राजशेखरही ऋजूच्या बाजूला डायनिंग टेबलसमोर येऊन बसले. तिघेही नाश्ता करत होते.
"कसं चाललंय बेटा सगळं? " राजशेखर.
"ठीक आहे बाबा. नीट चाललंय."
"काही प्रॉब्लेम तर नाही ना? काल अशी डिस्टर्ब्ड का वाटत होतीस ग?"
"अं... ते... बाबा,"
"हं सांग ना."
"बाबा, काल आमचा रिलीज रोहित सरांच्या ऑफिसला जाऊन करायचा होता ना, तो तर व्यवस्थित झाला. पण त्यांनी ना, मला लग्नासाठी विचारलं. घरी येऊन बोलतील म्हणाले."
"अच्छा! असं आहे तर! मग काय, कसा आहे मुलगा? काय काय माहिती आहे तुला त्याच्याबद्दल?" राजशेखर.
मग ऋजुताने रोहितने सांगितलेले सगळे सांगितले.
"मग चांगलं आहे की सगळं , येऊ देत त्यांना घरी. मग बघू या." राजशेखर रेखाताईंकडे बघत म्हणाले.
"पण बाबा, नको ना, मला नाही करायचं त्यांच्याशी लग्न."
" बघू या तर खरं घरचे कसे आहेत, कोण आहेत. एवढं तर सगळं चांगलं आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? आवडला नाही का मुलगा? मग कसा मुलगा हवा तुला?" राजशेखर सहजपणे म्हणाले .
"मला ना, अगदी तुमच्यासारखाच, निर्व्यसनी, स्वतःच्या हिंमतीवर, कर्तृत्वावर विश्वास असणारा, घरच्यांची काळजी घेणारा, बायकोच्या मताला आदर देणारा, इतरांचा विचार करणारा आणि मला समजून घेणारा आणि माझ्यावर खूप प्रेम करणारा असा नवरा हवा."
"छ्या:! असे इतके सगळे गुणविशेष असलेले मॉडेल्स बनणं आजकाल बंद झालंय. अशी मुलं आहेत कुठे आता!" राजशेखर नकारार्थी मान हलवत गमतीने म्हणाले.
"आ ऽऽ हेत ना ऽ बाबा." ऋजुता किंचित जोर देत म्हणाली.
"मला तर नाही दिसत, तुला कोणी दिसला का?" राजशेखर.
"असतात अशी मुलं. विराजच बघा ना, आहे की नाही?" ऋजू.
"ओ ऽऽ ह! तो आहे का तसा? " राजशेखर मनातून चकित झाले होते आणि आनंदितही, पण शक्य तेवढ्या निर्विकारपणे ते म्हणाले.
"हॊ , आहे न, बघा, अगदी तुमच्यासारखंच आहे त्याचं सगळं. निर्व्यसनी आहे, हुशार आहे, स्वतःच्या हिंमतीवर, कर्तृत्वावर विश्वास आहे त्याचा. ऑफिसमध्ये सगळं कसं नीट सांभाळतो, घरी काका काकू, विधीची किती काळजी घेतो. आपल्यापरीने समाजासाठीही कितीतरी प्रयत्न करत राहतो, बघा, एवढी मोठी 'दृष्टी'ची स्थापना केली त्याने. वेगळे काही करण्याची हिंमत आहे त्याच्यामध्ये. आपल्या ध्येयासाठी किती झटतो, मेहनत घेतो तो." ऋजुता एक एक वाक्य जसजसे बोलत होती तसतसे राजशेखर आणि रेखाताई मनातून आनंदित होत होते.
पण रेखाताई निर्विकार असल्यासारखे दाखवत होत्या. जणुकाही तिच्या मनातले काही कळलेच नाही. राजशेखर मात्र गंभीर होत, चेहऱ्यावर राग दाखवत ऋजुताला मोठ्याने म्हणाले , "काय आहे हे ऋजू? काय चाललंय तुझं? मला वाटलंच असं काहीतरी असेल. शोभतं का असं?"
तिला आठवलं तिचं विराजशी झालेलं बोलणं. मग तो तिच्यासाठी काहीतरी प्लॅन करणार असल्याचं आणि तिने घाबरून एक आवंढा गिळला.
"रेखा, काय बघतोय मी हे?"
सहसा न चिडणारे बाबा चिडलेले, चेहरा लाल झालेला पाहून ऋजुता जाम घाबरली. तिचा चेहरा एकदम पडला. तिला वाटलं, आता आई-बाबांना कळलंय सगळं आणि ते नाराज झालेत.
"मला... आवडतो तो, पण बाबा,... मी... मी...खरंच... काही... नाही केलं. " ऋजू घाबरून अडखळत म्हणाली. काय बोलावं तिला काही सुचेना.
तिची घाबरगुंडी उडालेली बघून रेखाताईंच्या ओठांवरचे हसू रुंदावत चालले होते. शेवटी त्या म्हणाल्या,
"अहो, पुरे ना आता. घाबरलंय कसं बघा माझं कोकरू."
"फसली रे फसली, एक मुलगी फसली!" राजशेखर हसून म्हणाले.
"म्हणजे? तुम्ही दोघे रागावले नव्हते ? ओह माय गॉड! बाबा, केवढी परफेक्ट ऍक्टिन्ग करता तुम्ही! आई पण बेमालूमपणे साथ देते. किती टेन्शन आलं होतं मला, माहिती आहे?" ऋजुता काहीशी शांत होत म्हणाली.
"हॊ मग? यायलाच हवं होतं... तुला काय वाटलं तू कोणालाही निवडशील आणि आम्ही होकार देऊ? " रेखाताई.
"श्रीमतीजी, आता तुम्ही सुरु नका होऊ. " राजशेखर.
"बेटा, तुझ्या आईने मनात कधीचाच विराजला जावई म्हणून निवडलं होतं. पण ती म्हणते तेही खरंच आहे मात्र. विराज आहे, आपल्या चांगल्या ओळखीतला परिवार आहे म्हणून आम्ही इतक्या सहजपणे होकार दिलाय. दुसऱ्या कोणासाठी , इतक्या सहजासहजी, पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय कसं काय आम्ही होकार दिला असता? " राजशेखर.
"रेखा, कधी जायचं मग विनीत अन वीणाताईंकडे?" ते रेखाताईंकडे बघत म्हणाले.
"त्यांच्याकडे? कशाला?" ऋजुता.
"आम्हांला आमचा जावई सापडलाय म्हणून सांगायला." रेखाताई हसून म्हणाल्या. "लग्न करशील ना विराजशी? तो आवडतो ना तुला?"
तशी ऋजुता लाजली अन उठत म्हणाली, "आई मी जाते ऑफिसला. बाय."
"ही ही ही, छकुली, नीट हॊकार तर दे." रेखाताई हसून तिच्या दंडाला धरून बसवत म्हणाल्या.
"आता वेगळ्या होकाराची काय गरज आहे अजून? बघितलंस ना, विराजचा विषय निघाला की कशी बोलताना थांबतच नाही ती. " राजशेखर हसत म्हणाले.
"म्हणजे तुम्हालाही पसंत आहे विराज?" ऋजुताला आश्चर्य वाटले होते.
"हॊ, तुझ्या आईने तर कधीचीच जावई म्हणून त्याची निवड करून घेतली होती. मलाही तिची निवड पसंत होती. पण आम्ही तुमचीच वाट बघत होतो, की तुम्हाला काही जाणवतंय का एकमेकांबद्दल, तुम्ही कधी बोलताय आमच्याशी."
"खरंच? " ऋजुता खूप आश्चर्यचकित झाली होती, तिच्या आनंदाला पारावार नव्हता.
"विराजचं काय म्हणणं आहे? तो बोलला का काही तुझ्याशी याबद्दल?"
"हॊ, काल बोलला तो."
"म्हणून तू आम्हांला हे सगळं कसं सांगायचं या विवंचनेत होतीस तर!" रेखाताई.
"हं, हॊ. मला वाटलं तुम्ही खूप रागवाल."
"बरं मी काय म्हणतो, एकदा रजतचेही मत घेऊया. तो त्याच्या बरोबर राहतोय. " म्हणत राजशेखर रजतला फोन करू लागले.
"उठलास का रे? "
"हॊ, कॉफी बनवत होतो. आज इतक्या सकाळी सकाळी फोन कसा काय केलात बाबा ? " रजत.
"हॊ ना, तसंच महत्वाचं बोलायचं होतं म्हणूनच. बरं मला सांग, विराज कसा वाटतो तुला , स्वभावाने किंवा एकंदरीत वागणूक, राहणी वगैरे?"
"विराज? छानच आहे त्याचा स्वभाव वगैरे. अगदी कुठलाही प्रॉब्लेम नाही. पण असं का विचारताय? " रजत.
'ही ऋजू काही बोलली की काय आईबाबांशी !' रजत विचार करत होता.
"ऋजूसाठी विचार करतोय त्याचा म्हणून म्हटलं, तुलाही विचारावं. "
"हॊ छानच आहे बाबा . त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर . कालच सांगितलं त्याने मला, अन मीही पाहिलंय ते. अगदी सुखात ठेवेल तो तिला. फुलासारखं जपेल."
"काय?" राजशेखर.
"तुम्ही रागवाल म्हणून भीती वाटत होती तिला, खूप टेन्शन आलं होतं. पण तिचंही प्रेम आहे त्याच्यावर ." रजत.
"हं, बरं. मग काय? करू या का पुढे हालचाली?" राजशेखर.
"हॊ चालेल." रजत.
"बाबा, दृष्टीचा हा प्रोग्रॅम होऊन जाऊ देत. मग जरा शांतता होईल. दोन तीन दिवसांनी बोललं तर चालेल ना काकांशी?" ऋजुता.
"ठीक आहे, तसं करू या." राजशेखर.
"आता तर खूष ना? " रेखाताई हसून ऋजूला म्हणाल्या.
"हॊ." ऋजू लाजून आईला बिलगत म्हणाली.
"बघा बघा, कशी लाजतेय." रेखाताई.
रेखाताई अन राजशेखर हसू लागले.
"आई, मी निघते आता ऑफिसला." ऋजू.
****
विराज आज ऑफिसमध्ये लवकर गेला. दिवसभर विराज खुशीतच होता. जरा लवकरच कामं संपवून तो ऑफिसमधून निघाला. जाताजाताच रजतला त्याने कळवून दिले की आज त्याला घरी यायला उशीर होणार आहे.
ऋजुताही खूप खुशीत होती. कधी एकदा ती वेळ होते असे तिला होत होते. ऑफिस झाल्यावर संध्याकाळी दृष्टी मध्ये लवकर जाऊन तिने भराभर सर्वांची प्रॅक्टिस करून घेतली.
"काकू, प्रॅक्टिस झाली. मी निघते." ऋजुता वीणाताईंना सांगायला गेली.
"अरे वा, आज लवकर येऊन लवकर आटपलेस. कसली घाई आहे ग आज? काही खास? रेखाताई तर काही बोलल्या नाहीत." वीणाताई हसून म्हणाल्या.
त्यांचा प्रश्न ऐकून चप्पल घालता घालता ऋजुता अडखळली.
"अं... ते... काही नाही काकू, ... मला थोडं काम आहे... म्हणून थोडी घाई आहे आज. " कसेबसे सांगून ती सटकली.
घरी जाऊन ती फ्रेश झाली. रेखाताईंच्या मागे लवकर जेवणासाठी भुणभुण करून तिने पटकन जेवण करून घेतले. रेखाताई तिची लगबग बघून गालातल्या गालात हसत होत्या. त्यांना अंदाज आला की विराज आणि ऋजूचा काहीतरी प्लॅन असावा. घाईने कसेबसे जेवण उरकून ऋजू पुन्हा छान तयार झाली. बेबी पिंक रंगाचा घेरदार अनारकली ड्रेस, त्यावर चमकदार खड्यांचे लोंबते कानातले आणि गळ्यात मॅचिंग खड्यांचे छोटेसे लॉकेट, थोडेसे केस क्लचमध्ये घेऊन बाकी मोकळे खांद्यापर्यंत रुळणारे, दोन्ही भुवयांच्या मध्ये छोटीशी चमकदार टिकली, डोळ्यात काजळाची बारीक रेघ, अगदी कळत नकळत असा केलेला मेक अप. खूप सुंदर दिसत होती ऋजुता.
विराजही तोपर्यंत त्याच्या निर्धारित ठिकाणी पोचला होता.
"ए मी तयार आहे, तू तुझ्या घरी गच्चीवर ये ना, चांदण्यात." विराजने ऋजुताला मेसेज केला.
ती गच्चीवर गेली. तिला खूप धडधडत होते. एक स्वप्नवत क्षण आज साकार होणार होता. इकडे विराज अन तिकडे ऋजू, दोघेही ती अनामिक हुरहूर अनुभवत होते.
क्रमश:
© स्वाती अमोल मुधोळकर
संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा, घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
माझी 'एव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट येट!' ही एक वेगळा विषय घेऊन लिहिलेली लघुकथासुद्धा नक्की वाचून अभिप्राय कळवा.
एव्हरीथिंग इज नॉट लॉस्ट येट कथा या लिंकवर वाचा
किंवा App वर कथेचे नाव search करूनही वाचता येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा