दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 5

Drushti, ani, Drushtikon, sight, vision, perspective, Rujuta, Viraj, Rohit, marathi, katha, kathamalika, Swati, Mudholkar

मागील भागात आपण पाहिले....

"होळीचे सगळे रंग सुद्धा यांच्यासाठी सारखेच ... काळे...
दोन वेगवेगळ्या विश्वातला विरोधाभास लक्षात येतोय का? एक हे आपलं नेहमीचं दृष्टीसहित असणाऱ्यांचं रंगीबेरंगी विश्व.... आणि एक हे , फक्त एकच रंग असणारं.... तमोमय... काळ्या रंगाचं.... सगळ्या जाणिवांची प्रखरता इथे जास्त जाणवते. एकमेकांना समजून घेण्याची, मदत करण्याची वृत्ती येथे जास्त जाणवते, या शांततेमध्ये मनाचे आवाज नीट ऐकू येतात ", हॉटेल मालक.

"दृष्टीसहित असलेल्या सर्वांना समोरच्या व्यक्तीची परिस्थिती बघण्याची दृष्टी खरंच असते का? हा एक प्रश्नच आहे खरं तर....प्रत्येकाने याचं उत्तर स्वतः च शोधून स्वतः ला द्यावं..." हॉटेल मालक.

सगळेच भारावलेल्या अवस्थेत होते.... अगदी निशब्द झाले होते....

आता पुढे....

******


काही वेळाने विराज टीमला उद्देशून म्हणाला ," चला, निघू या? नाहीतर घरी पोचेपर्यंत उशीर होईल . प्रसाद , ऋजुता, तुम्ही सर्वजण गाडीमध्ये बसा. मी रोहितबरोबर येतोच बाहेर".

गाडीची चावी त्याने प्रसादकडे दिली. टीम बाहेर निघाली. जाताना कारंजातून उडणाऱ्या तुषारांचे  रंगीबेरंगी लाईट्स मध्ये चालणारे नर्तन दिसत तर होते... पण ते सौंदर्य आता मनात आतपर्यंत कदाचित पोचत नव्हते....

विराज हॉटेलमालकाला म्हणाला , "मला सुदर्शनला भेटायचं आहे". मालकाने एका जणाबरोबर विराजला सुदर्शनकडे पाठवले. इकडे रोहितने तोपर्यंत बिल भरले.

"काय झालं सर? सर्व ठीक आहे ना?", सुदर्शनने विचारले.

"जिंकलंस मित्रा, खूप अभिमान वाटतोय तुझा, तुम्हा सर्वांचा! अडचणींवर मात करून तुम्ही आज स्वतःच्या पायावर उभे आहात! भूक लागलेली असताना आज तू आम्हाला जेवायला घातलं आहेस. तुला कधी काही गरज वाटली , अडचण आली तर तू मला सांगू शकतोस. तुझ्या फोनमध्ये मी माझा नंबर सेव्ह करून देतो".

"सर तुम्ही सांगा तुमचा नंबर, मी नंतर सेव्ह करून ठेवेन", सुदर्शन.

"**********", विराज.
"**********", सुदर्शनने नंबर पुन्हा उच्चारला.

" एकदाच सांगून तुला पाठ झाला???", विराज आश्चर्याने म्हणाला.

"हो सर. मला राहतो लक्षात. फोनमध्ये सेव्ह करेन मी", सुदर्शन

"ग्रेट! काळजी घे. बाय", विराज.

विराज सुदर्शनला एक मिठी मारून परत रिसेप्शन रूममध्ये आला. रोहित आणि विराज बाहेर पडले आणि सर्वजण घरी निघाले. जाताना कारमध्ये शांतता होती. आता आईसक्रीमची आठवण तर कोणालाही आली नाही. विराजसहित सर्वजण आपापल्या विचारातच हरवलेले होते.....

घरी पोचल्यावर ....

"झाली का रे पार्टी? कशी झाली?", आईने विराजला विचारले.

"हो. चांगली झाली", विराज.

"काय झालं, थकलास का?", आई विराजचा चेहरा बघून म्हणाली.

"हं, डोकं दुखतंय ग थोडं, बाम लावून देतेस का", विराज.

"हं, येते बाम घेऊन, तू पड जरा बेडवर" ,आई.

"काय झालंय याला कोणास ठाऊक. विचारलं तरी सांगणार तर नाहीच काही. नेहमी ऑफिसमधून आल्यावरही विधीच्या मागे चिडवाचिडवी करत, दादागिरी करत फिरत असतो. मस्ती सुरू असते दोघांची. आज तर किती उतरलाय चेहरा, ऑफिसचं काही टेन्शन असेल किंवा थकला असेल. उशीरही झालाच आहे ना तसा... उद्या बघू काही सांगितलं स्वतः हून तर... ", आई स्वतःशीच विचार करत होती.

विराजचे कपाळ चेपून देत आईने बाम लावली.  कितीतरी वर्षांनी आईच्या मांडीवर विराजने डोके ठेवले होते. विचार करून करून श्रांत झालेल्या त्याच्या मनाला तेथे निवारा मिळाला होता. थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला... थोडयावेळाने आईने त्याला नीट झोपवून अंगावर चादर टाकली आणि त्याच्या डोक्यावरून एकदा प्रेमाने हात फिरवून झोपायला निघून गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी...

"आई , तुला खूप दिवसांपासून त्या टेकडीवरच्या दूरच्या मंदिरात जायचं होतं ना? चल आज जाऊ या का आपण सगळे? मला सुट्टी आहे तर घेऊन जातो तुला आज", विराज.

"कुठे जायचा प्लॅन सुरू आहे माय - लेकांचा ? जरा आम्हालाही येऊ द्या बरोबर ...", बाबा. नुकतेच मॉर्निंग वॉकला जाऊन येत असलेले बाबा चप्पल काढून रॅक वर ठेवत म्हणाले. विराजचे फक्त शेवटचे वाक्य त्यांच्या कानावर पडले होते.

"अहो, त्या दूरच्या टेकडीवरच्या मंदिरात घेऊन जातो म्हणत होता विराज ... चला ना जाऊ या सगळेच. गाडीने जाता येईल.", आई.

"हं आवरून निघू या लवकर मग", बाबा.

आज विराज स्वतः हून म्हणाल्यामुळे पटकनच सगळे निघाले होते. थोड्याच वेळात सर्वजण मंदिरात पोचले.  आज जवळपास दीड दोन वर्षांनी मंदिरात आला होता विराज. तेही आई आग्रह करायची म्हणून तो कधीतरी यायचा . आताशा तर आईने कधी म्हटलं तर म्हणायचा, "तू जाऊन ये ना बाबांबरोबर नाहीतर विधीबरोबर". मग कधी जाणं व्हायचं अन कधी मनातच राहून जायचं.

विराजने घंटा वाजवली आणि हात जोडून तो देवापुढे नतमस्तक झाला. "देवा, तुझी कृपा म्हणून आम्ही धडधाकट आहोत.... प्रेम करणारे आईवडील, बहीण असलेला परिवार आहे.... ही तुझी रंगीबेरंगी सुंदर सृष्टी ..... ती डोळ्यांनी बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय.... खूप मोठी देणगी दिली आहेस देवा... खरं तर सृष्टीचा कर्ता करविता तू आहेस.... हे विसरून गेलो होतो मी.....  रूप , हुशारी ही तर तुझी देण .... मला स्वतःबद्दल खूप गर्व होता... कोणालाही काहीही बोलताना विचार केला नाही... समोरच्याला काय वाटेल त्याची परिस्थिती काय असेल हे सगळे न बघताच मी रागावून मोकळा होत होतो .... पण काल माझे डोळे उघडले... खऱ्या अर्थाने मला दृष्टी प्राप्त झाली.... माझं गर्वहरण करण्यासाठीच तू मला तिथे पाठवलेस ना? .... काल मला झालेली जाणीव मी स्वतः मध्ये सतत जागृत ठेवण्याचा प्रयत्न करीन.... तुझा आशीर्वाद असाच कायम असू दे".

सर्वांचे दर्शन करून होते आहे तोच विधीने विराजला एक कोपरखळी मारली .  फिक्या पिवळ्या रंगाचा चुडीदार कुर्ता घातलेली , ओले केस अलगद क्लिपमध्ये लावलेले. हातात पिवळ्या बारीक नाजूक बांगडया, कपाळावर नाजूकशी टिकली .

"ती बघ सापडली....", विधी हळूच विराजला तिकडे इशारा करत म्हणाली.

"अग तुला दुसरे काही सुचत नाही का? ", विराज डोक्याला हात लावून म्हणाला.

"तू एकदा बघ तिकडे आणि मग बोल...", विधी गालात हसून म्हणाली.

ती मुलगी पाठमोरी असल्याने तिचा चेहरा विराजला दिसत नव्हता.

"डोन्ट वरी ब्रो, मी पाहिला आहे, खूप गोड आहे ती", विधी.

काही वेळात तिचे देवदर्शन झाले आणि ती मागे वळली. आता विराजला तिचा चेहरा दिसला. सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसलेलं ते सोज्वळ सौंदर्य... चेहऱ्यावर शांत आणि सात्त्विक भाव ... एक वेगळाच ताजेपणा  ... तो थबकून तिकडे बघतच राहिला....

"ओय दादा ss गेलास तू...", विधी हसत म्हणाली.

"चल बाहेर", विराज घाई करत विधीला म्हणाला.

"अरे, पण का? थांब ना", विधी.

"चल ना आता, ओळख करून देतो ना तुझी त्या मुलीशी", विराज हसून म्हणाला.

"काय? तू ओळखतोस तिला?", विधीचे डोळे विस्फारले.

"अग हो, तू चल लवकर , नाहीतर निघून जाईल ती, तुम्हा सर्वांचीच ओळख करून देतो तिच्याशी",

तोपर्यंत ती मुलगी आणि तिची आई पायरीवरून खाली उतरायला लागले होते. विराजने तिला आवाज दिला. आपले नाव ऐकून तिने चमकून थबकून मागे पाहिले.

" तुम्ही ?", मुलगी.

"तू इथे?", विराज.

"हो , मी येते इथे अधूनमधून", मुलगी.

अगदी बरोबर ओळखलंत... ती दुसरी तिसरी कोणी नसून ऋजुताच होती. विराज आणि विधी पायऱ्या उतरून तिच्याकडे गेले. तिने तिच्या आईला विराजची ओळख करून दिली.

"आई , हे विराज सर.... ", ऋजुता.

"हो का , नमस्कार सर, ऋजुताने सांगितले होते. तुम्हीही ऋजुताच्या ऑफिसमध्ये काम करता ना?, तिचे मॅनेजर का काय ते म्हणाली होती ", ऋजुता ची आई.

"हो. आणि सर काय हो काकू, मी तुमच्या मुलासारखा आहे. ऋजुता माझ्याच टीममध्ये आहे", विराज हाताने नमस्कार करत म्हणाला.

"अस्सं का दादूड्या, मुलगाच , नाही का तू त्यांचा", विधी गालात हसत मनात म्हणाली.

"ही विधी", विधीच्या खांद्यावर हात ठेवत विराज म्हणाला.

"नमस्कार काकू, हाय ऋजुता ", विधी.

"आई बाबाही येतच आहेत. तुमची ओळख करून देतो", विराज.

सर्वांची एकमेकांशी ओळख करून झाली. विराजच्या आई वीणाताईनी ऋजुताच्या डोक्यावर हात फिरवून म्हटले, "गोड आहे हो रेखाताई तुमची मुलगी, छान वाटले तुम्हाला भेटून".

रेखाताईंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य पसरलं. " हो , गुणाची आहे आमची ऋजू ".
अशाच दोघींच्या एकीकडे गप्पा रंगल्या होत्या.

इकडे विधी, विराज अन ऋजुता बोलत बोलत चारदोन पावले पुढे आले होते.

"सर, ही तुमची ...?", ऋजुता पुढे विचारणार तोच विधी लगेच म्हणाली, " त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर".

विराज काही न कळून विधीकडे बघत होता. विधीने त्याला डोळ्यांनीच गप्प राहायला खुणावले. पुन्हा असेल काहीतरी विधीचा खोडकरपणा ! असं म्हणून विराज गप्प राहिला. तसेही विधीने काही खोटे तर सांगितले नव्हतेच ना. :-)


"हं ओके", ऋजुता.

विधीने हे म्हटल्यावर ऋजुताच्या चेहऱ्यावर जाणवणारा बदल विधीने अचूक टिपला. "हं, मला तर कळलं, आता तुम्हा दोघांना कधी कळतंय बघू या", विधी मनात म्हणाली.


"आता ओळख तर झालीच आहे वीणाताई आपली . घरी या तुम्हाला जमेल तसे, आपण गप्पा मारू या निवांतपणे", रेखाताई.

"हो, हो, नक्की", वीणाताई.

निरोप घेऊन सगळे निघाले. जाताना गाडीत बसल्यावर विधी विराजकडे बघून सारखी "उं हु , उं हु " करत होती.

" आई , हिला खोकला झालाय ग, जरा डॉक्टर कडे न्यावं लागेल. इंजेक्शन वगैरे दिलं की बरं वाटेल हिला", विराज.

"ए नाही ग आई, इंजेक्शन वगैरे काही नको, हा काहीपण बोलतोय", विधी.

" हो ना, झालाच तर आहे खोकला, केव्हाची खोकते आहेस" , मागच्या सीटवर बसलेली आई काळजीने म्हणाली.

"विराज , तू जाताजाताच थांबव गाडी डॉक्टरकडे, लवकर दाखवलेलंच बरं आहे ", आई.

विराज विधिकडे बघत मिस्किलपणे हसू लागला.

" आई , मी ठीक आहे, बघ , गेला माझा खोकला, येत नाहीये आता", विधी विराजकडे बघून तोंड वाकडं करत म्हणाली.

आईसुद्धा गालातल्या गालात हसू लागली.

काही वेळाने विराजने गाडी एका दुकानाजवळ थांबवली.
"उतरा सर्वजण, इथे जायचं आहे", विराज दुकानाकडे हात दाखवत म्हणाला.

सर्वांना वाटले विराजला काही घ्यायचं असेल. सर्वजण दुकानात गेले.

"यांच्यासाठी वॉकिंगसाठी चांगल्यापैकी  शूज दाखवा", बाबांकडे हात दाखवत तो तिथल्या सेल्समनला म्हणाला.

"अरे, मला कशाला हवेत वॉकिंगला शूज वगैरे. चप्पल आहे की ", बाबा.

"बाबा, तुम्ही रोज फिरायला जाता ना, पायात आरामदायी शूज हवेत फिरताना. घ्या तुम्ही जो आवडेल तो", विराज .

"आई तुही घेतेस का? मग तुलाही जाता येईल बाबांबरोबर फिरायला", विराज.

"नको बाई, कसं वाटतं ते? साडी आणि त्यावर ते शूज? ", वीणाताई.

"अग आई एवढंच ना, मग ड्रेससुद्धा घे ना", विधी .

" काहीही बाई तुम्हा पोरांचे, आतापर्यंत साड्याच नेसले आहे ना मी, आता या वयात मी कुठे ड्रेस घालणार आहे का?", वीणाताई.

"बरं तू शूज तर घे सध्या, खूप आरामदायी असतात ते , फिरायला जाताना. मग त्रासही होत नाही . ड्रेसचं आपण बघू नंतर तुला वाटलं तर. मी येईन तुझ्यासोबत", विधी.

आई बाबा दोघेही शूज बघायला लागले. विधी अधूनमधून त्यांच्याकडे तर अधूनमधून विराजकडे बघत होती. "आज या दादाला काय झालंय, कधीही न करणाऱ्या गोष्टी करतो आहे आज.... मंदिरात काय नेतो.... बाबांना शूज घ्यायला काय लावतोय ... नक्कीच काहीतरी झालंय" , विधी मनात म्हणाली.

"बाबा, आई, आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी स्वतःच्या कितीतरी सुखांचा त्याग करत आला आहात.... मला आठवतं, लहानपणी मी धावण्याच्या स्पर्धेसाठी महागडे शूज हवेत म्हणून किती हट्ट केला होता तुमच्याकडे.... आईने किती समजावले ... शेवटी बाबांनी ओव्हरटाईम करून मला ते शूज घेऊन दिले. तेव्हाच्या काटकसरीच्या दिवसांत सुद्धा जमेल तसे तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायचे .... पण हे तेव्हा कधी कळलेच नाही.... आता जाणवतंय.... दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघितले की खरच जाणवायला लागते की तो कोणत्या परिस्थितीतून जात असेल....

खरंच मीही किती वेडा होतो. स्वतः  स्वतःच्या स्टायलिंग कडे एवढं लक्ष द्यायचो , रोज काहीतरी नवीन घ्यायचो. पण बाबांची झिजलेली चप्पल कधी दिसली नव्हती मला. आईचे कष्ट कधी जाणवले नाही मला . तिलाही घरातून बाहेर कुठे जावंसं वाटत असेल, असा कधी विचारच केला नव्हता. स्वत:पलिकडे कधी माझी नजर जाईल तर ना ! पण आता असं नाही होणार. आज सकाळी बघितले तेव्हाच ठरवले की काहीही झालं तरी तुम्हाला आज शूज घेऊन द्यायचेच", विराज आईबाबांच्या आनंदी चेहऱ्याकडे बघत मनात म्हणत होता.

आणि विधी आपल्या बदललेल्या दादाकडे बघत होती.  तिच्याकडे लक्ष जाताच तो काय अशी हाताने खूण करत विचारत होता. विधी त्याच्याकडे जाऊन म्हणाली , " क्या बात है दादा, तू ठीक आहेस ना? हे सगळं कसं काय झालं?", विधी.

" इन अ वे, तू आत्ता जिला भेटलीस ना तिच्यामुळे ", विराज.

"कोण ? ऋजुता? हे अवघड कार्य तिने इतक्या समर्थपणे कसे काय केले बुवा?", विधी आश्चर्याने अन हसत म्हणाली.

"सांगेन नंतर", विराज हसून म्हणाला.

"उधार रहेगा हां?" , विधी दम देत म्हणाली.

" हो ग, नक्की सांगेन.... आणि तुझा काय आगाऊपणा चालला होता ग ? कशाला तिला कन्फ्यूज करत होतीस?", विराज.

"म्हणजे मी जे बोलली ते खोटं होतं का दादा? तुझं माझ्यावर प्रेम नाही? ", विधी डोळे मोठे करत नाटकीपणे विराजला म्हणाली.

"ही काही सुधारणार नाही", डोक्याला हात लावत विराज म्हणाला.

तेवढ्यात दोघांचेही शूज घेऊन झाले. आणखी थोडीफार खरेदी करून सर्वजण आनंदात घरी गेले.

*****

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

ऑफिसमध्ये काय होईल ?

रोहितची पार्टीबद्दल काय प्रतिक्रिया असेल? त्याला पार्टी आवडली असेल का?

विराजच्या आयुष्यात पुढे काय होईल ?

बघू या पुढील भागांमध्ये.

संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.  हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all