दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 59

Viraj Rujuta, Rajat Vidhi.

मागील भागात...

"विराजने शिकवलंय? दाखव बघू गाऊन. बघू कसं शिकवलंय." ऋजुता उत्साहाने म्हणाली.

'दृष्टी'मध्ये ती मुलगी गात असताना ऋजुता तिच्याकडे बघत, ऐकत मध्येच डोळे मिटत आपल्याच विचारात हरवली होती. विराज हे गाणं तिला कसा शिकवत असेल असं तिच्या डोळ्यासमोर येत होतं. चेहऱ्यावर एक गोड हसू आलं होतं. वीणाताई दुरूनच हे सगळं बघत, ऐकत होत्या.

पुढे ...

'या गाण्याबरोबरच्या विराजच्या कशा वेगवेगळ्या आठवणी आहेत ना! पहिल्यांदा तो गाडीमधला चिडका, जमदग्नीचा अवतार झालेला विराज! मग हेच गाणं ऐकल्यावर स्वतःच शांत झालेला विराज, मग ज्या कारणासाठी माझ्यावर चिडला होता, ते समजून घेऊन स्वतःच त्यासाठी एवढे कष्ट घेणारा विराज आणि हेच गाणं या मुलांकडून कार्यक्रमात सादर करवून घेतानाचा समाधानी अन आनंदी विराज. आजही माझ्या मनात त्याची आठवण जागविणारा... ' ऋजुता विचार करत होती. चेहऱ्यावर हसू कायम होतं. आणि हेच वीणाताईनीही दुरून बघितलं होतं .

"इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना..." ती मुलगी गात होती.

'हे गाणं याही कार्यक्रमात घ्यायला हवं. छान गातेय ही प्रार्थना.' तिने ठरवून टाकले आणि तसे त्या मुलीलाही सांगितले .

दीड तास सर्वांची प्रॅक्टिस करून झाली. विनीतसुद्धा आपला क्लास संपवून बाहेर आले होते. तेवढ्यात ऋजुताला कसली तरी आठवण आली आणि ती विनीत आणि विणाताई बसले होते तिकडे आली.

"काकू, विराजशी तुमचं आज बोलणं झालं असेल ना? त्याची तब्येत बरी नव्हती." ऋजुता.

"अगंबाई! हो का? बरं झालं सांगितलंस. काय झालं त्याला? तो ऑफिसमध्ये असतो ना या वेळी, म्हणून फोनच नाही केला मी. तू फोन केला होतास का त्याला? " वीणाताई.

"नाही. मी थोड्यावेळापूर्वी दादाशी बोलत होते ना, तर त्याने सांगितलं की विराजला आज ताप आहे म्हणून तो ऑफिसमध्ये नाही गेला. झोपला होता." ऋजुता.

"बरं, मी बोलते मग त्याच्याशी." वीणाताई.

"झाली का ग आजची प्रॅक्टिस?  कशी चाललीय ग बेटा?" विनीत.

"हो झाली काका. छान सुरु आहे. उद्या ऑफिसमध्ये प्रोजेक्ट रिलीज आहे आमचा. त्यामुळे लवकर यायला जमलं नाही तर... म्हणून आज जरा जास्त प्रॅक्टिस केली आम्ही."

"अच्छा. मग असं कर ना, उद्या तू तुझं काम नीट करून घे. उगाच इकडे येण्याची गडबड करू नकोस. धावपळ होते तुला. परवा घे प्रॅक्टिस यांची. चालेल ना?" विनीत.

"हो, चालेल तसंही. आता निघते मी." ऋजुता म्हणाली आणि निघून गेली.

"बघितलंत ना मॅडम, कशी लाघवी पोर आहे." विनीत म्हणाले पण वीणाताई आपल्याच विचारात, जरा काळजीत होत्या.

"अहो, विराजला ताप आलाय म्हणे ना . झोपला होता. त्याच्याशी बोलू या का? फार आजारी तर नसेल ना पडला?"

"हो, घरी जाऊन मग बोलू. चल." ते दोघेही निघाले.


इकडे रजतने  विधीला मेसेज करून सांगितले,

"किट्टू, दादाला ताप आलाय तुझ्या. कसलं तरी टेन्शन घेतलंय वाटतं." रजत.

तो कधीकधी लाडाने विधीला किट्टू म्हणायचा आणि ती त्याला पिट्टू म्हणायची.

"ओह, आईच्या बोलण्याचं टेन्शन घेतलंय का त्याने! कसा आहे रे तो?" विधी.

"अग डोन्ट वरी, मी आहे ना. बघतोय, काळजी घेतोय त्याची. आज त्याने सुट्टी घेतलीय आणि आराम करतोय तो." रजत.

"थँक यू पिट्टू. तू दादाची काळजी घेतोय." विधी. भरपूर स्माईली आणि चॉकलेट्स तिने मेसेजमध्येच पाठवले.

"हो ना, साला." रजतने स्माईलीसोबत उत्तर दिले .

"ए, काळजी नको घेऊ हवं तर, पण शिवी नको देऊस माझ्या दादाला. जा मी नाही बोलणार आता तुझ्याशी." विधीने रागावलेले, लालबुंद झालेले ईमोजी पाठवले.

"अग रागावतेस काय? वेडी मुलगी. मी कुठे शिवी दिली?" रजत.

"मग काय तर? मी पाहिलंय ना किती मुलं येताजाता एकमेकांना साल्या म्हणत असतात. कसं वाटतं ते ऐकायला! शी! आता तू पण तेच म्हणालास. मला अजिबात नाही आवडलं." विधी रागावलेलीच होती.

"अग माझी किट्टू, तो तुझा भाऊ आहे ना? तू माझी कोण होणार आहेस? " विधी जितकी रागावली होती तितक्याच  लाडाने रजत म्हणाला .

आत्ता मात्र विधीच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि आधी तिच्या नाकाच्या शेंड्यावर असणाऱ्या लालीने गालापर्यंत कधी प्रस्थान केले हे तिलाही कळले नाही. तिच्या शांत राहण्यावरून रजतला अंदाज आलाच.

'लाजल्या वाटतं मॅडम. रजत डोन्ट मिस धिस मोमेन्ट.' गालात हसत रजत स्वतःशी म्हणाला.

ते सुंदर लाजणं बघण्याची अनिवार इच्छा होऊन रजतने तिला व्हिडिओ कॉल केला.

विधीने कॉल तर घेतला, पण चेहरा मात्र हाताने झाकून घेतला होता.

"ए किट्टू, चेहऱ्यावरचा हात बाजूला कर ना. बघायचं आहे मला तुला लाजलेलं."

"नाही हं, बिलकुल नाही." विधी.

"एकतर इतक्या दिवसांनी बघतोय तुला. प्लीज ना. फक्त एक मिनिट." रजत.

"नाही ना." विधी.

"जा, मी आता रुसलोय हं, खरोखर. काय यार एवढ्या दुरून मी फक्त एवढंस काहीतरी म्हणतोय. त्याला पण नाही म्हणतेस तू. मग सांग ना, मी कसं रहायचं? अजून किती पेशन्स ठेवायचं मी?" रजत लटक्या रागाने म्हणाला.

आता मात्र विधीने हळूच चेहऱ्यावरून हात काढले. पण ती अजूनच लाजली.

"ए, सांग ना, कोण होणार आहेस तू माझी?" रजत मुद्दाम तिला आणखी चिडवत होता.

विधीचा चेहरा लाजेने लाल लाल होत होता. रजतची नजर मात्र त्यावरून हटतच नव्हती.

"सांग ना."

"किट्टू!" विधीने हसून दोन्ही हाताचे अंगठे कानाला लावून पंजे हलवत रजतला चिडवले.

"किट्टू होणार मी तुझी." ती खळखळून हसत म्हणाली.

"तू न, सुधारणार नाहीस!" म्हणत रजतही हसला.

"कधीच नाही." विधी हसून म्हणाली. "आधी घरी मागणी तर घाला मिस्टर! मग विचारा मला ." विधी मिश्किलपणे म्हणाली .

"अच्छा? तू म्हणशील तर विचारू का मग आजच? मला तर तशीही घाईच आहे." रजत गमतीने म्हणाला .

"ए, नाही हं. कॉलेज वगैरे पूर्ण करू देणार की नाही? आणि आधीच सध्या टेन्शन आहे. आई रागावली आहे." विधी.

"ठीक आहे ग, तू म्हणशील तेव्हा विचारेन. मग तर झालं?" रजत.

"हं, होईल ना रे सगळं नीट? मला तर भीती वाटायला लागली आहे. जर तुझ्या किंवा माझ्या घरच्यांनी नाही म्हटलं तर?" विधी.

"असं का वाटतं तुला? नाही होणार तसं." रजत. "बरं चल काम आहे मला आता . मग नंतर जरा सूप वगैरे बनवतो ना साल्यासाठी. " रजत हसून म्हणाला.

"बाय." विधी हसून म्हणाली .

फोन ठेवून रजत स्वतःशी हसला. आज सकाळी उठल्यापासून रजतला थोडीही फुरसत मिळाली नव्हती. पण आता दोन मिनिटांच्या या कॉलने त्याचा सकाळपासूनचा श्रमपरिहार झाल्यासारखं वाटलं त्याला. दोन मिनिटात विधीची किती रूपं त्याला दिसली होती, गोड लाजलेली, तर दुसऱ्याच मिनिटाला एकदम मिश्किल, चिडवणारी अन खळखळून हसणारी अन नंतर काहीशी गंभीर.

'प्रिन्सेस, नको काळजी करू. तुझा प्रिन्स कसेही करून घरच्यांना तयार करेल.' तिचा डीपी बघत तो स्वतःशी म्हणाला.


इकडे संध्याकाळी विनीत आणि विधी जेवणानंतर शतपावली करताना बोलत होते.

"बाबा, मला वाटलं होतं की तुम्ही खूप रागवाल. तुम्हांला माहिती होतं ऋजुताबद्दल? दादाने सांगितलं का?" विधी आश्चर्याने म्हणाली .

"हं, मला तसं वाटलं होतं, म्हणून त्याला विचारलं होतं मी , तो लंडनला जाण्यापूर्वी. तेव्हा सांगितलं होतं त्याने." विनीत.

काही वेळ थांबून ते म्हणाले,

"बेटा, तुलाही सांगतो. आईवडील हे तुमचे शत्रू असतात का? नाही ना? तुमच्या लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं तुम्हाला. मग ही जीवनभर प्रेमाने सांभाळ केलेली, जपणूक केलेली, लहानाची मोठी केलेली मुलं अशीच कशी कोणाच्याही हाती आम्ही सोपवणार ग? मुलं प्रेमात पडतात, पण प्रेम केलं तरी ते आंधळं असू नये. कधी कधी अल्लड वयामध्ये याची जाण मुलांना नसते. आपल्या प्रेमासाठी समोरची व्यक्ती पात्र आहे की नाही, हे आधी तपासून पहायला पाहिजे . तिचं बॅकग्राउंड काय, स्वभाव काय, वागणं कसं, हे नीट डोळसपणे बघितलं पाहिजे. थापांना भुलून जाऊ नये. खरोखर समोरची व्यक्ती सांगते तसं आहे की नाही याची खात्री करावी लागते, नाहीतर एखाद्या चुकीच्या अशा निर्णयाने आयुष्याची राखरांगोळी होते. असे होऊ नये यासाठीच आईवडील काळजी घेत असतात. जीवनाचा अनुभव त्यांना तुमच्यापेक्षा जास्त असतो. पण तुम्हाला वाटतं की ते कडक आहेत, रागावतात . मुलांनी परस्पर निर्णय न घेता आईवडिलांना विश्वासाने सांगायला हवे. त्यांच्या मदतीने निर्णयाची योग्यता तपासून पहायला हवी. "


क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखिकेच्या परवानगीशिवाय आणि नावाशिवाय कॉपी, शेअर करू नये.

कथेला देत असलेल्या प्रतिसादबद्दल सर्व वाचकांना धन्यवाद. भाग आवडल्यास लाईक कमेंट करून नक्की कळवा.

🎭 Series Post

View all