दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 73

अशी काही लाजली ना ऋजुता की विराजचा कलिजा तिथल्यातिथेच खलास !!!

मागील भागात आपण पाहिले ...

विराज - ऋजू आपल्या आयुष्यातला अविस्मरणीय असा सुवर्णक्षण अनुभवताहेत. विराजने एकदम अनोख्या पद्धतीने ऋजूला प्रपोज केले आणि ऋजूनेही तितक्याच हटके स्टाईलने त्याला उत्तर दिले.

पुढे...

"तू पण ना, कोडे घालतेस का मला? आय लाईक इट! तुझी पण \"हटके\" स्टाईल आहे एकदम! वॉव यार!" विराजचा आनंद गगनात मावत नव्हता.

"विराज, हे स्वप्न आहे का रे? " ऋजू.

"हॊ स्वप्नच आहे हे, मी कित्येक दिवसांपासून पाहिलेले स्वप्न. जे आज प्रत्यक्षात आलेय." विराज.

"थँक यू विराज, खरंच खूप स्पेशल केलास तू आजचा स्पेशल मोमेन्ट! आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा! हॅट्स ऑफ टू युवर इमॅजिनेशन अँड रोमँटिसिझम! " ऋजू.

"तूसुद्धा काही कमी नाहीस हं, त्यामुळे अर्धे क्रेडिट तुलाही. साध्या क्षणाला आणखी सुंदर, अविस्मरणीय कसं बनवावं हे कळतं तुला. तू म्हणाली नसतीस तर मीही एवढं केलं नसतं ग." विराज.

"ऋजू, एखादं गाणं गाशील? ऐकावंसं वाटतंय तुझ्या आवाजात."

"कोणतं?" ऋजू.

"तुझ्या आवडीने, कोणतंही." विराज.

किंचित विचार करून लगेच ऋजुताने त्या घडीला साजेसे एक सुंदर गाणे गायला सुरुवात केली.

"जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभु दे

शीतल अशा रुपेरी चंद्रप्रकाशात गुलाबी रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती ऋजुता. वाऱ्याने केस किंचित भुरभुरत होते. मध्येच एखादी चुकार बट गालाला स्पर्श करून जात होती. गळ्यातल्या नाजूकशा नेकलेसचा एखादा खडा मध्येच चांदणीसारखा चमचमत होता. ऋजुता गाणे गाण्यात मंत्रमुग्ध झाली होती आणि विराजला तर हे नेत्रसुख अन कर्णसुख किती अन कसे समेटून घ्यावे तेच कळेना. अनिमिष नेत्रांनी बघत विराज त्या गाण्याच्या शब्दांमध्ये, ऋजुताच्या सुरांमध्ये अगदी धुंद होऊन ते ऐकत होता. ऋजुताही त्या शब्दांद्वारे जणू काही तिच्या मनातल्या भावना व्यक्त करत होती. तिच्या मनात स्वप्नातल्या राजकुमाराचे, त्याच्याबरोबर संसार करण्याचे चित्र उमटले होतेच. त्या स्वप्नरंजनात रमण्याचा हा सोनेरी काळ होता.
\"प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे \" गाताना अशी काही लाजली ना ऋजुता की विराजचा कलिजा तिथल्यातिथेच खलास!

पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाउ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे"

विराजच्या चेहऱ्यावर एक हसू बघण्यासाठी तिने त्याची गाणे गाण्याची विनंती अलगद झेलली होती. त्याचे हास्य असेच नेहमी कायम रहावे अशी तिची प्रेमळ इच्छा.

विराज अगदी भारावून गेला होता. प्रत्यक्षातले अंतर कितीही असले तरी शब्दागणिक मनातील दुरावा कमी होऊन दोघे मनाने जवळ येत होते. गाणे संपले आणि दोघांचेही तसेच एकमेकांच्या डोळ्यात बघत भान हरपले.

"वा ! काय सुंदर ताना घेतल्यास ग! सुंदर गायलीस !" भारावलेला विराज खूष होऊन म्हणाला.

"थँक यू. " ऋजुता गालात हसली.

"विराज, परत कधी येणार आहेस तू इथे?" ऋजुताने त्याच्याकडे बघत अलगदपणे विचारले.

"अग चाळीसेक दिवस तरी आहेत अजून." विराज उत्तरला.

"बाप रे! चाळीस! " ऋजुताचा चेहरा काहीसा खट्टू झाला.

"का ग, काय झालं?" विराज.

"काही नाही. सहज." म्हणताना ऋजुताची नजर झुकली आणि ती गप्प झाली. कसं सांगावं, मनातली हुरहूर, अधीरता त्याच्यासमोर कशी उलगडावी तिला कळेना.

"ए सांग ना. का विचारते आहेस? भेटावसं वाटतंय?" विराजने हळुवारपणे मृदू आवाजात विचारत तिच्या हृदयाचा ठाव घेतला.

"हॊ ना. कधी एकदा भेटू असं होतंय. किती वाट बघायची, लवकर ये ना." म्हणत मन काहीसं मोकळं करताना ऋजुताची नजर झुकली अन नाजूक हास्याबरोबरच लज्जेची रक्तिमाही गालावर पसरली.

विराज पुन्हा तिच्याकडे बघतच राहिला. आपली कोणीतरी इतकी वाट बघतेय ही नव्यानेच झालेली जाणीव त्यालाही अधीर करून गेली, मनोमन सुखावून गेली.


तेवढ्यात विराजचा आकाशपाळण्याच्या राऊंडचा वेळ संपला. अतीव आनंदाची एक सुंदर सुखद अनुभूती मनात जपत दोघांनीही एक अनोखा सुवर्णक्षण आठवणींच्या खजिन्यात , मनाच्या कुपीत हळुवारणे कैद केला. चेहऱ्यावर अनोखी लालिमा लेवून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

ऋजुता काही वेळ आकाशातल्या चंद्राला निरखत आपल्याच सुखद अनुभूतीमध्ये मग्न होती. काही वेळाने ती आनंदात गालात हसतच गच्चीवरून खाली आली. बघते तर काय, रेखाताई आणि राजशेखर तिची वाटच बघत बसले होते.

"अरे हे काय , तुम्ही झोपायला गेला नाहीत अजून?" ऋजुता म्हणाली

"झोपलो असतो तर माझ्या परीराणीचा हा इतका आनंदित चेहरा कसा बघायला मिळाला असता?" राजशेखर सोफ्यावरून उठत म्हणाले.

"खूष आहेस ना बेटा?" रेखाताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

ऋजुताने किंचित लाजत होकारार्थी मान हलवली.

"विराजने त्याच्या घरी सांगितलेय ना ग? विचारलंय का तू त्याला?" रेखाताई.

ऋजुताने जीभ चावली . "अरे! मी तर हे विचारलंच नाही विराजला! विचारू का आता?" ती म्हणाली.

"नको , आता नको. त्याला म्हणावं, उद्या सकाळी मला फोन कर. मला बोलायचं आहे त्याच्याशी. " राजशेखर काहीशा ठामपणे म्हणाले.

"क... काय बोलणार आहात तुम्ही , बाबा?" ऋजुता.

"बोलेन मी." राजशेखर.

"बेटा, जरा सबुरीने घे . अजून विणाताई , विनितभाऊजी यांच्याशी आपलं बोलणं व्हायचं आहे, त्यांचा होकार यायचा आहे ना आपल्याला. " रेखाताई तिला समजावत म्हणाल्या.

"हो. अग आई, मला वाटतं तो बोलला असावा कारण आज मला लग्नासाठी विचारलं त्याने." ऋजुता.

"अच्छा, तो ये बात है? म्हणूनच माझी परी एवढी खूष आहे तर! बरं, ठीक आहे . तुमचा दृष्टीचा प्रोग्राम झाला की बोलणार आहोतच आपण. तू जा, झोप आता. "


तिकडे विराजही खुशीत जवळपास उड्याच मारत घराजवळ पोचला. फुटपाथवरून चालत असतानाच त्याने विधीला फोन केला.

"ए नकटू, झोपलीस का ग?"

"उं ऽऽ, झोपू दे ना ऽऽ. किती दिवसांनी आज लवकर झोपायला मिळालंय. " विधी झोपाळलेल्या आवाजात म्हणाली.

"उठ उठ चिमणे, एक गोष्ट सांगायचीय तुला. इन फॅक्ट सर्वांनाच सांगायची आहे. अग ऐकशील न, तर झोप पळूनच जाईल तुझी!" म्हणत विराज घरी पोचला.

"हं बोल. असं काय सांगायचं आहे? काही छानपैकी गिफ्ट घेतलंस का माझ्यासाठी तू?" विधी डोळे चोळत, चुळबूळ करत झोप भरल्या डोळ्यांनीच कशीबशी उठून बसत म्हणाली.

" चिमणे, ऐक न, ऋजुताने माझ्याशी लग्नाला होकार दिलाय. " विराजच्या आवाजात आनंद ओसंडून वाहत होता.

"क्काय?" आता मात्र विधीने एकदम खडबडून जागी झाल्यासारखं विचारलं.
"ऋजुता हो म्हणाली तुला? प्रपोज केलंस सुद्धा तू तिला? आणि कधी झालं एवढं सगळं? "

"हो ऽऽ ! अग आताच. आहे की नाही ग्रेट न्यूज?" विराजच्या आवाजातली अन् चेहऱ्यावरची खुषी बघून विधीचाही आनंद गगनात मावत नव्हता.

"हो हो , मग काय ! अगदीच ! ग्रेट म्हणजे काय एकदम ढिंचॅक ! अरे ढिंचॅक ढिंचॅक ढिंचॅक ढिं !

विधी उठून एक हात वर करून गोल गोल फिरत नाचायलाच लागली होती. विराज हसून बघत होता.

"आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली ... "

खाली म्हणताच तिला आठवले अन्
"थांब थांब, मी आईला अन् बाबांना सांगते खाली जाऊन." विधी त्याला म्हणाली.

"ए आई ऽऽ, बाबा , अहो बाबा ऽऽ . हे बघा दादा काय सांगतो आहे."

"काय ग, काय झालं, इतकी खूष कशामुळे दिसतेय? कसला एवढा आनंद झालाय आम्हालाही सांग जरा." विधीला आनंदात पायऱ्या उतरून येत असताना बघून झोपायला खोलीत जायला निघालेल्या वीणाताई दारातच थबकल्या आणि हसून विचारत्या झाल्या.

तोवर विधी त्यांच्याजवळ पोचून तिने वीणाताईंचा हात धरला आणि त्यांच्या अवतीभोवती नाचायला लागली. एका हातात फोनवर विराजशी स्पीकर वर व्हिडिओ कॉल सुरूच होता. विनीतसुद्धा गमतीने त्यांच्याकडे पाहू लागले.

" ही काही सांगत नाही. तूच सांग रे विराज , काय झालंय?"

"नाही नाही , थांब थांब , मी सांगणार दादा." विधी त्याला म्हणाली.

"आई, बाबा, ऋजुताने दादाशी लग्नाला होऽऽकार दिलाऽऽय. त्याने विचारलं आता तिला. ऋजुतावहिनी ! ऋजुवहिनी ! ये ऽऽ " विधी उत्साहाने सांगत होती. विराज हसत होता.

ते ऐकून विनीत सुखावले. त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा मिळाल्यासारखे भाव अन् त्यामुळे आपसूकच आलेले स्मितहास्य!

आणि वीणाताई? एक काळजी मिटली होती पण तरी त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर काहीशी चिंता आणि गंभीरता डोकावली होती. पण विराजचा आनंद बघून त्या मनातून सुखावल्याही होत्या. त्यांनी काहीसा मनात विचार करत विराजला विचारले,

" तू विचारलस का आता ऋजुताला? आपले ठरले होते ना, तू आल्यावर बघू या असं? मग घाई का केलीस अशी? "

"हो आई. मी विचारलं. ॲक्च्युअली ते असं झालं, की तिला दुसरं स्थळ आलंय . मला तिला गमवायचं नाहीये ग. निदान विचारलंच नाही असं तरी व्हायला नको म्हणून मग घाई करावी लागली मला. सॉरी ना आई... मी तुम्हाला न विचारता पुढे ..." विराज.

"तिला सांग , मला उद्या भेट म्हणावं. अन् हो, घरीच ये म्हणावं. " वीणाताई.

क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर.

संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा, घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


रिलोकेशन, शिफ्टिंग, घर, ऑफिस इत्यादी पुन्हा सगळी घडी बसविणे, त्यात झालेली धावपळ, एक्झर्शन आणि त्यानंतर आळीपाळीने माझ्यासहित घरातल्या सर्वांचे एकेक करून आजारी पडणे. ते सुद्धा एकदा नव्हे तर दोनदा !! प्रत्येकी!! पूर्ण राऊंडस् !!! .... या सर्व गडबडीत लिहायला जमलं नाही. खरं म्हणजे, मागील दोन भाग म्हणजे प्रपोजल स्पेशल भागसुद्धा मी प्रवासात असताना वेळात वेळ काढूनच लिहिले होते. कारण सर्वांना त्याची खूप आतुरता होती. वाचकांना वाट बघायला लावणे हा उद्देश कधीच नसतो. मी सुद्धा वाचकही आहेच ना! त्यामुळे समजू शकते. परंतु एकामागोमाग काही अडचणी येत गेल्यामुळे हा विलंब झाला. \"दृष्टी आणि दृष्टिकोन\" कथा वाचताना सर्व सुज्ञ वाचक लेखिकेच्या दृष्टिकोनातूनही विचार करत, समजून घेऊन, न रागावता, पूर्वीप्रमाणेच कथेला भरभरून प्रेम देतील या प्रेमळ अपेक्षेसहित, झालेल्या तसदीबद्दल वाचकांची क्षमा मागून पुढील भाग लिहायला घेते आणि आपण सर्व कथेच्या उत्तरार्धाकडे वाटचाल करत या सुंदर कथेचा आस्वाद घेऊ या.

मागील भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. हा भाग कसा वाटला ते अवश्य कळवा.

🎭 Series Post

View all