दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 6

Drushti, Drushtikon, ani, vision, perspective, sight, Rujuta, Viraj, Rohit, marathi, katha, kathamalika, story, love

मागील भागात ...

आई बाबा दोघेही शूज बघायला लागले. विधी अधूनमधून त्यांच्याकडे तर अधूनमधून विराजकडे बघत होती. "आज या दादाला काय झालंय, कधीही न करणाऱ्या गोष्टी करतो आहे आज.... मंदिरात काय नेतो.... बाबांना शूज घ्यायला काय लावतोय ... नक्कीच काहीतरी झालंय" , विधी मनात म्हणाली.

"बाबा, आई, आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी स्वतःच्या कितीतरी सुखांचा त्याग करत आला आहात.... . तेव्हाच्या काटकसरीच्या दिवसांत सुद्धा जमेल तसे तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायचे .... पण हे तेव्हा कधी कळलेच नाही.... आता जाणवतंय.... दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघितले की खरच जाणवायला लागते की तो कोणत्या परिस्थितीतून जात असेल....

खरंच मीही किती वेडा होतो. स्वतः  स्वतःच्या स्टायलिंग कडे एवढं लक्ष द्यायचो , रोज काहीतरी नवीन घ्यायचो. पण बाबांची झिजलेली चप्पल कधी दिसली नव्हती मला. आईचे कष्ट कधी जाणवले नाही मला . तिलाही घरातून बाहेर कुठे जावंसं वाटत असेल, असा कधी विचारच केला नव्हता. स्वत:पलिकडे कधी माझी नजर जाईल तर ना ! पण आता असं नाही होणार. आज सकाळी बघितले तेव्हाच ठरवले की काहीही झालं तरी तुम्हाला आज शूज घेऊन द्यायचेच", विराज आईबाबांच्या आनंदी चेहऱ्याकडे बघत मनात म्हणत होता.

आणि विधी आपल्या बदललेल्या दादाकडे बघत होती.  तिच्याकडे लक्ष जाताच तो काय अशी हाताने खूण करत विचारत होता. विधी त्याच्याकडे जाऊन म्हणाली , " क्या बात है दादा, तू ठीक आहेस ना? हे सगळं कसं काय झालं?", विधी.

" इन अ वे, तू आत्ता जिला भेटलीस ना तिच्यामुळे ", विराज.

"कोण ? ऋजुता? हे अवघड कार्य तिने इतक्या समर्थपणे कसे काय केले बुवा?", विधी आश्चर्याने अन हसत म्हणाली.

"सांगेन नंतर", विराज हसून म्हणाला.

"उधार रहेगा हां?" , विधी दम देत म्हणाली.

तेवढ्यात दोघांचेही शूज घेऊन झाले. आणखी थोडीफार खरेदी करून सर्वजण आनंदात घरी गेले.

*****

आता पुढे...

मंदिरात जाऊन आल्यावर थोडीफार खरेदी आटपून सगळे घरी आले. दुपारची जेवणे वगैरे झाल्यानंतर विराज आपल्या खोलीत बेडवर पडून पुस्तक वाचत होता. वाचता वाचता मधेच कितीतरी वेळा त्याच्या डोळ्यासमोर सकाळीच मंदिरात बघितलेला कोवळ्या उन्हातला ऋजुताचा प्रसन्न आणि सात्त्विक तेज असलेला चेहरा येत होता. पुस्तक छातीवर पालथे ठेवून शेवटी त्याने डोळे मिटले आणि तो नकळत तिच्या विचारात पुन्हा हरवला....

"किती सुंदर आहेस तू ऋजुता .... मनानेही आणि चेहऱ्यावरही तेच सौंदर्य झळकतं....  प्रसन्न... सकाळच्या कोवळ्या उन्हात देवासमोर नतमस्तक होणारं, सात्त्विक तेज असलेलं  सोज्वळ सौंदर्य ... दुसऱ्याची स्वतःहून मदत करत असताना असलेलं मनातल्या करुणेचं सौंदर्य ... ऑफिसमध्ये काम करताना असलेलं ज्ञानाचं, आत्मविश्वासाचं सौंदर्य ... इतरांशी मिळून मिसळून खेळीमेळीने राहताना त्या मिस्किलपणातही एक सौंदर्य आहे ...  मला आतापर्यंत कळले कसे नाही .... इतकी वर्षे झाली सोबत काम करत आहोत...  मीच कदाचित माझ्या मनाचे दरवाजे उघडले नव्हते ... कोणाहीसाठी ... कसे कोणी आत येऊ शकणार होते ... हॅट्स ऑफ टू यू ऋजुता ... माझ्यातली संवेदनशीलता जागृत केलीस तू ... वृथा अभिमानही ढासळून पाडलास .... तू माझें डोळेही उघडलेस ... तेही कसे ... अगदी एका शब्दानेही न दुखावता ... आणि मी पुन्हा त्या मार्गाला जाणार नाही अशाप्रकारे .....

छूकर मेरे मन को, किया तूने क्या इशारा
बदला ये मौसम , लगे प्यारा जग सारा

डोळे मिटलेल्या विराजच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटले होते.
तेवढ्यात विधीने दरवाज्यातून हलकेच डोकावले आणि तिला ते दिसले. "दादा, तुम तो गये काम से", ती मनात म्हणाली आणि तिच्याही चेहऱ्यावर हसू उमटले. तशीच ती मागे वळली आणि निघून गेली.


दुसऱ्या दिवशी ...
सकाळी उठून विराज ऑफिस साठी तयार झाला आणि नाश्ता करायला आला. स्वयंपाकघरात जाऊन कढईत असलेले पोहे स्वतः प्लेटमध्ये घेतले आणि बाबांनाही नेऊन दिले.

"आई , तू सुद्धा आधी गरमागरम नाश्ता करून घे .  सकाळी लवकर उठतेस ना, भूक लागली असेल तुला. नाश्ता झाला की मी भरून घेईन माझा डबा". विराज म्हणाला.

"आई, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का ग? आज पोहे केले म्हणून दादा चिडला नाही, उलट स्वतःच्या हाताने पोहे घेतले, डबाही स्वतः भरून घेतो आहे.... काय चाललंय काय ? ", विधी आश्चर्यमिश्रित आनंदाने म्हणाली.

"तू पोहे खा बरं ", असं म्हणून विराजने तिच्या प्लेटमधून चमच्याने पुष्कळ पोहे तिला भरवत तिचे तोंड बंद केले. आणि हसू लागला.

"अं .....अं..... ", विधी, तोंडात भरलेल्या पोह्यांच्या बकाण्यामुळे तिला काही पुढे बोलता येईना....

काही वेळाने ....
"हुश्श, संपला एकदाचा.... काय रे दादा , आईवर प्रेम अन माझ्यावर राग काय? मी कोणता गुन्हा केला आहे?  ", विधी.

"राग नाही ग, पण तू ही जी चर्पटपंजिरी करत असते न .... त्यासाठी होतं ते.... ", विराज हसून म्हणाला.

"मी करणार ....माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो ....", विधी मान उंच करत , चेहऱ्यावर अभिमान दाखवण्याची ऍक्टिंग करत डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताची मूठ आपटून म्हणाली.

"हो ग बाई.... ", विराज तिच्यापुढे हात जोडत म्हणाला.

"मग माझाही जन्मसिद्ध अधिकारच आहे तुझ्या खोड्या करण्याचा", तो हसून पुढे होत बॅग आणि डबा घेत म्हणाला.

"आई, येतो ग मी", गालात हसणाऱ्या आईला सांगून विराज ऑफिसला निघाला.

इकडे ऋजुताही आज ऑफिसमध्ये थोडी लवकरच आली होती.

काही वेळाने ऑफिसमध्ये ....

"गुड मॉर्निंग ऋजू, लवकर आलीस का ग? काम भरात आलेलं दिसतंय तुझं ?", ऋजुता तिच्या क्यूबिकलमधल्या आपल्या जागेवर कामात गढून गेलेली दिसताच निकिता तिला म्हणाली. आपली बॅग वगैरे जागेवर ठेवत तिने लॅपटॉप लावला.

"हो, ग लवकरच आले आज. अग म्हटलं, लवकर पोचले तर जमदग्नींना एक कारण तरी मिळणार नाही ना मला रागवायला. नाहीतर उशीर झाल्याचं निमित्त करतील अन सुरू होईल प्रकोप.... मग आवरता आवरता दम येईल मला.... तसही कालपासून भीतीच वाटतेय ग मला .... काय म्हणतील सर  अशा ठिकाणी पार्टीला नेलं त्याबद्दल ...", ऋजुता.

"म्हणजे? तुझा काय संबंध त्याच्याशी?", निकिताने गोंधळून विचारले.

"अग रोहित सरांना ते ठिकाण मीच सुचविले होते ", ऋजुता.

"ओह, फिर तो तू गयी बेटा अब...." , निकिता.

"बाप रे, असं नको म्हणू ग ... तुलाही नाही आवडलं का ते ठिकाण?", ऋजुताचा चेहरा उतरला होता.

"अग असं नाही , मला तर छानच वाटलं होतं. सुरवातीला गेम्स पण छान होते आणि नंतर एकदम युनिक आणि वेगळा अनुभव होता. जीवन जगताना इतरांना येणाऱ्या अडचणींची जाणीव करून देणारा... अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा ", निकिता.

"हो, ना? रोहित सरांना वेगळ्या ठिकाणी जायला आवडतं ... म्हणून मी ते सुचवलं होतं ", ऋजुता.

"हं, पण जमदग्नींचा काही भरवसा नाही.... पण आहेत कुठे ते , दिसत नाहीयेत आज ? ", निकिता.

"मीटिंग मध्ये आहेत आल्यापासून... ", ऋजुता.

"ओके", निकिता.

दोघीही कामात गढल्या.

"साडेतीन वाजलेत. आत्ता संपली त्यांची मीटिंग.  ऋजुता, आले बघ जमदग्नी बाहेर. येईल तुला बोलावणं आता थोड्याच वेळात.... आज तर लंचसुद्धा करायला मिळालं नाहीये त्यांना.... भूक लागली की आणखी मूड खराब होतो ना सरांचा  ",  निकिता  ऋजुताला म्हणत मिस्कीलपणे गालात हसू लागली. कॉन्फरन्स रूम मधून बाहेर पडून केबिनमध्ये जाणाऱ्या विराजकडे तिने ऋजुताचे लक्ष वेधले.

"निकी , गप्प न यार, आधीच टेन्शन आले आहे मला. आणि तू अजून त्यात भर घालतेस ...", ऋजुता नाराज होऊन म्हणाली.

"डोन्ट वरी ग ऋजू, मी गंमत करत होते. काही नाही होणार", निकिता.

दहा मिनिटांतच ऋजुताच्या डेस्कवरचा फोन वाजला.

"ऋजुता, केबिनमध्ये ये",  विराज.

"Ok सर, आलेच".

निकिताने ऋजुताकडे बघून नजरेनेच तिला शांत रहा आणि जा असे खुणावले.

"स ... सर... काही काम....काम होतं?", ऋजुताने केबिनमध्ये जाऊन विराजच्या नजरेला नजर न देता हळूच विचारले.

"हो, बस ना", विराज.

"बाप रे, आज काय रागवण्याचा मोठा प्रोग्रॅम आहे का? इतक्या दिवसांमध्ये पहिल्यांदाच बसायला सांगताहेत. ऋजुता , गेलीस तू आता", ऋजुताने मनात विचार करता करता क्षणभर डोळे मिटून घेतले.

"एवढी का घाबरलीय ही आज? .... हं आता आठवलं .... रोहितच्या पार्टीसाठी मी ओरडेन असं वाटलं असावं हिला.... अशी पण किती क्यूट दिसते ही .... थोडी मजा घेऊ या हिची ...." , विराज मनात विचार करत होता...

"ऋजुता, काय समजतेस तू स्वतःला? कुठे कसं वागावं काही कळतं की नाही ? काय गरज होती रोहितला पार्टीसाठी हे ठिकाण सुचवण्याची? अजिबात आवडलेलं नाही मला तुझं हे वागणं. काय वाटलं असेल त्याला आपल्याबद्दल ? प्रोफेशनल रिलेशन्स टिकवावे लागतात ....  असे एकाच प्रोजेक्ट मध्ये धुळीला मिळवायचे नसतात .... कधी शिकणार आहेस तू? ",  हा नेहमीचा विराज .... एकदा सुरू झाला की त्याचं धडाधड पूर्ण बोलून होईपर्यंत थांबायचं नाव घेत नसे.

त्याच्या प्रत्येक वाक्यागणिक तिच्या चेहऱ्यावरची भीती वाढत चालली होती.

"शेवटी निकी म्हणाली होती तसंच झालं. उपाशीपोटी जास्तच ओरडतात हे...  आता कसं समजवावे यांना... ", ऋजुता मनात विचार करत होती.

"सॉरी, सर. काही प्रॉब्लेम झालाय का? पुन्हा नाही सुचवणार ते ठिकाण... पण सर, जेवढं मी रोहित सरांना ओळखलं आहे त्यावरून ते या गोष्टीकडे खेळीमेळीने बघतील , त्याचा त्यांना राग वगैरे येणार नाही असं वाटलं मला.... आपली पार्टीही होईल आणि तेवढीच त्या तिथल्या लोकांना अप्रत्यक्षपणे मदतही होईल .... म्हणून मी .... ", ऋजुताने घाबरतच आपला दृष्टिकोन मांडला.

आता विराज मनात म्हणाला," ठीक आहे एवढी गंमत पुरे आहे आज साठी". आणि त्याने आवरते घेतले.

"ऋजुता, अग समोरच्याला एवढं ओळखतेस, मग सांगताना घाबरतेस कशाला ग? तुझा मुद्दा बरोबर आहे ना? मग पटवून द्यायचा ना मला, थिंक अँड स्टार्ट वर्किंग ऑन धिस पॉईंट ऑफ युवर परसनॅलिटी", विराज शांत होऊन नेहमीच्या आवाजात म्हणाला.

"रोहितने मला सांगितलंय की त्यांना सर्वांना ते ठिकाण आवडलं, आणि इन फॅक्ट त्यांच्या एच आर ने ते त्यांच्या हॉटेल्सच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतलय. मी आपल्या एच आर ला सुद्धा कळवलं आहे त्याबद्दल", विराज.

"खरंच? म्हणजे तुम्ही रागावत नव्हतात मला आता?", ऋजुता आश्चर्य वाटून म्हणाली.

"नाही, पण तुला समजावण्यासाठी तसं बोललो, रिलॅक्स", विराज टेबलावरची पाण्याची बाटली तिच्यापुढे सरकवत म्हणाला.

ऋजुताने दोन घोट पाणी प्यायले.

"हं, ऋजुता आता कामाबद्दल बोलूया, आपला आता जो प्रोजेक्ट चालला आहे , त्याचे अजून किती परसेन्ट काम राहिलं आहे? ", विराज.

"70 परसेन्ट झालंय", ऋजुता.

"ठीक आहे. ते जरा लवकर संपवावे लागेल. स्पीड अप कर ते. टीममध्ये दुसरं कोणी फ्री असेल तर शेअर कर त्यालाही.
रोहितचा पुढचा एक प्रोजेक्ट मिळाला आहे आणि तो सुरू करायचा आहे. त्याने त्याचे काही डॉक्युमेंट्स , प्रेझेंटेशन वगैरे पाठवले आहेत. मी पाठवतो तुला. तू ते वाचून घे. त्यांच्याबरोबर मीटिंग मध्ये मग शंका असतील तर विचारता येतील मग तुला. ", विराज.

"ओके सर", ऋजुता .

"सरांचं न काही कळतच नाही , ओरडतात काय , समजावतात काय... पण एवढं मात्र खरं आहे की ते बरोबर सांगत होते की मी काय करायला हवंय... शिकावं लागेल ते मला ", ऋजुता विचार करत होती.

ऋजुता आपल्या जागेवर जाऊन पुन्हा कामाला लागली. आधीच्या हातातल्या प्रोजेक्टचं काम करता करताच तिला संध्याकाळ झाली. अजून तर विराजने पाठवलेले नवीन प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स वाचायचे , समजून घ्यायचे होते.  दोन तीन दीर्घ श्वास घेऊन , जवळच्या बाटलीतून पाणी पिऊन तिने ते वाचायला सुरवात केली.


क्रमशः
******

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.


विराजच्या आयुष्यात पुढे काय होईल ?

पुढच्या प्रोजेक्टचे काय होईल? विराजच्या कंपनीला मिळतील की नाही?

बघू या पुढच्या भागांत.
 

🎭 Series Post

View all