दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 7

Drushti, drushtikon, ani, vision, perspective, sight, Rujuta, Viraj, Rohit, marathi, katha, kathamalika

ऋजुता आपल्या जागेवर जाऊन पुन्हा कामाला लागली. आधीच्या हातातल्या प्रोजेक्टचं काम करता करताच तिला संध्याकाळ झाली. अजून तर विराजने पाठवलेले नवीन प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स वाचायचे , समजून घ्यायचे होते.  दोन तीन दीर्घ श्वास घेऊन , जवळच्या बाटलीतून पाणी पिऊन तिने ते वाचायला सुरवात केली.

"ऋजू, मी निघतेय ग , बाय, भेटू उद्या.", निकिता आपले लॅपटॉप वगैरे सगळं सामान बॅगमध्ये भरत निघता निघता म्हणाली.

"हं , बाय", लॅपटॉप वर वाचण्यात गुंग असलेली ऋजुता तिच्याकडे न बघताच म्हणाली.

"बाय ऋजुता",  प्रसाद.
"बाय",  ऋजुता.

एक एक करत टीममधले सगळेजण निघून गेले . ऋजुता कधी डॉक्युमेंट्स वाचायची मग प्रेझेंटेशन मधून मुद्दे बघायची, मधेच तिला आलेले प्रश्न नोट करायची. असे तिचे काम चालले होते. थोड्या वेळाने आजूबाजूचे लाईट्स आणि सेंट्रल ए सी बंद झाला. थोडं उकडायला लागलं तसं ऋजुताने आपले केस एकत्र घेऊन वर त्यांचा रोल बांधत हातातल्या पेन्सिलीने ते अडकवले.  आता तिला थोडे बरे वाटले. 

"तीन चार पाने राहिलंय अजून , तेवढं संपवूनच निघावे म्हणजे बरं होईल", तिने विचार केला.

विराज केबिनमध्ये आपले काम करत होता . संपतच आले होते जवळपास. त्याने खुर्चीला मागे डोके टेकवून क्षणभर डोळे मिटले. आजचा दिवस बऱ्यापैकी थकवणारा होता (हेक्टिक ) . डोळे उघडले तर त्याचे लक्ष बाहेर गेले. बरेचसे लोक निघून गेले होते. मधेच कुठे कुठे एखादे जण काम करत बसलेले होते. आता त्याचे लक्ष समोर आपल्या टीमच्या जागेकडे गेले.  सर्वजण घरी गेलेले होते . फक्त ऋजुताच्या क्यूबिकल वरचा लाईट अजूनही सुरू दिसला. तसे त्याने पाहिले तर ऋजुता अजूनही लॅपटॉपसमोर बसलेली दिसली. ही अजूनही घरी का नाही गेली ते विचारावं म्हणून तो मागून येऊन तिच्या क्यूबिकल मध्ये येऊन निकिताच्या खुर्चीवर बसला. तो कधी  ऋजुताच्या लॅपटॉपकडे तर कधी तिच्याकडे बघू लागला . ऋजुता इतकी गढून गेली होती की तिला तो आलेला कळलेही नाही.

टक टक ... टक टक ...
टक टक .... टक टक...
विराज पेनाने निकिताच्या डेस्कवर टक टक करत होता.

"निकू गप्प रहा ग जरा", ऋजुता.

टक टक .... टक टक

"निकी , शांत रहा न ग, वाचू दे ना मला , पूर्ण करू दे. नाहीतर जमदग्नी रागावतील पुन्हा", असे म्हणत ऋजुता काही लिहिण्यासाठी पेन्सिल शोधू लागली.

विराजने हळूच तिच्या केसातून ती काढली . रोल सुटून तिचे काळेभोर सिल्की केस हळुवारपणे उलगडत, पाठीवर घरंगळत मोकळे झाले.

"Wow!!! beautiful !!! ", विराज मनातच उद्गारला.
पेन्सिल तिच्या समोर धरत तो म्हणाला "हीच शोधतेय ना?"  .

ऋजुताने दचकून तिकडे वळून पाहिले तर समोर विराज गालात हसत म्हणाला, "मला माहिती नव्हतं की पेन्सिलीचा असाही उपयोग होतो".

"तू... तुम्ही? ", ऋजुता गोंधळली होती.

"ऋजू, अग बाहेर ये आता त्या प्रोजेक्टमधून. किती उशीर झालाय , घरी नाही का जायचं तुला? उद्या कर बाकीचे. मी घरी जायला निघालो होतो तर तू अजून इथेच दिसलीस म्हणून विचारायला आलो, काही प्रॉब्लेम तर नाही ना?", विराज शांतपणे म्हणाला.

"न ... नाही सर... सॉरी ... मी ते मघाशी निकिता समजून वैतागले तुमच्यावर" , ऋजुता.

"ठीक आहे, चल आता , सोडू का तुला घरी, उशीर झालाय तर?", विराज.

"ओह, इतके वाजलेत !  कोणी डिस्टर्ब करणारं नव्हतं , शांततेत छान काम होत होतं ना , त्यामुळे माझं लक्षच नाही राहिलं वेळेकडे. मी जाईन, स्कूटी आणली आहे. आईला सांगावं लागेल आता निघतेय म्हणून", ऋजुता घड्याळाकडे बघत म्हणाली.

बॅग पॅक करत ऋजुताने आईला फोन करून आता उशिरा निघत असल्याचं कळवलं.

दोघेही लिफ्ट ने खाली येऊ लागले. अर्ध्यात आले असतील तोच लाईट गेले आणि लिफ्ट मधेच अडकली.

"ओह, आज दिवसभर लाईट सारखी जात येत होती ना, तर बॅकअप चालत नाहीये वाटतं", विराज म्हणाला.

आधीच उशीर झालेला ... घर दूर आणि आतातर लिफ्टमध्येही अंधार झाला होता . लिफ्टमध्येही आणखी कोणी नव्हते . ऋजुताला खूप भीती वाटू लागली .  हाताला घाम फुटला. ती भीतीने थरथरायला लागली होती. हाताने चाचपडत तिने लिफ्टच्या भिंतीचा आधार घेतला आणि त्यावर डोके टेकून उभी राहिली. भुकेचीही जाणीव प्रकर्षानं होत होती. 

"ऋजुता, काय झालं? "

"मला खूप भीती वाटतेय, आधीच उशीर झालाय आणि आता ही लिफ्ट ... किती अंधार आहे इथे...  ", ती रडकुंडीला आली होती.

"ऋजुता, मी आहे ना", विराज.

"हो ना ... म्हणून तर...", ऋजुताच्या तोंडून रडवेल्या आवाजात पटकन निघून गेले...

"काय? कसली भीती वाटतेय तुला ? अंधाराची? ", विराज.
"हो", ऋजुता.

"की माझी?", विराज.

"हो", ऋजुता.

"काय?" , विराज.

"अंधारात ... तुमची ...", ऋजुता आपल्याच धुंदीत अन काळजीत होती.

विराजच्या मनाला मात्र ते शब्द झोंबले होते.... खूप वाईट वाटलं होतं त्याला .... दुखावल्या गेला होता तो ... खूप मेहनत करून एखादया चित्रकाराने चित्र साकारावे आणि समोरच्याने क्षणात ते टर्रकन फाडून टाकावे असे झाले होते त्याला ....  नुकतेच त्याच्या मनात कोमल भावना फुलायला सुरवात झाली होती .... पहिल्यांदाच त्याच्या मनाच्या कोऱ्या कागदावर त्याने तिला स्थान दिले होते ....  आणि इकडे ऋजुताला त्याच्याबद्दल असं वाटतय .... एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडत असावी .... पण त्या व्यक्तीच्या मनात आपली जागा असणे तर दूरच ... उलट त्या व्यक्तीने आपल्यावर अविश्वास दाखवावा .... किती वाईट वाटेल ना असं झालं तर ... तसंच विराजला वाटत होतं.

विराजने न राहवून तिच्या हाताला धरून तिला स्वतः कडे ओढले. अनावधानाने त्याच्या ब्लेझर चा स्पर्श तिला झाला. तिच्या डोक्यामागे एक हात हलकेच धरून तिचा चेहरा हळूच वर केला आणि तिच्या डोळ्यांत खोलवर बघून म्हणाला,

"ऋजू, मला घाबरतेस का तू? .... अंधार असला म्हणून काय झालं? ... मला भिऊ नकोस ग ... तुला वाटतो तितका मी वाईट नाहीये ग.... ओरडतो मी फक्त, पण तू इतक्या वर्षांपासून मला ओळखतेस ना... आपल्या करिअरच्या सुरवातीपासूनच ओळखतेस .... कितीदा तरी आपण सोबत मीटिंगला वगैरे गेलोय ... कधी काही चुकीचे वागलोय का मी ? वाईट वळणाचा नाहीये ग मी ... रागावतो मी नेहमी, चिडतो ... पण ते तुमच्या भल्यासाठीच ना .... असं वाटतं या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पटापट शिकून पुढे जावं .... खूप काही असतं शिकण्यासारखं , नवीन करण्यासारखं ... ते करावं ... म्हणून म्हणत असतो ... काहीही करणार नाही मी तुला , काहीही होऊसुद्धा देणार नाही ... उलट आधारच देईन ... तू एकटीच उशिरापर्यंत थांबलेली दिसलीस म्हणून तुला नीट घरी सोडावं म्हणून मी काळजीने थांबलोय, गेल्या अर्ध्या तासापासून ".  विराजच्या डोळ्यात तिला खरेपणा दिसत होता. किती निर्मळ होती त्याची नजर ! त्याची अगतिकता तिला जाणवत होती. त्याचे डोळे आणि त्याच्या हळवे झालेल्या आवाजात आलेला कंप ऋजुताच्या हृदयाला हेलावून गेले. त्याच्या डोळ्यात तरळलेले पाणी बघून तिच्याही हृदयात कालवाकालव झाली.

" चुकलंच माझं... मी हे काय बोलून गेले ... पण, हे काय होतंय, विराज सरांना झालेल्या दुःखामुळे मला का वाईट वाटतंय?" , ऋजुताला कळत नव्हतं.

"स ... सर ... सॉरी ... सॉरी ना " , तिने त्याच्या डोळ्यात बघत, आपला कान हलकेच धरत म्हटलं.  त्याच्या रागावण्यामागचा दृष्टिकोन तिला आज कळला होता.

"किती चुकीचे समजत होतो आम्ही तुम्हाला", तिला वाटून गेले.

"ऋजू सॉरी नको, दुसरी एक गोष्ट देशील आज?", विराज.

"क... काय?"

"आपण दोघे तर टीमच्या सुरवातीपासूनचे खिलाडी आहोत. तूच जर मला समजू शकली नाहीस तर दुसरे कसे समजू शकतील?  तू टीममध्ये सगळ्यांशी किती मोकळेपणाने वागतेस. मित्रमैत्रिणी असल्यासारखे नाते जपतेस. आज इथे माझ्याऐवजी त्यांच्यापैकी कोणी असतं, तर तू घाबरली नसतीस ना ? तशीच माझीही मैत्रीण होशील? मला मान्य आहे , मी थोडा वेगळा होतो इतरांपेक्षा , माझी पद्धत वेगळी होती ... पण कळल्यात मला माझ्या चुका ... सुधारण्याचा प्रयत्न करतोय मी .... मला समजून घेशील? माझ्यावर विश्वास ठेवशील ? " , तिच्या डोळ्यात खोलवर बघत त्याने विचारलं आणि आपला हात पुढे केला.

"ओके सर" , त्याच्या हाती मैत्रीचा हात देत ती म्हणाली.

"तसं बघितलं तर किती हुशार आहेत सर...  इतक्या कमी वयात इथपर्यंत पोचलेत... प्रत्येक एम्प्लॉयी चे प्लस पॉइंट्स आणि विकनेसेस माहिती आहेत त्यांना. सांगतही असतात ते प्रत्येकाला. पण ओरडतात फार ... त्यामुळे कोणी समजूनच घेत नाही... मीही समजू नाही शकले ", ऋजुता विचार करत होती, तिलाही वाईट वाटत होतं .

तिचा हात हाती घेऊन त्याने क्षणभर डोळे मिटले आणि एक अश्रू त्याच्या गालावर ओघळला.

"सॉरी ना सर, मी चुकले . मी कधी या दृष्टिकोनातून  विचारच केला नव्हता", ऋजुता म्हणाली. 

नेहमी सर्वांवर ओरडत असणाऱ्या विराजचे हे हळवे रूप पाहून , त्याच्या  गालावर ओघळणाऱ्या अश्रूला पाहून ती हेलावली होती . काय करावे तिलाही सुचत नव्हते.


पण काही गोष्टी शब्दांतून नाही तरी स्पर्शातूनही व्यक्त होतात ना? खूप विश्वास आणि आधार जाणवला ऋजुताला त्याने हाती घेतलेल्या हाताच्या त्या स्पर्शात ....

काही सेकंदांनी स्वतःला सावरत तो म्हणाला, "मैत्रीत सर म्हणतात का तुमच्याकडे?".

"अं?", ऋजुता गोंधळली.

"तुमच्याकडे मित्राला सर म्हणतात का?", विराजच्या चेहऱ्यावर आता किंचित हसू आले होते.

"न ... नाही सर..", ऋजुता.

"ही अशी का गोंधळतेस ग माझ्यासमोर नेहमी? मी काही वाघ नाहीये तुला खाऊन टाकायला.  आणि नाव काय आहे माझं? ", विराज हसून म्हणाला.

"वि... विराज ...", ऋजुता.

"विराज ना? की जमदग्नी ? काय ग?", विराज आता मिस्कीलपणे म्हणत तिच्याकडे बघत होता.

"तुम्हाला कसे माहिती?", ऋजुताने आश्चर्याने विचारले.

"तूच म्हणालीस ना मगाशी, जमदग्नी?", विराज .

"नाही ... विराज आहे ", ऋजुताही आता हसण्यात सामील झाली. "पण माझं ऐकून न घेता आधीच रागावलात की जमदग्नीच म्हणणार मी तुम्हाला".

"बरं, डन ", तो हसून म्हणाला.

"उफ्फ" , ऋजुता.
"आता काय झालं?" , विराज.

"काही नाही , भूक लागलीय जोरात, आज नवीन प्रोजेक्ट च्या गडबडीत काही खाल्लेच नाही. तुम्हालाही भूक लागली असेल ना? ", ऋजुता.

" हं, जेवणाची वेळही होऊन गेलीय", विराज.

तेवढ्यात काहीतरी आठवून विराजने बॅगमधून एक डबा काढला.
"Guess what, आज माझ्याकडे माझा टिफिन तसाच शिल्लक आहे. पराठा दिला होता आज आईने. चल खाऊ या", विराज.

"ओह नो, सर आज तर तुम्ही दुपारीही जेवला नाहीत ना?, खाऊन घ्या मग आता तरी, इथे किती वेळ लागेल काय माहिती", ऋजुता.

" अग हो, आज त्या मीटिंग मध्ये थोडेफार स्नॅक्स खाऊन झाल्यामुळे भूकही नव्हती आणि कामात लागल्यामुळे नंतर आठवणही नाही राहिली. पण बघ त्यामुळेच आता कामा येईल आपल्याला", म्हणत विराजने तिच्याही हातात पराठा दिला.

पराठा खाऊन पाणी प्यायल्यावर दोघांनाही जरा बरे वाटू लागले.

"काकूंनी खूप छान बनवला होता पराठा. थँक्स सांगा त्यांना माझ्याकडून", ऋजुता.

"हो , तू पण खाल्लास हे ऐकून तर खूष होईल ती एकदम. तू मंदिरात भेटल्यापासून तर दोनतीनदा विचारले तिने आणि विधीने तू कशी आहेस म्हणून", विराज.

ऋजुताच्या चेहऱ्यावर स्माईल आले.

तेवढ्यात लाईट आले आणि लिफ्ट पुन्हा सुरू झाली.

"थँक यू लिफ्ट" , विराज.

"का, लिफ्ट ला का थँक यू?" , ऋजुताने विचारले.

"तिनेच एक मैत्रीण दिली ना मला आज? आणि जमदग्नीपासून विराज बनवले , म्हणून", विराज.

आणि दोघेही हसू लागले.

खाली पोचून बाहेर पडले तेव्हा कुठे ऋजुताचा जीव भांड्यात पडला.

"ऋजू, तू एकटी जाण्यापेक्षा चल आज मी सोडतो तुला घरी . उद्या सकाळी रिक्षाने येता येईल तुला", विराज.

दोघेही विराजच्या गाडीत बसून निघाले. काही अंतर गेल्यावर विराजने गाडी बाजूला घेऊन थांबवली आणि तो खाली उतरला.

भराभर जाऊन बाजूला असलेल्या Naturals Icecream मधून त्याने दोन आईसक्रीम आणले. एक ऋजुता ला देत म्हणाला, "हे आपल्या मैत्रीच्या पहिल्या दिवसासाठी.... घाई असली म्हणून काय झालं ? ... celebration तो बनता है न ?".

ऋजुताने हसून ते घेतले आणि म्हणाली, "सर, तुम्हीसुद्धा शिकलात हं, छोटे छोटे आनंद celebrate करायला."

"काय ग ऋजुता, 'सर' 'सर' सरकवत असते तू मला नेहमी. विराज म्हणता येत नाही का तुला? एवढं चांगलं माझं नाव ठेवलंय आई बाबांनी. सर म्हटलं की कसं एकदम पन्नाशीत गेल्यासारखं वाटतं. विराज म्हणत जा बरं ", विराज.

ऋजुता खळखळून हसत म्हणाली , "बरं".

"चला मॅडम , आटपा आता लवकर, जायचं आहे ना , माझं तर झालं पण", विराज.

"हो.... स्स... खूप थंड आहे न ते...", ऋजुता.

"हो का? माझे तर इतके गरम होते की चटके लागत होते मला", विराज हसत हसत म्हणाला.

पुन्हा खळखळून हसणाऱ्या ऋजुता कडे विराज त्याच्याही नकळत भान हरपून बघत राहिला.

"किती छान दिसतेस अशी हसताना... आता टेन्शन घेत जाऊ नकोस हं आणि घाबरायचे सुद्धा नाही. मी आहे ना?"

" हो... विराज , चल ना आता", ऋजुता.

"Ok बॉस, बंदा आपकी खिदमत में हाजिर है, बोलिये मोहतरमा , कहाँ जाना चाहेंगी आप?", विराज.

"फिलहाल तो  राणीसाहिबा को अपने महल जाना हैं ... चलने की कृपा करेंगे ? ", ऋजुताही आता त्याच्या नौटंकीमध्ये हसून सामील झाली होती.

थोड्याच वेळात ते घरी पोचले.
घरी त्यांच्यासमोर काय वाढून ठेवले होते ?


क्रमशः
******

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेतील कोणते पात्र आवडते आहे? हा भाग कसा वाटला ? नक्की कळवा.

विराजच्या आयुष्यात पुढे काय होईल ?

बघू या पुढच्या भागांत.

प्रत्येक भागाच्या शेवटी खाली scroll केल्यानंतर Series List मध्ये आतापर्यंत पोस्ट झालेले सगळे भाग दिसतात. कोणाला मधले भाग मिळाले नसतील तर त्यांना ते series list मध्ये वाचता येतील.

🎭 Series Post

View all