दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 50

A memorable day in life for Viraj and Rajat .

मागील भागात ...

रजतने बिघडलेले पोहे वाया जाऊ न देता त्याचे कटलेट्स तयार केले. ते करताना रजतचे भाजी चिरणे, त्याचे पदार्थांचे भराभर अंदाज घेत एकत्र करणे , टाकणे इत्यादी कौशल्य बघून विराज अचंबित झाला. विधी आणि ऋजुताची मस्ती, रजत - विधीचे मजेदार बोलणे हे सगळे भागात नक्की वाचा. मागील दोन तीन भागांतील गमतीजमती अजिबात चुकवू नका, नक्की वाचा.


आता पुढे ...

ऋजुता वर्तमानपत्रामध्ये आज काही चांगला कार्यक्रम आहे का ते बघत होती.

"काय करते आहेस बेटा ? पेपरमध्ये काही शोधते आहेस का ?", राजशेखर तिला बघून विचारते झाले.

"हो बाबा, एक गाण्यांचा खूप छान प्रोग्रॅम आहे, म्हणजे गायकवृंद नावाजलेला आहे. चला ना आपण सगळे जाऊ या". ऋजुता. तिने बाबांना हाताच्या इशाऱ्यानेच दाखवले की आई रडत होती. तिला जरा छान वाटेल बाहेर गेलो तर.

"आई, तयार हो लवकर. चल आपल्याला एका प्रोग्रॅमला जायचं आहे. छान आहे प्रोग्रॅम", ऋजू.

"ऋजू, राहू दे ना आता. मला नाही कुठे जायचं.", रेखाताई अजूनही काहीशा अस्वस्थ होत्या.

"आई , चल ना, मग मलाही वेळ नाही मिळत न ग, आज सगळे फ्री आहोत तर जाऊ या ना", ऋजू.

"श्रीमतीजी, चला लवकर तयार व्हा, ती निळी साडी नेसा, सुंदर दिसता तुम्ही त्यात", राजशेखर तिला दुजोरा देत म्हणाले.

"इश्श, काहीही काय हो तुमचं ", रेखाताई त्यांना डोळ्यांनीच दटावत पण लाजत लगेच तयार व्हायला आत गेल्या. त्यांची कळी तर इथेच खुलली होती.

ऋजुताने रेखाताईंचा बदललेला मूड बघितला अन हसून बाबांना  'थम्बस अप ' दाखवले.

थोड्याच वेळात ते पोहचले. जुन्या सुमधुर गाण्यांच्या एकामागून एक आविष्काराने तिघांच्याही चित्तवृत्ती प्रसन्न झाल्या होत्या. गाणे ऐकता ऐकता ऋजुताला विराजची आठवण येत होती. त्या दिवशी मंदिरातून परत येताना म्हटलेले गाणे, विराजने दिलेली दाद , ती भेट सगळे नकळतपणे तिच्या डोळ्यासमोर आले.


तिकडे कटलेट खाताखाता रजत आणि विराज बोलत होते.

"मग बंधू, आज काय प्लॅन तुमचा? काही विशेष ठरलंय का?", रजत.

"नाही . आता सामान नीट लावून घेतो . मग नंतर फ्री आहे. बाहेर जाऊ या फिरायला , तुझी काही हरकत नसेल तर. काही सामान आणायचं असेल तर तेही आणू येताना", विराज.

"हं ओके, तू कधी आलास इथे? काय काय बघून फिरून झालंय आतापर्यंत?", रजतने विचारले.

"फक्त आठएक दिवस झालेत मी येऊन . ऑफिसमुळे काही बघणं झालं नाही. पुष्कळ ठिकाणं आहेत ना, कुठेही जाऊ शकतो आपण. मुख्यतः मला लॉर्ड्सला जायचं आहे. सर्वात आधी तेच बघू", विराज. लॉर्ड्सचे नाव काढताच विराजच्या डोळ्यात एक चमक आलेली रजतला दिसली.

"हं , ठीक आहे . तू आटपून घे . मग निघू अर्ध्या तासात", रजत.

विराज आपलं आटपायला गेला. तेवढ्यात त्याला विधीने पाठवलेला व्हिडिओ दिसला . तो व्हिडिओ बघितल्यावर तो कुठे चुकला होता हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

त्याने लगेच आईला आणि विधीला "थँक् यू , कळले ग मला आता. पुढच्या वेळी मस्त करेन. काळजी करू नकोस." असा मेसेज पाठवला.

"दादा, लोक वाघाच्या गुहेत हात टाकायला घाबरतात, तू तर नेमका वाघाच्या गुहेत रहायलाच गेला आहेस. कसं होणार तुझं आता? जपून रहा रे बाबा ", विधीने दोन तीन खट्याळपणे हसणाऱ्या इमोजीसोबत मेसेज पाठवला.

विराजने स्माईली पाठवत उत्तर दिले, "हो ना , ते तर आज कळलं. आलीया भोगासी असावे सादर."

"पण मला तर छान वाटला रजत, काही प्रॉब्लेम नाही सध्या तरी. पण जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो कसा रिऍक्ट करेल ते काही सांगता येत नाही", विराज.

"बरं मी आता तयार होतो. बाहेर जाणार आहोत फिरायला. बाय", विराज.

"अरे वा! मस्तच! एन्जॉय ", विधी.काही वेळाने दोघेही 'क्रिकेटची पंढरी' म्हणवल्या जाणाऱ्या 'लॉर्ड्स' या क्रिकेटच्या स्टेडियमला पोचले. लंडनमधील लॉर्ड्स मैदान हे क्रिकेटच्या मैदानांपैकी सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते. अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यापासून ते पुढे शंभराहून अधिक कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचे साक्षीदार असलेले हे स्टेडियम . इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही खेळाडूंसाठी एक अतिशय सन्मानाची गोष्ट . हे मैदान , तिथली भव्य आसनव्यवस्था , स्कोअर बोर्ड , पॅव्हिलियन ,  ड्रेसिंग रूम मधल्या सन्मान फलकावरील आवडत्या खेळाडूंची नावं इत्यादी सगळे ते दोघे बघत होते. रजत आणि विराज दोघांनीही कितीदा तरी इथे होणारे सामने टीव्हीवर बघितले होते. पण इतके सुप्रसिद्ध स्टेडियम 'याचि देही याचि डोळा' बघून ते दोघे जणू धन्य झाले होते. दोघेही क्रिकेटवेडेच ना! एवढे सुप्रसिद्ध स्टेडियम प्रत्यक्षात बघण्यातला आनंद काय वर्णावा!

लॉर्ड्समधले एमसीसी संग्रहालय म्हणजे जगातील सर्वात जुने क्रीडा संग्रहालय . येथे क्रिकेट जगतामधील अनेक जुन्या संस्मरणीय वस्तूंचे जतन केलेले आहे. त्यामध्ये डॉन ब्रॅडमन, शेन वॉर्न यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंचे क्रिकेट - किटसुद्धा रजत-विराज दोघांना बघायला मिळाले. ब्रायन लाराच्या जीवन आणि कारकीर्दीवरील एक प्रदर्शन, ब्रायन जॉन्स्टन मेमोरियल थिएटर, आणि त्यातल्या एका सिनेमामध्ये ऐतिहासिक क्रिकेट सामन्यांचे फुटेज इत्यादी बघतानासुद्धा दोघे एकदम भारावून गेले होते.

स्टेडियम बघितले आणि विराजचे लहानपणापासून पाहिलेले एक स्वप्न पूर्ण झाले.

"चल, आता मी तुला आणखी एका चांगल्या ठिकाणी घेऊन जातो. गेट रेडी टू हॅव अनदर अमेझिंग एक्सपिरिअन्स !", रजत म्हणाला आणि तिथून ते आनंदात बाहेर निघाले. थोडीशी पोटपूजा करून ट्रेनने ते पुढे निघाले. कुठे बरं जात होते ते? ते जात होते आणखी एका अनोख्या सफरीला.

ट्रेनमध्ये बसल्यावर दोघेही एकमेकांशी गप्पा मारण्यात रमले होते. एकमेकांशी ओळख तर झालेलीच होती. गप्पांमधून थोडीफार एकमेकांच्या कंपनी, प्रोजेक्ट्स, काम आणि त्यातील आवडीनिवडींची कल्पना दोघांनाही आली. स्वभाव थोडाफार उमजायला लागला होता. दोघेही एकमेकांवर खूष होते. काही वेळात ते त्यांच्या निर्धारित केलेल्या ठिकाणी पोचले.

रजतला हे ठिकाण आवडायचे . त्यामुळे तो आधीही येथे एकदोनदा आला होता. पण विराज मात्र पहिल्यांदाच हे बघत होता.

लांबच लांब पसरलेली थेम्स नदी , त्यातून जाणारे वेगवेगळ्या आकाराचे जहाज , नदीची सफर करून देणाऱ्या छोट्या मोठ्या क्रूज शिप्स, पाण्याचा खळखळाट. तिथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. विराज तर बघूनच खूष झाला होता.

ते दोघे एका क्रूज शिप मध्ये गेले. डेकवर रांगेने खुर्च्या मांडलेल्या होत्या. ते तिथे बसले. तिथून थेम्स नदी आणि आजूबाजूच्या दृश्याचे अवलोकन करणे सोपे होते. आणखी काही टूरिस्ट त्यांच्या सोबतीला होते. त्यांची थेम्स नदीतून सफर सुरू झाली. पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन आय , सेंट पॉल कॅथेड्रल,  शेक्सपिअर्स ग्लोब थिएटर इत्यादी त्यांना दिसत होते. गाईड त्यांच्या मार्गातील दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या वेगवेगळ्या इमारती, ठिकाणे, स्मारके, संग्रहालय इत्यादींबद्दल इंग्रजीतून माहिती देत होता. त्यातली थोडीफार ऐकू येत होती. मध्ये मध्ये रजतही विराजला काही माहिती सांगत होता.

"ते वेस्ट मिन्स्टर ऍबे आहे ना, तिथे हाऊसेस ऑफ पार्लमेंट आहेत. ते तिथे एलिझाबेथ टॉवर ", रजत हात दाखवत म्हणाला.

"हं, ती मोठी घड्याळ दिसतेय तेच ना एलिझाबेथ टॉवर?", विराज तिकडे बघत म्हणाला.

"हो", रजत.

"हा मिलेनियम ब्रिज म्हणजे हॅरी पॉटर मूव्ही मध्ये दाखवलाय ना तो ब्रिज आहे", गाईडने हाताने दर्शवत सांगितले.

"वॉव!", विराज उत्साहात दिसत होता.

"हे बघ ती बिल्डिंग दिसते आहे न, ती आहे पश्चिम युरोपातील सर्वात उंच बिल्डिंग 'द शार्ड' . बहात्तर मजली बिल्डिंग आहे ती. खाली ऑफिसेस, हॉटेल्स वगैरे आहेत आणि वरच्या मजल्यावर 'ओपन एअर स्काय डेक' म्हणजे जिथून लंडन शहराचे चाळीस मैल दूरपर्यंतचे दृश्य अगदी स्पष्ट दिसते. यासाठीच जास्त प्रसिद्ध आहे ती बिल्डिंग", रजत विराजला सांगत होता.

"वॉव ! मस्त दृश्य दिसत असेल ना तिथून !", विराज.

"हो , फक्त आकाश निरभ्र हवं. धुकं, पाऊस वगैरे नसेल तर खूप सुंदर दिसतं तिथून", रजत.

"हो, बरोबर आहे", विराज.

"आणि ती बघ वॉकी-टॉकी बिल्डिंग म्हणतात तिला", रजत.

"हो ना , आकार अगदी वॉकी-टॉकी सारखाच आहे".

"तिथेही स्काय गार्डन आहे. तिथूनसुद्धा लंडनचे चांगले दृश्य दिसते", रजत.


टॉवर ऑफ लंडनबद्दल गाईड सगळी माहिती सांगत होता. थोड्याच वेळात जगप्रसिद्ध टॉवर ब्रिज त्यांना दिसू लागला. एक मोठेसे उंच जहाज त्या ब्रिजजवळ होते आणि त्या जहाजाला जाता यावे यासाठी तो ब्रिज दोन्ही बाजूंना अर्धा अर्धा उघडत होता. काही वेळातच ते मोठे जहाज ब्रिजखालून गेले आणि मग तो ब्रिज पुन्हा बंद झाला.

"व्वा! काय सुपर टेक्नॉलॉजी आहे ना याची! " विराज उद्गारला. लहानपणी शिकलेल्या किंवा फक्त पुस्तकात वाचलेल्या या ब्रिजबद्दलची ही अद्भुत गोष्ट ते दोघेही आज अनिमिष नेत्रांनी प्रत्यक्षात पाहत होते.

"हो रे, पूर्वी दोनदा आलो मी इथे , पण तेव्हा ब्रिज उघडताना दिसला नव्हता. आज प्रत्यक्ष बघायला मिळाला आणि माझी इच्छा पूर्ण झाली", रजतसुध्दा आनंदित झाला होता.
काही वेळात त्यांचं जहाजसुद्धा त्या ब्रिजखालून गेलं आणि जहाजावरच्या सर्व प्रवाशांनी आनंदाने एकच जल्लोष केला.

ब्रिजवरून फेरफटका मारून झाल्यावर पुन्हा क्रूज मध्ये बसले. शेवटी त्यांनी रॉयल ओब्झर्वेटरीला भेट दिली आणि तिथे प्राईम मेरिडियन म्हणजे ०° रेखांशाची रेषा बघितली. ही रेषा म्हणजे पृथ्वीभोवती पूर्व आणि पश्चिम दोन्ही अंतर मोजण्यासाठी प्रारंभिक बिंदू आहे. ती रेखा आणि आंतरराष्ट्रीय तारीख रेषा दोन्ही मिळून पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम गोलार्धात विभागतात.

प्राईम मेरिडियन या रेषेच्या दोन्ही बाजूंना एकेक पाय ठेवत उभे राहून रजत आणि विराजने एकाच वेळी पूर्व आणि पश्चिम गोलार्धात उभे असण्याचा एक अनोखा आणि रोमांचित करणारा अनुभव आपल्या गाठीशी जोडला.क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

विराज आणि रजत एकमेकांबरोबर जुळवून घेत आहेत, मजा मस्ती करत एकमेकांना समजूनही घेत आहेत.

आज 50 वा भाग. कथेला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. 

लंडनची वारी प्रत्यक्षात करण्याचा योग तर मला आलेला नाही. त्यामुळे सर्वांसाठी हा भाग लिहिताना मी भरपूर मेहनत घेतली आहे. प्रत्यक्षदर्शींची मदतही घेतली आहे. तरीही लिहिण्यात काही चूकभूल झाली असल्यास क्षमस्व. कथेचा एक भाग म्हणून समजून घ्यावे.

विराज आणि रजतबरोबर लंडनच्या छोट्याशा ट्रिपचे सरप्राइज कसे वाटले? भाग आवडल्यास फेसबुक पेजवर तुमच्या लाईक आणि कंमेंट्स द्वारे नक्की कळू देत. अधिकाधिक चांगले लिखाण करण्याची प्रेरणा त्यातून आम्हाला मिळते.

🎭 Series Post

View all