दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 56

Rajat reads Viraj's diary. Would he come to know about Viraj's love? Veenatai gets a surprising news.


आवाज कुठून येतोय ते बघत रजत विराजच्या खोलीत येऊन पोचला. त्याच्या खोलीची खिडकी आज उघडी राहिली होती. तिथून पावसाचे काही थेंब आत येऊन टेबलावर उघड्या असलेल्या विराजच्या डायरीवर पडत होते. डायरीची पाने वाऱ्याने फडफडत होती. रजतने खिडकी बंद केली आणि डायरीच्या पानांवरचे थेंब पुसण्यासाठी डायरी हातात घेतली.

'अरे काय हे!  डायरी ओली होतेय . पानं खराब होण्याआधी पुसायला हवे.' म्हणत तो पुसू लागला.

डायरीच्या ज्या उघड्या पानावर थेंब पडलेले होते, तिथे लिहिलेले रजतच्या नजरेस पडले.

'विराजने हे एवढ्यातच लिहिलं असावं कदाचित.' हळुवारपणे थेंब पुसता पुसता रजतला वाटले. असे का वाटले असावे त्याला? कारण विराजने लिहिले होते,

सखे भाग्यवानच तुझा तो
आरसा, जो रोज तुला पाहतो
डोळे दोन्ही मिटून मी मात्र,
तुझ्या आठवणीत राहतो

भाग्यवान ग तो उनाड वारा,
पहा तुझ्या बटांशी खेळतो
तुला आठवताना मी मात्र
हलकेच गालात हासतो

भाग्यवानच तो थेंब पावसाचा
तुला हलकेच स्पर्शून जातो
तुझ्या आठवणींची पालवी
माझ्या मनात उमलवून जातो

कसा स्पंदनांचा सूरताल हरवतो,
गाताना गीतांचा सूरही विसरतो,
अश्रूही कधीकधी ओघळून जातो,
ओघळताना तुझा आसरा शोधतो

तेव्हा मीच माझ्यात हरवून जातो,
तुझ्या आठवणीत एकरूप होतो
जेव्हा तुझी खूप आठवण येते
तुझा नसूनही मी फक्त तुझाच असतो.

तुला येते का ग कधी आठवण ?
सांग ना, येते का तुला कधी, माझी आठवण?

- तुझाच विराज.

 
'वॉव! काय सुंदर लिहिलंय यार ! अरेच्चा , थेंब पुसता पुसता या पानावर लिहिलेलं सगळं वाचलं मी! सॉरी हं विराज. चुकून तेवढं वाचल्या गेलं. पण मी आणखी काही नाही वाचणार. डोन्ट वरी. पण कमाल आहे तुझी. मानलं यार तुला. जेवढं प्रेम करतोस, तेवढंच तिला समजूनही घेतोस आणि स्वतःवर संयमही ठेवतोस. तिच्या भावनांचा मान ठेवतोस. नशीबवान तर ती आहे, जिच्यावर तुझं एवढं प्रेम आहे.' रजत स्वतःशीच म्हणत होता.

पुढच्या काही कोऱ्या पानांवरचे थेंब पुसून झाले आणि त्याने डायरी जागेवर ठेवली. खोलीतून बाहेर येतायेताच दरवाजाचा आवाज आला. रजत बघतो तर विराज चावीने दरवाजा उघडून आत आला होता.

"अरे , एवढ्या पावसात आलास आज ? " रजत.

"हो ना, येताना पाऊस सुरू झालाच. किती थंडगार वातावरण आहे. बाप रे!" विराज जॅकेट काढता काढता म्हणाला.

"हो ना , थांब जरा, मस्त गरमागरम कॉफी करतो. मग घेऊ या बरोबरच."

विराज कपडे बदलून फ्रेश होऊन आला. तेवढ्यात कॉफी घेऊन रजत आला. विराजला कॉफी देत तो म्हणाला,

"बंधू, बरं झालं आज मी घरी होतो. नाहीतर तुझ्या डायरीचं आज काही खरं नव्हतं."

"डायरीचं? का रे , काय झालं?" विराजला काही कळलं नव्हतं. कॉफी घेत तो म्हणाला.

"अरे खिडकी उघडी होती अन पावसाचे थेंब डायरीच्या पानांवर पडले होते. ओली होत होती ती डायरी. मला दिसलं तर पुसून ठेवले मी आताच." कॉफी घेता घेता रजत सांगत होता.

"ओह, थँक्स भाई. थँक यू सो मच. दॅट्स व्हाय आय कॉल यू ॲज बिग ब्रो." विराज.

"आज थोडं लवकर निघालो होतो मी. थोडं काम करायचं आहे अजून. तुझं झालं काम?" विराज.

"नाही, पाऊस आला, खिडकीचा आवाज येत होता म्हणून उठलो होतो मधे. कॉफीही घेणार होतोच. आता काम करतो थोडा वेळ पुन्हा." रजत.

"अच्छा." विराज कॉफीचे रिकामे कप किचनमध्ये ठेवून येत म्हणाला.

दोघेही आपापल्या खोलीत काम करू लागले.


त्या दिवशी संध्याकाळी विराजच्या घरी वीणाताई, विनीत आणि विधी तिघेही जेवणाच्या टेबलावर जेवायला बसले होते. वीणाताई अधून मधून वाढत होत्या.

"अहो मी काय म्हणते, विराज आता साधारण महिना-दीड महिन्यात येईल ना? तर आपण त्या माझ्या मावसबहिणीच्या नात्यातल्या मुलीसाठी सांगून ठेवू या ना त्यांच्याकडे. तो येईपर्यंत फोटो वगैरे मागवता येतील. त्यांनाही पाठवता येईल विराजचा फोटो. विराज आला की लगेच बघण्याचा कार्यक्रम आणि पुढची बोलणी करूया." वीणाताई विनीतना म्हणाल्या.

विधीने त्यांचे म्हणणे ऐकताच तिचे डोळे विस्फारले आणि  चेहरा कसनुसा झाला. आता तिचे पुढचे लक्ष बाबा काय म्हणतात, त्यांचा काय विचार होतो, याकडे लागले होते.

"नको वीणा, आत्ताच काही नको. त्याला येऊ दे परत, मग बघू या. " विनीत म्हणाले.

"अहो उगाच उशीर झाला आणि चांगलं स्थळ हातचं निघून गेलं असं नको व्हायला." वीणाताई जोर देत म्हणाल्या.

"वीणा, थांबू या थोडं अजून. त्याने हो म्हटल्याशिवाय काही करायचं नाही." विनीत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते.

"आता घाई करायला हवी ना. चांगल्या मुलींची पटापट लग्न जुळतात हो. मिळत नाहीत मग हव्या तशा मुली. त्याचं ऑफिसच्या कामाचं काय हो, ते तर सुरूच राहणार आहे." वीणाताई.

"मला त्याच्यासाठी दुसरी एक मुलगी आवडली आहे. " विनीत म्हणाले.

"काय? कोण?" वीणाताई आश्चर्याने म्हणाल्या.

"ऋजुता." विनीत शांतपणे म्हणाले.

" ऋजुता? " वीणाताईंचे डोळे विस्फारले होते. त्या आश्चर्याने म्हणाल्या.

"नाही हो, मला नाही चालणार हे. या शिकलेल्या आणि नोकरीवाल्या मुलींचं काय, एक पाय घरात अन् एक पाय बाहेर! असा काय चांगला संसार होणार आहे का?"

"अगं वीणा, काय म्हणतेस तू हे? आजकाल गरजेचं आहेच ना ते? आपली विधीसुद्धा शिकतेच आहे ना? पुढे जाऊन तीही नोकरी वगैरे काहीतरी करेलच की नाही? आपण तिला तिच्या पायावर उभे राहण्यासाठी तयार करतो आहोतच ना?" विनीत आश्चर्याने म्हणाले.

"तू म्हणतेस त्या मुलीची मी माहिती काढली आहे. ती जास्त शिकलेली नाही आणि तिने मधेच शिक्षण सोडून देऊन शिवण क्लास केलाय. आता ड्रेसेस वगैरे शिवते. " विनीत सांगत होते.

"अहो, मग ठीक आहे ना, चाललंय ना तिचं काही ना काही, तेच करेल ती इकडेही. स्वयंपाक वगैरे छान येतो म्हणे तिला. घरकामातसुद्धा चांगली आहे." वीणाताईंनी आपला मुद्दा लावूनच ठेवला होता.

"वीणा तुला कळत नाही आहे का, फक्त स्वयंपाकपाणी नीट आलं म्हणजे संसार होतो का? विराजला पटणार आहे का? तो नाही तयार होणार तिच्याशी लग्नाला. "

"का? काय वाईट आहे तिच्यामध्ये?" वीणाताई.

"अगं तसं अजिबात म्हणणं नाही माझं. मुलगी चांगलीच आहे तीही. पण फक्त ती विराजला सूटेबल नाहीये एवढंच माझं म्हणणं आहे." विनीत शांतपणे म्हणाले.

"का, सूटेबल का नाही?"

"अगं, दोघांच्या राहणीमानात, शिक्षणात एवढा फरक आहे. आपला विराज इंजिनीयर आणि एम. बी. ए. आहे. दोघांना जुळवून घेताना किती कठीण जाईल! विचारांमध्ये किती तफावत राहील! दिवसेंदिवस तफावत वाढत जाईल ना. मनं जुळायला हवीत ना ग. फक्त आत्ताच नाही तर पुढेही पटायला हवे त्यांचे. माझं ऐक, तू तो विचार सोडून दे." विनीत.

"मला नाही बाई पटणार ही ऋजुता सून म्हणून. " वीणाताई.

"का काय झालं आता? त्या दिवशी तर मोठ्या हक्काने विचारलं तिला, गाणं शिकवायला येशील का म्हणून! अन तुझ्या एका शब्दावर तयार झाली ती. किती धावपळ होतेय तिची. तरीसुद्धा करते आहे ना? आणि तेही किती मन लावून अन उत्साहाने." विनीत.

"अहो ते वेगळं आहे." वीणाताई.

"स्मार्ट आहे मुलगी, हुशार आहे, चांगली धडाडी आहे तिच्यात. स्वभावसुद्धा किती चांगला आहे. घरचे सगळे चांगले आहेत, अजून काय हवंय? आणि मुख्य म्हणजे विराजचे खूप प्रेम आहे तिच्यावर. मी पाहिलंय त्याला तिच्यासाठी झुरताना. तिचा जर होकार असेल तर तू मोडता घालू नकोस वीणा."

"तिनेच नादाला लावलं असेल माझ्या मुलाला. तरीच मी म्हणत होते." वीणाताई नाराज होत म्हणाल्या

"नाही ग आई. तिने काय केले? तिला तर माहितीसुद्धा नाही दादा तिच्यावर प्रेम करतो ते." विधीला अजिबात पटले नव्हते वीणाताईंचे म्हणणे.

"हं, म्हणजे तुम्हा बापलेकांना हे आधीच माहिती होतं तर! माझ्यापासूनच काय ते लपवून ठेवलंत. तरीच मी म्हणत होते." वीणाताई.

"तुला दुखवायचं नव्हतं ग त्याला. म्हणून घाईगडबडीत काही बोलला नाही तो. पण माझ्याकडे बोलला होता, "बाबा, आई रागवेल का?" म्हणून. तेव्हाही त्याला तुझीच काळजी होती." विनीत.

"आई प्लीज सोडून दे ना दुसऱ्या मुलीचा विचार. ऋजुता खरच खूप चांगली आहे ग. दादा आला की विचारणार आहे तिला."

"कसे कपडे घालते ती, बघितलंस ना? पॅन्ट, टॉप, जीन्स वगैरे." वीणाताई.

"कम ऑन आई, आता तू 'नाही' म्हणायचं म्हणून  कारण काढते आहेस हं. सगळ्याच मुली घालतात तसे . ती तर चांगले, पूर्ण फॉर्मल्स घालते, एकदम व्यवस्थित, नीटनेटके. ऑफिसमध्ये तसेच हवे असतात. मी नाही घालत का असे कपडे? पंजाबी ड्रेस आणि साडीही घालते ना ती कधीकधी? बघितलंय तू, ते नाही का लक्षात तुझ्या? आणि तिचंही लग्न नाही झालंय अजून. मग ऑफिस मध्ये काय साड्या नेसून जाणार आहे का रोज? भरगच्च ट्रॅफिकमध्ये दहा-पंधरा किलोमीटर गाडी चालवताना साडी पायात, गाडीत अडकली म्हणजे? काय भावात पडेल ते?" विधी समजावत होती.

"आली मोठी तिची वकिलीण." वीणाताई नाक मुरडत म्हणाल्या.

विधीने डोक्याला हात लावला. तिलाही समजेना, आता आईला कसे सांगावे.


क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे आणि कवितेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. लेखिकेच्या नावाशिवाय आणि परवानगीशिवाय साहित्य कॉपी, शेअर करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.


तर कसा वाटला हा भाग? काय होणार पुढे?

संक्रांतीनिमित्त मी लिहिलेली 'गोडवा' ही छोटीशी कथा कोणीकोणी वाचलीत ? वाचायची राहिली असेल तर नक्की वाचून सांगा, त्यात तीळगुळाचा गोडवा सापडतो की अजून कोणता ते. लिंक वर किंवा ऍपमध्येही वाचता येईल.
आवडल्यास कथेला आणि भागाला कमीतकमी एक एक लाईक तर नक्की कराच. अभिप्रायही कळवा. प्रतीक्षेत.   गोडवा लघुकथा येथे वाचा.

🎭 Series Post

View all