दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 8

Drushti, ani, Drushtikon, sight, vision, perspective, Rujuta, Viraj, marathi, katha, kathamalika, story

मागील भागात ...

पुन्हा खळखळून हसणाऱ्या ऋजुता कडे विराज त्याच्याही नकळत भान हरपून बघत राहिला.

"किती छान दिसतेस अशी हसताना... आता टेन्शन घेत जाऊ नकोस हं आणि घाबरायचे सुद्धा नाही. मी आहे ना?"

" हो... विराज , चल ना आता", ऋजुता.

"Ok बॉस, बंदा आपकी खिदमत में हाजिर है, बोलिये मोहतरमा , कहाँ जाना चाहेंगी आप?", विराज.

"फिलहाल तो  रानीसाहिबा को अपने महल जाना हैं ... चलने की कृपा करेंगे ? ", ऋजुताही आता त्याच्या नौटंकीमध्ये हसून सामील झाली होती.

थोड्याच वेळात ते घरी पोचले.
घरी त्यांच्यासमोर काय वाढून ठेवले होते ?

*****
आता पुढे....

विराजची गाडी घराजवळ पोचली.
" इथे पार्क करता येईल, विराज", ऋजुता एका जागेकडे हात दाखवून म्हणाली .

"ए नाही, मी जातो आता घरी. तू उतरून घे", विराज गाडी थांबवत म्हणाला.

"विराज, चल ना पाच दहा मिनिटे फक्त, आईलाही आनंद होईल तू आलास तर. तसेही तू घरी सोडलेस म्हटल्यावर मला ओरडेलच ती, घरी का नाही आणलंस म्हणून" , ऋजुता आग्रह करत म्हणाली.

"ओके , चल", विराज.

ऋजुताने घराची बेल वाजवली. दोन मिनिटे झाली तरी आई दरवाजा उघडेना. आणखी एकदा बेल वाजवल्यावर तिने शेवटी फोन केला.

"आई, मी आलीय, दरवाजा उघडतेस ना?", ऋजुता.

"ऋजू, शेजारच्या काकूंकडून चावी घेऊन तूच उघड दरवाजा", आई म्हणाली.

"विराज, एक मिनिट हं , आलेच मी", ऋजुता म्हणाली.

शेजारच्या काकूंकडून चावी घेऊन तिने दरवाजा उघडला.

"ये, विराज, बस ना. आई बघ ना कोण आलंय आपल्याकडे. कुठे आहेस तू? ", म्हणत म्हणत ऋजुता आईला घरात शोधू लागली. विराज सोफ्यावर बसला.

"हॉल चा लाईट पण नाही लावलास का ग आज ? काय करते आहेस एवढं तिकडे?", ऋजुता लाईट लावत म्हणाली.

"मी इकडे आहे . इकडे ये ऋजू", आई .

आईचा आवाज ऋजूला जरा वेगळा वाटत होता. ती खोलीत गेली. बघते तर काय? आई जमिनीवरच्या गालिच्यावर पाय पसरलेल्या अवस्थेत बसलेली होती. चेहऱ्यावर वेदना दिसत होती. बाजूला फोन पडला होता. कपड्यांच्या स्टॅण्डवरती वाळलेले कपडे होते.  पण ते स्टॅण्ड जमिनीवर आडवे पडले होते.

"अग आई, आज अंधारात का बसली आहेस? इकडेही लाईट नाही लावलास आणि खाली का बसली आहेस अशी?", ऋजुता इथलाही लाईट लावत म्हणाली.

"अग बसली नाहीये मी, पडली आहे. त्यामुळे उठता येत नाही आहे मला. ये हात दे जरा. ", आई.

"काय ??? अग अशी कशी पडलीस? लागलंय का कुठे जोरात? म्हणूनच हा स्टॅण्ड असा पडलाय का ? मला सांगितलं का नाहीस?  ", ऋजुता घाबरून एकामागून एक प्रश्न विचारत होती. तिने आईला आधार देत हळूहळू उठवून बेडवर बसविण्याचा प्रयत्न केला. 

आईला पायाला, कमरेला आणि  हाताला लागलं होतं. त्यामुळे उठताना ते दुखत होतं. ऋजुताला एकटीला त्यांना खालून उठवून बेडवर बसवणे जमेना.

"थांब , मी विराजला बोलावते", ऋजुता आईला थांबवत म्हणाली.

"विराज, विराज , इकडे ये ना लवकर", ऋजुताने आवाज दिला.

"हं , आलो. कुठे आहेस ग? ", विराज हॉलमधून उठून तिला शोधत आत खोलीत आला.

"काय ग, काय झालं? ", विराज .

"अरे आई पडलीय, लागलंय तिला , त्यामुळे तिला उठता येत नाहीये खालून. आणि मला एकटीला जमत नाहीये ते,  तिला खूप दुखतंय. प्लीज मदत करशील का?", ऋजुता.

"अग प्लीज काय त्यात? हं, मला धरा , काकू  ", विराज समोर येत आईचा हात आपल्या खांद्यावर ठेवत म्हणाला. "ऋजू, तू तिकडून आधार दे. हं काकू,आता जमेल ना?".

"हं, आता होईलसं वाटतय",आई.

"हळूहळू उठा काकू, आम्ही आहोत धरायला", विराज.

"आई, सावकाश. हं असं धर मला ", ऋजुता.

दोघांनी मिळून आईला बेडवर बसवले. ऋजुताने उशा लावत टेकायला आधार बनवून दिला आणि आईला त्याला टेकून बसवले.

"आई, बाबा कुठे आहेत ग ? आले नाहीत का अजून? ", ऋजुता.

"अग ते आज टूर वर जाणार होते ना ऑफिस च्या. विसरलीस का? ", आई.

"अरेच्चा , हो ग, बाबा तर दोन दिवस बाहेरगावी जाणार होते. आई , डॉक्टरला दाखवावं लागेल , तुला बरंच लागलंय ग. सुजलेलं दिसतंय", ऋजुता काळजीने म्हणाली.

"थांब, मी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन करून बघते", ऋजुता.

ऋजुताने फोन करून बघितले. त्यांचा फोन लागत नव्हता.

"त्यांचा तर फोनच लागत नाही आहे ग, ते नाहीत वाटतं. आता काय करावं? ", ऋजुताला आता टेन्शन येऊ लागले होते. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

"आई, तू जेवलीस का?", ऋजुता.

"हो. तुला बराच उशीर झाला होता . तू मघाशी फोन केलास त्यामुळे जेवून घेतलं मग मी. हात धुवून आले आणि जरा हे वाळलेले कपडे आवरावे म्हटलं . आत येता येता लाईट गेले. अंधारात दिसले नाही आणि मी या स्टॅण्डच्या पायाला अडखळून पडले . नशीब फोन तरी हातातच होता माझ्या. तोही बाजूला पडला होता. नाहीतर तुला फोनही करता आला नसता. तुम्ही येण्याच्या अगदी दहा पंधरा मिनिटे आधीचीच गोष्ट आहे."

"ऋजुता, मला वाटतं आता जास्त वेळ इथे घालवण्यापेक्षा काकूंना हॉस्पिटलमध्ये दाखवून यावं, इथे जवळच आहे ना एक, येताना दिसले होते मला", विराज.

"हं, खरंय तुझं", ऋजुता.

"आई , आपण चेक करून येऊ, चल".

"अरे, बाळांनो, तुम्ही एवढे थकून भागून आला आहात, भूकपण लागली असेल. नको ना आता जायला. मी मलम वगैरे लावेन काहीतरी. मग उद्या बघू या", आई.

"पण हे लवकर दाखवून औषध घेतले तर थोडा तरी आराम पडेल काकू तुम्हाला सकाळपर्यंत ", विराज.

"बरं, जाऊ या आपण. पण तत्पूर्वी ऋजू तू एक काम कर . विराजला आणि मलाही पाणी दे. आणि त्या डब्यात लाडू आहेत त्यातला विराजला दे आणि तूही खा. पहिल्यांदाच आलाय तो घरी. त्यात जेवणसुद्धा राहिलंय अजून दोघांचंही", आई  .

शेवटी आई ही आईच असते नाही का? ऋजुताने पटकन लाडू आणि पाण्याचे ग्लास आणले आणि दोघांनाही दिले. एका हाताने लाडू खात दुसऱ्या हाताने पर्समध्ये पैसे, कार्ड वगैरे चेक करत तिने पर्स खांद्याला अडकवली.

"थांब मी कॅब बुक करते , मग जाऊ या", ऋजुता फोन हातात घेऊन त्यात बघू लागली.

"अग ऋजुता, कॅब कशाला हवी आहे?  माझ्या गाडीनेच जाऊ ना ", विराज लगेच म्हणाला.

"तुला उशीर होईल ना ?", ऋजुता.

"नाही ग, काही हरकत नाही , जाईन मी नंतर. घरीच तर जायचं आहे", विराज.

"ग्रेट, थँक्स रे", ऋजुता.

तोपर्यंत विराजने विधीला मेसेज केला, "मला घरी यायला वेळ लागेल. जरा काम आहे. आईला सांग की काळजी करू नकोस आणि आवरून झोप."

"ओके. ये तू आरामात", विधीचा रिप्लाय आला.

"निघायचं मग? ", विराज सोफ्यावरून उठत म्हणाला.

"हो", ऋजुता आईकडे जात म्हणाली . विराजही तिच्या मागोमाग आला.

"आई, धर आम्हाला नीट आणि चल हळूहळू ", ऋजुता.

आई एका हाताने ऋजुताला पकडत दुसऱ्या हाताने विराजच्या खांद्याचा आधार घेत उभी राहिली आणि ज्या पायाला लागले होते या पायावर जास्त भार पडू न देता चालण्याचा प्रयत्न करू लागली.

"काकू, सावकाश. मी आहे, धरा मला नीट, काळजी करू नका, मी धरलंय तुम्हाला", विराज.

दोघांनी मिळून आईला गाडीत बसवले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे रात्री असणाऱ्या डॉक्टरांनी चेक केले.  हाताचा एक्सरे काढून बघितले तर मायनर क्रॅक वाटत होती . त्यांनी मग हात बांधून दिला आणि काही गोळ्या आणि पायाला लावायला मलम दिले. काही दिवस आराम आणि काळजी घ्यायला सांगितले. औषधे वगैरे घेऊन सर्वजण परत घरी आले.

आईला पुन्हा नीट बेडवर बसवून ऋजुताने औषध दिले.

"विराज, बाळा, तुझे खूप आभार. किती काळजीने केलंस. तू पहिल्यांदा घरी आलास आणि मी तुझा पाहुणचार करण्याऐवजी तुलाच धावपळ करावी लागली. पण मी बरी झाली की नक्की ये हं", आई.

"हो , काकू. काळजी घ्या आणि आराम करा काही दिवस तरी", विराज.

"थँक यू सो मच विराज, आज तू होतास म्हणून बरं झालं, नाहीतर काय करावे सुचलंच नसतं मला", ऋजुता आता थोडी नॉर्मल होत विराजला म्हणाली.

"असं काही नसतं वेडाबाई, तूही केलंसच ना. बरं चल मी निघू मग आता?"

"हं ओके".

"बाय ऋजुता, टेक केअर. आणि हं वाटल्यास उद्या ऑफिसमध्ये नाही आलीस तरी चालेल", विराज.

"हं, पण ते रोहित सरांच्या नवीन प्रोजेक्टचं..." ऋजुता म्हणाली. चक्क विराजने स्वतः परवानगी दिल्यामुळे तिला आश्चर्य वाटले होते आणि आईबरोबर राहून एक दिवस तरी तिची नीट काळजी घेता येईल म्हणून तिला आनंद झाला होता.

"अग हो, ते मी बघतो कसं जमतं ते. उद्या त्याच्याशी बोलून रिशेड्युल होत असेल तर बघतो. बाकी कामाबद्दल उद्या बोलूया" , विराज.

विराज गाडीत बसला तर ऋजुताने त्याला हात दाखवून बाय केला. ऋजुताच्या चेहऱ्यावरचे टेन्शन कमी झालेले विराजला स्पष्ट जाणवले. तो हसून बाय करत घरी जायला निघाला.

आईशी बोलता बोलता ऋजुताने सांगितले "अग आई , आज ना , कामात होते आणि माझं लक्षच राहिलं नाही वेळेकडे. त्यात लाईट गेले आणि आम्ही लिफ्टमध्ये अडकलो . मला तर जाम भीती वाटत होती ग , काय सांगू. पण विराजनेच धीर दिला. मग उशीर झाला होता तर विराज सोडायला आला मला इथपर्यंत" , ऋजुता.

"अगबाई !! ऋजू तू आता वेंधळेपणा कमी कर बर जरा. लक्ष ठेवत जा ग  वेळेकडे सुद्धा. दिवसभर सर्वांना मदत करत राहतेस अन मग स्वतःचं काम करायला असं उशिरापर्यंत थांबावं लागतं ", आई.

"अग पण आज दुपारी उशिरा मिळाले होते ग ते डॉक्युमेंट्स ", ऋजुता.

"आज विराज होता म्हणून बरं झालं ना. नाहीतर किती घाबरली असतीस एकटी अडकली असतीस तर. आज तर आपल्याला खूपच मदत झाली त्याची इथेही. तेव्हा तर वेदनेने अगदी काही सुचतच नव्हते मला. आता औषध घेतल्यावर जरा कमी होतंय दुखणं", आई.

"हो ना.  बरं आई, उद्या दादाला सांगू या का ग, तुला लागलंय ते? ", ऋजुता.

"अग जरा बरं वाटलं की सांगू एक दोन दिवसांत. उगाच काळजी करत बसेल पोर तिकडे" , आई.

"ठीक आहे , बघू मग. आता तू आराम कर , मी पण झोपते. काही लागलं तर उठव मला. मी आहे इथेच", ऋजुता.

"झोप ग माझी राणी, आज खूप धावपळ झालीय तुलाही", आईने प्रेमाने ऋजुताच्या डोक्यावरून हात फिरवला.

ऋजुताने डोळे मिटले तर डोळ्यांपुढे अलगदपणे विराजचा चेहरा आला. 

"हे विराज सर म्हणजे पण ना, एक कोडंच आहेत. कधी कधी किती रागावतात, त्यांच्याकडे बघण्याचीही हिंमत होत नाही ... असं वाटतं की समोर उभेही राहू नये. पळून जावे तिथून... आणि आज इतके भावुक झाले होते ... कसंसच झालं मला ते अश्रू बघून .... घाबरू नकोस , मी आहे ना , म्हणाले .... आणि खरंच खूप सुरक्षित असल्यासारखं वाटलं तेव्हा .... चुकलंच होतं माझं खरं तर , त्यांना समजून घेण्यात .... "मी आहे ना , काळजी करू नकोस"  म्हणाले...  नुसतं म्हणालेच नाही तर तसं वागलेसुद्धा .... आईला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणेपर्यंत पूर्ण मदत केली .... आईला अचानक तसे बघून काय करू अन काय नाही , मला तर काही सुचतच नव्हतं तेव्हा ....  त्यांनीच आधार दिला .... नाकावर राग आहे त्यांच्या .... पण  त्यांच्या पद्धतीने विचारही करतात दुसऱ्याचा .... मनाने एकदम सच्चे आहेत विराज सर .... " , ऋजुता विचार करत होती.

विचारात असतानाच दिवसभराच्या श्रमाने तिचा डोळा लागला आणि ती झोपेच्या अधीन झाली.

क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर

संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

आता उद्या ऑफिसमध्ये काय होणार? बघूया पुढील भागात.

आतापर्यंतचे सर्व भाग Series List मध्ये वाचायला मिळतील. हा भाग कसा वाटला नक्की कळवा.
🎭 Series Post

View all