दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 67

किती विरळाच आहे हा! जितका कणखर तितकाच संवेदनशीलही ! हळुवार भावना आणि मन जपणारा!


\"खरंच मला का वाटतं की त्याने लवकर परत यावं? किती वाट बघतेय मी मनातून त्याने परत येण्याची. दर वेळी मिस करते मी त्याला. काहीही झाले की खूप आठवण येते मला त्याची. दिवसातून कितीदा तरी येते. असं असतं तर विराजने काय केलं असतं, तसं असतं तर विराजने काय केलं असतं, काहीही प्रॉब्लेम्स आले की असं कितीदातरी वाटतं. त्याच्या एकेका मेसेजचीसुद्धा किती वाट बघते मी. मला स्वप्नातला राजकुमार बनवशील का असं रोहित सर जेव्हा म्हणाले, तेव्हा माझ्या स्वप्नातला राजकुमार डोळ्यासमोर आला. मिटलेल्या डोळ्यांसमोर जे चित्र आलं, ते तर अविश्वसनीय होतं अगदी !\"


विचार करता करता ऋजुताने नकळत डोळे मिटले. काही वेळाने तिने रजतला कॉल केला.

इकडे रजत आणि विराज ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळच्या जेवणासाठी पास्ता बनवत होते. विराज टोमॅटो वगैरेपासून पास्ता सॉस तयार करत होता. तर रजतने एकीकडे पास्ता पाण्यात उकळायला ठेवत भाज्या चिरायला घेतल्या होत्या.

तेवढ्यात ऋजुताचा रजतला कॉल आला.

"हॅलो दादा, काय करतोय?"
"पास्ता बनवतोय." रजत.
"अरे वा! पास्ता! छानच. ए दादा ऐक ना, थोडं बोलायचं होतं." ऋजू.

"हं, बोल ना. आज झोपली नाहीस अजून?" रजतने फोन स्पीकर वर करत बाजूला ठेवला आणि तो ऐकत ऐकत चॉपरवर भाज्या चिरू लागला. त्याची विराजकडे पाठ होती.

"हं तेच तर. ऐक ना. तुला मी सांगितलं होतं ना आमच्या आताच्या प्रोजेक्टविषयी?" ऋजू.

"हं काय बरं नाव होतं? पेस की कायसं. हो ना? झाला का तो प्रोजेक्ट?" रजतने आठवत विचारले.

"हं, आज रिलीज होता त्याचा." ऋजू.

"मग, कसा झाला? नीट झाला ना?" रजत.

"हो रे, तो तर नीट झाला. पण..." ऋजू.

"मग? पण काय?" रजत.

"त्याचे जे क्लाएन्ट आहेत ना, ते रोहित सर... त्यांनी..." ऋजू.

रोहितचे नाव ऐकून बाजूलाच असलेल्या विराजने कान टवकारले. \" रोहित! काय केले याने आता?\" विराज उत्सुकतेने ऐकत होता.

"त्यांनी काय? अशी अडखळत का बोलतेय? सांग ना." रजत म्हणाला .

"त्यांनी मला लग्नासाठी विचारलंय, दादा." ऋजू.

ते ऐकून तर श्वासच अडकल्यासारखे झाले होते विराजला. त्याच्या काळजात धस्स झाले. आधी हसरा असलेला त्याचा चेहरा एकदम उतरला होता. तो पुढे ऐकू लागला.

"काय, लग्नासाठी? डायरेक्ट लग्नासाठीच विचारलं? आधी काही बोलले होते का? " रजत आश्चर्याने म्हणत होता.

"नाही, आधी काही नाही. डायरेक्ट लग्नासाठीच विचारलंय, आणि दोन दिवसात सांग म्हणाले." ऋजू.

"मग कसं आहे सगळं? चांगला आहे का मुलगा? आवडला का तुला?" रजतने उत्सुकतेने विचारले.

"तसं नाव ठेवण्यासारखं तर काहीच नाही. दिसायला हँडसम आहेत , प्रॉपर्टी पण बरीच आहे असं सांगत होते. त्यांनी सांगितलं सगळं, घरच्यांबद्दल, प्रॉपर्टीबद्दल. तू बघायला पण येऊ शकते म्हणाले. मी होकार दिला तर घरी त्यांच्या आईबरोबर येऊन बोलतील म्हणाले. " ऋजुता सांगत होती.

एवढं सगळं ऐकल्यावर विराजला तिथे थांबवले नाही. त्याने गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवले आणि तो तिथून निघून गेला. त्याला पुढे ऐकवेनासे झाले होते. तो आपल्या खोलीत जाऊन खिडकीशी उभा राहून बाहेर आकाशाकडे बघत विचार करत होता,

\"हा रोहित! असं कसं विसरलो होतो मी या रोहितला! मला वाटलं नव्हतं हा असं काही बोलेल, तेही इतक्यातच. तेव्हा रोखूनही नाही थांबला. शेवटी त्याने केलेच त्याला जे करायचे होते ते. ऋजुतालाही तो पसंत आहे... \"

विराजचे डोळे डबडबले होते. हृदयात खोलवर काहीतरी रुतल्यासारखे त्याला वाटत होते. त्याला काही सुचत नव्हते. मनाच्या घावावर औषध काय असणार? त्याची आवडती बासरी. तीच त्याचा एकमेव सहारा होती. त्याने बासरी काढून वाजवायला घेतली.

\"मी तिच्या मनात स्थान नाही मिळवू शकलो. इतकं सगळं करूनही तिने नोटीस नाही केले मला. माझ्याहीकडे सगळं आहे. अगदी खूप नसली तरीही संपत्ती आहे, आणखी स्वतः सगळं कमवण्याची मनगटात ताकद आहे, बुद्धीची जोडही आहे, मनात हिंमत आहे, डोक्यात प्लॅन्स आहेत. ऋजू, तूसुद्धा वंशपरंपरागत आलेल्या प्रॉपर्टीच्या मोहात पडलीस? भुललीस का ग? प्रेम, सच्चेपणा, कर्तृत्व, स्वतःच्या बळावर उभे राहणे या गोष्टींना काहीच किंमत नाही का तुझ्या लेखी? माझे प्रेम जाणवलेच नाही का तुला? मग मला मध्यंतरी तसे काहीसे जाणवत होते ते काय होते? तो सगळा माझाच भ्रम होता का? भास होता का? किती स्वप्न पाहिली होती मी. \"

विराजचे विचार सुरूच होते. विचारांसोबतच बासरीचे सूर अधिकाधिक आर्त होत चालले होते. गालावर अश्रुंचे ओघळ वाहत होते.

इकडे रजत आणि ऋजूचे बोलणे सुरु होते. काही वेळ बोलून झाल्यावर ऋजुताने विचारले,

"दादा, आईबाबांना कसं सांगू रे सगळं? त्यांना काय वाटेल? काय म्हणतील ते? तू मदत करशील का माझी? बोलशील का त्यांच्याशी?" ऋजू काळजीत होती.

"हं, तो प्रश्न आहेच. पण बोलू या आपण. तू काळजी नको करू. मी आहे ना, मी पण सांगेन त्यांना." रजत.

"दादा, विराज आहे का? फ्री आहे का तो सध्या ? थोडं बोलायचं होतं त्याच्याशी." ऋजू.

"हो थांब देतो. " म्हणत रजत मागे वळला, तर काय, विराज नव्हता तिथे.

"अरे, आता तर इथेच होता, कुठे गेला? बघतो मी, सांगतो त्याला . तू थोड्या वेळाने फोन कर. " रजत.

फोन ठेवून रजत विराजला बघायला गेला. \"विराजच्या खोलीत तर अंधार आहे. मग कुठे गेलाय हा? \" बासरीचा आवाज कुठून येतोय ते बघत रजत तिथे पोचला.

बघतो तर विराज अंधारातच खिडकीजवळ पाठमोरा उभा राहून बाहेर बघत बासरी वाजवत होता. आज बासरीचे सूर रजतला नेहमीसारखे आनंदी वाटत नव्हते. मिनिटभर वाट पाहून त्याने विराजच्या खांद्यावर हात ठेवला. तसा विराज वळला आणि त्याने पटकन रजतला मिठी मारली. मिठीत त्याची अगतिकता रजतला जाणवत होती. मुसमुसण्याचा किंचित आवाज आला तसे रजतने हळूच त्याच्या पाठीवर थोपटले.

"काय झालं?" रजत.

"भाई, सगळं संपलं रे. सगळं संपलं." विराज अगतिकतेने म्हणाला.

"काय झालं? काही सांगशील का?" रजत बाजूला होत, लाईट लावत म्हणाला. विराजचा चेहरा, गालावरचे सुकलेले ओघळ, रडल्यासारखे लालसर झालेले डोळे पाहून रजत काय समजायचे ते समजला.

"तिला का नाही जाणवलं रे माझं प्रेम? मी तिथे असतानाही नाही, आणि आता एवढा दुरावा सहन करून सुद्धा नाही. तिच्या मनात मी आपले स्थान निर्माण नाही करू शकलो." विराज गहिवरल्या स्वरात सांगत होता.

"का? तू बोललास का तिच्याशी? काही म्हणाली का ती तसं?" रजत.

"नाही. पण तिला एक स्थळ आलंय." विराज.

"अरे वेड्या , फक्त स्थळच आलंय ना? लग्न तर झालं नाही अजून. तुला काय माहिती की ती त्याला होकार देणार की नाही ते?" रजत.

"भाई, स्थळ तर चांगलं आहे. तिला आवडला असेल तो. काहीच जाणवलं नसेल का रे तिला माझ्याबद्दल? " विराज.

"अरे, असंच असेल असं कशावरून? " रजत.

"मला ती मनापासून माझी म्हणून हवी आहे." विराज.

"हे बघ, स्थळ तर तुलाही आलं होतं ना? तू एकदा बोलशील तर कळेल ना , आणि मी आहे ना. अरे हं, मी हे सांगायला आलो होतो, की ऋजू तुझ्यासाठी विचारत होती. फोन करेल ती तुला."

"ऋजू? माझ्यासाठी?" विराज आश्चर्याने म्हणाला.

....

काही वेळापूर्वी,

विचार करता करता ऋजुताने नकळत डोळे मिटले होते.
शीतल, शामल अशा चंद्रप्रकाशात ओढ्यातील पाण्याच्या हळुवार खळखळाटात, आकाशी रंगाचा कुर्ता, ऑफव्हाईट रंगाचा चुडीदार , गळ्याभोवती गुंडाळलेला दुपट्टा अशा पेहरावात राजबिंडा दिसत असलेला , बेंचवर बसून मंत्रमुग्ध होऊन बासरी वाजवत असलेला तिचा राजकुमार तिच्या डोळ्यासमोर आला होता.

हमको हमी से चुरा लो, दिल में कहीं तुम छुपा लो...

तिच्यासाठी या गाण्याचे सूर बासरीतून छेडत मनापासून त्यात भावना उमटवीत वाजवणारा, त्याच्या डोळ्यातले काहीतरी सांगू पाहणारे तेच आर्त भाव! वाऱ्यावर भुरूभुरू उडणारे, मधेच कपाळावर रेंगाळत हलत राहणारे त्याचे समोरचे केस.

ऋजू मिटलेल्या डोळ्यांनीच त्याचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या चेहऱ्यासमोरचं धूसर वलय हळूहळू विरत गेलं आणि त्याचा चेहरा तिला स्पष्ट दिसला.

\"अरेच्चा! हा तर \"दृष्टी\"च्या प्रोग्रॅमच्या वेळचा विराज! म्हणजे मला त्याआधीपासून आवडतो तो? ऋजू चकित झाली होती. म्हणून त्या दिवशी विधीने त्याचं पहिले अभिनंदन केलं तर मला पहिल्याप्रथम थोडीशी इर्ष्या वाटली! आणि म्हणूनच स्नेहाच्या लग्नाला गावाला गेले तर तिथेही मला त्याचा भास झाला, तो आल्यासारखं वाटलं ! ओह माय गॉड! म्हणजे, मी ऽऽ ... मी... प्रेमात... प... पडलेय त्याच्या? म्हणून मला रोहित सरांचं बोलणं नाही आवडलं. पण... मी ऽऽ ... कशी... प्रेमात...? मी तर काहीच केले नाही असे? मग का? बाप रे! आता काय करायचं? \"

ऋजुता स्वतःवरच चकित झाली, स्वतःशीच हसली आणि स्वतःशीच लाजली सुद्धा.

तिने लगबगीने विराजने दिलेल्या पेन ड्राइव्ह मधून त्याचे बासरीवादन ऐकायला घेतले.

"आओगे जब तुम ओ साजना,
अंगना फूल खिलेंगे...
बरसेगा सावन झूमझूम के
दो दिल ऐसे मिलेंगे... "

ऋजुता ऐकता ऐकता त्यात हरवून गेली .
\"किती मनापासून सूर उमटताहेत. इतका दर्द! फक्त माझ्यासाठी वाजवलंय. आज मला कळलंय. त्याची प्रेम दर्शविण्याची, वाट बघतोय हे सांगण्याची पद्धत. किती विरळाच आहे हा! इतका संवेदनशील! हळुवार भावना आणि मन जपणारा! आणि त्याची ही गोड पद्धत. म्हणजे तो व्यक्तही झाला, पण तेही मला कुठलेही दडपण न आणता, न दुखावता, अलगदपणे. जणू मला मोरपिसावर बसवून त्याच्या मनाची सफर घडवून आणली. खूपच क्यूट आहे हा विराज! आणि तो \"माझा\" आहे! माझा हिरो!\"

\"माझा\" हा शब्द मनात येताच इतकी लाजली ना ऋजुता, की विचारता सोय नाही. गाल गुलाबी गुलाबी झाले तिचे. डोळ्यात एक आगळीच चमक आली. ओठांवर नाजूक हसू खुलले.

\"आजीबाई खरंच म्हणत होत्या, की प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते, आपण ओळखायचं असतं. पण मी नाही बुवा सांगणार त्याला. पण त्याच्या मनात काय आहे? किती दिवस झालेत, तो बोलत का नाहीये माझ्याशी? त्याला आठवण नाही येत का माझी? कसं कळेल हे सगळं? \"

विचार करता करता तिने रजतला कॉल केला होता .

....

वर्तमान,

रजत विराजशी बोलत होता, तेवढ्यात विराजचा फोन वाजलाच. विराजला \"थम्बस अप\" करून

"आणि हं, आज बोलून घे तिच्याशी." म्हणून रजत हसत निघून गेला.


क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. घटना, प्रसंग, संवाद इत्यादी कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक, कमेंट करून नक्की कळवा.

🎭 Series Post

View all