दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 4

Drushti, Drushtikon, ani, vision, and, perspective, katha, kathamalika, bhag, 4, marathi, Rujuta, Viraj, Rohit, office

मागील भागात आपण पाहिले ...

पार्टीसाठी सर्वजण आलेल्या हॉटेलमध्ये हिरवळीवर फुलझाडे, कारंजे, कृत्रिम धबधबा, शिल्पाकृती इत्यादींची नीट योजना करून खूप सुंदर वातावरण तयार केले होते. रोहित आणि विराजच्या टीमने पार्टीमध्ये खूप धमाल केली. (कसे... त्यासाठी मात्र भागच वाचावा लागेल.)

सोबत आणलेल्या फोन, घड्याळ इत्यादी सर्व गोष्टी सर्वांनी एका कपाटात ठेवल्या. एका ट्रे मध्ये व्यवस्थित मांडलेल्या काळ्या पट्ट्या घेऊन रिसेप्शनिस्ट पुढे आली आणि तिने त्या माणसाला इशारा केला. त्याने भराभर रोहित, विराजसहित सर्व माणसांच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली. तर रिसेप्शनिस्टने सर्व मुलींच्या डोळ्यावर पट्टी बांधली ...  सर्वजण फारच गोंधळून गेले होते. हे काय चाललंय कोणालाच काही कळत नव्हतं....
इकडे जेवायची वेळ झालीय.... पोटात कडकडून भूक लागली आहे .... आणि हे जेवायला द्यायचं सोडून पट्ट्या का बांधताहेत? ....

आता पुढे....

*****

पट्टी बांधल्यानंतर काही वेळ तसेच थांबून त्या माणसाने एक दरवाजा उघडून सर्वांना आत पाठवले. आता तेथे सर्वांची पट्टी काढण्यात आली. डोळ्यांना अंधारा शिवाय काही दिसत नव्हतं.

नंतर त्या माणसाने तिथल्या एकाला आवाज दिला "सुदर्शन .., घेऊन जा यांना".

लगेचच एक जण आला आणि त्याने सर्वांना स्वतःची ओळख करून दिली. " हॅलो , मी सुदर्शन. मी तुमचा इथला यजमान  (होस्ट) आहे. ",  सुदर्शन.

"हॅलो", सर्वजण.

"पुढचा तासभर मी तुमच्या सोबत राहून तुम्हाला मदत करेन.  मी सांगतो तसे करा आणि माझ्यामागे या", सुदर्शन.

"कुठे?", विराज साशंकपणे म्हणाला.

"सर, विश्वास ठेवा माझ्यावर. काळजी करू नका.  पुढे या आणि तुमचा उजवा हात माझ्या खांद्यावर ठेवा ", सुदर्शन.

"ओके ", असं म्हणत विराजने त्याच्या खांद्यावर उजवा हात ठेवला.

"आता , तुमच्यातले एकजण पुढे येऊन सरांच्या खांद्यावर उजवा हात ठेवा", सुदर्शन.

एकजण पुढे येऊन विराजच्या खांद्यावर हात ठेवला.

"आता त्यांच्या खांद्यावर आणखी एक जण हात ठेवा ", सुदर्शन. 

आणखी एकाने असाच उजवा हात समोरच्या व्यक्तीच्या खांद्यावर ठेवला. आता सर्वात पुढे सुदर्शन, त्याच्या मागे विराज आणि त्याच्या मागे आणखी तिघे जण अशी साखळी तयार झाली होती.

"बाकी सर्वजण इथेच थांबा , मी यांना सोडून लगेच तुम्हाला घ्यायला पाठवतो", सुदर्शन राहिलेल्या सर्वांना उद्देशून म्हणाला.

"तुम्ही सर्वजण मी जिकडे जातोय तिकडे माझ्या मागे मागे यायचं आहे", सुदर्शन विराज आणि बाकी तिघांना उद्देशून म्हणाला.

सुदर्शन एकेक पाऊल टाकत पुढे निघाला . त्याच्या खांद्यावर हात ठेवत मागची विराज आणि तिघांची साखळीही त्याच्या मागोमाग निघाली. एका अरुंद आणि एकदम अंधाऱ्या  गल्लीवजा (पॅसेज) जागेतून सुदर्शन सर्वांना हळूहळू नेऊ लागला.

कोणालाही अंधारात काहीही दिसण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सर्वांचे लक्ष स्पर्श, आवाज, गंध यांच्या जाणीवेकडे लागले होते. एकसारखी पावले टाकत सर्वजण पुढे जात होते. जाताना डावा हात अधूनमधून भिंतीवरून  फिरवत अंदाज घेत होते.

खांद्यावरचा हलकासाच स्पर्श .. पण त्यामध्ये काहीतरी वेगळेपण विराजला जाणवत होते... एक विश्वास त्यात जाणवत होता ...कधीही न अनुभवलेला पण तरीही आपलासा वाटणारा .... आत पर्यंत कुठेतरी खोलवर शिरणारा असा हा स्पर्श ... असल्यासारखं वाटलं विराजला .
"कोण आहे माझ्यामागे?", त्याला वाटून गेले.

"आता डावीकडे वळायचे आहे", काही पावले चालल्यानंतर सुदर्शन म्हणाला.

सर्वजण त्याच्या मागोमाग गेले. आणखी काही पावले पुढे गेल्यावर सुदर्शन त्यांना म्हणाला, "आपण आलोय. इथे जेवणासाठी टेबल आणि त्याभोवती खुर्च्या ठेवलेल्या आहेत."

एकेक जणाला मदत करत सर्वांना सुदर्शनने खुर्च्यांवर बसविले. खोलीमध्ये भोजनाचा दरवळ जाणवत होता. मंद आवाजामध्ये वाद्यसंगीत सुरू होते. मात्र उजेडाचा एकही किरण तेथे नव्हता. सगळीकडे अगदी काळाकुट्ट अंधार ! चौघेही तिथे बसून एका वेगळ्याच शांततेचा अनुभव घेत होते . तोपर्यंत सुदर्शन तिथल्या आणखी कर्मचाऱ्यांना सांगून अशाच प्रकारे पुढच्या दोन बॅचेस घेऊन आला. ते तेथे येऊन बाजूच्या टेबलवर बसले. अशाप्रकारे सर्वजण तेथे जमले. प्रत्येक टेबलावरती  वाढून देण्यासाठी एकेक जण तत्पर होता.

"सर , दहा मिनिटात जेवण वाढायला सुरुवात करतो", सुदर्शन असे सांगून तेथून निघून गेला. 

सहसा जेवायला हॉटेलमध्ये गेल्यानंतर हातातल्या फोनकडे आपले लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. त्यातल्या वेगवेगळ्या ॲप्सवर उगाचच इकडून तिकडे आपण फिरत असतो. हा वाट बघण्याचा बराचसा वेळ एकतर फोन मध्ये डोकावून बघण्यात किंवा फोनवर कुणाशीतरी बोलण्यात जातो.

पण या सर्वांकडे आता काहीही नव्हते ....आणि आजूबाजूला काळाकुट्ट अंधार!  त्यामुळे लक्ष स्वतःकडे आणि आपल्याला काय जाणवतंय याकडे जास्त जात होतं.... त्या शांततेत वाद्य संगीताचा मंद असा आवाज होता तोच तेवढा.... तिथल्या अन्नाचा दरवळ नाकातून शिरून पोटातली भूक खवळून सोडत होता .... आणि तिथल्या अंधारामध्ये डोळे सोडून बाकी सगळी इंद्रिये आपले काम अगदी चोख बजावत होती .... एरवी तर कधी जाणवत नाही, की एखादी गोष्ट फक्त स्पर्शातून अनुभवायची असेल तर ती कशी अनुभवता येईल?.... किंवा फक्त वास घेऊन हे काय आहे ते ओळखायचे असेल.... किंवा कानांनी आवाज ऐकून वस्तू किंवा व्यक्ती ओळखायची असेल... तर?... याचा तर कधी विचारही केला नसेल.... पण आज या सर्वांना हेच करावे लागणार होते.

थोडेसे वातावरणाशी जुळविल्या नंतर सर्वजण आपसात गप्पा मारू लागले. हा अनुभव सर्वांनाच नवीन होता ना !

"दहा मिनिटाचा काळही फोन सारखी इतर साधने जवळ नसताना ,  किती मोठा वाटू लागतो, नाही का? ", ऋजुता म्हणाली.

"हो ना ...पण अगदी भारी अनुभव आहे हा ! स्वतःला शोधण्याचा ... आपल्या इतर इंद्रियांचे सामर्थ्यही आता जाणवते आहे ना?", निकिता म्हणाली.

"इतकी शांतता तर आपण सहसा कधी अनुभवतच नाही ग! स्वतःमध्ये बुडून शांतपणे विचार करायला कधी बसत नाही आपण. आजकालच्या धावपळीच्या युगात हे शांततेचे क्षण फारसे मिळतच नाहीत, स्वतःची पुरेशी ओळख करून घेण्यासाठी", प्रीती.

एकीकडे विराज आणि रोहित आपसात गप्पा मारत होते.
"तू गाणं खूप छान गायलास विराज . मला तर काही सुचत नव्हते. दोन गायकांनी गायलेलं गाणं लगेच आठवत नव्हते. मग क्लिक झाले कसेबसे. पण मजा आली गेम मध्ये आय रियली हॅड फन . तुमची टीमपण मस्त उत्साही आहे . धमाल करते एकदम",  रोहित.

"हो, ना, छान होती इव्हेंट, थँक्स", विराज.

"विराज मला एक सांगायचे होते", रोहित म्हणाला.

" हो बोला ना", विराज.

"आमचे पुढचे दोन-तीन प्रोजेक्ट येण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यासाठी मी तुमच्या कंपनीचं नाव सीनियर मॅनेजमेंट कडे रिकमेंड केलं आहे . दोन-तीन दिवसात त्यांचा निर्णय कळेल . प्रोजेक्ट आल्यास तुमची तयारी राहील ना करायची ?", रोहितने विचारले.

"हो, हो, का नाही ? आम्ही नक्कीच प्रयत्न करू वेळेवर आणि व्यवस्थित करून देण्याचा . तुमच्या कंपनीशी डिल करायला आम्हाला आवडेलच " , विराज खात्रीने म्हणाला.

"मी कळवतो तसे काही दिवसात", रोहित म्हणाला.
"ओके", विराज .

अशा गप्पा रंगल्या असताना सुदर्शन आला आणि त्या सर्वांना सांगितले," जेवण तयार आहे आता तुम्ही सर्वजण टेबल वरून हात बाजूला घेऊन बसा".

लगेचच त्या तीनही टेबल वरती तिघेजण जेवण वाढायला लागले. सर्वप्रथम सूप दिले गेले.

"तुमच्या डाव्या हाताशी सूप पिण्यासाठी चमचा ,पाण्याची छोटी बाटली, उजव्या हाताशी काटा चमचा ठेवलेले आहेत. प्रत्येकासमोर सूपचे मोठे बाउल ठेवलेले आहे ", सर्वांना सूचना देण्यात आली.

सर्वजण हाताने हळूहळू अंदाज घेत, एकेक गोष्ट शोधत होते. सांडलवंड होण्याचा किंवा चटका लागण्याचाही धोका असल्याने सगळे जपूनच करावे लागणार होते. हाताने चाचपडत चमचे, बाउल शोधून सर्वांनी सूप घेतले. त्यांचे सूप घेऊन झाल्यानंतर ते सर्व बाऊल उचलून घेतले गेले.

नंतर स्टार्टर्स सर्वांना वाढले गेले. चव घेण्याआधीच वासावरून कळत होते की पदार्थ उत्तम झाला आहे .
प्रत्येकासमोर प्लेट्स , वाट्या व्यवस्थितपणे मांडण्यात आल्या . वाढणारे सर्वजण इकडून तिकडे फिरत वाढत होते. एकमेकांना आवाज देत किंवा चुटकी वाजवून रस्त्यातून बाजूला सरकायला सांगत होते. सगळे शाकाहारी पदार्थच असल्यामुळे ते खाण्यासाठी कोणालाही काही अडचण नव्हती. प्रत्येक पदार्थ हाताने स्पर्श करून बघायचा, त्याचा स्पर्श कसा आहे ते जाणून घेऊन ते काय आहे ते ओळखायचं. वास घेऊन चव ओळखायची लोणचं आहे , भाजी आहे , पोळी आहे की भात आहे... आणि मग खायचं.... सर्वजण या जेवणाचासुद्धा स्पर्श, रस , गंध यांनी आस्वाद आणि आनंद घेत होते. सर्वात शेवटी गोड पदार्थ वाढण्यात आला.

"जेवताना इतकं लक्ष तर आपण कधी दिलंच नसेल , अगदी  आयते जेवण मिळते तरीसुद्धा... भराभर ताटातले खाऊन मोकळे होतो आपण ", त्यांना मनाशी वाटून गेले.

"इथली सर्विस सुद्धा किती फास्ट आहे ना", प्रसाद म्हणाला.

"हो ना, इतक्या अंधारातही किती व्यवस्थितपणे वावरत आहेत हे सर्वजण", प्रीती दुजोरा देत म्हणाली.

जेवण उरकल्यावर येतानाच्या पद्धतीप्रमाणेच जातानाही सुदर्शनने सर्वांना बाहेर रिसेप्शन रूम मध्ये पोचवून दिले. आणि खुर्च्यांवर बसायला सांगून तो निघून गेला.

रिसेप्शनिस्ट ने काही वेळासाठी सर्व लाईट्स बंद करून तेथे अंधार केला. सर्वांचे डोळे सरावल्यावर मग पाच मिनिटांनी दोन तीन अगदी छोटे लाईट्स लावून अगदी मंद प्रकाश खोलीमध्ये केला . डोळ्यांना काळ्याकुट्ट अंधारातून सामान्य प्रकाशात लगेचच येता येत नसल्याने तिने ती काळजी घेतली होती. आणखी थोड्या वेळाने थोडा थोडा प्रकाश वाढवत शेवटी नेहमीसारखा प्रकाश खोलीत केला आणि पुन्हा तिथले  झुंबर आपल्या रंगीबेरंगी प्रकाशाची झलक सर्वांना देऊ लागले.

तेवढ्यात हॉटेलचा मालक तेथे आला.  त्याने सर्वांना विचारले ,"कसा वाटला तुम्हाला सर्वांना आजचा डायनिंग इन द डार्क चा अनुभव?".

"अगदी वेगळा होता. कधीही न अनुभवलेला...", रोहित.

"तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता सांगतो, तुम्हाला वाढणारे सर्वजण हे दृष्टीहीन होते. अगदी तुम्हाला घेऊन जाणारा सुदर्शन सुद्धा. त्याचे नाव सुदर्शन आहे परंतु त्याने या जगाचे दर्शन मात्र फक्त अंत:चक्षूंनीच केले आहे. इथे वाढण्याचे काम करणारा संपूर्ण स्टाफ दृष्टीहीन आहे. इन फॅक्ट अशांनाच इथे नोकरी दिली जाते", हॉटेल मालक.

"काय ???? " , सर्वजण. आता मात्र सर्वांच्या आश्चर्याला पारावार राहिला नव्हता. सर्वांचे डोळे विस्फारले होते.

"विश्वासच बसत नाहीये सर! किती सफाईने त्यांनी आपल्याला सर्व गोष्टी एकापाठोपाठ एक अगदी व्यवस्थितपणे वाढल्या, टेबलवरची रिकामी झालेली भांडी उचलली.", निकिता म्हणाली.

"आणि मुख्य म्हणजे आम्हालाही खुर्चीवर बसताना, चमचे प्लेट इत्यादी वस्तू शोधून खाताना त्यांची मदत घ्यावी लागत होती. पण ते सर्वजण मात्र त्या अंध:कारमय विश्वात वावरताना आम्हाला सहजता यावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत होते. आम्हाला काही अडचण येऊ नये म्हणून झटत होते, लक्ष ठेवून होते", ऋजुता.

"खरंच हॅट्स ऑफ टू देम", प्रसाद म्हणाला.

"हे सर्वजण येथे काम करतात. स्वतः अर्थार्जन करून आपल्या पायावर उभे राहत कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सहज येथे वावरता यावं, काम करता यावं या दृष्टीने आम्ही इथली व्यवस्था केली आहे. सामान्य माणसाला त्यांच्या या परिस्थितीत थोडा वेळ जरी घालवावा लागला तरी त्यांच्या अडचणींचा अंदाज येतो. यांच्यापैकी जवळपास सर्वच जण जन्मापासूनच दृष्टीहीन आहेत. येथे इतक्या महिन्यांपासून काम करत असूनही हे बाहेरचे सुंदर दृष्य, निसर्गातील विविध रंग त्यांना एकदाही बघता आलेले नाहीत", हॉटेल मालकाने दरवाज्यातून बाहेर निर्देश करत बाहेरचे दृष्य दाखवले . हिरवळीवरच्या कारंजातून उडणारे तुषार रंगीबेरंगी लाईट्स मुळे चमकत होते. त्याच्याबरोबर वाजणाऱ्या संगीताच्या कमी जास्त होणाऱ्या आवाजानुसार त्यांचा मनोहारी खेळ तेथे चाललेला होता.

"होळीचे सगळे रंग सुद्धा यांच्यासाठी सारखेच ... काळे...
दोन वेगवेगळ्या विश्वातला विरोधाभास लक्षात येतोय का? एक हे आपलं नेहमीचं दृष्टीसहित असणाऱ्यांचं रंगीबेरंगी विश्व.... आणि एक हे , फक्त एकच रंग असणारं.... द ब्लॅक वर्ल्ड.... सगळ्या जाणिवांची प्रखरता इथे जास्त जाणवते. एकमेकांना समजून घेण्याची, मदत करण्याची वृत्ती येथे जास्त जाणवते, या शांततेमध्ये मनाचे आवाज नीट ऐकू येतात ", हॉटेल मालक.

"दृष्टीसहित असलेल्या सर्वांना समोरच्या व्यक्तीची परिस्थिती बघण्याची दृष्टी खरंच असते का? हा एक प्रश्नच आहे खरं तर....प्रत्येकाने याचं उत्तर स्वतः च शोधून स्वतः ला द्यावं..." हॉटेल मालक.

सगळेच भारावलेल्या अवस्थेत होते.... अगदी निशब्द झाले होते....

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

काय होईल उद्या ऑफिसमध्ये? क्लाएंट ला अशा ठिकाणी पार्टीसाठी नेणे हे योग्य नाही, असे वाटून विराज ऋजुता वर चिडलेला असेल का?

रोहितला हा अनुभव कसा वाटला असेल? तो कशाप्रकारे याकडे बघेल?

पुढच्या प्रोजेक्टचे काय होईल? विराजच्या कंपनीला मिळतील की नाही?

यासाठी पुढील भाग वाचायलाच हवा ..

हा भाग कसा वाटला सढळ हाताने कंमेंट करून जरूर कळवा. 

🎭 Series Post

View all