दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 55

Rajat finds Viraj's diary. Oh my god !

"पण मी खरंच तर बोलत होते. बरं , विचारू या ना आपण त्यांनाच फोन करून , की तुम्हांला ऋजुताची आठवण येते का? " निकिता हात चोळत पण तरीही मिश्किलपणेच म्हणाली.

"हो का? एक फटका कमी झाला ना तुला? बरं ठीक आहे, विचारू या आपण. चल तू आता चहा घ्यायला." म्हणत ऋजुताने तिला केबिनच्या बाहेर दामटले आणि दोघीही कॅन्टीनमध्ये गेल्या.

चहाचा कप हातात घेऊन येऊन दोघी कँटीनमध्ये टेबलाजवळ येऊन बसल्या . कप टेबलावर ठेवत निकिता एक कॉल करायला लागली. तेवढ्यात ऋजुताने पटकन तिच्या हातून फोन खेचला.

"अग काय करतेस ऋजू? कॉल करत होते ना मी?"

"काही नाही करायचा त्याला कॉल. नाही विचारायचं मला काही त्याला. "

"अग त्याला कोणाला ऋजू?"

"विराजला."

"अग पण मी कुठे त्यांना कॉल केला? मी तर प्राजक्ताला इथे बोलावण्यासाठी कॉल करत होते. वेडी कुठली. काय झालंय तुला?" निकिता हसत म्हणाली.

"तू ना, अशी घाबरवतेस मला." ऋजुता तिचा फोन तिला परत देत , खाली बघत म्हणाली. ओशाळली होती ती काहीशी.

"ऋजू, तू ना, खूप क्यूट आहेस ग. नशीबवान आहेत ते." निकिता ओघाने बोलून गेली.

"आता कोण ग बाई?" ऋजुता प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होती.

"अं ... कोणी नाही ग. तू चहा घे ना , थंड होतोय. " निकिता स्वतःही तिचा कप उचलत म्हणाली.

एक दोन मिनिटांनी निकिताने विचारले,
"ऋजू, विराज सरांचा कॉल येत असेल ना ग तुला अधूनमधून?"

"नाही ग, कॉल काय, मेसेजसुद्धा करत नाही तो. मी गुड मॉर्निंग मेसेज केला तर त्यालाही तेवढ्यापुरते उत्तर देतो कधीकधी. " ऋजुता.

ऋजुता बरेचदा सकाळी विराजला छानसा सुप्रभात मेसेज पाठवत असे. कधी त्यात सुंदर ओळी लिहिलेल्या असायच्या , तर कधी एखादी सुंदर इमेज . कधी फ्रेश टवटवीत दिसणारी फुलं, तर कधी उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे . विराजसुद्धा तिच्या मेसेजची आतुरतेने वाट बघत असे. दिवसातून कितीदा तरी त्याच एका मेसेजचे पारायण तो करत असे. पण त्याने तिला कधीही तसे जाणवू दिले नाही. तिचा मेसेज आला नाही तर त्याला चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. पण उत्तर मात्र तो जाणूनबुजून क्वचितच देत असे. तेही अगदी तेवढ्यापुरतेच. ऋजुता त्याचे उत्तर येईल, तो काहीतरी बोलेल, म्हणून त्या वाटेकडे डोळे लावून बसत असे, नाही आले तर जरा खट्टूही होत असे. तिला विराजची अधिकाधिक आठवण येत राही. तेच केबिन, तिथे वेळोवेळी झालेल्या त्यांच्या मीटिंग्स, चर्चा, त्याचे रागावणे, समजावून सांगणे, तिच्यासाठी चहा मागवणे , सगळे सगळे तिला आठवत राहायचे. त्याचे अस्तित्व तिला आसपास असल्यासारखे जाणवत राहायचे.
कधी कधी तर त्याने सरप्राईज म्हणून तिच्यासाठी ठेवलेल्या बासरीवादनातून त्याची सोबत अनुभवण्याचा प्रयत्न करायची.

पण हे सगळे विराजला कुठे माहीत होते! तो तर या सर्वांपासून अनभिज्ञ होता.


"झाले का आजचे काम? कधी जाणार आहेस घरी?" निकिताने ऋजुताला विचारले.

"नाही ग, एक मीटिंग आहे थोड्या वेळाने. ती संपल्यावर निघेन. पण घरी नाही, 'दृष्टी'मध्ये जायचंय मला." ऋजुता.

"'दृष्टी'मध्ये? आता ? कशासाठी ग?" निकिता.

"अग गेल्या काही दिवसांपासून तिथल्या मुलींना गाणे शिकवतेय मी. कार्यक्रम करायचाय पुढल्या आठवड्यात. " ऋजुता.

"ओह छानच ग. पण धावपळ होत असेल ना तुझी? दमायला होत असेल तुला."

"हं, होतेय , पण काही दिवस जास्त होईल. मग कार्यक्रम झाल्यावर सुट्टीच्या दिवशीच घेईन क्लास" . ऋजुता.

"हं, ते बरं पडेल तुला." निकिता.त्याचं झालं असं होतं, की काही दिवसांपूर्वी मध्यंतरी डिसेंबरमध्ये एक दिवस ,

"मॅडम, त्या गाणं शिकवण्यासाठी ज्या मॅडम येतात ना, त्यांना आता काही महिने जमणार नाही म्हणून फोन आलाय त्यांचा. आता काय करायचं? कोणी दुसरे शिकवेल का?" 'दृष्टी'चा मॅनेजर पराग वीणाताईंना विचारत होता.

"ओहो, असं आहे का? अचानकच सांगितलंय. ठीक आहे. शिकवू शकणारं कोणी बघावं लागेल आता . सध्या त्यांना जे शिकवलंय त्याची प्रॅक्टिस करायला सांगा. बघू या आपण ." वीणाताई.

तेवढ्यात रेखाताईही 'दृष्टी'मध्ये पोहोचल्या.
"काय वीणाताई, कसली एवढी चर्चा चाललीय?"

वीणाताईंनी त्यांना कल्पना दिली. बोलता बोलता त्यांच्या लक्षात आले,

"अहो, ऋजुतालाही आवड आहे ना गाण्याची? ती शिकवू शकेल का यांना? " वीणाताई.

"शिकवू तर शकेल. येतं खरं तर तिला. फक्त ऑफिसमुळे रोज जमेल की नाही ते विचारावं लागेल. कदाचित शनिवारी-रविवारी घेऊ शकेल. मी विचारते तिला." रेखाताई.

लगेच त्यांनी विचारून घेतले. आता तर काय , ऋजुताने आठवड्यातून एखाद्या दिवशी संध्याकाळी अन सुट्टीच्या दिवशीसुद्धा दोन तास दृष्टीमध्ये संगीत शिकवणे सुरूही केले होते. तिलाही त्याचे समाधान वाटत होते. विराजचीच संस्था. त्याने सुरू केलेले वेगवेगळे उपक्रम, त्यानेच घेतलेल्या वेगवेगळ्या वस्तू, बनवलेले चित्र. इत्यादी तिथे असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ती त्याचे अस्तित्व शोधत राही. त्याची आवड, त्याने केलेले काम, त्याचा स्पर्श लाभलेल्या वेगवेगळ्या वस्तू ... नकळत त्यांना निरखत कधीकधी स्वतःच्याच विचारात रमून जात असे.

काही दिवसांनी तिला एका ठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या संगीतविषयक कार्यक्रमांबद्दल कळलं. तीन दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ असे वेगवेगळे कार्यक्रम होणार होते.

'या कार्यक्रमात आपल्याला 'दृष्टी'साठी एक स्लॉट मिळाला तर किती छान होईल ना' तिला वाटले.

तिने त्याच दिवशी संध्याकाळी 'दृष्टी'मध्ये विनीतना भेटून याबाबत विचारले.

"अरे वा! छान कल्पना आहे. पण या मुलांची तयारी होऊ शकेल का तेवढी?" विनीत.

"हो, करून घेईन ना मी. आधी तयार केलेली काही गाणी आहेत. काही नवीन घेऊ . अजून वीस दिवस आहेत त्यात रोज प्रॅक्टिस करू या. मग होईल. "

"मग विचारू या का आयोजकांना आताच? म्हणजे निश्चित होईल." विनीत.

लगोलग त्यांनी विचारून घेतले. आयोजकांनी कल्पनेचे स्वागत केले व स्लॉट निश्चित करून दिला.

"बेटा ऋजुता, आता स्लॉट तर निश्चित झाला. लागा आता तयारीला. " विनीत.

"हो काका, अगदी लगेच. रोजच प्रॅक्टिस करू आता आम्ही." ऋजुता आनंदाने म्हणाली. लगेच तिने मुलामुलींची कोणकोणती गाणी तयार आहेत यांची एक यादी बनवली . त्यातली काही आतासाठी निवडली आणि आणखी विचार करून काही नवीन गाणी यादीमध्ये टाकली. प्रॅक्टिस करवून घ्यायला सुरवात केली.

तेव्हापासून आतापर्यंत ऋजुता रोजच ऑफिस झाल्यावर 'दृष्टी'मध्ये जात असे. त्यामुळे मुलांच्या तयारीला वेग आला होता.


ऋजुता हे सगळं निकिताला सांगत होती. तेवढ्यात प्राजक्ता तिथे आली अन संभाषणाला वेगळे वळण मिळाले.

ऋजुताने तिला तिच्या PACE च्या कामाबद्दल विचारले.  निकिताकडे बघत ती म्हणाली,

"निकी, PACE चं सगळं ऑन ट्रॅक आहे ना? दोन दिवसांवर डिलिव्हरी आलीय. " ऋजुता.

"हो. ऑन ट्रॅकच आहे." निकिता.

"टेस्टिंग कसं चाललंय? काही मेजर इश्यू आहेत का?" ऋजुता.

"ठीक चाललंय. एक-दोन मेजर इश्यू आहेत टेस्टिंग मध्ये, पण मी सांगितलंय नंदनला आणि प्रसादला. ते बघत आहेत. होऊन जाईल ते." निकिता.

"ओके. परफेक्ट व्हायला हवा हं आपला हा रिलीजसुद्धा." ऋजुता.

"हो मॅडम, परफेक्टच होईल, काळजी नसावी." निकिता मिश्किलपणे पण तिला आश्वस्त करत म्हणाली.

"गुड. प्रसादचेही मॉड्युल बरेच मोठे आहे. महत्वाच्या फंक्शनॅलिटीज आहेत त्यात. त्यालाही एकदा विचारते. काही अडचण तर नाही ना ते. नाहीतर कसं , हा हातचा वेळ निघून गेला आणि पुढे त्या अडचणीमुळे प्रोजेक्ट डिले झाला , असं नको व्हायला. " ऋजुता.

"हं, बरोबर आहे तुझं. चल जाऊ या." निकिता.

ऋजुताने जाऊन प्रसादला विचारले,

"प्रसाद, कसं चाललंय तुझं काम? काही अडचण तर नाही ना? वेळेत सगळे इश्यूज सॉल्व्ह होतील ना?"

"काम नीट चाललंय . एक मेजर इश्यू आला होता टेस्टिंग मध्ये. पण तो कळलाय मला. तोच सोडवतो आहे. थोड्या वेळात होऊन जाईल आज. "

"गुड. आणखी एक, तुझ्या मॉड्यूल्सचं डिप्लोयमेन्ट तूच करायचं आहे तिथे. म्हणजे मग वेळेवर काही गडबड नको क्लाएंटकडे गेल्यावर. कारण आता तू आणि निकिता दोघेच राहणार आहात तिकडे डिप्लोयमेन्टकरिता. " ऋजुता.

"का, तू नसणार आहेस बरोबर?" निकिता.

"मॅडम, आता माझी ती जागा तुम्ही घेतलीय ना? विसरलात का?" ऋजुता हसून तिला म्हणाली.

"हं, हो. नाही नाही, कळलं मला." म्हणत निकिताने जीभ चावली.

"बरं चल मी जातेय आता मीटिंगला , तुमचं चालू दे हे काम." म्हणत ऋजुता निघून गेली.


रजतकडे,

आज रजत घरीच हॉलमध्ये बसून ऑफिसचे काम करत होता. विराज ऑफिसमध्ये गेलेला होता. दुपारची साडेचार पाच वाजताची वेळ होती. दुपार कसली, बाहेर बघितले तर अंधारून आले होते. जोराचा वारा सुटला होता. ढग दाटून आलेले होते. कोणत्याही क्षणी पाऊस येईल असे वाटत असतानाच पाऊस सुरू झाला. वाऱ्याने घरात कुठल्यातरी खिडकीचा दरवाजा आदळत होता. त्याचा आवाज येत होता. आवाज कुठून येतोय ते बघत रजत विराजच्या खोलीत येऊन पोचला. त्याच्या खोलीची खिडकी आज उघडी राहिली होती. तिथून पावसाचे काही थेंब आत येऊन टेबलावर उघड्या असलेल्या विराजच्या डायरीवर पडत होते. डायरीची पाने वाऱ्याने फडफडत होती. रजतने खिडकी बंद केली आणि डायरीच्या पानांवरचे थेंब पुसण्यासाठी डायरी हातात घेतली.


क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

हे साहित्य लेखकाच्या परवानगीशिवाय आणि नावाशिवाय कुठेही कॉपी किंवा शेअर करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

विराजची डायरी रजतच्या हाती लागलीय ... ओह माय गॉड! आता काय होणार ?

भाग आवडल्यास फेसबुकवर एक लाईक आणि अभिप्राय नक्की द्या . कथेचा एकही भाग वाचायला मिस करू नका.  :-)

वाचकांचा प्रत्येक लाईक आणि अभिप्राय हा अधिकाधिक चांगले लेखन करण्याची प्रेरणा देऊन उत्साह वाढवत असतो. मागील भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

माझी 'गोडवा' ही लघुकथा सुद्धा नक्की वाचा आणि आवडल्यास कथेला लाईक, कंमेंट करून अवश्य कळवा.
गोडवा येथे वाचा.
https://www.facebook.com/581606972323826/posts/1272356663248850/?sfnsn=mo

🎭 Series Post

View all