दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 43

Viraj's first day in London office. Rujuta in dilemma.

मागील भागात आपण पाहिले ,

विराजने जाण्यापूर्वी ऋजुतासाठी वेगवेगळ्या सरप्राईझेसची योजना करून ठेवली होती. ते दिसताच ऋजुताने आनंदाने, उत्साहाने त्याला फोन करून धन्यवाद दिले. अर्धवट झोपेत असलेला विराज तिचा फोन आल्यामुळे खूप खूष झाला. काही वेळ बोलणे झाल्यानंतर,


"आज मीही बघतो जरा इकडचे. मग उद्यापासून हॅन्ड ओव्हर सुरू करू या", विराज पुढे म्हणाला.

"हो . ऑल द बेस्ट फॉर द न्यू प्रोजेक्ट. एज  यूज्युअल यू विल विन हार्ट्स विथ युअर चार्म. हॅव अ गुड डे, बाय", ऋजुता.

"थँक्स. बाय", विराज स्माईल करत म्हणाला आणि हसतच तयारीला लागला.

आता पुढे ...

दिवसाची सुरवातच गोड झाल्यामुळे विराज एकदम खुषीत शीळ घालत तयारी करत होता. पांढरा शुभ्र शर्ट, नेव्ही ब्लू रंगाचा सूट, टाय , हातात स्मार्ट वॉच, हलके कुरळे असलेले केस नीट सेट केले . नवीनच घेतलेला हलकासा परफ्युम लावला, फॉर्मल शूज वगैरे घालून विराज एकदम छान तयार झाला होता. मुळातच देखणा, चार्मिंग असलेला विराज अजूनच राजबिंडा दिसत होता.  तेवढ्यात त्याचा फोन वाजला. विधीने आई बाबांना बरोबर घेऊन विडिओ कॉल केला होता.

"अरे वा दादा, तयार झालाससुद्धा एवढ्यात ? काय डॅशिंग दिसतो आहेस रे !", विधी त्याला बघताच उद्गारली.

"बघू, मला बघू", म्हणत विणाताईंनी पटकन फोन घेतला.

विनीत आणि विधी त्यांची धडपड बघून हसले.
"अहो हायकमांड , तुम्हाला तर आधी दाखवावच लागेल ना त्याशिवाय कसं चालेल? मग कुठे आमचा नंबर लागेल ", विनीत वीणाताईंना चिडवत म्हणाले.

"अहो तो घाईने ऑफिसमध्ये निघून गेला तर? माझं राहून जाईल ना बघायचं म्हणून घाई करत होते ना मी. घ्या असा धरते फोन म्हणजे सगळ्यांनाच दिसेल आणि त्यालाही सगळे दिसतील." , वीणाताई हातातला फोन समोर धरत म्हणाल्या. विराज हसून सगळे ऐकत, बघत होता.

"खरंच ग, एकदम राजबिंडा दिसतोय" , वीणाताई त्याच्याकडे बघत हरखून म्हणाल्या.

"बरं, दादा तुला शुभेच्छा द्यायला फोन केलाय. ऑल द बेस्ट", विधी.

"ऑल द बेस्ट बेटा", विनीत म्हणाले. "आता घाईत असशील ना ? संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर फोन कर."

"हो नक्की कर हं संध्याकाळी, आणि आता काहीतरी नाश्ता करून जा बरं का?", विणाताईंनी घाईघाईने सूचना दिली.

"थँक्स, हो ग आई , फोनही करतो आणि नाश्ताही . बाय", विराज हसून म्हणाला आणि फोन ठेवला. "किती प्रेम करतात सगळे माझ्यावर. एवढ्या घाईतही आईने काळजीने खाऊन घ्यायला सांगितले. चला आता तर जावंच लागेल", विराज मनाशी विचार करत होता.

अजूनही काही वेळ शिल्लक होता. त्याने हॉटेलमध्ये खाली जाऊन ब्रेकफास्ट आटपून घेतला आणि मग खाली हॉटेलमध्येच बसून थोडी मीटिंगची तयारी केली. बरोबर साडेसात वाजता तो निघाला. अजूनही पूर्ण उजाडले नव्हते.  फटफटू लागले होते आताशा. रस्त्यावरचे लाईट्स सुरूच होते. तुरळक रहदारी सुरू झाली होती. अध्ये मध्ये ऑफिसमध्ये जाणारे लोक दिसत होते. वातावरणात खूप गारवा होता. विराजने जॅकेट घातले होते पण हॅन्डग्लोव्हज , मफलर वगैरे घालायला तो विसरला होता. त्यामुळे तळहात आणि कानाला एकदम थंडी जाणवत होती. आजूबाजूला बघितले तर सर्वजण जॅकेट, मफलर, हँडग्लव्हस, शूज असा संपूर्ण जामानिमा करूनच निघालेले दिसत होते.

साधारण पंधरा मिनिटात तो त्याच्याजवळ असलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर येऊन पोचला. एका तीस मजली काचेच्या चकचकीत इमारतीच्या पंचविसाव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये तो गेला. सुरवातीच्या फॉर्मालिटीज आटपून आत प्रवेश केला. ऑफिस आणि क्यूबिकलमधली बसण्याची जागाही एकदम ऐसपैस आणि चकचकीत होते. सगळीकडे अतिशय स्वच्छता ठेवलेली होती. भरपूर लाईट्स लागलेले होते. खिडक्यांमधून वेगवेगळे इनडोर प्लॅन्टस ठेवून अंतर्गत सजावट केली होती. त्यांच्यामुळे वातावरण फ्रेश राहण्यास मदत होत होती. आत आल्यावर उबदार वाटत होते. कसलाही गोंधळ नव्हता. आलेले लोक एकदम शांतपणे आपापले काम करत बसले होते. काही लोक अजून येत होते. रॉबर्ट नावाच्या एका व्यक्तीने त्याला त्याची बसण्याची जागा दाखवून दिली. विराज आपल्या जागेवर स्थिरस्थावर झाला आणि लॅपटॉप लावून कामात गुंतला.

काही वेळाने त्यांची नियोजित मीटिंग व्यवस्थित पार पडली. तिथे GRACE प्रोजेक्टवर काम करत असलेल्या लोकांची प्रत्यक्ष ओळख विराजला झाली. क्लाएंट कडले मोठमोठ्या पदावर असलेले लोक मीटिंगला उपस्थित होते. विराजच्या प्रेझेन्टेशनमुळे तेही प्रभावित झाले होते. त्याच्या बुद्धिमत्तेची चुणूक त्यांना लगेचच दिसून आली होती. आपला प्रोजेक्ट योग्य हातांमध्ये असल्याचे क्लाएन्ट्सना समाधान वाटत होते.

इकडे ऋजुतानेही मीटिंगची तयारी केली आणि पुनीत सरांना भेटून नंतर मीटिंगला गेली. मीटिंग व्यवस्थित आटपल्यानंतर लंच टाईम मध्ये टीमबरोबर मस्त पार्टीही झाली. निकितालाही तिने नवीन रोलसाठी शुभेच्छा दिल्या . तिने निकितासाठी डेस्कवर ठेवता येईल अशी एक छोटीशी आणि छान सजावट असलेली गणपतीची मूर्ती  आणि  सर्वांसाठी गुलाबजाम, पेस्ट्री, बर्गर ऑर्डर केले होते. पार्टी झाल्यावर सगळे खुशीतच आपल्या कामाला लागले .

संध्याकाळी ऑफिस आटपल्यानंतर परत येऊन विराजने घरी कॉल केला. आता मात्र त्याने सर्वांना सविस्तर वृत्तांत सांगितला. सगळे नीट झालेले बघून विनीत आणि वीणाताईंचा जीव भांड्यात पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास,
ऋजुता ऑफिस मध्ये काम करत बसली होती. तेवढ्यात पुनीत सरांचा फोन आला.

"हॅलो, हां सर", ऋजुता.

"ऋजुता, मी आज ऑफिसमध्ये येऊ शकत नाही आहे. Actually माझा मुलगा फुटबॉल खेळत असताना पडून लागलंय त्याला. तर मला त्याला चेक करायला न्यायचं आहे.", पुनीत.

"ओह, ओके. फार लागलंय का सर? कसा आहे तो?"

"पायाला आणि कमरेला लागलंय बऱ्यापैकी. बरं हे बघ, माझी साडेअकरा वाजता एक मीटिंग ठरलेली होती. सिनिअर मॅनेजमेंटबरोबर PACE चा प्रोग्रेस रिव्ह्यूबद्दल होती. तर तू ती मीटिंग घे आणि त्यांना सगळं एक्सप्लेन कर. खरं तर तुला हे सांगायलाही उशीर झालाय. मी तुला एक मेल पाठवतो त्यात जे लिहिलेले फील्डस आहेत त्या सर्वांचे डिटेल्स शोधून घेऊन जा. ", पुनीत.

"ओके सर", ऋजुता.

"आणि हं, ते भरपूर प्रश्न विचारतील. हे असे का? तसे का? इतके एफर्टस का ? वगैरे वगैरे. तर घाबरून जाऊ नकोस. तुम्ही सगळं व्यवस्थित केलंय ना. तर सगळं नीट सांगून उत्तरं दे. तुझी पहिलीच वेळ आहे अशी मीटिंग अटेंड करण्याची आणि तुझा हॅन्डओव्हरही नीट झालेला नाही अजून. विराज बरोबर हॅन्डल करायचा. आता तो नाही आणि नेमका मीही नाही तुझ्या मदतीला. त्यामुळे तुलाच नीट बघावे लागेल . इलाज नाही. ठरल्याप्रमाणे आजच ही मीटिंग व्हायला हवी आहे कारण पुढच्या त्यावर अवलंबून असलेल्या बऱ्याच गोष्टी लाइन्ड अप आहेत", पुनीत.

"Ok सर, मी बघते", ऋजुता.

"थँक्स. नंतर संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी मला कळव. मेल पाठवतोय मी . बाय", पुनीत.

पुनीतने फोनवरूनच लगेच मेल पाठवला. आणि ऋजुताने तो बघत मीटिंगची तयारी सुरू केली.

"बाप रे किती मोठी लिस्ट आहे . एवढे सगळे फील्डस शोधायचे आहेत अन वेळही किती कमी उरलाय." मनात म्हणत ऋजुता घाईने कामाला लागली.

वेगवेगळ्या फाइल्स, डॉक्युमेंट्स वगैरेमध्ये बघत बघत ती डिटेल्स गोळा करत होती. काही वेळाने तिला जवळपास सगळ्या गोष्टी सापडल्या. पण चार पाच फील्डस काही तिला सापडत नव्हते.

"कुठे बरं शोधू आता, जवळपास सगळ्या फाइल्स शोधून झाल्या . ही एकच राहिली आहे. बघते यात" , मनात विचार करत ऋजुता ती फाईल ओपन करत होती .

"अरे हे काय, ही file तर protected आहे. याला पासवर्ड लागेल. नक्कीच हे महत्वाचे डिटेल्स असल्यामुळे यातच असतील . आता काय करू? कोणाला माहीत असेल याचा पासवर्ड?", ऋजुता मनाशी.


आधी तिने विराजने जाण्याआधी पाठवलेले मेल्स पुन्हा चेक केले. पण त्यातही नव्हतं. मग तिने निकिताला विचारले.
"निकिता, विराजने ---- ही फाईल दिलीय का ग तुला ? किंवा त्याचा पासवर्ड दिलाय का?", ऋजुता.

पण तिलाही माहीत नव्हते.

"नाही ग", निकिता.

"आता काय करावे? थोडाच वेळ राहिलाय मीटिंग सुरू होण्यासाठी", ऋजुता चिंतेत पडली.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

माझ्या ईराच्या अकाऊंटमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. त्यामुळे भागाला उशीर होतोय.

आपल्या अभिप्रायांकरिता धन्यवाद.

🎭 Series Post

View all