दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 51

Viraj- Rujuta , Rajat-Vidhi.

मागील भागात आपण विराज आणि रजतबरोबर लंडनची सुंदरशी सफर केली. ती मागील भागात नक्की वाचा.
http://www.irablogging.com/blog/drushti-ani-drushtikon---bhag-50_10485

आता पुढे ...

रेखाताई, राजशेखर आणि ऋजुता कार्यक्रम झाल्यावर घरी परत आले . ऋजुताने दोघांनाही पाणी दिले.

"सुंदर होती ग ऋजू गाण्यांची महफिल! एकदम मूडच बदलला बघ माझा. असे प्रत्यक्ष सादरीकरण असले की एक वेगळ्याच विश्वात जातो ना आपण. असे मधुर स्वर कानातून मनापर्यंत पोचतात.", रेखाताई आनंदाने म्हणाल्या. "पूर्वी खूप आवडायचं मला, पण घरातली कामं असली की मग जमायचं नाही तेव्हा एवढं दूर जाऊन येणं".

"श्रीमतीजी, तुम्हाला अजूनही आवडतं ना ते. मग आता जमेल ना? तुम्ही फक्त हुकूम करा. आम्ही हजर आहोत तुम्हाला जिथे जायचं तिथे सोबत येण्यासाठी", राजशेखर.

"मम्मा, खरं तर तुझ्यामुळेच मलाही आवड निर्माण झाली असेल शिकण्याची", ऋजुता.


तिकडे लंडनला ...

अनेक रोमांचित करणारे अनुभव आपल्या गाठीशी जोडून विराज अन रजत एका कॅफेमध्ये थोडीशी पोटपूजा करायला थांबले होते.

"स्टोअरमध्ये जायचंय का रे? सामान आणावे लागेल का काही? की आता दमला आहेस?", विराज.

"हं, दमलोय खरं तर. पण चल घेऊन टाकू , म्हणजे पुढचे काही दिवस निश्चिन्त राहता येईल", रजत म्हणाला.

पुढचा तास दीड तास सामान घेण्यात गेला. दोघे घरी आले तेव्हा रात्र झाली होती. दोघेही खूप दमले होते. फ्रेश होऊन
आल्यावर विराज म्हणाला,
"कॉफी घेणार का ?"

"हो रे चालेल मला.", रजत.

विराजने कॉफी केली. दोघेही निवांतपणे कॉफीचे घुटके घेत गप्पा मारत होते.

विराज म्हणाला, "खूपच गारठलोय मी तर! थंडी वाढायला लागली आहे आता."

रजत, "हं . डिसेंबर आहे ना, पुढे तर आणखी वाढते थंडी."

"पण काहीही म्हण हं, खूप मजा आली यार आज ! इट वॉज ऍन अमेझिंग एक्सपिरीयन्स! लहानपणापासून वाटायचं की आपणही हे स्टेडियम एकदातरी प्रत्यक्ष बघावं. आज ते स्वप्न पूर्ण झालं", सांगतानाही विराजच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

"हो ना मलाही बघायचंच होतं ते", रजत म्हणाला.

"थेम्सची सफर सुद्धा भारी मस्त होती! फोटोही खूप सुंदर आलेत. आता उद्या काय? ऑफिस ना?", विराजने विचारले.

"हो. तसा मी बरेचदा घरूनच काम करतो. पण उद्या मीही ऑफिसला येईन. जाऊ सकाळी बरोबरच. मग तुझी माझ्या टीमशी ओळखही करून देईन." रजत म्हणाला.

"ओके, गुड नाईट", दोघेही एकमेकांना म्हणत आपापल्या खोलीत झोपायला गेले. बिछान्यावर पडल्या पडल्या दोघांनाही झोप लागली.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे विराज उठला.
'आजपासून आता व्यवस्थित सगळा दिनक्रम ठेवायला हवा.' विराज मनाशी म्हणाला.

व्यायाम वगैरे करून झाल्यावर त्याने दोघांसाठीही चहा आणि टोस्ट बनवले. ते घेऊन झाल्यावर तो खोलीत लॅपटॉप लावून बसलेला होता. काही वेळाने रजत उठून बाहेर आला, तर त्याला विराजच्या खोलीचा लाईट सुरू आहे असे दिसले. आणि खोलीतून बोलण्याचा आवाजही येत होता.

'उठला वाटतं हा' , मनाशी म्हणत त्याने जाऊन बघितले तर विराज लॅपटॉपवर काहीतरी टेक्निकल सेशन देत होता.

रजतला आश्चर्य वाटले. त्याला कळत नव्हते की इतक्या सकाळी याचं हे काय काम चाललंय. विराजचे त्याच्याकडे लक्ष गेले . त्याने खुणेनेच रजतला सांगितले की चहा आणि टोस्ट करून स्वयंपाकघरात ओट्यावर ठेवले आहेत. मग तो परत आपल्या कामाला लागला.

कितीतरी दिवसांनी असाच सकाळी उठल्या उठल्या तयार चहा मिळाल्या मुळे रजत जाम खुश झाला होता. चहा वगैरे घेऊन तो पुढच्या कामाला लागला. बघतो तर काय! विराजने एकीकडे चहा करता करता काल आणलेले सामान नीट जागच्या जागी ठेवले होते. भाज्या फळे व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून सगळा पसारा आवरून ठेवला होता. सकाळच्या घाईच्या वेळी रजतचे अर्धे काम हलके झाले होते. त्याला असे एकामागून एक सुखद धक्के मिळत होते.

तो विचार करू लागला, 'आज दुपारच्या जेवणासाठी डब्यात न्यायला काय बनवू ? हं, भिजवलेले चणे आहेत . छोले आणि जीरा राईस बनवतो.'

त्याने चणे कुकरमध्ये लावले. तांदूळ धुवून भिजत ठेवले. तेवढ्यात विराजचे सेशन संपले आणि तो बाहेर आला.

"सुप्रभात रजत."

"सुप्रभात बंधू, सुप्रभात! सकाळी सकाळी मस्त चहा मिळाला आज , अन खरच सुप्रभात झाली. थँक्स. खूपच छान झाला होता रे चहा. काय काय टाकलं होतंस त्यात?", रजत उत्साहाने म्हणाला.

"थँक्स. आवडला ना तुला? अरे, थोडं आलं आणि आईने दिलेला चहाचा मसाला घातला होता."

"सुपर स्पेशल!", रजत हसत म्हणाला.

"तू काय करत आहेस?", विराजने विचारले.

"जिरा राईस आणि छोले घेऊन जाऊ आज लंचमध्ये खायला. तीच तयारी करत होतो", रजतने उत्तर दिले.

"अरे वा ! छानच की मग!", विराज उद्गारला.

"बरं , छोले ठेवले आहेत . मी स्नान करून घेतो तोपर्यंत. लक्ष ठेव हं. चार-पाच शिट्या होऊ दे", रजत त्याला सांगत खोलीत जायला लागला होता.

"हो भाई, बिनधास्त जा तू. मी आहे बाहेर", विराजने आश्वस्त केले.

रजत त्याच्या खोलीला लागून असलेल्या बाथरूममध्ये अंघोळीला गेला. तो गेल्यावर लगेच विराज बाथरूमच्या जवळ बाहेर खुर्ची ठेवून तिथे बसला. थोडीशी आजच्या ऑफिसमधल्या मीटिंगची तयारी करत, एकीकडे घरी सर्वांना कालचे त्या दोघांचे फोटो पाठवत होता. रजतने तिकडे बादली आणि नळावर ताल धरला होता आणि शीळ वाजवत त्याचे गाणे सुरू होते,

" ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिए ... गाना आये या ना आये गाना चाहिए..." रजतने वाजवलेल्या शीळेतून हे गाणे उमटत होते.

काही वेळात,
"पापा कहते हैं , बडा नाम करेगा ... ", रजतची शीळ हे शब्द उमटवत होती.

विराजही ते ऐकत, हसत आपले काम करत होता.

इकडे आतापर्यंत कुकरच्या सहा-सात शिट्या वाजल्या. रजत आत वाट बघत होता की आता शिट्या बंद होतील , मग बंद होतील. पण त्या चालू तर चालूच! बरं, आवाज देऊन काही फायदा नव्हता . कारण घर मोठे असल्याने खोलीत असलेल्या बाथरूममधून एकदम हॉलमध्ये किंवा स्वयंपाक घरात आवाज जाणार नव्हता . शेवटी त्यानेच आपले आटपले आणि टॉवेल कमरेभोवती गुंडाळून बाहेर आला.

तेवढ्यात तिथेच विराज बसलेला त्याला दिसला.
"गॅस बंद नाही केलास का रे? सात आठ शिट्या झाल्या ना!"

"नाही तर. मला तर दोनच ऐकू आल्या. एक ती 'ठंडे ठंडे पानीसे ' अन दुसरी 'पापा कहते हैं' . बस दोनच तर शीळ वाजवल्या तू. पूर्ण लक्ष होतं न माझं ", विराज अगदी खात्रीपूर्वक म्हणाला.

रजतने डोक्यावर हात मारला. त्याला हसावे की रडावे तेच कळेना. तोपर्यंत कुकरची अजून एक शिटी वाजली. तसा रजत टॉवेल गुंडाळूनच स्वयंपाकघरात पळाला आणि त्याने गॅस बंद केला.

विराजही काय झाले बघायला लगबगीने बाहेर आला.

रजत सुटकेचा निःश्वास टाकत म्हणाला,
"बंधू, वाचलो आपण . बरं झालं , कुकरमध्ये पुरेसे पाणी होते. नाहीतर चणे करपले असते किंवा कुकरचे झाकण वर उडून सगळं गॅसवर, जमिनीवर, भिंतीवर, छतावर इतस्ततः उडालं असतं. सकाळी सकाळी धिंगाणा झाला असता. अन दिवसभर ते साफ करण्यात गेला असता. छोलेच होते, तेही एक बरं झालं."

"बाप रे, असं पण होतं का?"

"अरे हो, माझ्या एका मित्राकडे असंच झालं होतं एकदा. भिंतीवर, छतावर उडालेला एक एक थेंब पुसता पुसता नाकी नऊ आले होते त्याच्या", रजत सांगत होता.

"ओह ! भाई, तू न एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन देत जा मला पुढच्या वेळेपासून. मग मी नक्की बरोबर लक्ष ठेवेन", विराज थोडा खजील होत डोक्याला हात लावत म्हणाला.

"हो ना , शिट्या कुकरच्या मोजशील असं मी सांगायला हवं होतं , नाही का? सॉरी बॉस, पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवेन", रजत खो खो हसत म्हणाला.

"तू ना , खूपच स्वीट आहेस. अरे तू कधी घरी तीन शिट्यांनंतर गॅस बंद करण्याचे काम केले नाही का?", रजत म्हणाला. त्याला हसू आवरतच नव्हते.

एकीकडे बोलता बोलता त्याने कुकरमध्ये तांदूळ शिजायला ठेवले होते आणि दुसरीकडे छोले फोडणीला टाकत होता.

"नाही रे, कामच नाही पडलं कधी. आधी आई आणि आजीकडे किचनचा ताबा असायचा. आता आई आणि माझी बहीण करतात. आधी आजी कधी आईला मला किचनमधली कामे सांगू द्यायची नाही. आजीला आवडायचे नाही पुरुषांनी स्वयंपाकघरात कामं केलेली. त्यामुळे तिलाही तशी सांगण्याची सवय नाही आणि मीही तसा दूरच असायचो. फक्त आजोबांना कधीकधी माझ्या हातचा चहा प्यायची इच्छा झाली तर ते करायला सांगायचे", विराज सांगत होता.

विराजचे एकीकडे काकडी , गाजर चिरून दोघांच्याही डब्यात भरून घेणे चालले होते.

"हं, असं आहे तर सगळं", रजत.

"तुला कशी काय रे सगळ्या गोष्टींची एवढी सवय?", विराज आश्चर्याने विचारत होता.

"अरे मुळात आमच्याकडे असं काही ठरलेलं नव्हतं की ही कामे याने करू नयेत. आईने लहानपणीच छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या होत्या, मलाही करता आल्या पाहिजेत म्हणून. चहा कॉफी पासूनच सुरवात झाली होती. मग पुढे कधीतरी मी तिला भाजी चिरून देत असे. मग एक दोनदा तिने फोडणीला कशी टाकायची तेही शिकवले. मुख्य म्हणजे, ही ऋजू ना लहानपणी फार हट्टी आणि रडकी होती. ती दोन तीन वर्षांची असेल. नेमकी संध्याकाळी आईची स्वयंपाक करण्याची वेळ असे आणि तेव्हाच तिला आईच्या मांडीत बसून तिचं पुस्तक वाचायचं असे, किंवा तिच्या बाहुलीशी खेळायचं असे. बरं बाहुलीशी खेळायचं तर आईच्या बाजूला बसून खेळावं ना? तर नाही, तिच्या मांडीत बसूनच खेळायचं असे सोनुलीला. 'माझी आई माझ्याजवळच हवी' असं तिचं म्हणणं असे. नाहीतर रडून सगळं घर डोक्यावर घेई. त्यापेक्षा थोडा वेळ आईजवळ बसू देणे बरे असे", रजत हसता हसता ऋजुच्या लहानपणीच्या आठवणीने थोडा भावुक होत होता.

विराजला ऋजुताच्या लहानपणीची गोष्ट माहिती झाल्यामुळे त्याला मजा वाटली.

'कित्ती स्वीट होती माझी वेडू. अजूनही आहेच म्हणा. 'माझी आई माझ्याजवळच हवी!'  नक्कीच चिडवणार आहे मी तिला यावरून.' तो मनात विचार करत होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले होते.

"तिकडे आजी-आजोबांची जेवणाची वेळ होत आली की आईला घाई व्हायची . मग तेव्हा मी जमेल तशी मदत करायचो तिला थोडीफार. असंच करता करताच शिकलो. अंदाज यायला लागले. थोडीफार आवडही आहे मला. मग मोठा झाल्यावर पहिल्यांदा परदेशात जाताना आईकडून आणखी काही पदार्थ शिकलो."

बोलता बोलता दोघांचेही काम झाले होते. विराजने दोघांचेही डबे भरून बॅगमध्ये ठेवले. काही वेळात दोघेही तयार होऊन ऑफिसमध्ये जायला निघाले.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

मागील भागांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. जसे वाचक भागाची आतुरतेने वाट पाहत असतात, तसेच वाचकांचा प्रत्येक लाईक आणि अभिप्राय हा आम्हाला प्रेरणा देत असतो. त्यामुळे आवडल्यास प्रत्येक भागाला फेसबुकवर एक लाईक आणि अभिप्राय नक्की द्या .

🎭 Series Post

View all