दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 54

Viraj- Rujuta, Rajat-Vidhi.

"तू बोलला नाहीस तरी मला कळतंय ते. पण तेव्हा मुद्दामच बोललो नाही मी काही. कोण आहे ती? तुझ्या मनावर काही भार असेल तर मला सांगून मन हलकं करू शकतोस."

"भाई, ... कोण?" विराज. खरं तर समजलं होतं त्याला, रजत काय विचारतोय ते.

"तुझं जिच्यावर प्रेम आहे ती? " रजत.

"भाई, ... आताच काही नको विचारू, प्लीज. तिचा जर होकार मिळाला तर सर्वात पहिल्यांदा तुलाच सांगेन. प्रॉमिस." विराज.

"नक्की? काही मदत लागली तर सांग. मी आहे." रजत.

"हो, नक्कीच. तूच तर 'बिग ब्रो'सारखा आहेस माझ्यासाठी. सोबत असतोस, पाठीशी असतोस. तुझ्याशिवाय कोणाला सांगणार मी?" विराज.

"पण तेव्हा त्यांच्यासमोर काही बोलायचं नव्हतं मला तिच्याबद्दल. " विराज.

"हो, बरं केलंस ते. उगाच आगाऊपणा करतात ते दोघे. मला सांग, कार्यक्रमात गाणं गातानाही तुला तिची आठवण आली होती ना?" रजत.

"हो, पण तुला कसं माहीत हे?" विराज आश्चर्याने म्हणाला.

"तुझा कंठ रुद्ध झाला होता शेवटच्या ओळींना , त्यामुळे मला तेव्हाच वाटलं होतं.  त्या अज्याने अजून वाढवलं . उगाच सतावत होता तो तुला. मी थांबवण्याचा प्रयत्नही करत होतो , पण ऐकत नव्हता तो. मी काही बोलणार नव्हतो तुला. पण आता शेवटी राहवलं नाही मला." रजत.

"हं. भाई, मी तिच्याशी बोललो नाहीय अजून. खरं म्हणजे बोलणारच होतो, पण तेव्हा ती गावाला गेली होती आणि परत येईपर्यंत मी इकडे आलो. त्यामुळे आता मी परत गेल्यावर बोलेन. तसे मी तिला थोडे हिंट्स दिले होते. पण ते तिला स्वतःला फीलिंग्स असतील तर कळतील. खूप भीती वाटते मला , तिने नकार देऊन मैत्रीही तोडली तर ? " विराज.

"अच्छा , ते असं आहे तर! बस काय, तुला कोण नकार देईल? काहीही हं. उगाच का घाबरतोस? " रजत.

"तसं नाही रे, मला ती माझ्या आयुष्यात हवी आहे , तिच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाहीये. पण तिलाही तिची आवड असेलच ना. मित्र म्हणून मीही समजून घ्यायला हवे. मी म्हणतोय म्हणून तिने 'हो' म्हणण्यापेक्षा तिला स्वतःला माझ्याविषयी फीलिंग्ज जाणवल्या आणि म्हणून तिने होकार दिला तर ते मला जास्त आवडेल. म्हणून मी परत जाईपर्यंत तिला स्वतःला जाणीव होते का ते बघेन. मी येऊन आता एक महिना झालाच आहे. आणखी थोडी वाट बघायची." विराज.

"हं खरं आहे तुझं. कठीण वाटतो ना हा काळ? ऑल द बेस्ट. " रजत.

"हं, कठीण तर आहेच. पण मग बघू या, काय होतं ते. तेव्हा सांगेन तुला नक्की." विराज.

"पण... रागावणार नाहीस ना तू? " विराज.

"मी कशाला रागावणार?" रजत. त्याला वाटले होते की विराज सध्या सांगत नाहीये म्हणून रागावू नकोस असं म्हणतोय.

"प्रॉमिस कर आधी. " विराज.

"ओके. नाही रागावणार." रजत.

विराजने रजतला मिठी मारली. "थँक्स भाई, थोडं मोकळं वाटतंय आता, तुझ्याशी बोलल्यावर."

"हं,  ये इश्क नही आसान!  आग का दरिया है और कूद के जाना है. पण डोन्ट वरी. ठीक होईल सगळं." रजत त्याच्या पाठीवर थाप मारत किंचित हसत म्हणाला.

"हो का? तुला कसे रे माहिती? की..." विराजच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळानंतर आता कुठे थोडं हसू आलं होतं.

"सगळी फिल्मी दुनियेची कृपा!" रजत दोन्ही हात वर करत, खांदे उडवत, हसून म्हणाला.

विराजही हसला.

"पण भाई, मला एक सांग की तुला एवढे दिवस झालेत इथे येऊन, तू अजित, सुजितबरोबर जात नाहीस का ड्रिंक्स घ्यायला कधी?" विराज.

"नाही रे, तुझ्यासारखंच मलाही नाही पटत ते. जेव्हा आपण योग्य मार्गावर असतो ना, तेव्हा ही अशी त्यावरून लक्ष विचलित करणारी प्रलोभने, आमिषे, येत असतात. मन खच्चीकरण करणारे, चिडवणारे लोकही असतात. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून , ठाम राहून पुढे चालणे महत्त्वाचे असते. आता त्या दोघांनाही माहिती आहे की मी येत नाही. त्यामुळे ते फोर्सही करत नाहीत आता." रजत.

"हं, खरं आहे. अनुभव आहे मलाही. 'दृष्टी'साठी फंड गोळा करणे काही सोपे नसते. माझं म्हणणं एवढंच असतं, की तुम्ही स्वतः काही मदत करत नसाल तरी एक वेळ ठीक आहे, पण जो स्वतः काही चांगलं काम करू बघतोय त्याचे खच्चीकरण कशाला करावे? पण कळत नाही काहींना. असो."

"हं हो ना. पण तूसुद्धा बरं वळवलंस हं त्या अजितला. स्वतः ठाम राहिलास." रजत हसून म्हणाला.

"हं, उगाच आताचा वेळ अन उद्याची सकाळही कशाला खराब करायची? अशा गोष्टींमध्ये वेळ आणि एनर्जी घालवण्यापेक्षा मला काहीतरी चांगलं करायला आवडतं. मग ते म्युझिक ऐकणं जरी असेल तरी चालतं. आधीच 'दृष्टी'मुळे मी फुल टाईम बिझी असतो. त्यामुळे अशा ध्येयापासून विचलित करणाऱ्या गोष्टी नकोतच. " विराज.

"हं, बरोबर आहे. आपले याबाबतीतले ध्येय कोणते? तर, माणूस म्हणून जन्माला आलोय तर एक चांगला 'माणूस' बनणं, आणि तसं कायम टिकून राहणं. स्वतः शांतपणे जगणं आणि कोणालाही त्रास न देता त्यांनाही शांतपणे जगू देणं." रजत.

"आणि स्वतःसाठी जगताना कणभर दुसऱ्यासाठी जगणं अन क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे." विराज.

"वा वा, बंधू ! अगदी बरोबर. एवढं सगळं कसं कळतं रे तुला?" रजत मिश्किलपणे म्हणाला.

"ही ही ही ही प्रॅक्टिकल लेसन्स मिळालेत मला यावर!" विराज हसून म्हणाला.

"अच्छा ?! सरप्राइजिंग ! कोण शिकवतं हे सगळं?" रजत.

"राजराजेश्वरी मिस ऋजुता कुलकर्णी, आपल्याच भगिनी आहेत त्या." विराज हाताने राजराजेश्वरींना अभिवादन करण्याची ऍक्शन करत हसून म्हणाला.

"हा हा हा , काहीही काय सांगतोस . तिने तुला शिकवले?" रजत मोठ्याने हसत म्हणाला.

"हं, खरं आहे ते." विराज.

"ते कसं काय? काय स्टोरी आहे?" रजतला आश्चर्य वाटले होते.

"स्टोरी नाही भाई, स्टोरीज आहेत!" विराज हसून म्हणाला. "सांगेन तुला नक्की . पण तूर्तास आपण झोपू या का? दमलोय रे आता."

"अच्छा ? हो, थकलोय तर मीसुद्धा. आणि हं, एक राहिलंच, हॅपी न्यू इयर" रजत हसत, हात मिळवत म्हणाला.

विराजही हसला. "हॅपी न्यू इयर" म्हणत त्याने रजतला हलकीशी झप्पी दिली.

बाहेर फटाके अजून वाजतच होते. 'गुड नाईट' म्हणून दोघेही आपापल्या खोलीत जाऊन झोपले.

****

एक दिवस, ऋजुता तिच्या केबिनमध्ये खिडकीजवळ उभी आपल्याच विचारात गढली होती. हातात विराजने दिलेले ग्रीटिंग कार्ड होते. ऋजुता त्यावर लिहिलेल्या विराजच्या अक्षरांवरून बोटे फिरवत त्याच्याकडे बघत होती. आज तिला त्याची खूप आठवण येत होती.

'त्याला येत असेल का कधी माझी आठवण ? किती बिझी असतोस रे? किती दिवस झाले, एक फोन नाही की काही नाही. गेलास तर तिकडचाच झालास जसा.' ती मनातच विचार करत त्याच्याशी बोलत होती.

तेवढ्यात निकिता केबिनमध्ये आली. तिच्या आवाजाने ऋजुता एकदम दचकली आणि तिच्या हातातून ग्रीटिंग कार्ड खाली पडले.

"का ग, दचकलीस का अशी एकदम? कसल्या विचारात होतीस एवढी? " निकिता. तेवढ्यात तिला ते कार्ड दिसले.

"अं ... काही नाही ग. तू सांग ना काय म्हणत होतीस?" ऋजुता कार्ड उचलत म्हणाली.

"अग, मी तुला चहा घ्यायला येतेस का म्हणून विचारायला आले होते. हे कार्ड... हे कार्ड तर विराज सरांनी दिलंय ना?" निकिता.

"अं हो." ऋजुता.

"पण बरेच दिवस झाले ना त्याला. मग हे आत्ता ... तुझ्या हातात? काय करत होतीस?" निकिता जणू तिला काही कळलेच नाही अशा अविर्भावात विचारत होती.

"काही नाही ग, आठवण येत होती म्हणून बघत होती ते कार्ड. तुला पण येत असेल ना ग त्याची आठवण?" ऋजुता.

"कुणाची? कार्डची? नाही बुवा, मला तर नाही दिले असे काही कार्ड वगैरे त्यांनी कोणी. " निकिता हसू दाबत म्हणाली.

"फटका देईन हं आता तुला. कार्डची नाही विराजबद्दल म्हणतेय मी. किती दिवस झाले न तो जाऊन. तुलाही आठवण येतच असेल ना त्याची?"  ऋजुता कार्डकडे बघत म्हणाली.

"हो येते ना. आताच तर आली होती आठवण, आठ दिवसांपूर्वी एक इश्यू आला होता तेव्हा. मागच्या वेळी तसा इश्यू आला तेव्हा त्यांनी तो कसा सोडवायचा ते सांगितले होते मला, म्हणून आठवण आली होती." निकिता.

"हं. अच्छा. आ ऽऽ ठ दिवसांपू ऽऽ र्वी आली होती आठवण तुला?" ऋजुता काहीशी विचारात पडलेली होती.

"हो मग? का विचारते आहेस ग?"

"निकी त्याला येत असेल का ग माझी आठवण?" ऋजुता.

"येत असेल ना तुझ्यासारखीच, दर आठव्या मिनिटाला आठवण! येत असेल ."  निकिता हसत हसत मिश्किलपणे म्हणाली.

ऋजुताला जसं तिचं बोलणं कळलं, तसा लगेच निकिताला दंडावर एक फटका बसला.

"अग, अग , बस ना, लागलं ना मला. मारतेस काय अशी?"

"मग काय तर, असेच हवे तुला. मी इतकी सिरीयसली विचारत होते  आणि तुला गंमत सुचतेय." ऋजुता.

"पण मी खरंच तर बोलत होते. बरं , विचारू या ना आपण त्यांनाच फोन करून , की तुम्हांला ऋजुताची आठवण येते का? " निकिता हात चोळत पण तरीही मिश्किलपणेच म्हणाली.

"हो का? एक फटका कमी झाला ना तुला? बरं ठीक आहे, विचारू या आपण. चल तू आता चहा घ्यायला." म्हणत ऋजुताने तिला केबिनच्या बाहेर दामटले आणि दोघीही कॅन्टीनमध्ये गेल्या.

क्रमश:


*****

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. 

हे साहित्य लेखकाच्या परवानगीशिवाय आणि नावाशिवाय कुठेही कॉपी किंवा शेअर करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

भाग आवडल्यास फेसबुकवर एक लाईक आणि अभिप्राय नक्की द्या .

वाचकांचा प्रत्येक लाईक आणि अभिप्राय हा अधिकाधिक चांगले लेखन करण्याची प्रेरणा देऊन उत्साह वाढवत असतो. मागील भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

🎭 Series Post

View all