्त्रियांनी बाहेर जाऊन नोकरी वगैरे करणं. \"आम्ही कमावतो ते तुम्हाला कमी पडतं का? तेवढ्यात निभावता येत नाही का?\" असं म्हणायचे ते. बाबांच्या शब्दाबाहेर मी नाही जाऊ शकलो ग. तुझ्यासाठी उभं नाही राहता आलं मला त्या वेळी. खरच तूसुद्धा तेवढी हिंमतवान होतीस की त्या काळीसुद्धा नोकरी करू शकली असतीस." विनीतसुद्धा भावुक झाले होते.

"मग विराज अन विधी झाले. मग काय, करिअर आणखीच मागे राहिलं. नाहीतर किती उत्साहाने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं मी. बाकी सगळं नीट पार पाडलं हो मी, पण हा एक सल मनात राहिला तो राहिलाच. सोबतच्या काही मैत्रिणींना नोकरी करताना बघितलं की खूप जाणवतं हो. असं वाटतं कुठल्या कुठे असती मी आज. " मनात खोलवर दडलेली गोष्ट आज वीणाताईंच्या ओठावर आली होती.


"पण वीणा, तुला एक सांगतो, आज मी जो कोणी आहे, जे काही मी मिळवू शकलोय त्यात तुझासुद्धा सिंहाचा वाटा आहे ग. तू होतीस, तू सगळं घर सांभाळत होतीस, आईबाबांचं पथ्यपाणी, जेवणखाण, आजारपण, मुलं, त्यांच्या शाळा, अभ्यास, माझं सगळं, सर्वांच्या वेळा सांभाळणं, वर्षानुवर्षे सगळं तू एकहाती बघत होतीस ग. त्यामुळेच तर मी निश्चिन्तपणे बाहेर जाऊन ऑफिस, काम, टूर वगैरे करू शकत होतो. वीणा आहे, ती बघेल हा विश्वास असायचा मला. वेगवेगळ्या परिस्थितीत तू किती धीराने साथ दिली आहेस मला. मुलांना घडवलेस. हे सगळं काय कमी वाटतं का वीणा तुला? तू खंबीरपणे उभी आहेस म्हणून घराला घरपण आहे. मला जाणीव आहे ग या सगळ्या गोष्टींची. आज मी जितका यशस्वी आहे ना तितकीच तू सुद्धा आहेस ग. माझ्या यशातला अर्धा वाटा तर तुझाच आहे." सगळे आठवून विनीत यांचा कंठ दाटून आला होता.

"होय हो, तुमच्याबद्दल तक्रार नाही माझी. आपलं एक झालं, निभलं. पण असं वाटतं ऋजुताचं असं काही होऊ नये. निदान आपल्यामुळे तरी नको. तुम्हा दोघांना सगळं हातात लागतं. ती नोकरी करून इतकं सगळं कसं करू शकेल? शेवटी तिलाही मर्यादा असणारच ना. सुरवातीला तिला जास्त जाणवलं नाही तरी पुढे जाऊन दोघांचे खटके उडाले तर काय करायचं? कोणाच्याच जीवाला शांतता राहणार नाही ना. संसार म्हटलं की कुठे ना कुठे तडजोड करावी लागते ना. पण तिला एवढी मोठी तडजोड करायला त्रास होईल. " वीणाताई.

"खरं आहे तुझं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दूरच्या दृष्टिकोनातून म्हणते आहेस तू. या बाजूने विचार तर मी केलाच नव्हता." विनीत काहीसे विचारात पडले होते.

क्रमश:


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की कळवा.


🎭 Series Post

View all