दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 70

An Interesting Story Of Viraj & Rujuta.


"ठीक आहे. चांगली अट घातलीय. बघ किती काळजी आहे तिला तुझी. पण मग आता करणार काय आहेस?

"आहे माझ्याकडे एक आयडियाची कल्पना! " विराज हसून म्हणाला आणि त्याने रजतला कानात ती कल्पना सांगितली.

"भारीच रे! मस्त. ऑल द बेस्ट." रजतने हसून अनुमोदन दिले.

" पण मला सांग तुला कधी सांगितले तिने? आणि नक्की काय म्हणाली ती? म्हणजे तिचे माझ्यावर प्रेम आहे असं तिने सांगितलं का तुला?" विराज अधीर झाला होता ऐकायला.

"अरे हो हो, किती प्रश्न ते एकामागे एक!" रजत हसत म्हणाला.

" तेव्हाच सांगितले जेव्हा तुम्ही भावुक होऊन खोलीत आर्त स्वरात बासरी वाजवत होतात मिस्टर." रजत.

" हं, जेव्हा तिने रोहितबद्दल सांगितलं ना, तेव्हा तर काही वेळासाठी असं वाटलं की माझं प्रेम हरलं. मी तिला जाणीव करून नाही देऊ शकलो. तिला माझ्याबद्दल फीलिंग्स निर्माण झाले नाहीत आणि माझ्या फीलिंग्सची जाणीवही झाली नाही. इतकं प्रेम करून सुद्धा मी हरलो असं वाटत होतं, कारण मला तिच्या मनाविरुद्ध जाऊन काहीच करायचं नाही. " विराज.

"तुम्ही हरलात कसले मिस्टर, स्टेडियम बाहेर षटकार ठोकलाय तुम्ही तर. अरे मगाशी जेव्हा आम्ही बोलत होतो ना, तेव्हा काय झालं ऐक," रजत हसून सांगू लागला.

काही वेळापूर्वी जेव्हा रजत आणि ऋजुता बोलत होते तेव्हा,

"मग कसं आहे सगळं? चांगला आहे का मुलगा? आवडला का तुला?" रजतने उत्सुकतेने विचारले.

"तसं नाव ठेवण्यासारखं तर काहीच नाही. दिसायला हँडसम आहेत , प्रॉपर्टी पण बरीच आहे असं सांगत होते. त्यांनी सांगितलं सगळं, घरच्यांबद्दल, प्रॉपर्टीबद्दल. तू बघायला पण येऊ शकते म्हणाले. मी होकार दिला तर घरी त्यांच्या आईबरोबर येऊन बोलतील म्हणाले. " ऋजुताने रोहितबद्दल सांगितले .

एवढं सगळं ऐकू आल्यावर विराजला तिथे थांबवले नव्हते . विराज तेथून आपल्या खोलीत निघून गेला होता. इकडे रजत आणि ऋजुताचं पुढे बोलणं सुरु होतं.

"मला रोहितशी लग्नाची कल्पनाच सहन नाही झाली. दादा, तू रागावू नकोस, पण मला विराज आवडतो. तो नाहीये तर आय अल्वेज मिस हिम. प्रत्येक गोष्टीत त्याची आठवण येते. त्याची रोज वाट पाहतंय माझं मन." ऋजुता .

"काय? अग वेडी सोनुली, मग प्रेमात आहेस तू त्याच्या." रजत.

"हं, मलाही जाणवलं ते आणि बहुधा विराजचंही माझ्यावर प्रेम आहे." ऋजू.

"अं... आर यू शुअर? नक्की असं वाटतं का तुला?" रजत.

"हं, खरं तर आधी मला नव्हतं कळलं, पण नंतर मलाही जाणवलं ते आणि माझ्याबरोबरच इथे आणखी एकदोघांनाही जाणवलं. निकिता तर सारखी चिडवत असते मला त्याच्यावरून. आणखी गंमत म्हणजे, रोहित सरांनाही जाणवलं होतं. तेच आज मला त्याबद्दल म्हणत होते."

"काय? असं असेल तर मग खरंच असेल तुला वाटतं तसं. फारच छान होईल मग तर. खूप चांगला मुलगा आहे तो. मला तर इतका आनंद होतोय ! " रजतला खूपच आनंद झाला होता. अखेर ऋजुता त्याची लाडाची लहान बहीण ना .

"आईबाबांनाही सांगायला हवं." रजत.

"मला भीती वाटतेय रे." ऋजू.

"नाही ग, त्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवं. आपले आईबाबा नक्की समजून घेतील, मला विश्वास आहे. जसं आता मला सांगितलंस न, तसंच दोन्ही गोष्टी सांग त्यांनाही. " रजत.

"आईबाबांना कसं सांगू रे सगळं? त्यांना काय वाटेल? काय म्हणतील ते? तू मदत करशील का माझी? बोलशील का त्यांच्याशी?" ऋजू काळजीत होती.

"हं, तो प्रश्न आहेच. पण बोलू या आपण. तू काळजी नको करू. मी आहे ना, मी पण सांगेन त्यांना." रजत.

"दादा, विराज आहे का? फ्री आहे का तो सध्या ? थोडं बोलायचं होतं त्याच्याशी." ऋजू.

"हो थांब देतो. " म्हणत रजत मागे वळला, तर काय, विराज नव्हता तिथे.

हे सगळं ऐकून,
"ओह माय गॉड! असं होतं का ते! अन मला वाटलं की..." विराजने डोक्याला हात लावला.

*****

दुसऱ्या दिवशी सकाळी ऋजुताकडे,

रेखाताईंची सकाळची आन्हिके उरकून पूजाही झाली होती. त्यांनी नाश्त्याची तयारी करायला घेतली. राजशेखर नुकतेच फिरून येऊन पेपर वाचत बसले होते.

\"साडेसहा झालेत, आज अजून कशी उठली नाही ऋजू? रोज तर सहा वाजताच उठते. \" स्वत:शी म्हणत रेखाताई टॉवेलाला हात पुसत ऋजुताच्या खोलीमध्ये डोकावल्या.

\"किती शांत झोपलीय माझी बेटी ! कितीतरी दिवसांनी अशी शांत रिलॅक्स होऊन झोपलेली दिसतेय. \"

\" निजल्या तान्ह्यावरी माउली दृष्टी सारखी धरी\" याप्रमाणे रेखाताई ऋजुताच्या चेहऱ्याकडे काही वेळ बघत राहिल्या. खरंच होतं ना, आता तान्ही जरी नव्हती, तरी आईही तीच आणि मुलगीही तीच, मग आईची ममता कशी बदलणार? रेखाताईंच्या डोळ्यात ममता दाटून आली होती.

\"कसं गोड हसू दिसतंय आता चेहऱ्यावर! काल कसलं एवढं टेन्शन आलं होतं हिला कुणास ठाऊक. यांनाच सांगावं ती उठली की जरा बोलून बघा म्हणून. \" रेखाताई स्वतःशी विचार करत होत्या.

\"झोपू देत थोडा वेळ. कालच मोठं काम झालंय न ऑफिसचं, त्यामुळे कदाचित आज एवढी घाई नसेल. उठेल थोड्या वेळाने.\" रेखाताईंना तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवण्याचा मोह आवरला नाही.

"अहो, मी काय म्हणतेय." हॉलमध्ये येत रेखाताई राजशेखरना म्हणाल्या.

"हं, बोला राणीसरकार, काय हुकूम आहे आमच्यासाठी?"

"इश्श! काहीही काय हॊ तुमचं सकाळी सकाळी! मी काहीतरी महत्वाचं सांगतेय ना." रेखाताई लटक्या रागाने म्हणाल्या.

"बरं सांग, सांग."

"ऐका ना, ऋजू काल कसल्या टेन्शनमध्ये होती कोणास ठाऊक. मला बाई ते ऑफिसातलं काही कळत नाही. तुम्ही कसं खुबीने काढून घेता तिच्या मनातलं, अगदी तिच्या लहानपणापासूनच. ती उठली की तुम्ही जरा बोलून बघा ना तिच्याशी." रेखाताई त्यांना म्हणाल्या.

"असं म्हणतेस? हॊ, खरं तर मलाही वाटलं होतं की काहीतरी झालं असावं, ती डिस्टर्ब्ड वाटत होती. बोलतो तिच्याशी, येऊ दे तिला ."

त्यानंतर काही वेळ गेला असेल.

खिडकीला लावलेल्या पडद्याच्या फटीतून एक अगदी कोवळा सोनेरी सूर्यकिरण ऋजुताच्या चेहऱ्यावर पडला आणि तिला जाग आली. तेवढ्यात तिचा फोन बीप झाला. तिने बघितलं तर विराजचा मेसेज आला होता,

"गुडमॉर्निंग प्रिन्सेस. झोप आली की नाही ?"

उठल्या उठल्या विराजचा मेसेज बघून इतकी खूष झाली ना ऋजुताची स्वारी, की काही विचारायलाच नको. तिने उत्तर दिले,

"गुडमॉर्निंग. मला तर झोप लागली कधीतरी. पण तुम्ही जागेच दिसताय मिस्टर , निद्रादेवी प्रसन्न झाल्यावर नाहीत का आपल्याला? तुमच्याकडे तर अजून उजाडलेही नसताना कसे काय उठलात ?"

"हं, कोणीतरी आमच्या मेसेजची वाट बघतं असं नुकतंच कळलं ना. मग निद्रादेवी म्हणाल्या की त्यांना एकदा शुभ सकाळ म्हणालास की मी प्रसन्न होईन तुला." विराजने स्माईलींसोबत उत्तर पाठवले.

"वेडू! " ऋजुता हसली आणि भरपूर स्माईली पाठवत तिने उत्तर पाठवले.

"आज संध्याकाळी तयार रहा हं. " विराज.

"अरे, ऑफिसनंतर \"दृष्टी\"मध्ये पण जायचंय ना मला." ऋजू.

"सांगून दे ना माझ्या आईला, आज नाही येणार असं." विराज.

"नको रे, कर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य करायलाच हवं. मी जाऊन येईन. प्रोग्रॅम तीन चार दिवसांवर आलाय ना मुलांचा. " ऋजू.

"ओह बघ मग, मी तर तयार आहे तू सांगितलंस ते करायला." विराज.

"वॉव ! इतक्या लवकर सुचलंसुद्धा तुला! मस्तच! आय एम सो एक्सइटेड! मी राहीन नक्की संध्याकाळी . आता मात्र आटपते. तू झोप छान शांतपणे. बाय." ऋजूला आश्चर्यमिश्रित आनंद झाला होता.

"बाय."

"आणि हं, थँक यू. माझा दिवस खूप छान जाईल आज. सकाळी सकाळी तुझ्याशी बोलणं झालं ना ." ऋजू.

"असा रोजचाही दिवस होऊ शकतो. आयुष्यभर. सगळं तुझ्यावरच आहे आता. तू ठरव." विराजने मेसेजसोबत खट्याळ स्माईली पाठवले.

ऋजुता हसली.

काही वेळात ती तयार होऊन बाहेर आली. रेखाताईंनी तिच्यासाठी डायनिंग टेबलवर चहा आणि नाश्ता ठेवत विचारलं, " आता छान वाटतंय ना? झोप झाली ना नीट ?"

"हॊ ग मम्मा, मला उठवलं का नाहीस ग? रात्री उशिरा झोप लागली, मग रोजच्या वेळेवर जागच नाही आली बघ."

"अग, काल खूप थकली होतीस ना? सकाळी सकाळी गाढ झोपेत होतीस ग, उठवावंस नाही वाटलं मला. एखाद्या दिवशी चालतं ग. " रेखाताई बाजूच्या खुर्चीवर बसत म्हणाल्या.

राजशेखरही येऊन बसले. तिघेही नाश्ता करत होते.

"कसं चाललंय बेटा सगळं? " राजशेखर.

"ठीक आहे बाबा. नीट चाललंय."

"काही प्रॉब्लेम तर नाही ना? काल अशी डिस्टर्ब्ड का वाटत होतीस ग?"

"अं... ते... बाबा,"

"हं सांग ना."


क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर


संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा, घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून खूप धन्यवाद.

🎭 Series Post

View all