दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 52

Drushti ani Drushtikon : story of Viraj- Rujuta, Rajat -Vidhi.


रजत आणि विराज ऑफिसला जायला निघाले होते. काही वेळ चालल्यानंतर ते बस-स्टॉपला पोहोचून बसमध्ये बसले.


ऋजुता ऑफिसमध्ये तिच्या केबिनमध्ये बसलेली होती. तिचे लंचब्रेकपूर्वीचे काम जवळपास आटपतच आले होते. तेवढ्यात रजतने ऋजुताला आदल्या दिवशीचे फोटो पाठवले.

तिने फोटो बघायला घेतले. त्यात बरेचसे रजतचे फोटो होते.

रजतला छान 'सुप्रभात'चा मेसेज पाठवून तिने 'फोटोज खूप सुंदर आहेत. छान एन्जॉय केले तुम्ही' असे उत्तर दिले.

त्या फोटोंपैकी क्रूजवरचा एकच फोटो रजत आणि विराज दोघांचा होता. त्यात दोघांचेही चेहरे अगदी उत्फुल्ल दिसत होते, मागे टॉवर ब्रिज आणि थेम्स नदीचे पात्र दिसत होते . फोटो बघून ऋजुताला आनंद झाला. कितीतरी दिवसांनी विराजला बघतेय असं तिला वाटत होतं. तिने घड्याळात बघितलं.

'सकाळचे साडेसात वाजले असतील आता तिकडे. विराज उठला असेलच आतापर्यंत,' विचार करत तिने विराजला एक सुंदरशी पहाटेची इमेज असलेला आणि त्यावर सुंदर ओळींबरोबर सुप्रभात लिहिलेला मेसेज पाठवला .

ऋजुताचा मेसेज बघून विराजचा चेहरा खुलला. त्यानेही 'गुड मॉर्निंग' असा उत्तरादाखल मेसेज पाठवला.

फोटो बघितल्यावर ऋजुताला विराजची आठवण येऊ लागली. कितीतरी वेळा आणि कितीतरी वेळ ती तो फोटो बघत होती. त्याने दिलेले टेबलावरील काचेचे शोपीस हातात घेऊन त्याच्याकडे बघत आपल्याच विचारात, आठवणीत रममाण झाली होती.


इकडे बसमध्ये बसल्यावर रजत आणि विराजच्या गप्पा सुरू होत्या.

"अरे सकाळी तुला विचारणार होतो आणि विसरलोच बघ त्या छोल्यांच्या गडबडीत. इतक्या सकाळी कसले रे सेशन सुरू होते तुझे? इंडिया ऑफिसचे का?  म्हणजे काहीतरी टेक्निकल वाटत होतं, पण तुझ्या ऑफिसचं असेल असं वाटत नव्हतं." रजतने विचारले.

"हं, बरोबर आहे. ते ऑफिसमधले सेशन नव्हते. 'दृष्टी'मधल्या काही स्टुडंट्सना मी सेशन देत होतो. काही तरुण मुले आहेत 'दृष्टी'मध्ये. त्यांना जॉब मिळविण्याच्या दृष्टीने तयारी करून घेतोय त्यांची. या आठवड्यात रोज सकाळी लवकर उठून सेशन देईन त्यांना. संध्याकाळी त्यांना नाही ना जमणार, तिकडे रात्र होते. खरं म्हणजे आता बाकी गोष्टी बाबा शिकवत आहेत , पण हे टॉपिक्स टेक्निकल असल्याने मी घेतोय." विराज म्हणाला.

"दृष्टी?" रजतने न कळून विचारले.

" 'दृष्टी' म्हणजे माझी संस्था आहे. तिच्यामध्ये आम्ही दृष्टिहीन व्यक्तींना एकत्र आणतो आणि त्यांना दैनंदिन गरजेच्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःहून कसे करायचे ते शिकवितो. त्यांच्या वयानुसार त्यांना झेपेल तसे वेगवेगळ्या गोष्टींचे प्रशिक्षणही देतो. त्यासाठी खास प्रशिक्षक नेमलेले आहेत. मी रोज संध्याकाळी रोजचा सगळा तपशील घेतोय इथून सुद्धा." विराज सांगत होता.

"व्वा ! अरे! माझी आई मध्यंतरी अशाच एका संस्थेमध्ये जायला लागली आहे. ती सांगत असते अधूनमधून काही काही. पण नाव नाही माहिती मला संस्थेचे." रजत म्हणाला.

"हो, रेखाकाकू  येतात ती माझीच संस्था आहे," विराज हसत म्हणाला.

"अरे वा ! खूपच छान काम करतो आहेस! खूप खूप अभिनंदन रे तुझे!" रजत उद्गारला.

"आता किती स्टुडंट्स आहेत मग 'दृष्टी'मध्ये?" रजत.

"ऐंशी जण आहेत आता. काही लहान मुले-मुली, काही बायका, काही तरुण मुलेही आहेत." विराज.

"आता कोण बघतंय सगळं, तू इथे आहेस तर?" रजतने विचारले.

"तिथे मी मॅनेजर नेमला आहे आणि आता बाबा बघतात सध्या. आईही जाते थोडावेळ बायकांच्या कामावर देखरेख करण्यासाठी." विराज सांगत होता.

"ग्रेट ! सुचली कशी काय तुला ही आयडिया?" रजत.

"खरं तर ऋजुतामुळे सुचली." विराज हसत म्हणाला.

"ऋजुतामुळे? ते कसं काय?" रजतला प्रश्न पडला होता.

बोलता बोलता ते ऑफिसला पोहोचले होते.

"ती तर स्टोरीच आहे, सांगेन नंतर." विराज म्हणाला.

"हं, ठीक आहे." रजत.

ऑफिसला पोचल्यावर दोघेही आपापल्या जागी गेले आणि कामाला सुरुवात केली. थोड्यावेळाने रजतने विराजला त्याच्या टीमची ओळख करून दिली. त्या दिवसभरात कितीदातरी विराजने ऋजुताच्या मेसेजचे पारायण केले. प्रत्येक वेळी वाचताना चेहऱ्यावर स्माईल येणे हे तर ठरलेलेच जणू!


असेच भराभर दिवस जात होते. विराज आता रजतबरोबर चांगला रुळला होता. पाहणाऱ्याला वाटावे, की किती जुनी मैत्री असावी दोघांची! सामान आणणे, आवरणे, सफाई करणे, झालंच तर चहा कॉफी, नाश्ता बनवणे, जेवणासाठी भाजी वगैरे चिरून देणे, कुकर लावणे इत्यादी अनेक गोष्टींमध्ये रजतला त्याची मदत होत होती. मुळातच हुशार असल्यामुळे विराज भराभर पदार्थही शिकत होता. त्याला आता बऱ्याच गोष्टी जमायला लागल्या होत्या.  मुळातच नीटनेटके राहण्याची आवड असल्यामुळे त्याला पसारा झाला तर लगेच आवरायची सवय तर आधीपासूनच होती. इथेसुद्धा त्याची खोली , हॉल वगैरे तो नीटनेटके ठेवत असे.

रजतचे मित्रही कधीतरी सुट्टीच्या दिवशी रजतकडे येत. मग सगळे मिळून कधी मॅच बघणं, तर कधी एखादी मूव्ही बघणं व्हायचं. कधी बाहेर फिरायलाही जाणं होत असे.

डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होता. आता सगळीकडे ख्रिसमसची आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी दिसत होती. दुकाने, मॉल, वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस इत्यादी सगळीकडे छोटे-मोठे ख्रिसमस ट्री सजवलेले दिसत होते. दुकानांमध्ये सॅन्टा क्लॉज चमकदार गिफ्ट बॉक्सेस मोठ्या पिशवीत भरून घेऊन जातानाचे दृश्य तयार करून वेगवेगळ्या प्रकारे सजावट केलेली दिसत होती.

नाताळनिमित्त सगळीकडे सोनेरी, रुपेरी तसेच चमकदार लाल रंगातील वेगवेगळ्या आकाराच्या सजावटीच्या छोट्या छोट्या वस्तू, चेंडूसारख्या पण लटकविता येणारे काचेचे रंगीबेरंगी बॉल्स इत्यादींनी सजावट केलेली होती. सोनेरी, रुपेरी झालरी, लेस, वेगवेगळ्या रंगातील दिव्यांच्या माळा घरोघरी लावलेल्या दिसत होत्या. रस्त्यावरून जातानासुद्धा घरांच्या काचेच्या खिडकीतून घरांमध्ये सजवलेल्या ख्रिसमस ट्रीचे तसेच आजूबाजूला केलेल्या रोषणाईयुक्त सजावटीचे दर्शन होत होते.

मॉल्स मध्ये मोठमोठे रंगीत झुंबर छताला लटकविलेले दिसत होते . चमकदार स्नोफ्लेक्सच्या आकाराचे काही मोठे तर काही लहान लोलक, आजूबाजूला सोनेरी , रुपेरी झालर , वेगवेगळ्या आकाराचे लाईट्स, दिव्यांच्या माळांनी उजळलेले अधेमध्ये असणारे खांब, मध्येच एखादया अंतर्गत सजावटीच्या झाडावर सजवलेली रंगीबेरंगी दिव्यांची माळ, अशा अनेकविध प्रकारे केलेल्या सजावटीमुळे आणि सुंदर प्रकाशयोजनेमुळे नेहमीच्या मॉल्स आणि इतर अशा जागांना जणू नवेच रूप मिळाल्यासारखे दिसत होते. मॉल्समधली रोषणाई, चमकधमक बघून तर डोळ्यांचे पारणे फिटल्यासारखे वाटत  होते. रोषणाई बघून भारतातल्या दिवाळीची आठवण विराजला येत होती.

एक दिवस रजत विराजला म्हणाला,

"विराज, अरे इथे ना, 31 डिसेंबरला महाराष्ट्र मंडळाचा न्यू इयर प्रोग्राम आहे. मला काय वाटतं, की तू प्रोग्राम मध्ये दोन मिनिटे घेऊन सर्वांना तुझ्या 'दृष्टी' संस्थेबद्दल माहिती दे ना . लोकांना माहिती होईल अन आर्थिक साहाय्यही मिळू शकेल तुला कदाचित."

"हो रे! ग्रेट आयडिया!" विराज उद्गारला.

"काय प्रोग्राम असतो तिथे?" त्याने विचारले.

"गाण्याचे, डान्सचे वगैरे परफॉर्मन्सेस असतात. सगळे आपले भारतीय लोक येत असतात तिथे." रजतने सांगितले.

"बस, मस्त जमेल मग. मी पण तिथे एक परफॉर्मन्स करेन आणि मग माहितीही देईन. आयोजकांना विचारावं लागेल आधी त्यासाठी ." विराज.

मग काय, रजतने लगेच आयोजकांना तसे कळविण्यासाठी फोन केला , तर त्यांनी त्यासाठी परवानगी देत रजतलाच पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी विचारले. रजतने होकार दिला.


होता होता तो दिवस येऊन ठेपला. कार्यक्रम सुरू झाला. लंडनमधली बरीच भारतीय त्यातल्या त्यात मराठी भाषिक मंडळी जमलेली होती. वेगवेगळे सादरीकरण सुरू होते. रजत उत्तम रीतीने सूत्रसंचालन करत होता. विराजला त्याने स्टेजवर बोलावले.

"आणि आता एक सुंदरसे गाणे सादर करणार आहेत मिस्टर विराज दीक्षित." रजत स्टेजवरून बोलत होता.

विराजने पुढे येऊन गाणे गायला सुरवात केली.

"मै तेनु समझावां कि
तेरे बिन लगदा जी
तू की जाने प्यार मेरा
मै करूँ इन्तजार तेरा
तू दिल तूयों जान मेरी..."

विराजचे गाणे सुंदर सुरू होते. तो गाण्यात , त्या शब्दांमध्ये, त्याच्या भावनेमध्ये गुंग झाला होता. गाणे पूर्ण होईपर्यंत त्याचा गळाही भरून आला होता. डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. आवाजातला किंचित बदल रजतला जाणवला होता.

"मिस्टर विराज बासरीसुद्धा उत्तम वाजवतात. होऊन जाऊ द्या हे गाणे एकदा बासरीवर." असे म्हणत त्याने विराजला बासरी वाजवण्यास सांगितले.

जसे विराज बासरी वाजवायला लागला तसे लोक त्याच्यासोबत टाळ्या वाजवत त्याला प्रतिसाद देऊ लागले. विराजने या गाण्यासोबत एकदोन गाण्यांचे फ्यूजन करून अप्रतिम सादरीकरण केले.

त्यानंतर रजतने त्याला 'दृष्टी'बद्दल माहिती देण्यास सांगितले. विराजने 'दृष्टी' आणि तिथे घेत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल थोडक्यात माहिती देऊन कोणत्याही प्रकारची मदत करता येत असेल तर कळवावे असे आवाहन केले. काही लोकांनी तर तेव्हाच तयारी दर्शविली.

आणखी काही जणांचे सादरीकरण झाल्यावर जेवणे झाली आणि कार्यक्रम पार पडला. आता बऱ्याच जणांशी दोघांची ओळख झाली होती.

'विराज भावुक का झाला असेल?' रजतला राहून राहून वाटत होते.


क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. 

ज्याप्रमाणे कोणताही कलाकार कलाकृती घडविण्यासाठी परिश्रम करत असतो, त्याचप्रमाणे लेखकही शून्यातून कथा, कविता किंवा कोणतीही साहित्यकृती घडविण्यासाठी त्यात जीव ओतून मेहनत करत असतो. हे साहित्य लेखकाच्या परवानगीशिवाय आणि नावाशिवाय कुठेही कॉपी करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

मागील भागांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. वाचकांचा प्रत्येक लाईक आणि अभिप्राय हा अधिकाधिक चांगले लेखन करण्याची प्रेरणा देऊन उत्साह वाढवत असतो. त्यामुळे आवडल्यास प्रत्येक भागाला फेसबुकवर एक लाईक आणि अभिप्राय नक्की द्या .

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांसाठी नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे, आरोग्याचे राहो.

🎭 Series Post

View all