Login

दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 61

Viraj -Rujuta, Rajat -Vidhi

"आता माझ्याकडूनही किती दिवस इतकं सगळं होऊ शकेल? शेवटी कधी ना कधी वय आपला परिणाम दाखवेलच ना?" वीणाताई.

"हं खरंय." विनीत.

"पण तुला सांगू का, विराज गुंतलाय ग ऋजुतामध्ये. जाणवलंय ते मलाही. जे येत नसेल ते ऋजुताही शिकेल ना सगळं. तू आहेसच की नाही तिला शिकवायला? तीही सांभाळेल नीट. आणि हे बघ, कामाचाच प्रश्न असेल तर, आता काही कमी आहे का आपल्याला? आधीसारखं नाही आता. तुला वाटेल तेव्हा सांग, मदतनीस लावून देतो मी तुला. आम्ही तर आधीच म्हणत होतो ना ग." विनीत.

"मला माहिती आहे, की तुलाही त्याचं सुखच हवं आहे. फक्त दुसऱ्या मार्गाने जाण्याचा विचार करते आहेस तू . कारण तू त्याला कधी बघितलेलं नाहीये तिच्यासाठी झुरताना. अग खूप आठवण आली तर त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा येतं कधी कधी. आणि जेव्हा असं  एखाद्या व्यक्तीसाठी डोळ्यात पाणी येतं ना, तेव्हा ते प्रेम खरं असतं ग. आपण समजून घेऊ या त्याला. आता काही तो शाळा, कॉलेज मधला अपरिपक्व मुलगा थोडाच आहे. त्यालाही कळतं आता." विनीत.

"त्याने सांगायला नको होतं का हो मला? एवढी काय मी वाईट आहे का?" वीणाताई आता भावुक होत होत्या.

"वीणा, हे बघ, तू शांत हो आधी. त्याने मलाही सांगितलं नव्हतंच. मला तसं वाटलं म्हणून मीच विचारलं होतं त्याला. तेव्हा तो हो म्हणाला आणि खूप भावुक झाला होता ग. पण 'आईला वाईट वाटेल का, ती रागवेल का?' असच म्हणत होता, काळजी आहे ग त्याला तुझी, खरं  सांगतो. तुझ्या मनात दुसऱ्या मुलीविषयी चाललं होतं ना. त्याचं नीट तुझ्याशी यावर बोलणंही झालं नाही. आधी तुला बरं वाटत नव्हतं आणि नंतर घाईगडबडीत वेळ मिळाला नाही. आणि सांगणार तरी काय म्हणा, त्याने ऋजुताला विचारलं नाही आहे. तो तिच्या भावना समजून घेतो ग. तिला काय वाटत असेल, तिच्या मनात काय असेल, बरोबर कळतं त्याला. म्हणून तो थांबलाय. आल्यावर प्रत्यक्ष विचारतो म्हणाला होता ."

"हे भगवान , आणि तिच्या मनात तसं काही नसलं तर? म्हणजे आली की नाही पंचाईत?" वीणाताई.

"तसं नाही होणार वीणा. माझं मन सांगतंय. मीही बघितलं ना तिला तर असं वाटलं की तिलाही विराज आवडत असावा. पण विराज म्हणतो तसं तिलाही ते कळलं नसावं. स्पष्ट झालं नसावं, स्वतःचं स्वतःलाच. अन जर तसं नसेलच तर तो स्वतःच स्वतःला तयार करेल त्यासाठी. पण जर तिने होकार दिला तर आपण मोडता घालायला नको असं मला  वाटतं." विनीत.

बोलता बोलता ते दोघे विधी जवळ बाकावर येऊन बसले.

"बरं, आता थोड्यावेळापुरता त्या दुसऱ्या मुलीचा विषय बाजूला ठेवू या. ऋजुताबद्दल सांग, तुला काय काय नाही आवडलं?"

"गुणी नाही का ती ?" विनीत.

"आहे." वीणाताई.

"स्वभाव चांगला नाही का?" विनीत.

"आहे." वीणाताई.

"दिसायला बऱ्यापैकी आहे का?" विनीत.

"नाही. सुंदरच आहे." वीणाताई.

"हुशार नाही का?" विनीत.

"आहे." वीणाताई.

"स्वयंपाक करता येत नाही का?"
विनीत यांनी असं विचारताच विधीने आठवण करून दिली,

"आई, आठव हं, रेखाकाकू जेव्हा पडल्या होत्या, तेव्हा तीच स्वयंपाक करत होती, घरही सांभाळत होती. त्यांची काळजीही घेत होती. आपण गेलो तर तिच्या हातची भजी सुद्धा खाल्ली होती आपण."

"येतो." वीणाताई.

"घर सांभाळता येणार नाही का तिला? आता विधी जे सांगतेय ते आठवून मग सांग. एवढं लक्षात घे की अजूनही तिच्यावर तशी जबाबदारी आलेली नाही आहे, जेवढी लग्न झाल्यावर येत असते. तरी तिने हे सगळं नीट केलंय न तेव्हा. मग तिला लग्नानंतर करता येणार नाही का?" विनीत.

"येईल हो. खरी शंका ती नव्हतीच. अन खरे कारणही ते नव्हते. " वीणाताई हसून म्हणाल्या. "फक्त पुढच्या दृष्टीने जे मी तुम्हाला म्हणाले ना तेवढंच वाटतंय. ते कळत नाही आहे."

"वीणा, त्याबद्दल आपण विराजशीही बोलू या. मला कळतंय की तू विराजच्या सुखासाठी, समाधानासाठीच तो विचार करते आहेस. पण लक्षात घे वीणा, मी सांगतोय तुला, त्याचं सुख ऋजुताबरोबर आहे. ती त्याची प्रेरणा आहे. बघितलंस ना, तिच्यामुळे त्याला एवढं  चांगलं काम करण्याची, 'दृष्टी'ची प्रेरणा मिळाली. ती त्याला समजून घेणारी आहे. तोही तिला चांगल्या प्रकारे समजून घेतो. अगदी न बोलतासुद्धा तिच्या भावना त्याला कळतात. त्याचं एवढं चांगलं कनेक्शन दुसऱ्या मुलीशी होणं कठीण आहे ग वीणा. " विनीत म्हणाले.

"आई, तसंही दुसरी कोणतीही मुलगी असली तरी पुढे काय होईल हे तर आपण सांगू शकत नाहीच ना. तुला जो प्रॉब्लेम वाटतोय तो तिच्याही बाबतीत होऊ शकतोच की नाही? दुसऱ्या त्या मुलीला आपण कोणी स्वतः फारसं ओळखतही नाही; त्यापेक्षा ऋजुताला तर आपण सगळेच ओळखतो, त्यातल्या त्यात दादा तर किती वर्षांपासून ओळखतो. तिचा स्वभाव चांगला आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. इन फॅक्ट तिच्या घरच्या सगळ्यांचाच स्वभाव चांगला आहे. मुख्य म्हणजे दादाला ती आवडते. त्यांना एकमेकांशी जुळवून घ्यायला एवढी अडचण येणार नाही ग लग्नानंतर. मग ऋजुताचाच विचार करू या ना ग." विधी.

"ठीक आहे. मी आत्ता काही करणार नाही. आपण तो इथे परत येईपर्यंत वाट बघूया. तोपर्यंत मलाही विचार करायला वेळ मिळेल . तोपर्यंत दुरून अंदाज घेते ऋजुताचा. तिला काय वाटतं तेही अंदाज घेऊन बघू या. मग तो आल्यावर बघू या काय करायचं ते.  चला आता घरी." वीणाताई.

सगळे घरी गेले.


एकीकडे यांचे असे बोलणे झाले आणि दुसरीकडे लंडनला,

संध्याकाळी रजतने बाकी पदार्थांसोबत विराजसाठी सूपही बनवले. पुन्हा जेवायला विराजला उठवले. औषध घेऊन दिवसभर झोपल्यानंतर आता विराजला थोडं बरं वाटत होतं.
रजतने विराजसाठी सूपसुद्धा केलेले बघून विराज गहिवरला.

"भाई, किती काळजी घेशील माझी! मला तर घरी असल्यासारखंच वाटत आहे." विराज.

"अरे मग, घसा दुखतोय ना तुझा? पटापट बरा झाला पाहिजेस की नाही? मला गप्पा मारायला नको का कोणी? असा शांत शांत नाही चांगला वाटत ना. जाम बोअर झालोय मी आज एकटा, तू बोलायला नव्हतास तर." रजत हसून चमच्याने सूप पीत म्हणाला .

"हं, टेन्शनमध्ये आहे मी जरा. काल तर काहीच सुचतच नव्हतं. " विराज सूप पीत बोलत होता.

"ते कळलं होतंच रे. पण असं इतकं टेन्शन कशामुळे?" रजत.

"अरे भाई, आई एका स्थळासाठी खूप फोर्स करते आहे. मावशी घेऊन आली आहे हे स्थळ. तिच्या नात्यातली आहे एक मुलगी ." विराज.

"ओह! तो ये बात है! मग काय म्हणालास तू?" रजत.

"काय म्हणणार? नाही म्हणालो. सध्या कोणालाही फोटो वगैरे पाठवू नकोस असं सांगितलं. मी आल्यावर बघू म्हटलं. इकडे आईला घाई आणि तिकडे... काय करावं तेच कळत नाहीये यार." विराज हताश होत म्हणाला .


"हं, आईला सांगितलंय ना, मग ठीक आहे ना. आई आई असते रे. समजून घेतील त्या. महिनाभराचा तर प्रश्न आहे.  तू टेन्शन घेऊ नकोस. " रजत.

"हं. बघू या." विराज.

"मला एक सांग, तू आल्यापासून तिचा काही फोन वगैरे येत असेल ना? " रजत.

"अं... काम असायचं तेव्हा यायचा सुरवातीला . पण त्यानंतर फोन एकदाही नाही. मेसेज येतो बरेचदा. पण तोही असाच, सुप्रभात किंवा तत्सम." विराज.

"हं , ठीक आहे. म्हणजे आठवण तर आहे तिला तुझी . पण तेवढ्यावरून सांगणं मुश्किल आहे." रजत विचार करत म्हणाला .

" तू गेल्यावर तर सगळं सॉर्ट आऊट करशीलच ना? बाकी काही गोष्टी काळावर आणि वेळेवर सोडाव्या लागतात. नियोजित वेळ येईल तेव्हा सगळं बरोबर होईल." रजत.

"हं, कधी वाटतं की तिला जाणीव होत असेल, कधी खात्री नाही वाटत. कळतच नाहीये मला नक्की." विराज.


क्रमश:


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कसल्याही प्रकारची कॉपी खपवून घेतली जाणार नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

तर वाचकांनो, आपण बघितलंत ना, वीणाताई नकार देत असल्यामुळे आपल्याला वीणाताईंचा राग आला असेल तरी आई म्हणून त्यांचा दृष्टिकोन काय आहे आणि त्यांच्या ठिकाणी तो कसा योग्यही आहे.


कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की कळवा.


🎭 Series Post

View all