दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 9

Drushti, ani, Drushtikon, sight, vision, perspective, Viraj, Rujuta, Marathi, katha, kathamalika

मागील भागात ...
आईला औषध वगैरे देऊन ऋजुताने सगळे आटपले आणि बिछान्यावर पडून तिने डोळे मिटले. डोळे मिटायचा अवकाश की तिच्या डोळ्यांपुढे अलगदपणे विराजचा चेहरा आला  आणि नकळतपणे मन विचारात गुंतले.

"हे विराज सर म्हणजे पण ना, एक कोडंच आहेत. कधी कधी किती रागावतात, त्यांच्याकडे बघण्याचीही हिंमत होत नाही ... असं वाटतं की समोर उभेही राहू नये. पळून जावे तिथून... आणि आज इतके भावुक झाले होते ... कसंसच झालं मला ते अश्रू बघून .... घाबरू नकोस , मी आहे ना , म्हणाले .... आणि खरंच खूप सुरक्षित असल्यासारखं वाटलं तेव्हा .... चुकलंच होतं माझं खरं तर , त्यांना समजून घेण्यात .... "मी आहे ना , काळजी करू नकोस"  म्हणाले...  नुसतं म्हणालेच नाही तर तसं वागलेसुद्धा .... आईला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणेपर्यंत पूर्ण मदत केली .... आईला अचानक तसे बघून काय करू अन काय नाही , मला तर काही सुचतच नव्हतं तेव्हा ....  त्यांनीच आधार दिला .... नाकावर राग आहे त्यांच्या .... पण  त्यांच्या पद्धतीने विचारही करतात दुसऱ्याचा .... मनाने एकदम सच्चे आहेत विराज सर .... " , ऋजुता विचार करत होती.

विचारात असतानाच दिवसभराच्या श्रमाने तिचा डोळा लागला आणि ती झोपेच्या अधीन झाली.

आता पुढे ....

*****

विराज घरी जायला निघाला. गाडीत बसल्यावर त्याने एफ एम ऑन केला. गाणे ऐकणे, गाणे हा त्याचा जुना छंद होता. रात्री रस्त्यावर तुरळकच ट्रॅफिक असल्याने गाणे ऐकत ऐकत ड्राइव्ह करत होता. आता त्याला एक वेगळीच ऊर्जा वाटत होती . आवडीचे गाणे ऐकायला मिळाल्या मुळे मूडही फ्रेश झाला होता. थोड्याच वेळात तो घरी पोचला.


घरी जाऊन बिछान्यावर पडल्या पडल्या विराजच्या मनात विचार सुरू होते...

"काकूंना मदत करता आली , त्यांना चेक करून आणता आलं तर मलाच किती समाधान झाल्यासारखं वाटतंय  ...खरं तर फार काही करावे लागले नाही मला .... त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं ...  किती छान फीलिंग आहे ही .... यात स्वतःसाठी काही न करूनसुद्धा किती आनंद होतोय मला स्वतःला....  खरच म्हणाली होती ऋजुता .... दुसऱ्याला मदत केल्यावर आपल्यालाही एक समाधान, आनंदच मिळतो .... मी तुझा सिनिअर आहे पण अशा किती गोष्टी तू मला शिकवणार आहेस ऋजुता .... ",

विराजच्या ओठांवर स्माईल आले होते.

" किती मिश्र अनुभव होते ना आजच्या या एकाच दिवसातले ".

सकाळच्या बिझी मीटिंग पासून ते आतापर्यंतच्या घडामोडी त्याच्या डोळ्यापुढे सरकायला लागल्या. दुपारी केबिनमधील तो रागावतानाचा ऋजुताचा घाबरलेला , गोंधळलेला चेहरा .... नंतर संध्याकाळी ऑफिसमध्ये कामात बुडून गेलेला तिचा चेहरा .... मला बघितल्यावर अर्धवट कामाच्या धुंदीत असलेला ,गोंधळलेला, आश्चर्यचकित  झालेला चेहरा .... लिफ्टमधला आधी भीतीने थरथरणारा , घर्मबिंदूंनी आच्छादलेला चेहरा .... आणि नंतर त्याचे बोलणे ऐकून आपली चूक उमगल्यानंतर  सॉरी ना म्हणताना झालेला केविलवाणा चेहरा .... '.... तर मी तुम्हाला जमदग्नीच म्हणणार'  असं म्हणणारा मिस्कील चेहरा.... आईस्क्रीम खाताना खळखळून हसणारा चेहरा .... आईला पडलेले बघून घाबरलेला काळजीयुक्त चेहरा .... डॉक्टरकडे मी सोबत येतो म्हटल्यावर काहीसा निश्चिन्त झालेला चेहरा .... सगळे नीट झाल्यावर सुटी मिळाल्यानंतर आनंदित झालेला चेहरा .... ते शेवटी बाय करतानाचा तिचा समाधानी चेहरा .... एकामागे एक सगळे त्याच्या डोळ्यांपुढे तरळून जात होते ....

तिचे प्रत्येक रूप त्याला मोहून टाकत होते... त्या एकेका आठवणीत तो हरवून जात होता ....

" हे, काय होतंय मला? ... ऋजुता इतकी का आठवते आहे? तिने माझी भीती वाटते म्हटल्यावर माझ्या हृदयातून कळ का उठली ....  मला इतके का वाईट वाटले ? तिच्या दृष्टीने बघितले तर साहजिकच आहे ना ते . तिने समजून घ्यावं म्हणून मी एवढा का धडपडत होतो? नंतर आईसक्रीम खाताना तिला खळखळून हसताना पाहून मलाही किती आनंद झाला होता ... असं का वाटतं की तिने नेहमी असं आनंदी रहावं ... खळखळून हसत रहावं ... हसताना दिसणारी तिच्या गालावर उमटलेली खळी नेहमी माझं लक्ष वेधून घेते... बघत रहावंस वाटतं त्या खळीकडे .... काय चाललंय हे ... असं आधी कधीच कोणाबद्दल झालं नाहीये मला ...  ऋजुता , तू ना, कोड्यात टाकलंस मला ...."

विचार करता करता निद्रादेवीने आपला आशीर्वाद त्याला दिला आणि तो निद्राधीन झाला.

सकाळी ...

"अगबाई, आज विराज उठला नाही अजून !  जिमला नाही जायचं का आज ? उठवावं लागेल ना त्याला ",  असे म्हणत आई विराजच्या खोलीत आली.

"आई, आई, राहू दे, झोपू दे थोडा वेळ त्याला. आपण करून ठेवू या ना त्याची तयारी. तू डबा बनवला की मी डबा वगैरे भरून ठेवते. कपडे, वॉलेट, घड्याळ वगैरे सगळं एका ठिकाणी ठेवते तोपर्यंत. उठला की होईल तो तयार लवकर  अन वेळेवर पोचेल ऑफिसमध्ये. काळजी नको करू. चल", विधी आईचा हात धरून तिला विराजच्या खोलीच्या बाहेर आणत हळूच म्हणाली.

"हो ना, किती गाढ अन शांत झोप लागलीय. बराच उशिरा आलाय वाटतं रात्री. झोपू दे जरा", आई त्याच्या खोलीचे दार ओढून घेत म्हणाली.

"तू जाऊन ये बाबांबरोबर वॉक ला. मी अभ्यास करते थोडावेळ. मग तू आल्यावर तयारी करू आपण", विधी.

"चला हो श्रीमतीजी, कधीकधी आमच्याबरोबरही येत चला", बाबा हसून म्हणाले.

"हो ना , बाबा घेऊन जा तुम्ही आईला फिरायला आणि शूज घालून जा हं दोघेही", विधी.

"बरं बाई , जाऊन येते", आई.

काही वेळाने आईबाबा मॉर्निंग वॉक करून परत आले.
आई स्वयंपाक घरात येऊन डबा आणि नाश्त्याची तयारी करू लागली. विधीसुद्धा आईला मदत करायला लागली. तिने एकीकडे चहा ठेवला आणि मग विराजची तयारी करायला खोलीत गेली. कपाटातून कपडे काढताना थोडीशी खुडबूड झाली आणि विराजला जाग आली.

त्याने घड्याळ पाहताच चमकून म्हटले, "अग विधी, पावणेआठ वाजताहेत, उठवले का नाहीस मला?"

"चिल दादा, तू खूप शांत अन गाढ झोपला होतास. रात्री पण उशिरा झोपलास ना, म्हणून उठवलं नाही तुला. आता जाग आलीय ना, उठ मग लवकर. हे बघ हा ड्रेस वगैरे सगळं काढून ठेवलंय तुझं. हो पटकन तयार आता म्हणजे झालं" , विधी.


"माय स्वीट लिटल सिस्टर !", विराज बेडवरून उतरून तिच्या डोक्यावरून हात फिरवत मिस्कीलपणे म्हणाला.

"हो, हो. माहिती आहे , कशासाठी एवढं चाललंय ते. करते मी तुझ्या पांघरूणाची घडी, जा तू . पण फक्त आजच्या दिवस हं, रोज नाही करणार " , विधी पण दम देत म्हणाली.

"हो ग, फक्त आजच्या दिवशी", असं म्हणून विराज तिच्या डोक्यावर टपली मारून हसत आपलं आटपायला निघून गेला.

थोड्याच वेळात तयार होऊन तो बाहेर आला.

"विराज काल एवढा का रे उशीर झाला तुला यायला? एवढं कसलं काम करतोस रे", आईने विचारले.

"अग आई , तसं निघालो होतो मी. पण उशीर झाला म्हणून ऋजुताला सोडायला गेलो घरी आणि गेल्यावर बघतो तर काय, काकू पडल्या होत्या अन काकाही गावात नव्हते. मग त्यांना डॉक्टरकडे नेऊन आणलं आणि मग आलो घरी. म्हणून आणखी उशीर झाला यायला", विराज .

"अगबाई , हो का? बरं झालं थांबलास ते. लागलंय का रेखाताईना फार? बोलेन त्यांच्याशी मी", आई.

"हो , बऱ्यापैकी लागलं होतं, ऋजुता घेईल आता काळजी", विराज.

"हं, नंबर देऊन ठेव मला ऋजुताचा किंवा त्यांचा घरचा असेल तर", आई.

"हं, सेव्ह केला आहे तुझ्या फोन मध्ये", विराज आईचा फोन ठेवत म्हणाला.

काही वेळाने विराज ऑफिसमध्ये पोचला आणि आपल्या कामाला लागला. काही वेळानंतर रोहितचा त्याला फोन आला.

"गुड मॉर्निंग विराज", रोहित.

"गुड मॉर्निंग रोहित . हाऊ आर यू?", विराज.

"मी मस्त . बरं ऐक ना, ऋजुता लँडलाईन फोन उचलत नाहीये. ", रोहित.

"हं, ती आज ऑफिसमध्ये नाही ना. म्हणून", विराज.

"ओके. तिचा पर्सनल नंबर दे ना जरा", रोहित.

"अं, ठीक आहे , पाठवतो".

"रोहित, मी तसंही आता फोन करणारच होतो. आपली आज दुपारी ठरलेली प्रोजेक्ट मीटिंग दोन तीन दिवसांनंतर रिशेड्युल केली तर चालेल का ? सॉरी मी जरा वेळेवर चेंज करतो आहे, पण आज जरा प्रॉब्लेम आहे , त्यामुळे...", विराज.


"हो, काही हरकत नाही. शुक्रवारी ठेवू या का मग? ", रोहित.

"हो चालेल. थँक्स", विराज.

"बाय", रोहित.


विराजने रोहितला नंबर पाठवला आणि बाजूला फोन ठेवून  एक सुटकेचा निःश्वास टाकला.  "चला, फारशी अडचण न येता हे तर मॅनेज झालं. आता बाकी कामं निपटावे ...".

एक दीड तासाने ...
ऋजुताच्या डेस्क वरचा फोन खणखणला. काहीवेळ वाजल्यानंतर तो निकिताने घेतला.

"ऋजुता, केबिनमध्ये ये", पलीकडून विराजचा आवाज होता.

"सर ,ऋजुता नाही आली आज. मी निकिता बोलते आहे", निकिता.

"अरे हो, मला माहिती होतं . पण मी विसरलोच . सॉरी", विराज.

"आज जमदग्नीसुद्धा विसरले का ऋजुता आली नाहीये ते? की आठवण येते आहे तिची सरांना? ", निकिता हसत विचार करत होती. "ती असली की कसं चैतन्य असतं इथे. लगबग चालली असते तिची. ती नाहीये तर मलाही करमत नाहीये आज ".

"कितीदा फोन वाजतोय हिचा! रोज कसे इतके फोनही अटेंड करते आणि कामही करते, तिचं तिलाच माहीत. इथेच येऊन बसावे आता", असे मनात म्हणत निकिता आपल्या जागेवरून उठून ऋजुता च्या जागेवर लॅपटॉप घेऊन काम करायला येऊन बसली आणि तिने ऋजुताला फोन केला.

"काय मॅडम , जमदग्नींना करमत नाहीये तुमच्याशिवाय ऑफिसमध्ये", निकिता फोनवर ऋजुताला म्हणाली.

"काहीतरीच काय ग निकिता, काम असेल सरांना काही " , ऋजुता.

"अग नाहीतर काय? सकाळपासून आतापर्यंत तीन तासात दोनदा फोन केला तुझ्या डेस्कवर त्यांनी. बाय द वे, आज का आला नाहीत आपण?", निकिता चेष्टा करत म्हणाली.

"अग आईला जरा लागलंय, म्हणून थांबलीय घरी", ऋजुता. तिने निकिताला सगळे सांगितले.

"ओह ओके, काळजी घे . आणि काकूंना बरं वाटलं की लवकर ये ऑफिसमध्ये. तू नसली की करमत नाही मला ", निकिता.

"हो बस, एक दोन दिवसात येतेच", ऋजुता.

"ओके बाय , बोलू नंतर. जमदग्नी बघतील मला गप्पा मारताना तर रागावतील मला", निकिता.

"बाय", ऋजुता.


काही वेळाने विराजने ऋजुताला फोन केला.

"हॅलो, विराज. बोल ना. काही काम होतं?", ऋजुता.

"हॅलो ऋजुता, अग मी तर विसरलोच होतो की तू आज ऑफिसला नाही आहेस. बरं, मी फोन यासाठी केला की आपली आजची रोहितबरोबरची मीटिंग शुक्रवारी रीशेड्युल झाली आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. बाकी काही महत्वाची कामं असतील तर तेवढी घरून करू शकतेस एक दोन दिवस. शुक्रवारी मात्र नक्की ऑफिसमध्ये ये.  मग आपण मिटींगला जाऊया", विराज म्हणाला.

"अरे वा ! ही तर चांगली न्यूज आहे.  बाबा येतीलच तोपर्यंत. आणि आईही थोडी ठीक होईल. रोहित सर चिडले नाहीत ना?",  विराजने स्वतः हून मॅनेज करून परवानगी दिल्यामुळे ऋजुताला आनंद झाला होता.

"नाही , काही हरकत नव्हती त्यांची. त्यांनी सहजपणे री शेड्युल केली . डोन्ट वरी. काकू कशा आहेत आता?", विराज.

"कालच्यापेक्षा थोडं ठीक आहे आज तिला. पण दुखतय अजून", ऋजुता.

"ठीक आहे , काळजी घे त्यांची", विराज.

"हो. विराज, माझी अडचण समजून घेतल्याबद्दल थँक्स", ऋजुता.

"बाय", विराज.

"बाय", ऋजुता.

फोन ठेवून विराज खुर्चीवर मागे डोके टेकवून डोळे मिटून बसला होता. सहज त्याच्या डोळ्यापुढे कालच्या घडामोडी डोकावल्या. वेळोवेळी दिसणारे ऋजुताच्या चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव मनात एकामागून एक हजेरी लावू लागले. घरी परत जाताना तिच्या चेहऱ्यावर असणारे निखळ हास्य आठवून त्याच्याही चेहऱ्यावर आपसूक हास्य उमटले. आज दोनतीनदा तिच्या डेस्कवर त्याने केलेला फोन आठवून त्याला स्वतः चेच हसू आले.

तेवढ्यात निकिता त्याला काहीतरी विचारायचं म्हणून केबिनमध्ये येणार तर तिला हे दिसले. ती तशीच थोडं थांबली आणि नंतर यावं असा विचार करून वळली. "आज तर पंचाईत होतेय बाबा, काही विचारायचं तर ऋजुता नाही  आणि धीर करून यांना विचारायला यावं तर हे तर Do not disturb mode मध्ये वाटताहेत. चिडले तर आणखी पंचाईत! त्यापेक्षा थोडया वेळानेच यावे. पण आज जमदग्नी एवढे कूल कूल कसे काय वाटताहेत , आणि आता तर चक्क स्माईल होती चेहऱ्यावर .... आठवं आश्चर्यच म्हणायचं ", निकिता विचार करत पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली.

"रोहितला ऋजुताचा पर्सनल नंबर कशाला हवा होता? खरं तर सहसा बाहेरच्या कोणाला देत नाही आम्ही एम्प्लॉयीचा पर्सनल नंबर . पण रोहितला नाही नाही म्हणू शकलो मी. उगाच तेवढ्याने प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. असेल काहीतरी काम . ऋजुताला विचारेन नंतर", असा विचार करून विराज परत कामात गुंतला.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर


कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

वेळोवेळी प्रतिक्रिया कळवल्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. हा पार्ट कसा वाटला तेसुुद्धा नक्की कळवा.

🎭 Series Post

View all