दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 69

वा ग वा! लगेच त्याची बाजू घेतेस तू तर! आता मी कोणीच नाही का तुझा?

पण ऋजुता थोडीच दाद देणार होती!

"भुलवतो आहेस का मला? पण मी नाही भुलणार. हे बघ आता एवढंच तर करायचं आहे तुला. जास्त काही नाही." ऋजुता गालात हसत म्हणाली.

आपल्या जवळच्या व्यक्तीकडून हट्ट पुरवून घेण्यातही किती मजा आणि गोड भावना असते ना? इकडे ऋजुता ती भावना अनुभवत होती आणि विराज मात्र पेचात सापडला होता. मात्र त्यालाही खूप आनंद आणि एक वेगळेच समाधान आज मिळाले होते आणि एक गोडसा हट्ट पुरवण्याची गोडशी हुरहूर त्याच्या मनालाही लागून राहिली होती.

फोन ठेवल्यावर विराज पुन्हा खिडकीतून बाहेर बघत बसला होता. काही वेळात त्याने डोळे मिटले. आता त्याच्या मनाला खूप हलके वाटत होते. राहून राहून त्याला आताचे त्यांचे बोलणे आठवत होते आणि ते आठवून एक मधुर हास्य त्याच्या ओठांवर विलसत होते . विराज खूप दिवसांपासून ज्या क्षणाच्या प्रतीक्षेत होता, तो त्याला आज गवसला होता. त्याची प्रतीक्षा आज फळाला आली होती. त्याच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहचल्या होत्या. आत्यंतिक समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते.

इकडे रजतचा फोन वाजला. ऋजुताचा मेसेज होता.

"दा s दा, आय हॅड गेस्ड इट करेक्टली! मी म्हटलं होतं ना तुला? त्याचं खरच माझ्यावर प्रेम आहे. ही कॉन्फेस्ड इट. "

"खरंच? मग खूष ना आता? " रजत.

"हॊ ss, खूप."

"मी पण खूप खूप खूष आहे तुझ्यासाठी. त्याच्यासारखा मुलगा पेट्रोमॅक्सचा लाईट घेऊन शोधला असतास ना तरी मिळाला नसता तुला. ही इज अ जेम. हिरा आहे तो अस्सल हिरा. खरंच खूप प्रेम करतो तो तुझ्यावर. मला तेव्हा कोण ते माहिती नव्हतं, पण मी पाहिलंय, त्याला झुरताना, तुझ्या आठवणीत अगतिक होऊन रडताना. तुझ्यासाठी डोळ्यात पाणी येतं ग त्याच्या. आणि असं जेव्हा एखाद्यासाठी डोळ्यात पाणी येतं, तेव्हा ते प्रेम खरं असतं ग ऋजू. खूप नशीब लागतं असा जोडीदार मिळायला. " रजत तिला सांगत होता. त्यालाही खूप आनंद झाला होता.

"दादा, पण आई बाबा? त्यांना आवडेल का? " ऋजू.

"हं, बोलू या आपण. बहुधा एवढं सगळं चांगलं असल्यावर ते नाही म्हणणार नाहीत. मी पण बोलेन त्यांच्याशी तसं." रजत.

"खूष राहशील तू त्याच्याबरोबर. आता अजिबात अंतर देऊ नकोस त्याला." रजत.

"नाही, आता तर मी हक्काने सतावणार आहे त्याला. सोडेन कशाला?" ऋजुता हसत म्हणाली.

"कर तुला काय करायचं ते, पण दुखावू नकोस हं माझ्या मित्राला." रजत प्रेमळ दम देत म्हणाला .

"ए, तू माझा दादा आहेस ना? लगेच पार्टी बदललीस का?" ऋजुता लटक्या रागाने म्हणाली .

"हा हा हा, पार्टी नाही बदलत ग सोनुली. " रजत.

तेवढ्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले अन तो म्हणाला,

"अरे, तू तर माझ्याशी बोलत आहेस, मग हे महाशय करतायत तरी काय? इकडे पोटात कावळे ओरडताहेत माझ्या. जेवायचंय ना. रोज सोबतच जेवतो आम्ही. बघतो जरा त्याची खबर घेतो. " रजत त्याच्या खोलीकडे जात म्हणाला.

"ए दादा, ओरडू नकोस हं त्याला."

"वा ग वा! लगेच त्याची बाजू घेतेस तू तर! आता मी कोणीच नाही का तुझा?"

"तसं नाही रे दादा, पण तुला एक सांगू का, बोलताना सुरवातीला मला असं वाटलं, की तो कदाचित तेव्हा काही वेळापूर्वी रडला असावा . म्हणजे ना, त्याचे डोळे लाल होते, चेहरा खूप सुकल्यासारखा दिसत होता. म्हणून म्हणतेय."

"ओहॊ! एवढी काळजी! आतापासून?" रजत तिला चिडवत म्हणाला. "बरं, नाही काही म्हणणार. पण जेवू तर देशील न आता? " तो हसत म्हणाला.

"हॊ, जेवा. बाय." ती हसत म्हणाली आणि फोन ठेवला.

रजत विराजला बोलवायला आला, तर विराज डायरी मध्ये काहीतरी लिहून डायरी बंद करत होता. त्याचा चेहरा अगदी तणाव मुक्त आणि आनंदी दिसत होता. चेहऱ्यावर हसू आलं होतं. रजतला बघून विराजच्या चेहऱ्यावर एकदम काळजीची रेषा आलेली दिसली.

\"ओह, आता भाईला सांगण्याचं मोठ्ठ काम राहिलंय. कसा रिऍक्ट करेल? रागवेल का? इतके दिवस सांगितलं तर नाहीच अन वरून ती आहे कोण? तर त्याचीच बहीण ! आता कसं सांगू?\" विराज मनात विचार करत होता.

"अरे, चल ना जेवायला. जेवायचं नाही का? केव्हाचे कावळे ओरडत आहेत माझ्या पोटात!" रजत दाराशी येऊन म्हणाला. रजत विराज स्वतः हून सांगेपर्यंत वाट बघणार होता.

" ओह! विसरलोच होतो मी तर!"

" हो ना, तुझे तर पोट बोलूनच भरलं असेल आता, पण मला भूक लागली ना. चल. " रजत.

विराजने उठून त्याला एक घट्ट मिठी मारली आणि गोल फिरवत म्हणाला,

"भाई, भाई, आय एम सो ss हॅपी टुडे. खूप खूप खूष आहे मी. तुला काय पाहिजे ते माग."

"ही ही ही, मागेन. नक्की मागेनच. पण प्रॉमिस कर, मागितल्यावर देशील ना? "

" हॊ, नक्की. प्रॉमिस." विराज.

"ठीक आहे, वेळ आल्यावर मागेन. पण आत्ता मात्र गुलाबजाम ऑर्डर कर. खूपच दिवस झालेत, खाल्लेच नाहीत . बरं हे सांग, काय झालं काय? तू इतका खूष कशासाठी आहेस?" रजत जणू काही कळलेच नाही अशा अविर्भावात म्हणाला.

"चल, जेवण झालं की सांगतो." म्हणत विराज त्याला घेऊन खोलीच्या बाहेर गेला. दोघांचीही ताटे वाढून घेऊन आला.
खाऊन झाल्यावर विराजने हळूच विषय काढला.

"भाई, वेडीच आहे हं तुझी बहीण!"

"कोण? ऋजू? काही वाटतं का तुला, माझ्यासमोर माझ्या बहिणीला असं म्हणतोस ? "

"अरे खरंच म्हणतोय ना. वेडी नाही तर काय म्हणू? नाहीतर कोणी अशी कंडिशन ठेवतात का? की प्रपोज कर, पण जमिनीवर उभे राहून नको. तूच सांग, आता कसं करणार मी? जमिनीवर नाही तर कुठे उभं राहणार? "

"काय? प्रपोज?"

"हं, हॊ ना." विराज नाटकीपणे चेहरा पाडत म्हणाला.

"छे! काहीही! ती कशाला असं म्हणेल? तूच काहीतरी केलं असेल. सांग काय केलंस तू?" रजत आपले हसू दाबत, अविश्वास दाखवत म्हणाला .

"भाई, ते... मी तुला... सांगणारच होतो... तू... प्लिज रागावू ... नकोस ना." विराज.

"बोल, लवकर बोल."

"माझं... जिच्यावर... प्रेम आहे... " विराज जरा अडखळत, धैर्य गोळा करत म्हणाला.

"ती ऋजू आहे. मी तिला आज सांगितलं." पुढचं वाक्य एका दमात तो म्हणाला.

"काय?" रजत आश्चर्याने आणि रागाने म्हणाला. "खबरदार! तिच्यावर वाकडी नजर ठेवलीस तर! माझ्याशी गाठ आहे."

"भाई, भाई, तू शांत हॊ ना. प्लिज रागावू नकोस ना."

"माझ्याच घरी राहतोस , माझ्याच बहिणीवर प्रेम करतोस अन माझ्यापासूनच लपवतोस?" चेहऱ्यावर शक्य तेवढे रागीट भाव आणत तो मोठ्याने म्हणाला.

"भाई, ऐक ना. अरे तिने हॊ म्हटल्याशिवाय मी कसं सांगणार होतो तुला? माझं खरंच खूप जीवापाड प्रेम आहे रे तिच्यावर. माझा कुठलाही वाईट हेतू नाही. तिच्याशी लग्न करायचं आहे मला. तुला तर माहिती आहे ना रे, की मी कसा राहिलोय तिच्याशिवाय एवढे दिवस. मी खूप जपेन तिला, अगदी फुलासारखं, आयुष्यभर . खूप सुखात ठेवेन, भरभरून प्रेम देईन तिला." विराज सोफ्यावर बसलेल्या रजतच्या समोर येऊन त्याचे दोन्ही हात धरत, त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला. तेच सच्चे आणि आर्त भाव त्याच्या डोळ्यात रजतला दिसत होते. चेहरा गंभीर झाला होता. रजत किती रागावणार, त्याला कसं समजावावे याचं टेन्शन विराजच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

एक दोन मिनिटे विराजची अशीच गंमत केल्यावर रजतलाही राहवले नाही. तो हसत, त्याला मिठी मारत म्हणाला,

"मला माहिती आहे ते. तू नाही, तरी ऋजूने सांगितलं होतं मला. म्हणून तर तुला सांगायला आलो होतो मी."

"ओह! म्हणून तू म्हणालास का, तिला सांगूनच टाक आज, असं? " आत्ता विराजला ते आठवलं.

"भाई, तू पण ना, मग हे रागावणं खोटं होतं? किती चांगली ऍक्टिन्ग करतोस! अजिबात वाटलं नाही मला, तुला माहिती झालं असेल असं." विराज हसत म्हणाला.

"हॊ, मला माहिती आहे, आणि हे पण माहिती आहे की हा वेडा त्या वेडीसाठी अगदी परफेक्ट आहे. चला, आता सासू सासऱ्यांना मनवण्याची तयारी करा." रजत हसून त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाला.

"हं, अरे आधी तुझ्या बहिणीला उत्तर तर देऊ दे. मॅडम म्हणाल्या आहेत, की आधी मी सांगितलं तसं प्रपोज कर, तेव्हाच मी विचार करेन आणि मग उत्तर देईन. तोपर्यंत वाट पहा. घ्या आता, आहे की नाही? एवढी हिंमत करून फोनवर आता म्हणालो ना आय लव्ह यू . पण नाही, तेवढ्याने नाही होणार तिचं." विराज हसत हसत म्हणाला.

"ही ही ही" रजतला हसू आवरत नव्हते. " सांभाळ तूच आता. मग काय आता पॅराशूट मधून प्रपोज करण्याचा प्लॅन आहे का? "

"नाही ना, ते नाही करू शकणार. एक तर त्यातून नीट बोलता येणार नाही आणि दुसरं, मॅडम म्हणाल्या, की कुठलीही रिस्क घेतलेली मला चालणार नाही. ही अट घातलीय."

"ठीक आहे. चांगली अट घातलीय. बघ किती काळजी आहे तिला तुझी. पण मग आता करणार काय आहेस?

"आहे माझ्याकडे एक आयडियाची कल्पना! " विराज हसून म्हणाला आणि त्याने रजतला कानात ती कल्पना सांगितली.

"भारीच रे! मस्त. ऑल द बेस्ट." रजत.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून खूप धन्यवाद. भागाला विलंब झाल्यामुळे झालेल्या तसदीबद्दल क्षमस्व. पुढील भाग अंदाजे तीनएक दिवसांनी येईल.

🎭 Series Post

View all