दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 49

Viraj - Rujuta's interesting story having love, emotions , dedication, goals, vision and perspectives.

मागील भागात ...

ऋजुताच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य अजूनही तसंच होतं. का कोण जाणे, वेगळाच आनंद तिला होत होता. विराज दूर गेलाय, तरी माझ्या नाहीतर दादाच्या तर जवळच आहे याची अनामिक खुषी तिला होत होती.

आता पुढे....


रजतशी बोलणे झाले आणि मग ऋजुताने विधीला मेसेज केला.

"अग विधी , विराज माझ्या दादाकडेच गेलाय राहायला . किती मज्जा येईल ना त्यांना आता . मलाच आनंद होतोय."

"हो मलाही आताच कळलं. हे बघ तुला गंमत दाखवते. ऑलरेडी मज्जा यायला सुरुवात झालीय. ", विधीने उत्तर दिले. पुढे दोनचार खळखळून हसणारे स्माईली टाकले तिने. अन लगोलग ते  'पोहे-कम-उपम्या'चे फोटोही ऋजुताला पाठवले.

" पोहे-कम-उपमा : विराजदादाचा पोहे करण्याचा पहिला प्रयत्न" असे कॅप्शन पण दिले तिने त्या फोटोंना.

ऋजुताला तर हसूच आवरत नव्हते. तिने स्माईलीबरोबर उत्तर पाठवले, "बरं झालं, मुलांना पोहे खिलवावे लागत नाहीत वरपरीक्षेच्या कार्यक्रमात! नाहीतर विराजचं काही खरं नसतं."

"ए हो ग, किती छान आयडिया ना, वधूपरीक्षा करण्याऐवजी अशी वरपरीक्षा करता आली असती तर!"

"बाय द वे, माझ्या दादाला मात्र तुझ्या वरपरीक्षेत पास करावे लागेल मग. तो पोह्यांच्या दोन-चार तरी व्हरायटीज अगदी उत्तम बनवतो, बरं का", ऋजुतानेही तिला चिडवण्याची आणि आपल्या दादाला सपोर्ट करण्याची संधी सोडली नाही.

विधी हलकेच लाजली आणि आश्चर्याने म्हणाली, "खरंच?"

"अगदी खरं ", ऋजुता.विधीने रजतला मेसेज केला. आता फोनवर बोलण्याची तर काही हिंमत नव्हती तिची. त्यालाही मेसेजमध्येच पोह्यांचा फोटो पाठवून विचारले,

"हाच नाश्ता बनलाय न आज तुमच्याकडे?"

रजतनेही मेसेजला उत्तर दिले "हो".

"कळलं का मिस्टर रजत, काय केलं आहे तुम्ही ते?
तुझा पार्टनर म्हणजे माझा दादाच आहे", विधी.

"हो न, आताच कळलं मला ते. स्वतःच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीय मी."

"नाही, कुऱ्हाडीवर पाय मारलाय तुम्ही. मी नाही बोलणार बाबा आता फोनवर. दादा खूप रागवेल त्याला कळलं तर ."

"तू न उगाच काहीही म्हणतेस, घाबरतेस त्याला. किती संयत आहे तो. एकदम मऊ हृदयाचा. पोहे तिखट झाले तर लगेच सॉरी म्हणाला मला", रजत.

"हो s ? ऋजुताला विचार तू. ती सांगेल तुला.", विधी.

"हाहाहा तिने ऑलरेडी सांगितलंय , तो चांगला आहे काळजी करू नकोस म्हणून", रजत हसून .

"ठीक आहे , तुला नाही न भीती वाटत, मग सांगते मी त्याला की रजतनेच ...", विधी आता त्याची गंमत करत होती.

"ए , ए , नाही ग बाई, हात जोडतो. आताच नको. नाहीतर माझ्याच घरातून मलाच मारून-झोडपून बाहेर काढेल तो", रजतने उत्तर दिले.

विधी खुदूखुदू हसत होती. चार-पाच स्माईली पाठवले तिने .

"जरा अंदाज घेऊ दे मला, अन त्यालाही जरा स्थिरस्थावर होऊ दे. ", रजत.

"हो रे, तुझ्यापेक्षा मलाच मारेल तो. अभ्यास सोडून हे काय करते म्हणून. पण मी अभ्यास करते की नाही? तूच सांग."

"ते मला काय माहीत! तू अभ्यास करते की नाही ते तर तुलाच माहीत ना", रजत हसत होता.

"ए जा , कट्टी मी. मी नाही बोलणार आता.", विधी. रुसल्याचा इमोजी पाठवला सोबत .

"अग राणी, गंमत करत होतो ना. कितीतरी दिवसांनी एखाद्या दिवशी बोलतो आपण. अभ्यास तर करतच असशील तू. त्याशिवाय एवढी बिझी कशी राहणार. कळतं ना मला.", रजतने मेसेजबरोबर चॉकलेट , फुलं, पेस्ट्री असं सगळंही पाठवलं, मेसेजमध्येच बरं का.

विधीची कळी लगेच खुलली. स्माईली पाठवला.

"वेडू", म्हणत रजत हसतच उठला.

इकडे विराज चिंतेत पडला होता. "विराज , तुलाही ना, काय गरज होती याच घरमालकाला "हो" म्हणण्याची. दोन तीन दिवस वाट पहावी लागली असती अजून, मिळालं असतं दुसरीकडे कुठेतरी. आता कसं होणार? हा तर नेमका ऋजूचा भाऊच निघाला. अन तेही पहिलंच पहिलं काय इम्प्रेशन पडलं असेल त्याच्यावर ! आता यालाच मनवायला कष्ट घ्यावे लागणार तुला. ती तर दूरच राहिलीय अजून. कठीण आहे बाबा तुझं."


विराज असा विचारात बसला होता तोवर रजत खोलीतून आला.

"ए रजत, सॉरी, ते पोहे वगैरे तुझे सगळे जिन्नस वाया गेले", विराज सोफ्यावरून उठत म्हणाला.

"ओह नो भाई, तू कशाला काळजी करतोय? हम हैं तो क्या गम हैं? काहीही वाया जाणार नाही. गिव्ह मी फिफ्टीन-ट्वेंटी मिनिट्स. तू फक्त पाहत राहा मी काय करतो ते".

रजत त्याला घेऊन स्वयंपाकघरात गेला. विराज एका ठिकाणी उभा राहून त्याला बघत होता. रजतने फ्रीजमधून काही भाज्या काढल्या. जणूकाही फास्ट मोशन मध्ये व्हिडिओ चालवावा त्याप्रमाणेच त्याने त्यातल्या काही पटापट बारीक चिरल्या अन काही किसून घेतल्या. मसाले वगैरे जिन्नस पटापट एकामागून एक पोह्यांमध्ये टाकत भाज्याही एकत्र करून टाकल्या. विराज तर अचंबित होऊन अन जणू श्वास रोखून त्याचं ते पटापट भाजी चिरून किसून घेणं, हात सफाईदारपणे चालवणं या सगळ्यांकडे बघत होता.

रजतने त्या मिश्रणाचे हातावर थापून कटलेट्स तयार केले.

"विराज, मला त्या पॅनमध्ये थोडंस तेल टाकून दे ना , शॅलो फ्राय करायला.", रजत.

विराजने त्यात तेल टाकून गॅस सुरू केला  आणि रजतने कटलेट्स त्यात टाकले. काही वेळात परतून झाल्यानंतर रजतने ते प्लेटमध्ये घेतले आणि विराजला देत म्हणाला,

"चल , लेट अस एन्जॉय".

विराज तर अजूनही त्या धक्क्यातच होता.

"भाई, तू कमाल आहेस , ग्रेट ", विराज.

"तू पण होशील, परत भारतात जाईपर्यंत", रजत हसत म्हणाला आणि दोघे खाऊ लागले.इकडे विनीत बाहेरून आले तर वीणाताई चिंताग्रस्त होऊन सोफ्यावर बसल्या होत्या.

"काय ग, काय झालं? अशी का बसलीय?", विनीत.

"या इकडे , दाखवते तुम्हाला ", वीणाताई.

"आलोच फ्रेश होऊन", विनीत चपला काढून जागेवर ठेवून हात पाय धुवून आले.

"हं, काय आहे? दाखव. " विनीत वीणाताईंच्या बाजूला येऊन बसत म्हणाले.

"काही नाही हो बाबा, ती जास्तच टेन्शन घेतेय", विधी.

"अहो कसं होणार या मुलाचं, हे बघा", वीणाताईंनी विराजने पाठवलेला फोटो दाखवला.

"काय आहे हे? उपमा? चांगला झालेला दिसतोय", विनीत मोबाईल मधला फोटो चष्मा लावून जरा निरखत म्हणाले.

"तुम्हालाही तो उपमाच वाटला ना ? ही ही ही ते पोहे आहेत बाबा, दादाने बनवलेले", विधीला हसू आवरत नव्हतं.

"ओह ! तर हे कारण आहे हायकमांड च्या चिंतेचं!", विनीत मिश्किलपणे म्हणाले.

"अहो, मला इकडे काळजी वाटतेय अन तुम्हाला मस्करी सुचतेय", वीणाताई लटक्या रागाने म्हणाल्या.

"अहो कोथिंबीर नव्हती तर चांगली दिसेल म्हणून  हिरवी मिरचीच जास्त टाकली त्याने. अन मग खूप तिखट झाले पोहे . एका घासातच चेहरा लाल झाला होता त्याचा. हा हा करत होता. कसं होणार आहे याचं तीन महिने कोणास ठाऊक!", वीणाताई.

"अग करेल तो मॅनेज. शिकेल ना. एवढी कशाला काळजी करतेस?"

"आणि पार्टनर आहे न त्याचा. त्याला येतं सगळं, तो करेल ना दादाला जे येत नसेल ते", विधी.

"तुला काय माहिती ग? पार्टनरला सगळं येतं ते?"
वीणाताईंनी एक प्रश्नार्थक नजर विधीकडे टाकली. त्या नजरेनेच विधी एकदम चपापली. अन मग तिच्या लक्षात आलं तिने काय गडबड केलीय ते.

"विधी, खाल्लीस का माती? कर आता काहीतरी पटकन. निस्तर", विधी स्वतःशीच मनात म्हणाली.

"अग, म्हणजे त्याला येत असेलच , वर्षभरापासून राहतोय न तो तिकडे!", विधी.

विधी बिचारी तिच्याही नकळत दलदलीत खोल खोल चालली होती.

वीणाताईंची प्रश्नार्थक नजर अजूनच रोखली गेली तिच्यावर. पुन्हा तिला कळलं की काहीतरी गडबड झालीय तिची.

"आता काय बोलले मी, अशी का बघतेय आई?" , जरा विचारातच पडली विधी.

"ओह ! पार्टनर वर्षभरापासून राहतोय हे म्हटलं मी ! अरे देवा! काही खरं नाही आता", विधी स्वगत.

"अग दादानेच सांगितलं होतं मला", विधीने कशी बशी वेळ मारून नेली. अन वेळेवर काहीतरी सुचलं म्हणून सुटकेचा  निःश्वास टाकला.

"उपाशी नको राहायला हो माझा बाळ! काळजीच वाटतेय मला तर", वीणाताई.

विराजला 'बाळ' म्हटल्यावर विधी खुदूखुदू हसू लागली.
"आई, बाळ आहे का तो आता?"

"तू गप्प ग", वीणाताई तिला दटावत म्हणाल्या.

तेवढ्यात विनीत म्हणाले, "अग प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्यूशन हे असतंच. तुला लक्षात आलंच असेल की त्याचं करताना कुठे काय चुकलंय.  मग आता असं कर, तुझा पोहे बनवताना एक व्हिडिओ बनव अन त्यात सगळ्या टिप्स दे अशा. जे काही चुकलं असेल तेही सांग. ही विधी करेल तुला मदत विडिओ करायला. अन दे मग त्याला पाठवून. पुढच्या वेळी बरोबर करेल तो. "

"हं पटतंय", वीणाताई.

"हो ना? होऊन जाऊ दे मग आजच पोहे", विनीत हसत म्हणाले. अन वीणाताईही हसल्या.

"चल विधी, लागू कामाला", वीणाताई.
दोघीनी सगळे साहित्य एका ठिकाणी केले अन विधीने विडिओ करायला सुरुवात केली. मग वीणाताईंनी पोहे कसे भिजवायचे इथपासून ते प्लेटमध्ये वाढेपर्यंत सगळ्या टिप्ससहित व्हिडिओमध्ये पद्धत सांगत पोहे केले . थोड्या वेळाने विधीने व्हिडिओ पूर्ण नीट तयार केला आणि विराजला पाठवला. वीणाताईंच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.


क्रमशः


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. जसे वाचक आतुरतेने वाट पाहत असतात, तसेच वाचकांचा प्रत्येक लाईक आणि प्रत्येक अभिप्राय हा आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे आवडल्यास प्रत्येक भागाला एक लाईक तरी जरूर जरूर द्यावा.

🎭 Series Post

View all