दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 72

Viraj - Rujuta Special... हॊ स्वप्नच आहे हे, मी कित्येक दिवसांपासून पाहिलेले स्वप्न. जे आज प्रत्यक्षात आलेय.

ऋजू छान तयार झाली होती . बेबी पिंक रंगाचा घेरदार अनारकली ड्रेस, त्यावर चमकदार खड्यांचे लोंबते कानातले आणि गळ्यात मॅचिंग खड्यांचे छोटेसे लॉकेट, थोडेसे केस क्लचमध्ये घेऊन बाकी मोकळे खांद्यापर्यंत रुळणारे, रेखीव भुवयांच्या मधोमध छोटीशी चमकदार टिकली, डोळ्यात काजळाची बारीक रेघ, अगदी कळत नकळत असा केलेला मेक अप. खूप सुंदर दिसत होती ऋजुता.

विराजही तोपर्यंत त्याच्या निर्धारित ठिकाणी पोचला होता.

"ए मी तयार आहे, तू तुझ्या घरी गच्चीवर ये ना, चांदण्यात." विराजने ऋजुताला मेसेज केला.

ती गच्चीवर गेली. तिला खूप धडधडत होते. एक स्वप्नवत क्षण आज साकार होणार होता. इकडे विराज अन तिकडे ऋजू, दोघेही ती अनामिक हुरहूर अनुभवत होते.

तिने त्याला सांगितले "हॊ, मी आलेय."
विराजने लगेच व्हिडिओ कॉल केला.

"हॅलो, आहेस कुठे तू?" ऋजुता हसून हात हलवत त्याला म्हणाली.

"हॅलो," विराजने उत्तर दिले. "वॉव! खूप सुंदर दिसते आहेस हं!"

"थँक्स." ऋजू गालात किंचित हसत म्हणाली . "ए, पण सांग ना तू कुठे आहेस?"

" बघ, तुझ्या सगळ्या अटी मी पूर्ण केल्यात हं. हे बघ, मी जमिनीपासून 135 मीटर उंचावर आहे. थेम्स नदीच्या काठावरचे 'लंडन आय' हे युनायटेड किंग्डममधले सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि ते लंडनमधल्या सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी  एक आहे, हे तुला माहीत असेलच. 'लंडन आय' हा लंडन शहरामधला एक अवाढव्य आकाशपाळणा म्हणजे जायंट व्हील आहे. हे युरोपमधले सर्वात उंच फेरिस व्हील आहे. त्यात कॅप्सूलसारख्या आकाराचे मोठे बत्तीस पारदर्शक पॉड्स आहेत. एअर कंडिशन्ड आहेत ते आणि आत अगदी कम्फर्टेबली फिरू शकतो आपण, बसूही शकतो. ते फेरिस व्हील 360° तून फिरते आणि आपल्याला तिथून उंचावरून संपूर्ण लंडन शहराचे अत्यंत विहंगम दृश्य दिसते. बघ, तुला दाखवतो." असं म्हणून विराजने तिला वेगवेगळ्या बाजूनी बाहेरचे दृश्य दाखवले.

"वॉव! ही लांबच लांब पसरलेली थेम्स नदी, टॉवर ब्रिज, बिग बेन वगैरे लंडनमधल्या प्रसिद्ध बिल्डिंग्ज, सगळं काही दिसतंय रे इथून उंचावरून तर! खाली त्या बाजूला एका रांगेत असलेल्या त्या झाडांवरची लाइटिंग पण चमचमत आहे. ते दृश्यही खूप छान दिसतंय. सहीच! खूप मस्त आणि भन्नाट आयडिया आहे रे तुझी! यू आर अल्मोस्ट ऑन टॉप ऑफ लंडन." बघताना ऋजुताच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.

"येस, आणि मी इतक्या उंचावर असूनसुद्धा एकदम कम्फर्टेबल आहे. म्हणजे माझ्या काळजीपोटी ठेवलेली तुझी दुसरीही अट नीट पूर्ण झाली."

एकमेकांना नीट व्हिडिओ दिसेल अशा पद्धतीने दोघांनीही आपापल्या ठिकाणी एक जागा बघून फोन नीट ठेवला.

"खरंच रे, मस्त आयडिया आहे तुझी तर! मला वाटलं नव्हतं की पॅरासेलिंग शिवाय दुसरं काही सुचेल तुला. पण उगाच कसली रिस्क नको होती रे, म्हणून मी ते नको म्हणाले होते तुला. नाहीतर करायला जावे एक अन व्हायचं काहीतरी दुसरंच. "

"हं, ती आयडियाही आली होती मला, पण बोलता आलं नसतं नीट, हवेच्या आवाजामुळे डिस्टर्ब झालं असतं कदाचित. म्हणून हा विचार केला." विराज.

"हं बरोबर आहे . या पॉड मध्ये आणखी कोणी दिसत नाहीये. तू एकटाच आहेस की काय आत?" ऋजुता.

"हॊ. एकटाच आहे. मी व्यवस्था करून घेतली तशी. "

"आणि हे तू माझ्यासाठी केलंस ." ऋजू.

"प्रिन्सेस, तुझ्यासाठी काहीही ग! आजचा हा आपला पहिला स्पेशल मोमेन्ट फक्त तुझा आणि माझाच हवा होता मला." विराज.

हे ऐकून ऋजू भारावली होती.

बोलेबोलेपर्यंत बाहेर सूर्यास्त व्हायला आला होता.

"हे बघ ऋजू, तुझ्या माझ्या या खास क्षणाला आपल्याला आसमंताची साक्षही मिळते आहे. वर रंगांची उधळण झालेले आकाश, खाली झुळझुळते पाणी... " त्याने पुन्हा तिला बाहेरचे दृश्य दाखवले.

सूर्याची सोनेरी किरणे सुवर्णस्पर्शाने आसमंत उजळत होती. नदीच्या पाण्यावरही अलगदपणे सोनेरी स्पर्श होत होता. आकाशात केशरी, नारिंगी, निळ्या रंगांची मुक्त उधळण होत मोहक सरमिसळ झाली होती. इकडे सूर्य आपला प्रवास संपवून मावळतीला झुकला होता, तर दुसरीकडे छोटीशी चंद्राची कोर ढगाआडून उगवू पाहत होती. एक दोन ठळक तारे लुकलुकायला लागले होते.

हे सगळे बघून तर ऋजुताचा आनंद गगनात मावत नव्हता.

"आणि माझ्याकडे शीतल चांदण्याची पखरण . हाच चंद्र तुझ्याकडे आणि माझ्याकडेही! आपल्या प्रेमाचा पहिला साक्षीदार! आज तुझ्या माझ्यातला दुवा." ऋजू म्हणाली.

"किती सारखा विचार करतो ग आपण! मीसुद्धा हाच विचार करून या वेळी ही सगळी योजना करून आलो आणि म्हणून तुला वरती चांदण्यात ये म्हणालो." विराजच्या मनातले ऋजूला स्वतःहून कळल्यामुळे विराजच्या मनाला खुशीची लहर स्पर्शून गेली.

"वेडू, किती रोमँटिक आहेस रे !" ऋजुता लाजून म्हणाली.

"आय हाय! तुझं हे लाजणं! " विराज अनिमिष नेत्रांनी तिचं लाजणं बघत होता.

"ऋजू,

तुझं हे सुंदर लाजणं, आयुष्यभर
हक्काने बघण्याचा मला हक्क देशील?
तुझेच लोभसवाणे रूप माझ्या हृदयात कोरले गेलेय
तुझ्या हसऱ्या चेहऱ्याचा छंद मला जडलाय
तुझ्या गुणांवर लुब्ध मी झालोय
तुझ्याशिवाय, माझा मी उरतच नाही
तुझीच आस, आणि तुझाच ध्यास माझ्या श्वासात आहे.
माझ्या रोमारोमात तुझेच नाव आहे,
त्यावर तुझ्या होकाराची मोहर उमटवशील?
आयुष्याची यशस्वी वाटचाल करण्यासाठी,
माझ्या हाती तुझा हात देशील?
प्रत्येक दुःखाशी आधी लढेन,
सुखात तुझ्या मी सोबत असेन
फुलासारखे तुला जपेन,
चंद्र ताऱ्यांची साक्ष असेल .
या सागराची सरिता,
माझ्या जीवनाची कविता होशील?
आयुष्यभरासाठी मला तुझा बनवून,
सांग ऋजू, तू माझी होशील?
आयुष्याचा जोडीदार म्हणून
मला स्वीकारशील ?
माझ्यासोबत सप्तपदी चालून
सांग ऋजू, तू माझी होशील ?"

विराज गुडघ्यावर बसून हातात गुलाबाचे फूल धरून ऋजुताला म्हणत होता.

ऋजू अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघतच राहिली. त्याचा शब्द न शब्द तिच्या काळजाचा ठाव घेत होता. त्याचे ते सच्चे आर्त भाव, तो आतुरता, आनंद, हुरहूर या सर्वांचा मनमोहक संगम असलेला चेहरा!

'हे सगळं माझ्यासाठी आहे? हा विराज माझा आहे? ' तिचे हृदय उचंबळून येत होते. तिच्या आयुष्यातला हा एक अविस्मरणीय क्षण होता.

'आपल्यावर कोणीतरी इतकं प्रेम करते ही भावनाच किती सुखद आहे ना!' तिला वाटून गेले.

ती त्या क्षणाच्या धुंद मारव्यात विरघळत गेली. अभवितपणे ती म्हणाली,

"होश ​​​ माझे उडवून, का रे निघून गेलास?
मी मला सापडले नव्याने, तू शोधून गेलास.
तुझाच सहारा अन तुझाच शहारा मनास माझ्या
झिरपली प्रीत ही तुझी, हृदयात माझ्या
मचमली चांदणी, उमलली मनी प्रीत माझ्या
रेशीमगाठ माझ्याशी बांधून, माझा तू होशील का?

विविध गुणांवर तुझ्या कशी मी भाळले,
राज्य मनावर तुझेच, मलाही हे कळले
से सोबती दिवा आणि वात, साथ माझी देशील ना , माझा तू होशील ना ?"


ऋजुतानेही त्याला असे अगदी भावपूर्ण उत्तर दिले.

विराजचा स्वप्नपूर्तीचा हा अविस्मरणीय क्षण होता. त्यात ऋजुताने इतक्या सुंदर शब्दात उत्तर दिले. विराजचा आनंद अवर्णनीय होता. तोही भारावून तिच्याकडे बघत होता. काही क्षण दोघेही निःशब्दपणे ती अनुभूती घेत होते.

"वॉव! किती छान ग! किती सुंदर शब्दांत भावना व्यक्त केल्यास! " विराजला झालेला आनंद त्याच्या चमकलेल्या डोळ्यांत दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरची खुषी ऋजुताला बघूनच कळत होती.

"अग, पण मी तुला विचारलं ना, मग मला हॊ की नाही ते उत्तर दे ना. तू तर मलाच प्रश्न विचारतेय पुन्हा." विराज मिश्किलपणे म्हणाला .

"त्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. त्या प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर घेऊन जुळवून बघ, तुला तुझे उत्तर मिळेल. " ऋजुता लाजून म्हणाली.

विराजने ओळी आठवून प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर जुळवून बघितले. तर त्याला उत्तर मिळाले, 'हॊ मी तुझीच रे विराज!'.

"येस्स! येस्स! येस्स! " इतका आनंदला ना विराज की काही विचारूच नका! येस्स ची हाताने ऍक्शन करत उड्याच मारल्या त्याने.

"अरे, वेडू, गोडू, सांभाळून ना. " ऋजुताने डोक्याला हात लावला. पण त्याचा उत्साह, त्याला झालेला आनंद आणि तिच्यावरचे प्रेम बघून तिला खूप भारावल्यासारखे झाले होते. सगळे खरंच स्वप्नवत वाटत होते.

"तू पण ना, कोडे घालतेस का मला? आय लाईक इट! तुझी पण 'हटके' स्टाईल आहे एकदम! वॉव यार!" विराजचा आनंद गगनात मावत नव्हता.

"विराज, हे स्वप्न आहे का रे? " ऋजू.

"हॊ स्वप्नच आहे हे, मी कित्येक दिवसांपासून पाहिलेले स्वप्न. जे आज प्रत्यक्षात आलेय." विराज.

"थँक यू विराज, खरंच खूप स्पेशल केलास तू आजचा स्पेशल मोमेन्ट! आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा! हॅट्स ऑफ टू युवर इमॅजिनेशन अँड रोमँटिसिझम! " ऋजू.

"तूसुद्धा काही कमी नाहीस हं, त्यामुळे अर्धे क्रेडिट तुलाही. साध्या क्षणाला आणखी सुंदर, अविस्मरणीय कसं बनवावं हे कळतं तुला. तू म्हणाली नसतीस तर मीही एवढं केलं नसतं ग." विराज.

"खरं सांगू, अगदी असाच खास असावा हा क्षण, पहिला खास क्षण नेहमी लक्षात रहावा, असं वाटलं होतं मला. म्हणून तुला तसं म्हणाले होते मी. " ऋजू.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

इमेज - गूगलवरून, साभार.

संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा, घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून खूप धन्यवाद. विराजच्या योजनेची कल्पना येण्यासाठी साजेशी इमेज शोधून लावली आहे. हा भाग कसा वाटला, अभिप्राय नक्की कळवा.

🎭 Series Post

View all