दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 68

तुला विसरणं मला शक्य तरी आहे का? श्वासागणिक तुझीच आठवण येत असते मला.

"ऋजू? माझ्यासाठी विचारत होती ?" विराज आश्चर्याने रजतला म्हणाला.

तेवढ्यात विराजचा फोन वाजलाच. विराजला 'थम्बज अप' करून
"आणि हं, आज सांगूनच टाक तिला." म्हणून रजत हसत निघून गेला.


विराजने हाताने चेहरा पुसत, आवाज ठीक करून ऋजुताचा व्हिडिओ कॉल घेतला . कितीतरी दिवसांनी ते एकमेकांना बघत होते, एकमेकांशी बोलणार होते. खूप दिवसांनी समोरासमोर आल्यावर दोघानाही बोलायला काही सुचत नव्हते. खरं म्हणजे, बोलायचं आहे हेच दोघे विसरून गेले होते. दोघेही फक्त नजरेतूनच एकमेकांच्या मनाचा वेध घेत होते. एकमेकांच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज घेत होते. पण दोघांचाही भावना मात्र एकदम विरुद्ध होत्या.

ऋजुतासाठी तर आता विराजचे सगळे संदर्भच बदलले होते. ओठांवर किंचित हसू, गुलाबी गालावर थोडीशी लज्जा, डोळ्यात खूपशी उत्सुकता, हृदयात असलेली खूप आतुरता अशा सर्वांचा सुरेख संगम तिच्या चेहऱ्यावर झालेला दिसत होता. मनाला वेगळीच हुरहूर जाणवत होती.

आणि विराज? तो कसा होता? ऋजुताने त्याच्या चेहऱ्याकडे बघितले तर तिला तो नेहमीसारखा उत्साही, आनंदी असल्यासारखा वाटला नाही. चेहऱ्यावर खूप गांभीर्य पसरलेले दिसत होते. चिंतेचे सावट डोकावत होते. हं, अचानकपणे ऋजुताला बघून तेव्हापुरता खूष तर तो झाला होताच, पण ही खुषी आणि नेहमीचा नेहमीच आनंदी असणारा विराज यातला फरक ऋजुताला जाणवल्याशिवाय राहणारच नव्हता.


"हॅलो" विराज.

"हॅलो विराज. कसा आहेस?" ऋजुता.

'आज हा इतका गंभीर, शांत का वाटतोय? डोळेही लाल झालेत.' ऋजुता विचार करत होती.

"मी ठीक आहे ग ऋजुता. तू कशी आहेस?"  विराज.

"हं, आता मी फोन केल्यावर विचारतोय ना? तू तर साहेबांच्या देशात गेलास अन तिकडचाच झालास. मला विसरूनच गेलास." ऋजू मिश्किलपणे म्हणाली.

आता 'हो' म्हणावं तरी पंचाईत अन 'नाही' म्हणावं तरी पंचाईत, अशी विराजची अवस्था झाली होती.

'आता तुला काय सांगू? तुला विसरणं मला शक्य तरी आहे का? श्वासागणिक तुझीच आठवण येत असते मला.' विराज मनात म्हणत होता.

"जा, मी नाही बोलणार आता." ऋजुता.

तिच्या लाडिकपणामुळे तरी त्याच्या चेहऱ्यावर थोडे हास्य उमटले  होते आणि त्यामुळे ऋजुतालाही मनातून छान वाटले.

"ओह! तर हेच सांगायला फोन केला होतास वाटतं आता." विराज किंचित हसून म्हणाला.

"अग जरा बिझी झालो होतो. तुला तर माहीतच आहे, इथे ऑफिस, मग खाण्यापिण्याची तयारी करणं , साफसफाई वगैरे सगळंच करावं लागतं ना. " विराज.

विराजने जेवणाचा विषय काढला तसे ऋजुताला त्याच्या हातचा 'पोह्यांचा उपमा' आठवला अन ती हळूच गालात खुदुखुदु हसू लागली.

"हो हो, माहीत आहे. एक मेसेज करायलाही वेळ नसतो तुम्हाला. बिझी माणसं बुवा तुम्ही!" ऋजुता.

"आज रिलीज होता ना? कसा झाला? तू असल्यावर व्यवस्थितच झाला असेल म्हणा." विराज तिच्या बोलण्यावर काहीही न बोलता चतुराईने विषय बदलत म्हणाला.

"हो. रिलीज व्यवस्थित झाला. काही इश्यूज नाही आले. पोस्ट रिलीज सुद्धा अजून तरी काही इश्यूज नाहीत." ऋजू.

"अरे वा, छान. अभिनंदन, तुझे आणि सर्वांचेच. तुझा पहिलाच प्रोजेक्ट यशस्वी केलास." विराज.

"थँक यू सो मच. विराज... आणखी... दुसरी एक गोष्ट... सांगायची आहे तुला." ऋजुता काहीशी अडखळत बोलत होती.

"हं, बोल ना." विराज.

"रोहित सरांनी... लग्नासाठी... प्रपोज केलंय." ऋजुता.

"हं, " विराज.

"तुला आश्चर्य नाही वाटलं?" ऋजुताने विचारले, पण त्याचा पडलेला चेहरा आणि पुन्हा डोकावलेले गांभीर्य मात्र तिच्या नजरेतून सुटले नव्हते.

"हं, पण इतक्या लवकर करेल असं वाटलं नव्हतं. मग तुझा काय विचार आहे?" विराज.

"तू सांग ना, तुला काय वाटतं?"  ऋजू.

"मी ऽऽ? ऋजू, हा तुझा निर्णय आहे ना?" विराज.

"हं, मग मला योग्य निर्णय घ्यायला मदत नाही करणार? तुझं मत खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी." ऋजू.

"मी कसं सांगू ऋजू? तुझ्या आयुष्यातले निर्णय तुझ्या आवडीप्रमाणे घ्यायला हवेत ना? तुला काय वाटतं?" विराज.

"मी काहीही निर्णय घेतला तर तुला फरक नाही पडणार?" ऋजू.

ऋजुता त्याच्या मनात काय आहे त्याचा थांग लावण्याचा प्रयत्न करत होती. पण स्वतःच्या मनाचा मात्र ताकास तूर लागू देत नव्हती. त्याच्या डोळ्यात तिला रोहितबद्दलची नापसंती स्पष्ट  दिसत होती आणि हिला नक्की काय म्हणायचं आहे, हिच्या मनात काय आहे याचा विचार विराज करत होता.

"म्हणजे काय ग ऋजुता?" विराज.

"म्हणजे, मी जर रोहित सरांना होकार दिला तर तुला काही फरक नाही पडणार? खरं सांग." ऋजुताने आता मात्र विराजच्या वर्मावर बोट ठेवले होते.

"हं, पडेल ना, खूप फरक पडेल. संपूर्ण आयुष्यभरासाठीच फरक पडेल." विराज खाली बघत, विचारात पडत, स्वतःशीच म्हटल्यासारखं म्हणाला आणि ऋजुताच्या ओठांचा आपोआपच चंबू होऊन तिचे डोळे विस्फारले.

"काय म्हणालास?" ऋजुता.

"माझं मत विचारशील तर मी त्याच्यासाठी 'नाही' म्हणेन. अर्थात हे माझं मत आहे. तुझा काय विचार आहे? होकार देणार आहेस का? " विराज.

"हं, होकार तर द्यायचाय, पण ज्याला होकार द्यायचाय तो तर विचारतच नाहीये." ऋजुता हळूच पण खट्याळपणे म्हणाली.

"काय?" विराज प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.

"तेच जे तू ऐकलंस." ऋजुता हसून म्हणाली.

"सांग ना, काय म्हणालीस?" विराज.

"काही नाही, आकाशवाणी एकदाच होत असते." ऋजुता खट्याळपणे म्हणाली.

"ओह! आकाशवाणी!" विराज हसून म्हणाला. "बरं हे सांग, कोण विचारत नाहीये? मी सांगतो त्याला विचारायला."

"म्हणजे ऐकलंस तू." ऋजू.

विराज फक्त थोडासा हसला.

"कोणीतरी मला म्हणालं होतं, 'माझी वाट बघशील ना?' असं काहीसं विचारलं होतं." ऋजुता.

"आओगे जब तुम ओ साजना
अंगना फूल खिलेंगे..." तुम शब्दावर जोर देत ऋजूने विराजच्या डोळ्यांकडे बघत गाण्याच्या दोन ओळी गायल्या.

'ओह! कळलंय की काय हिला ? ' विचार मनात येऊन आता विराजचे डोळे विस्फारले होते. किंचित हसू ओठांवर आले होते.

"छान गाते आहेस ग हे गाणं! आता या गाण्याचा मूड कसा काय झाला ग?" विराज.

"मला शोधायला सांगतोस ना, आता हे तू शोध. " ऋजुता हसून म्हणाली.

"पण मला सांग, तू नाही का म्हणतोय रोहित सरांसाठी?" ऋजुताने सरळ प्रश्न केला.

"ऋजू, तू रागावणार नाहीस ना? आधी प्रॉमिस कर. " विराज.

"नाही रागावणार, प्रॉमिस."

"मी नाही बघू  शकणार ग. इन फॅक्ट रोहित काय, कोणीही असेल तरी खूप कठीण आहे माझ्यासाठी."  विराज शब्दांची जुळवाजुळव करत होता.

"का, काय झालं ? " ऋजुता.

"कारण माझं... खूप.... खूप प्रेम आहे तुझ्यावर. मी तिकडे परत आल्यावर प्रत्यक्षच बोलणार होतो तुझ्याशी. " विराज तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"काय? खरंच?" ऋजू.

"हो. अगदी खरं." विराज.

"हं, एकदा म्हणायचं, वाट बघशील का? आणि इतकी वाट बघायला लावायची? एकेका मेसेजच्या उत्तरासाठी? जा, आता मी नाही उत्तर देणार." ऋजुता लटक्या रागाने म्हणाली.

"अग राणी, असं नको करूस ना." विराज.

"अं हं. " ऋजुता.

"मी सुद्धा खूप वाट बघत होतो ग ती वेळ येण्याची. कसं सांगू तुला? खूप मोठं स्वप्न होतं माझं की तुला मी हे सांगावं, तुझ्या मनात काय आहे ते जाणून घ्यावं. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच अशी सांगण्याची संधी नाही मिळत ग. आज तुला सांगितल्यावर खूप हलकं वाटतंय, एखाद्या मोरपिसावर बसून आकाशात उडत असल्यासारखं. हवेत असल्यासारखं."

"हं, हो ना? मग आता खाली जमिनीवर उभे न राहताच प्रपोज कर. मग बघू. फिर देखेंगे, सोचेंगे, फिर बतायेंगे." ऋजुता भाव खात, नाटकी ढंगाने अन मिश्किलपणे म्हणाली.

"काय? अग हे कसं शक्य आहे? असं कसं करणार मी? काहीही बाबा तुझं!"

"मला काय माहिती. तो तुझा प्रॉब्लेम आहे. तू सोडवायचास. फक्त कंडिशन एकच आहे. स्वतःला कोणत्याही संकटात टाकायचं नाही. सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यायची."

"ए प्लीज ना. असं काय करतेस? आत्ता सांग ना." विराज मनधरणी करत होता. जरी त्याला आता तिच्या मनातल्या भावना कळल्या होत्या, तरी त्या तिच्या तोंडून ऐकण्यात एक वेगळेच समाधान त्याला मिळणार होते.

"नाही. मला किती वाट बघायला लावलीस? थोडीशी वाट बघ ना तूही." ऋजुता.

"अच्छा, ऋजू, पण तू वाट का बघायचीस ग एवढी? म्हणजे तुला वाट बघावंसं का वाटायचं?" विराज खट्याळपणे तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता.

पण ऋजुता थोडीच दाद देणार होती!

"भुलवतो आहेस का मला? पण मी नाही भुलणार. हे बघ आता एवढंच तर करायचं आहे तुला. जास्त काही नाही." ऋजुता गालात हसत म्हणाली.

आपल्या जवळच्या व्यक्तीकडून हट्ट पुरवून घेण्यातही किती मजा आणि गोड भावना असते ना? इकडे ऋजुता ती भावना अनुभवत होती आणि विराज मात्र पेचात सापडला होता. मात्र त्यालाही खूप आनंद आणि एक वेगळेच समाधान आज मिळाले होते. आणि एक गोडसा हट्ट पुरवण्याची गोडशी हुरहूर त्याच्या मनालाही लागून राहिली होती.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

संपूर्ण कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. 

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून खूप धन्यवाद.

काय मग मंडळी, विराजला मदत करणार ना पेच सोडवायला ? सांगा तुमच्या आयडियाज त्याला.  अहो कशा म्हणजे काय, पटापट लाईक कमेंट करून. :-)

🎭 Series Post

View all