Jan 29, 2022
कथामालिका

दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 48

Read Later
दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 48

मागील भागात

आपण विराजचा गमतीदार पोहे-प्रताप पाहिला.

"थांब, थांब पार्टनर सॉरी हं, एक मिनिट", विराज.

विराज आत जाऊन बॅगमधून लाडूंचा डबा घेऊन आला.

त्यातला लाडू रजतला दिला आणि स्वतःही घेतला.

रजतने लाडूचा एक घास घेतला. मात्र लगेच ...आता पुढे...


डोळे मिटून तो त्या लाडूच्या चवीत हरवला.

"अम्म ... सुपर! ... काय चविष्ट लाडू आहे रे !", रजत.

"सॉरी भाई, ते पोहे तिखट...", विराज.

त्याला पुढे बोलूही न देता लगेच तो विराजच्या समोर येऊन त्याचे हात धरत आपल्या मिश्किल ढंगाने म्हणाला,

"ते जाऊ द्या हो बंधू ! बंधू आपण आहात तरी कोण ? आणि इतके सुपर लाडू आपण इथून आणलेत कुठून? किती दिवसांनी खातोय मी असा लाडू! अगदी माझ्या आईच्या हातच्या सारखा आहे. आठवण आली मला तिची. थांब फोनच करतो तिला.", रजत.


लगेच त्याने रेखाताईंना फोन केला. विराज हसतच आपला लाडू खात रजतकडे बघत होता..


"आई , काय करतेय ग? हे बघ मला काय मिळालंय?", रजत.

"काय आहे रे ? ", रेखाताई फोनमध्ये बघत बोलल्या.

"अग जवळपास वर्षभराने मी लाडू खातोय आणि अगदी तुझ्या हातच्या लाडू सारखाच आहे ग . तुझीच आठवण आली मला एकदम , म्हणून तुला लगेच फोन केला", रजत त्यांना म्हणाला.


"अरे , तुला तिकडे विकत मिळाला का लाडू? बरं झालं.", रेखाताई .

"नाही ग. माझ्या पार्टनरने दिला मला आत्ता. त्यानेच आणला तो कुठून तरी. बहुतेक त्याच्या घरूनच आणलेला असेल", रजत.

"अच्छा, पार्टनर मिळालाय का तुला? बरं झालं बाई. सोबत कोणी असलं की जरा बरं वाटतं न, एकटंच एकटं राहण्यापेक्षा", रेखाताई.

"हो , हा इथेच आहे", रजत म्हणाला आणि त्याने विराजकडे फोन वळविला.

"नमस्ते काकू.", विराज म्हणाला.

"अरेच्चा! विराज तू तिकडे? म्हणजे चक्क माझ्या रजतकडे तू पोचलाससुद्धा?"

रजत लगेच म्हणाला ,"आई तू याला ओळखतेस?"

"अरे हो . ऋजूच्या ऑफिसमध्ये आहे ना तो . एकाच टीममध्ये आहेत . ओळखते मी त्याला. घरीही आला होता ना आपल्या. अरे यानेच तर मदत केली होती मी पडले होते तेव्हा. आपल्या वीणाताईंचाच मुलगा ना हा!", रेखाताई.

"ओह, अच्छा, असं आहे का?", रजत.

"हो, आणि तुझ्या हातच्यासारखा लाडू काय , माझ्या हातचाच तर आहे तो लाडू ", रेखाताई हसून म्हणाल्या.

"काय ? खरंच? ", रजतचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते.

"हो. विराज तिकडे जाणार होता तेव्हा वीणाताईंना बरं नव्हतं ना म्हणून मी आणि ऋजूने विराजसाठी बनवून दिले होते. इतक्या मोठ्या शहरात तो लगेच तुला भेटू शकेल असं वाटलंही नव्हतं रे. पण आपण चांगल्या भावनेने एखादी गोष्ट केली ना , की त्याचं चांगलंच फळ मिळतं. अन म्हणतात ना, 'दाने दाने पर लिखा होता है खानेवाले का नाम' , त्याचाही प्रत्यय येतोय बघ .  विराजबरोबरच तुझ्या वाटचा लाडू तुलासुद्धा मिळाला. " रेखाताईंचे डोळे ओलावले होते अन एक आगळेच समाधानही त्यांना वाटत होते. त्यांनी हळूच डोळे पुसले.

"आता तू रडणार आहेस का आई? अग खूष हो ना", रजत त्यांना समजावत आपल्या खोलीत जात म्हणाला.

"खूषच आहे रे. पण आठवण येतेय तुझी", रेखाताई.

त्यांचा उतरलेला चेहरा बघून त्याने अंमळ विचार केला आणि म्हणाला, "आई, ऋजू कुठेय?"

रेखाताईंनी ऋजूला फोन दिला. ती घेऊन बोलत बोलत खोलीत गेली.

"ऋजू, तुला सुट्टी आहे न आज ? ", रजत.

"हो. का रे? काही काम आहे का? ", ऋजुता.

"अग आईला बाहेर कुठेतरी घेऊन जा ना, एखाद्या नाटकाला वगैरे. तिला करमत नाही, माझी आठवण येतेय तिला."

"ओह असं आहे का? लाडका लेक रे दादा तू !", ऋजुता हसून म्हणाली.

"गंमत नाही ग, सिरीयसली म्हणतोय मी. तिचं मन रमेल जरा", रजत म्हणाला.

"बरं, मग तू काही काळजी नको करू. हम हैं न. बघते आज काही प्रोग्रॅम्स आहेत का ते. नेते कुठेतरी तिला. नाहीतर बाबांना आणि तिला पाठवते", ऋजुता त्याला आश्वस्त करत म्हणाली.

"हं, ठीक आहे", रजत.

"का रे, पण काय झालं असं एकदम? ", ऋजुता.

"अग तुला तर माहिती आहे न , मम्मा किती हळवी आहे. मी तिला म्हणालो की मला तुझी आठवण येतेय. अगदी तुझ्याच हातचा लाडू असतो तसाच लाडू खाल्ला आज , असं तिला सांगत होतो. मग झालं, लगेच पाणी आलं तिच्या डोळ्यात , आठवण आली माझी तर. नंतर असं कळलं की तिनेच केलेला लाडू आहे तो. "

"अच्छा, अरे पण असं कसा काय मिळाला तुला? तिने पाठवलं होतं का काही?"

"तुझा कलीग आहे न ऑफिसमधला , तो आलाय , आय मीन, मीच बोलावलं त्याला घरी. पण मला तेव्हा माहीत नव्हतं की तो तुझा कलीग आहे आणि आई पण ओळखते त्याला. तो माझ्याकडेच राहणार आहे आता पार्टनर म्हणून", रजत तिला सांगत होता.


ऋजुता तर आता आश्चर्याने फक्त उडायचीच बाकी होती.

"माझा कलीग म्हणजे विराज दीक्षित आलाय तुझ्यासोबत राहायला? आणि तू बोलावलंस त्याला?" , तिला आश्चर्यासोबतच एक सुखद धक्काही मिळाला होता.

"हो. ", रजत.

"दादा , खरंच, वर्ल्ड इज सो स्मॉल", ऋजुता हसून म्हणाली.
"गुड , मग आता आम्हाला काळजी करण्याची गरज नाही.", ऋजुता.

"का , तुला त्याची एवढी काळजी आहे?", रजत.

रजतच्या प्रश्नामुळे ऋजुता गडबडली आणि तिला जाणवलं आपण काय बोलून गेलोय. "अरे म्हणजे आता परदेशात आपल्या इतक्या ओळखीचं कोणीतरी सोबत आहे म्हटल्यावर तुझीही काळजी मिटली अन त्याचीही. दोघांना छान कंपनी होईल ना एकमेकांची, असं म्हणतेय मी", ती सारवासारव करत म्हणाली.

"हो न, आज त्याने मला त्याच्या हातचे पोहेही खाऊ घातले", रजत गालात हसत म्हणाला.

"अरे वा, मजा आहे मग. कसे झाले होते? छान बनवले होते का त्याने?", ऋजुताने उत्सुकतेने विचारले.

"ही ही ही ते तू त्यालाच विचारशील ", रजत हसून म्हणाला.

"अरे तू ओळखलं नाहीस का त्याला?", ऋजुता.

"म्हणजे?", रजत न कळून म्हणाला.

"अरे माझा कलीग तर आहेच, पण तुला आणखी जवळची ओळख सांगते. "

"काय?"

"अरे तो विधीचा भाऊ आहे , सख्खा . आता बोल", ऋजुता हसून म्हणाली.

"काय? तिचा सख्खा भाऊ ? ", रजत जवळजवळ ओरडलाच होता.

"अरे हळू ना, ऐकेल ना तो", ऋजुता हसत म्हणाली.

"हं, हो हो. बाप रे! स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय मी. ", रजतचा चेहरा बघून ऋजुताला हसू आवरत नव्हते.

"हसू नको तू. इथे माझी वाट लागणार आहे. रजत तिला दटावत म्हणाला.

"अग खरं म्हणजे मी इतकं बघितलंही नव्हतं ग . आपल्याकडचाच कोणीतरी इतक्या दूर आल्यावर भेटतोय हेच खूप वाटलं मला. मला काय माहिती की  हा तोच दीक्षित आहे. मला वाटलं तो पुण्याला, हा इथे . एकच असतील असं स्वप्नातही आलं नव्हतं माझ्या. दीक्षित आडनाव असलेले खूप असतात ना. आता ती नाही का माधुरी दीक्षित ? ते तर वेगळे आहेत न ", रजत म्हणाला.

"ठीक आहे रे, फक्त तू काही गडबड करू नये म्हणून सांगितलं. तसा चांगलाय तो", ऋजुता.

"ओह असं आहे का?", रजत डोळे मिचकावत म्हणाला.

"अरे म्हणजे तसं नाही, पण चांगला आहे तो स्वभावाने.
बरं, आज काय प्लॅन तुमचा सुट्टीचा?", ऋजुता.

"ठरलं नाही काही, बघतो, विचारतो त्यालाही. बाय", रजत.

"बाय", ऋजुता.

ऋजुताच्या चेहऱ्यावरचं स्माईल अजूनही तसंच होतं. का कोण जाणे, वेगळाच आनंद तिला होत होता. विराज दूर गेलाय, तरी माझ्या नाहीतर दादाच्या तर जवळच आहे याची अनामिक खुषी तिला होत होती.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेच्या प्रकाशन, वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

हा भाग कसा वाटला?  Likes आणि कंमेंट्स भरपूर येऊ देत ना. पुढे लिहायला छान उत्साह राहायला हवा की नाही? तर अभिप्राय नक्की कळवत रहा. ☺️

'दिल्या घेतल्या वचनांची' ही माझी एक लघुकथाही नक्की वाचा आणि अभिप्राय कळवा.
दिल्या घेतल्या वचनांची कथा येथे वाचा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swati Amol Mudholkar

Engineer

तुमची शब्दसखी. वाचनवेडी. Art-lover. लिखाणाचासुद्धा छंद आहे.. सामाजिक , वैचारिक, ललित, प्रेम इत्यादी वेगवेगळ्या विषयांवरच्या आशयपूर्ण तसेच हलक्याफुलक्या कविता आणि कथांसाठी मला follow करा. वाचत राहा.