दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 58

An interesting story of vision and perspective. Viraj-Rujuta, Rajat-Vidhi.

मागील भागात...

"काय झालं? कसल्या विचारात आहेस? काही प्रॉब्लेम आहे का?"

"अं, नाही रे. चल जेवू या. भूक लागलीय." विराज.

"अरे आज काही बनवलंच कुठे आपण अजून? " रजत.

"ओह, हो रे, विसरलोच मी! चल बनवू पटकन. पुलाव करायचा का? मी भाज्या चिरून देतो. तू फोडणी दे. तांदूळ वगैरे धुवून घे. चालेल?"

"हो ठीक आहे. गरमागरम पुलाव तर धावेल मला. चलो." रजत. रजत जाऊन आपल्या कामाला लागला.

विराजने थोड्या थोड्या सगळ्या भाज्या फ्रीजमधून काढून धुतल्या आणि चिरायला घेतल्या. त्याचे विचारचक्र सुरूच होते. एक दोन भाज्या चिरल्या आणि त्याचा हात थांबला. तो हातात सुरी घेऊन टोमॅटो चॉपरवर ठेवून नुसताच टोमॅटोकडे बघत विचारात पडलेला होता.

'आई, खरंच ग, माझ्याकडून नाही होणार. मी विचारही नाही करू शकत आहे. माझ्यासाठी तू तयार होणार नाहीस का? कसं समजावू मी तुला? दोघींना कसे मनवू मी? ऋजुता तू हो म्हणशील का, सांभाळू शकशील का ग सगळं ? करू ना आपण सगळं मॅनेज. बाबा तुम्ही सांगा ना आईला.' विराजच्या मनात अशाप्रकारचे कितीतरी विचार सुरु होते.

आता पुढे...

इकडे रजतने पुलाव करायला घेतलेला होता, त्याचे बाकी काम झाले. विराज भाज्या चिरून देणार होता. तयार झालेल्या फोडणीत टाकण्यासाठी मिरची आणि बाकी भाज्या घ्याव्या म्हणून तो मागे वळला. तर त्याला विराज असा विचारात गढलेला दिसला.

त्याने दुसरी सुरी घेतली अन विराजच्या बाजूच्या भाज्या हळूच बाजूला घेतल्या, फ्रीजमधून दुसरा टोमॅटो काढून घेतला. अन सगळं पटापट चिरून घेतलं. फोडणीत टाकलं. तांदूळही टाकून झाले. पुलाव होत आला होता. रजतने दोघांच्या प्लेट्स घेतल्या. प्लेटमध्ये पुलाव वाढून घेतला. सोबत पापड घेतला. दह्यातला रायता घेतला.

विराजला आवाज देत, खांद्यावर हलकेच थोपटून म्हणाला, "चल. "

तेव्हा विराज भानावर आला. चॉपरवर धरलेल्या हातातल्या टोमॅटोकडे बघत गडबडून म्हणाला, "हो देतो लगेच तुला टोमॅटो. बस एक मिनिट."

त्याने बघितले तर त्याने चिरायला काढलेले गाजर, सिमला मिरची वगैरे काही नव्हतेच त्याच्या समोरच्या चॉपरवर. फक्त हाताशी धरलेला टोमॅटो मात्र तसाच होता.

तेव्हा रजतने प्लेट विराजसमोर धरली. म्हणाला,

"ताट वाढलंय. जेवून घे."

"पुलाव झाला?" विराज आश्चर्याने म्हणाला. 

"हो बंधू, चल आता, जेवून घे. भूक लागलीय ना कधीची ?" रजत प्रेमाने म्हणाला.

दोघेही जेवू लागले.

"छान झालाय ना पुलाव?" रजत विराजचं लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी म्हणाला.

"अं... हं... हो रे, मस्त झालाय." विराज.

एवढे बोलून दोघेही पुन्हा शांतपणे खात होते . एरवी जेवताना दोघांचेही गप्पा मारणे, हास्यविनोद करणे सुरूच असायचे. कधी ऑफिसमधल्या गप्पा असायच्या, तर कधी राजकारण, कधी स्पोर्ट्स, तर कधी सिनेमा, त्या दोघांना बोलण्यासाठी विषय कमी नव्हतेच कधी!

विराज आज काहीच बोलत नव्हता. काहीतरी झालंय असा रजतला अंदाज आला. विचारू की नको असा विचार करता करता शेवटी त्याने काही न विचारता विराजला त्याचा वेळ द्यावा असे ठरवले. त्याला वाटले तर तो सांगेल असे म्हणून तो शांत राहिला.

जेवण झाले तसे विराज म्हणाला, "मी आवरतो बाकीचे. "

विराज किचनमध्ये जाऊन आवरायला लागला. शेवटी त्याने भांडी धुवायला घेतली.

'रोज पंधरा मिनिटात आवरून होतं . पण आज बराच वेळ झाला तरी विराज अजून आवरणं होऊन बाहेर आला नाही? काय, करतोय काय हा एवढं?' असा विचार करत रजत तो काय करतोय हे बघायला गेला.

विराजच्या जवळ मागे उभा राहून तो बघत होता. एक दोन मिनिटे झाली. 

"विराज, जा तू आता." रजत.

"का, काय झालं? " विराज.

"अरे थकला आहेस तू, तुला आरामाची गरज आहे. धावपळ झालीय तुझी." रजत.

"एवढं झालं की झालंच ना सगळं . मग जातोच आहे की." विराज.

"अरे पण तू जसं करतोय, तशाने ते होणारच नाही. एकदा धुवून झालेल्या भांड्यांना पुन्हा साबण लावतोय अन पुन्हा धुवून पुन्हा घासायलाच ठेवतोयस तू. "

विराजने भांड्यांकडे पाहिले.

"ओह, तरीच! म्हणूनच आज किती धुतली तरी भांडी संपतच नव्हती." विराज.

"काय झालंय विराज?" रजत.

"खास काहीच नाही. डोकं दुखतंय रे , जरा बरं वाटत नाहीये." विराज.

"कसलं, ऑफिसच्या कामाचं टेन्शन आहे का?" रजत.

"नाही. थंडीमुळे असेल बहुतेक. येताना ओलाही झालो होतो ना थोडा." विराज.

"बरं, चल, झोप तू आज लवकर. म्हणजे बरं वाटेल." रजत.

विराज झोपायला गेला तर खरा पण मनात सतत सुरू असलेल्या विचारचक्रामुळे त्याला झोपच येत नव्हती. बऱ्याच वेळानंतर त्याचा डोळा लागला तिकडे रजतही इथे काही वेळानंतर झोपायला गेला.

 रजत सकाळी रोजच्याप्रमाणे उठला. आपले व्यायाम वगैरे नित्यक्रम आटपून बाहेर आला. बघितलं तर आज सगळे शांत दिसत होते.

' सात वाजत आले. विराज उठला नाही वाटत अजून. सहसा होत नाही असं. जायचं नाही का आज याला ऑफिसला?' असं मनात म्हणून रजत त्याला बघायला खोलीत गेला, तर विराज खरच झोपलेला होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. रजतने कपाळाला हात लावून बघितला तर त्याला एकदम चटका लागला.

' अरेच्चा! याला तर चांगलाच ताप आहे!' रजत मनात म्हणाला. 'काय करावे? उठवावे की नाही? त्याचं ऑफिसचे काही महत्त्वाचे काम असेल तर माहिती नाही. पाच दहा मिनिटांनी उठवून बघतो नाहीतर.' 

रजतने चहा आणि खायला काही करायला घेतले. ते होत आल्यावर त्याने विराजला उठवले.

"भाई, आज ऑफिसला जावेसे वाटत नाहीये रे. दिवसभर बसता येईल असं वाटत नाहीये. घसाही दुखतोय." विराज.

"हं, ताप आहे तुला पुष्कळ. ऑफिसमध्ये कळवून दे मग आणि आज पूर्ण आराम कर ." रजत.

"हं. बघेन, दुपारी बरं वाटलं तर घरून काम करेन आज." विराज. 

"बरं, आता चल, चहा वगैरे घे. थोडं खाऊन झाल्यावर मग आराम करशील. " रजत.

विराजला तापामुळे खूपच थकवा जाणवत होता. खाऊन झाल्यावर तो पुन्हा झोपला. रजत नाश्ता आणि थोडी जेवणाची तयारी करून आपल्या रोजच्या वेळेवर ऑफिसच्या कामाला लागला. जेवणाची वेळ होत आली तसे त्याने कामातून वेळ मिळाला तसतसे उठून खायला बनविले. काही वेळाने विराजला उठवावे म्हणून रजत विराजच्या खोलीकडे जात होता. तेवढ्यात त्याला विराजचा जोरात आवाज आला.

"नको ग, प्लीज प्लीज." विराज. तो औषधामुळे आणि थकव्यामुळे आलेल्या झोपेच्या अंमलाखाली ओरडला होता.

आवाज ऐकून रजत तिकडे धावला. बघितलं तर विराज पुन्हा झोपला होता.  

'झोपलाय. राहू देत. सध्या नको उठवायला. जेवेल तो थोड्या वेळाने उठल्यावर.' असा विचार करून रजत दरवाजातून परत वळला.

तेवढ्यात पुन्हा विराजचा जोरात आवाज आला, "प्लीज मला सोडून जाऊ नकोस ना , मी कसं राहीन तुझ्याशिवाय?' 

रजतने चमकून त्याच्याकडे बघितले. विराजच्या बंद डोळ्यातून अश्रू ओघळले होते.

'फक्त एकदाच विचार कर ना माझा.' विराज.

ते बघून, ऐकून रजतसुद्धा कळवळला. त्याच्या लक्षात आलं की विराज स्वप्नात काहीतरी बघतोय.

ऋजुता विराजचा हात सोडून दूर दूर जातेय आणि तो तिला जाऊ नकोस म्हणून विनवणी करतोय पण ऋजुता ऐकत नाहीये, दुसऱ्या कोणाशीतरी लग्न करणार आहे, असं काहीतरी विराजला स्वप्नात दिसत होतं.

रजत विराजच्या जवळ आला. विराजच्या डोक्यावरून हात फिरवत किंचित थोपटून त्याला म्हणाला,

"विराज, उठ, हे बघ सगळं ठीक आहे. " 

विराजला जाग आली. 

"ते स्वप्न होतं !?" विराज डोळे पुसता पुसता म्हणाला.

 "हो." रजत. "चल, आता उठला आहेस ना, जेवून घे. खिचडी केलीय. मी जेवायला बोलवायलाच आलो होतो."

दोघांनी जेवण केले. रजत पुन्हा आपल्या कामाला लागला. विराजने थोडा वेळ काम केले आणि तो पुन्हा झोपला.

इकडे ऋजुताकडे संध्याकाळ झाली होती. ऑफिसमधून 'दृष्टी'मध्ये जायला निघता निघता 'पाच मिनिटं दादाशी बोलावं ' म्हणून ऋजुताने रजतला व्हिडिओ कॉल केला. थोडा वेळ असंच बोलणं झाल्यावर तिने विचारले, 

"विराज ऑफिसमध्ये गेला असेल ना?"

"नाही. आज बरं नाहीये त्याला. म्हणून गेला नाही ऑफिसला."

"एवढं बरं नाहीये? काय झालं? जास्त काही नाही ना?" ऋजुताने एकदम काळजीने विचारले.

रजतलाही तिच्या चेहऱ्यावरची काळजीची रेष दिसल्याशिवाय राहिली नाही. तिच्या स्वरातली चिंताही जाणवली त्याला. तो म्हणाला,

"अग, ताप आहे आज त्याला आणि घसा दुखतोय. पण आज सुट्टी घेऊन आराम करतोय तो. औषधही घेतलं. होईल ठीक."

"हं, ओके. काळजी घे म्हणा." ऋजुता.

"हो." रजत.

"दादा, मी निघते आता, दृष्टी मध्ये जातेय. बोलू नंतर. बाय." ऋजुता. फोन ठेवून ऋजुता निघाली.

दृष्टीमध्ये पोचली तर आज वीणाताई अजून तिथेच होत्या.

"अरे, काकू, बरच वेळ झालाय, आज घरी नाही गेलात अजून? आज काही जास्त काम आहे का? " ऋजुता.

"आलीस बेटा? हो ग, जरा काम होतं आज. कशी आहेस? छान चाललंय ना सगळं?" वीणाताई.

"हो काकू. सगळं एकदम ठीक आहे." ऋजुता.

"जास्त धावपळ होतेय का ग तुझी? " वीणाताई.

"खरं तर सध्या होतेय थोडी धावपळ. ऑफिसला रिलीजही आहे ना उद्या, त्यामुळे. आपला हा प्रोग्रॅम झाला की मग शनिवार-रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी घेईन यांचा क्लास. चालेल ना?" ऋजुता.

"हो चालेल ना, काहीच हरकत नाही." वीणाताई.

" बरं, मी जाऊ, मुली वाट बघत असतील." ऋजुता.

"हो हो. तू कर तुझं सुरु. मी थोडा वेळ आहे इथे. मग जाईन आज घरी 'ह्यां'च्याबरोबरच.

खरं तर आज वीणाताई ऋजुताला भेटण्यासाठीच थांबल्या होत्या. 

ती आली तसा मुलामुलींनी एकच गलका केला. ऋजुतानेही हसून प्रतिसाद दिला.

"चला, कोणी कोणी कालच्या गाण्यांची प्रॅक्टिस केलीय? एक एक जण म्हणून दाखवा बरं. कसं जमतंय बघू. "

"ताई, मला अजून एक गाणं आठवलं. ते म्हणून दाखवू का तुला?"

"हो दाखव की. कोणी शिकवलंय?" ऋजुता.

"विराजदादाने शिकवलं होतं. बरेच दिवस झालेत आता. आम्ही तो पहिला प्रोग्राम केला होता न, तेव्हा."

"विराजने शिकवलंय? दाखव बघू गाऊन. बघू कसं शिकवलंय." ऋजुता उत्साहाने म्हणाली.

ती मुलगी गात असताना ऋजुता तिच्याकडे बघत, ऐकत मध्येच डोळे मिटत आपल्याच विचारात हरवली होती. विराज हे गाणं तिला कसा शिकवत असेल असं तिच्या डोळ्यासमोर येत होतं. चेहऱ्यावर एक गोड हसू आलं होतं. वीणाताई दुरूनच हे सगळं बघत, ऐकत होत्या. 

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर 

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.  

ज्याप्रमाणे कोणताही कलाकार कलाकृती घडविण्यासाठी परिश्रम करत असतो, त्याचप्रमाणे लेखकही शून्यातून कथा, कविता किंवा कोणतीही साहित्यकृती घडविण्यासाठी त्यात जीव ओतून मेहनत करत असतो. त्यामुळे 

 हे साहित्य, प्रसंग लेखकाच्या परवानगीशिवाय आणि नावाशिवाय कुठेही कॉपी किंवा शेअर करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

भाग आवडला असेल तर एक लाईक आणि अभिप्राय नक्की द्या. वाचकांचा प्रत्येक लाईक आणि अभिप्राय हा अधिकाधिक चांगले लेखन करण्याची प्रेरणा देऊन उत्साह वाढवत असतो. मागील भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असेच वाचनाचा आस्वाद घेत रहा.

🎭 Series Post

View all