दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 57

Veenatai has a talk with Viraj.

"आली मोठी तिची वकिलीण." वीणाताई नाक मुरडत म्हणाल्या.

विधीने डोक्याला हात लावला. तिलाही समजेना, आता आईला कसे सांगावे.

"तसं नाही ग आई, म्हणजे  सोयीनुसार आणि आवडीनुसार जे जमेल ते घातलं तर त्यात काही चुकीचं नाही असं वाटतं मला." विधी.

"ठीक आहे, ती तशीही छोटी गोष्ट आहे. " वीणाताई.

बोलता बोलता जेवणे आटपली होती. वीणाताई मागचं आवरत होत्या. विधी थोडीशी मदत करत होती.

"मी बाहेर शतपावली करतोय. तुमचं झालं की या तुम्ही." असं म्हणून विनीत बाहेर गेले.

थोड्या वेळाने विधी त्यांच्याबरोबर फिरायला आली.


इकडे वीणाताईंना मात्र राहवत नव्हते. कधी एकदा विराजशी बोलते असे त्यांना झाले होते. त्याला सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हती.

"विराज, पाऊस थांबलाय. मी येतो रे जरा पाय मोकळे करून." रजत शूज घालता घालता म्हणाला. "काही आणायचं असेल, आठवलं तर फोन कर."

रजत बाहेर गेला. विराज खोलीत बसला होता. आवरून झाल्यावर वीणाताईंनी विराजला फोन केला.

"हं, बोल आई. कशी आहेस? झालं का जेवण वगैरे?" विराज.

"हो, झालं आताच. बरं मी फोन यासाठी केलाय, की लतामावशीचा फोन आला होता. तुझा फोटो वगैरे पाठवण्यासाठी म्हणत होती ती. ती तिच्या नात्यातली मुलगी आहे ना, तिच्यासाठी." वीणाताई.

"आई, नको ना, मी इकडे आहे तर आता शांतपणे राहू दे न. नको हे सगळं आताच." विराज.

"तू आधी ऐकून घे. हे बघ, ती मुलगी मी आधी एका लग्नाला गेले होते तेव्हा बघितली आहे. सुंदर आहे. फार शिकलेली नाही, पण व्यवहारात हुशार आहे. काही अडचण असेल म्हणून तिने शिक्षण मध्ये सोडले असेल. पण आता ड्रेसेस वगैरे शिवते. इकडे शहरात आल्यावर आणखी काही ड्रेस डिझायनिंगचे कोर्सेस वगैरे करता येतील. तिचं तिला बुटीक वगैरे टाकून वाढवता येईल. स्वतःचं स्वतः काम करत असल्यामुळे घर वगैरे सांभाळताना तिला अडचण येणार नाही. नोकरीसारखे बांधून राहावे लागणार नाही. असं सगळं आहे. " वीणाताई शक्य तेवढ्या शांतपणे बोलत होत्या.

"आई तू मला हे सगळं का सांगते आहेस ग. जाऊ दे, करू दे ना तिचं तिला जे करायचं ते." विराज.

"अरे, मावशी म्हणत होती की आता जास्त वेळ लावू नको, स्थळ हातचं निघून जाईल. तिला आणखी स्थळं येत आहेत. मलाही आवडली होती ती तेव्हाच. फक्त आता तू हो म्हण की झालं. नाहीतरी या गोष्टींना वेळ लागतच असतो. तू येईपर्यंत फोटो वगैरे प्राथमिक गोष्टी आटपून घेऊ. मग तू आल्यावर बघण्याचं ठरवता येईल." वीणाताई.

"नको ग आई. बाबा कुठे आहेत ग?" विराज.

"ते बाहेर गेलेत फिरायला. मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून थांबलेय मी." वीणाताई.

"तू हे सगळं बोलली आहेस का बाबांशी?" विराज. त्याला वाटले होते की कदाचित आई बाबांचे यावर बोलणे झाले नसावे.

"हो. बोललेय." वीणाताईंच्या आवाजात काहीसा ठामपणा होता.

"मग ते काय म्हणालेत? ते तयार आहेत का?" विराज.

"तू त्यांचं सोड, ते आज न उद्या ऐकतील. मुलगी चांगली असल्यावर काय प्रॉब्लेम असणार आहे त्यांना? मी फोटो पाठवतेय तुझा. तेच सांगायला फोन केला होता मी." वीणाताई.

"आई, ऐक ना. प्लीज नको काही पाठवू तिकडे. तिकडेच नाही तर कुठेही नको." विराज.

"का काय झालं? लग्न तर करायचंच आहे ना कधी ना कधी. मग आता का नको ?" वीणाताई.

"हं करायचं तर आहे, पण..." विराज.

"हं, बोल बोल... मला तुझ्या तोंडूनच ऐकायचं आहे." वीणाताई.

"आई... तू... रागावणार नाहीस ना? म... मला... एक मुलगी... आवडते." विराज.

"हं, पुढे बोला." वीणाताई हाताची घडी घालून त्याच्या बोलण्याची वाट पाहत होत्या.

"तुला आश्चर्य... नाही वाटलं, म्हणजे... तुला बाबांनी सांगितलं सगळं?" विराज काहीसा भीत भीतच त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होता.

"सांग, कोण आहे ती मुलगी? " वीणाताई.

"आई, ती चांगली आहे ग... आवडेल तुलाही... म... मला... ऋजुता आवडते. तिच्याशी... लग्न... करायचं आहे मला." विराज.

"अरे बाळा, नको आपल्याला एवढी नऊ दहा तासांची नोकरी करणारी मुलगी. पुन्हा जाण्यायेण्यातही वेळ जाणार. घर कसं सांभाळेल ती? एकतर तुम्हा लोकांना सगळं हाताशी लागतं. कसं करेल ती एवढं? तिलासुद्धा काही मर्यादा असतीलच ना? आपल्याला काय कमी आहे का? आपल्या सोयीनुसार थोडंफार स्वतःचा काहीतरी व्यवसाय केला तरी खूप आहे आपल्याला. खरं तर मला तर सुनेने बाहेर फार काही नाही केलं तरी चालेल. घर नीट सांभाळलं म्हणजे पुरे." वीणाताई समजावत होत्या.

"आई, माझं प्रेम आहे ग तिच्यावर. "

"हे बघ विराज, एकदा लग्न झालं की सगळं होतं बरोबर. आम्ही नाही का संसार केला? तसंही आपण ऋजुताकडे अजून काही बोललो नाही तेच बरं झालं. तू बोलू नकोस आता याबद्दल तिच्याशी काही ."

"आई, मला खरंच नाही जमणार ग दुसरीकडे . मी आल्यावर तसंही ऋजुताशी बोलणारच होतो." विराज.

"हो? बोलणारच होतास तिच्याशी? फक्त मलाच सांगावंसं नाही वाटलं ना तुला? बाकी सर्वांना माहिती आहे, आणि मलाच फक्त माहिती नव्हतं. मी उगाच आपली तुझ्या लग्नाची, सुखी संसाराची, दुपारी आरामात आम्ही दोघी सासू सुना गप्पा मारतोय अशी स्वप्न पाहत बसले होते." वीणाताईंचा स्वर बदलला होता. त्यात आता खेद, रोष, उदविग्नताही डोकावत होती.

"आई, असं नको ना ग म्हणू. प्लीज ना. मी सांगणारच होतो ग तुला. " विराज खाली बघत म्हणाला.

"कधी? लग्नाची बोलणी करून आल्यानंतर?" वीणाताईंचा स्वर रुक्ष होऊन आवाज किंचित चढला होता.

"नाही ग, मी येण्यापूर्वीच बोलणार होतो तुझ्याशीही , पण तेव्हा तुला आधीच बरं नव्हतं. अजून त्रास द्यावासा नाही वाटला ग मला तेव्हा. नंतर तर इथे येण्याचीच गडबड  झाली सगळी. तू मला समजून घेशील अशी खात्री आणि विश्वास होता ग मला. " विराज त्याची बाजू समजावत होता.

तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली.

"आई, रजत आला असेल. दार उघडतो मी. आपण नंतर बोलूया का? पण प्लीज तू कोणालाच फोटो वगैरे काही पाठवू नको माझा आणि कोणाचे मागवूही नकोस." विराज.

"तू रजतकडे बोलू नकोस हे सगळं. आपण बघू या. तिच्यापेक्षाही..." वीणाताई.

"नाही. ऋजुताशी बोलल्याशिवाय कोणाशी नाही बोलणार मी आता. तुलाच सांगायचं होतं फक्त. ठेवतो मी आता, त्याच्यासमोर नको हे बोलायला , दार उघडतो. रागावू नकोस ग आई, प्लीज हं. बाय." विराज मध्येच म्हणाला.

त्याने एक लांब श्वास घेत चेहऱ्यावरून हात फिरवला. चेहऱ्यावर काही दिसू नये अशी काळजी घेत त्याने दरवाजा उघडला.

"क्यों बंधू, काफी देर लगा दी खोलने में . सॉरी, चावी विसरलो होतो मी." रजत आत येत म्हणाला.

"बरंच झालं विसरला होतास." विराज पुटपुटला.

"अं? काय म्हणालास?" रजत.

"अरे कॉलवर होतो म्हणून वेळ लागला." विराज सोफ्यावर बसत म्हणाला.

"ओके, मी येतो फ्रेश होऊन. मग काहीतरी बनवू जेवायला . ठरव तू तोपर्यंत, काय जेवायचं ते." रजत.

"हं." विराज.

पाच दहा मिनिटात रजत फ्रेश होऊन आला. विराज जसाच्या तसाच सोफ्यावर विचार करत बसलेला होता. रजतने त्याच्याकडे पाहिले.

"हं, काय ठरवलंस रे?" रजत.

"अं? कशाचं?" विराज दचकून म्हणाला.

रजतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
"काय झालं? कसल्या विचारात आहेस? काही प्रॉब्लेम आहे का?"

"अं, नाही रे. चल जेवू या. भूक लागलीय." विराज.

"अरे आज काही बनवलंच कुठे आपण अजून? " रजत.

"ओह, हो रे, विसरलोच मी! चल  बनवू पटकन. पुलाव करायचा का? मी भाज्या चिरून देतो. तू फोडणी दे. तांदूळ वगैरे धुवून घे. चालेल?"

"हो ठीक आहे. गरमागरम पुलाव तर धावेल मला. चलो." रजत. रजत जाऊन आपल्या कामाला लागला.

विराजने थोड्या थोड्या सगळ्या भाज्या फ्रीजमधून काढून धुतल्या आणि चिरायला घेतल्या. त्याचे विचारचक्र सुरूच होते. एक दोन भाज्या चिरल्या आणि त्याचा हात थांबला. तो हातात सुरी घेऊन टोमॅटो चॉपरवर ठेवून नुसताच टोमॅटोकडे बघत विचारात पडलेला होता.

'आई, खरंच ग, माझ्याकडून नाही होणार. मी विचारही नाही करू शकत आहे. माझ्यासाठी तू तयार होणार नाहीस का? कसं समजावू मी तुला? दोघींना कसे मनवू मी? ऋजुता तू हो म्हणशील का, सांभाळू शकशील का ग सगळं ? करू ना आपण सगळं मॅनेज. बाबा तुम्ही सांगा ना आईला.' विराजच्या मनात अशाप्रकारचे कितीतरी विचार सुरु होते.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर.

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. लेखिकेच्या नावाशिवाय आणि परवानगीशिवाय साहित्य कॉपी, शेअर करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

वीणाताईंना हे सगळं अचानकपणे समोर आलंय. त्यांनी आई म्हणून विराजच्या लग्नाची, सुनेबद्दलची काही स्वप्नं बघितली असतील. त्याला अचानक धक्का लागतोय. त्यामुळे त्या काहीशा दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, त्यांचा आई म्हणून असलेला दृष्टिकोन, त्यांची विराजच्या भविष्याबद्दलची, संसाराबद्दलची काळजी हे आपण समजून घेऊ या.

काय होईल पुढे?

मागील भागाला दिलेल्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद. भाग आवडल्यास नक्की लाईक, कमेंट करा.

🎭 Series Post

View all