दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 42

Rujuta gets beautiful surprises from Viraj.

मागील भागात ...

आपण विराजबरोबर पॅरिस आणि लंडन एअरपोर्टला फिरलो. आणि इकडे ऋजुताला राजमहाल आणि सिंहासन मिळाले.

ऋजुतानेही राजमहालात सिंहासनावर बसून आपले लॅपटॉप वगैरे सामान लावले आणि रोजची प्राथमिक कामे करायला सुरुवात केली. तासाभराने तिचे आटपले. आटपले कसले, थोडा ब्रेक घेतला तिने. "पुनीत सरांनाही भेटायला हवंय. पण सर मीटिंग मध्ये आहेत. संपल्यावर जावं लागेल", ऋजुता विचार करत होती.

ती खिडकीतून बाहेर सहजच इकडे तिकडे पाहत होती. सहजच तिने टेबलाचे वरचे ड्रॉवर उघडून पाहिले. तो तिला त्यात काहीतरी दिसले आणि ती आश्चर्यचकित झाली. मग तिने खालचेही ड्रॉवर उघडले. त्यात बघून ती अजूनच आश्चर्यचकित झाली.

आता पुढे ...

टेबलाच्या वरच्या ड्रॉवर मध्ये विराजने ऋजुतासाठी मोठ्ठी कॅडबरी ठेवली होती. अगदी तिला आवडणारी फ्रुट अँड नट फ्लेवरची. बाजूला एक छोटंसं कार्ड आणि त्यावर लिहिलं होतं,

"Congratulations !
नवीन कार्याची सुरवात करताना,
कुछ मीठा हो जाये ?"

"कधीकाळी बोलता बोलता म्हटलं होतं याला की कॅडबरीचं हे फ्लेवर आवडतं म्हणून. अजूनही लक्षात आहे याच्या?", ऋजुताला आश्चर्यमिश्रित आनंद झाला होता आणि त्या आनंदात तिच्या चेहऱ्यावर आपसूकच एक मोठी स्माईल आली होती. स्माईल करतच तिने दुसरे ड्रॉवर उघडले .

एक छोटासा चौकोनी गिफ्ट बॉक्स ठेवलेला होता. त्यावर एका स्टिकी नोटवर स्माईली काढलेला होता आणि खाली लिहिलं होतं,

"आता जशी हसते आहेस, तशीच नेहमी हसत रहा."

त्या गिफ्ट बॉक्सच्या खाली एक सुंदर हॅन्डमेड ग्रीटिंग कार्ड ठेवलं होतं. ऋजुताने आधाशीपणे अन खूप अधीरतेने ते ग्रीटिंग उघडलं.

"ऋजुता,

नित्य भरारी घे तू यशाच्या आकाशात
उत्कर्ष तुझा होऊ दे अन रहा तू आनंदात

शिखरे उत्तुंग यशाची नित सर तू करावी
साथीला तुझ्या माझी शुभेच्छा असावी.

-विराज"

अतिशय सुंदर अक्षरात हा मजकूर त्या ग्रीटिंग वर लिहिलेला  होता. तो वाचला आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.

आता तिने आपला मोर्चा गिफ्ट बॉक्सकडे वळवला. तिची उत्सुकता शिगेला पोचली होती. अधीरतेने तिने तो उघडला आणि हलक्या हाताने आतली वस्तू बाहेर काढली आणि उद्गारली,"Wow! किती सुंदर आहे !". ते तिला टेबलावर ठेवता येईल असे एक काचेचे रंगीबेरंगी सुंदर शो-पीस होते. खूप आनंदाने ते तिने टेबलावर नीट मांडून ठेवले. बॉक्स पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवणार  तेवढ्यात तिला बॉक्सच्या तळाशी आणखी काहीतरी दिसले. ते तिने बघितले तर तो एक पेन ड्राईव्ह होता. ऋजुताने पटकन तो लॅपटॉपला लावला . तर त्यात एक ऑडिओ फाईल होती. ऋजुताने घाईघाईने धडपडत बॅगमधून इअरफोन काढले आणि ते लावून ती ऐकू लागली.

"हाय ऋजुता, तुझ्याकडूनच शिकलोय की आनंद साजरा करायलाच हवा. मी तिथे नसलो तरी आजच्या तुझ्या आनंदात सहभागी मात्र आहेच हं. आता या सरप्राईझेसच्या मालिकेतले शेवटचे सरप्राईज. ऐक हं.
https://youtu.be/bTi5aHGTLxE
https://youtu.be/bTi5aHGTLxE

"आओगे जब तुम ओ साजना,
अंगना फूल खिलेंगे
बरसेगा सावन झूम झूम के
दो दिल ऐसे मिलेंगे ...

नैना तेरे कजरारे हैं, नैनों पे हम दिल हारे हैं
अनजाने ही तेरे नैनों ने वादे किए कई सारे हैं
साँसों की लय मद्धम चलें, तोसे कहे
बरसेगा सावन...

चंदा को ताकूँ रातों में, है ज़िन्दगी तेरे हाथों में
पलकों पे झिलमिल तारें हैं, आना भरी बरसातों में
सपनों का जहाँ, होगा खिला खिला
बरसेगा सावन..."

अतिशय मधुर आवाजात बासरीवर हे शांत सुंदर गाणं वाजत होतं . ऋजुता डोळे मिटून ते ऐकण्यात गुंग झाली होती. त्या सुरांमध्ये पुरती हरवली होती. गाणे संपल्यावरही काही क्षण डोळे मिटून तसेच स्तब्ध राहिली. ती धुन तिच्या मनात रेंगाळत होती. खूप सुंदर असा तो अनुभव होता.


विराजकडे लंडनला ,

"No , no, sorry sorry, I was not looking at you. I was thinking about somebody else. ", विराज समजावण्याचा प्रयत्न करत होता .

"Somebody else ? Who is that somebody else? You were staring at me. ", ती विमानातली एअरहोस्टेस विराजला जोरजोरात ओरडत होती. विराज कसाबसा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण ती अजूनच चिडत होती.

एवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला. ऋजुताने उत्साहाने त्याला फोन केला होता. तो झोपेतच उचलून कानाला लावून तो म्हणाला, "No, नाही ग ताई, हात जोडतो तुला , please listen, I was thinking about my friend Rujuta", विराज झोपेत स्वप्नातच गयावया करत होता. एअरहोस्टेसच्या बाजूलाच त्याला ऋजुताही कमरेवर हात ठेवून उभी त्याला जाब विचारतेय असे स्वप्नात दिसत होते. "Look, here she is", तो एअरहोस्टेसला म्हणाला.

"काय रे? काय म्हणालास इतकं सगळं? काही समजलं नाही मला", झोपेत असल्याने विराजचे शब्द अस्फुट, अस्पष्ट ऐकू येऊन ते न समजल्याने  ऋजुता  खरोखर फोनवर विचारत होती.

इकडे स्वप्नातल्या एअर होस्टेसचे जोरजोराने ओरडणे बंद होऊन ती गायब झाल्यामुळे विराजला फोन कानाला लावूनच पुनः झोप लागली होती . झोपेतच हं हं करत काही सेकंदातच तो गाढ झोपी गेला होता. काय करेल बिचारा? इतकी धावपळ, रात्रीच्या झोपेचा झालेला खेळखंडोबा, जेट लॅग इत्यादीमुळे तो थकलेला होता. अन त्यात वातावरण अगदी थंड असल्याने त्याला रात्री पटकन झोपही लागली नव्हती. आता तर कुठे सकाळचे पाच वाजत होते लंडनला. पण हे सगळं ऋजूला कुठे माहिती होतं. तिने तर लगेच उत्साहात सगळं सांगण्यासाठी विराजला फोन केला होता.

"विराज? विराज?", ऋजुताने मोठ्याने आवाज दिला.

"हं, हं , काय झालं .... काय झालं? ", विराज खडबडून जागा होत बोलला.

"अरे, काय झालं? असा दचकलास का एकदम?", ऋजुताने विचारलं.

मग त्याचे लक्ष बाजूला असलेल्या फोन आणि त्यावर सुरू असलेल्या कॉलकडे गेलं.

"अग ऋजू, फोन केलास, काय ग काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?", विराज जरा काळजीने आणि आश्चर्याने म्हणाला.

"प्रॉब्लेम ? नाही तर! असं का विचारतोय एकदम? आताच तर कॉल केलाय तुला. बोललाससुद्धा तू सुरवातीला. पण काही कळत नव्हतं मला."

विराजच्या चेहऱ्यावर हसू आले होते. "ते स्वप्न होते तर ! बाप रे बरं झालं स्वप्नच होतं." कपाळावरचे घर्मबिंदू  रुमालाने पुसत  तो विचार करत होता, "ऋजू स्वप्नातही आणि खरोखरही ! ". त्याने विडिओ ऑन केला आणि पलिकडे ऋजुताला बघून खूप खूष झाला. सकाळी सकाळीच ऋजुदर्शन झाले होते. एक वेगळाच आत्मविश्वास, खूप खूप आनंद आणि उत्साह तिच्या चेहऱ्यावर त्याला दिसत होता. तो हसून म्हणाला, " अग, हे बघ ".

"अरे हे काय? इतका अंधार?", ऋजुता.

"हो ना,अजून उजाडलेही नाही इथे. मी झोपेत होतो त्यामुळे कळलंच नाही मला. थांब लाईट लावतो. ", विराज.

ऋजुता डोक्याला हात लावत म्हणाली, "ओह, सॉरी रे , तुझी झोप डिस्टर्ब झाली." .

"ठीक आहे ग, पण त्यामुळे माझी सकाळ इतकी सुंदर झालीय ना. तसेही ऑफिसला जायला लवकर निघायचंच आहे. साडेसात वाजता निघेन. तिथे एंट्रंन्ससाठी वगैरे फॉर्मालिटीज कराव्या लागतील त्यातही थोडा वेळ जाईल. अन आज अकरा नंबरच्या बसने जायचंय ना! आता काही कार वगैरे नाही माझ्याकडे", विराज हातानेच आपले केस ठीकठाक करत म्हणाला.

"झोप डिस्टर्ब झाल्याने सकाळ सुंदर झाली तुझी?", ऋजुता आश्चर्य वाटून म्हणाली.

"काहीही का ग? तू फोन केलास त्यामुळे सकाळ सुंदर झाली, असं म्हणत होतो मी", विराज हसून म्हणाला.

"ओह, ओके ओके. विराज , थँक यू सो मच. खूप खूप सुंदर सरप्राईज होते. अरे मला तर वाटलंच नव्हतं की केबिन वगैरे मिळेल. कल्पनाही केली नव्हती मी. पण मानलं हं तुला, जाण्याआधी किती काय काय करून गेलास माझ्यासाठी. खरंच थँक्स विराज. ", ऋजुता खूप आनंदाने बोलत होती.

" मी इतकी आनंदात होते न , की कधी एकदा तुला थँक यू म्हणते असं झालं होतं मला. किती सारे सुंदर सरप्राईज दिलेस . गिफ्ट, ग्रीटिंग सुद्धा खूप सुंदर आहेत आणि तुझं बासरीवादन तर अगदी अप्रतिम ! माझं आवडतं गाणं आहे ते. मी डोळे मिटून ऐकत होते. इतकं छान अन शांत वाटलं की टेन्शन वगैरे सगळं गायब! अगदी अविस्मरणीय केला आहेस माझ्यासाठी आजचा दिवस. त्या आनंदात तू सध्या वेगळ्या टाईमझोनमध्ये आहेस हे लक्षातच नाही राहिले मला. अरे पण ही अकरा नंबरची बस काय? बस स्टॉप जवळ आहे का?"

"अग वेडू, अकरा नंबरची बस म्हणजे चालत जायचंय . आम्ही गमतीने म्हणतो तसं", विराज हसून म्हणाला.

"आणि अग हो ना, टाईमझोन चा फरक वगैरे लहानपणी भूगोलात शिकलो होतो न त्यामुळे ऐकून वाचून माहिती होता. पण खरंच प्रत्यक्ष पाहताना गंमतच वाटली मला. तुमची तिकडे संध्याकाळ असते तर इथे दुपारच असते तेव्हा. तुम्ही झोपीही जाता तिकडे तर इकडे आता कुठे संध्याकाळ व्हायला सुरुवात होते.", विराज.

"हं , हो ना खरच", ऋजुता.

"बरं एक सांगू का", विराज.

"हं, सांग ना", ऋजुता.

"आज खूप कॉन्फिडन्ट दिसते आहेस. नेहमीसारखी किंबहुना थोडी जास्तच", विराज.

"हो , ही कमाल या खुर्चीची आहे. तुला सांगू, सुरवातीला मला वाटलं होतं, की ही तर तुझी खुर्ची . आत्ता तू येशील अन बसशील इथे नेहमीसारखा. मी कशी काय इथे बसणार. मग आठवलं की या खुर्चीच्या रूपाने ती जबाबदारी मिळाली आहे मला. तू इथे बसून जितके छान काम केले आहे, तितकेच छान काम करण्याची. तुम्हा सर्वांचा विश्वास सार्थ ठरवण्याची. ", ऋजुता म्हणाली. "मग काय , निघालो आम्ही त्या प्रवासाला", ती मिश्किलपणे म्हणाली.

"हं, खुर्ची मिळायला तशी योग्यता, क्षमताही असावी लागते ना, उगाचच नाही मिळत ती. तू ते आधीच सिद्ध केलंय म्हणून मिळालीय ती. खरं आहे खुर्ची तर मिळते पण सोबत जबाबदारीही तेवढीच वाढते. बरं, कॅडबरी खाल्लीस का?", विराज.

"नाही रे अजून. आधी फोन केला तुला. तू असतास तर तुझ्याबरोबर खाल्ली असती ना. आनंद शेअर केला असता.", ऋजुताचा स्वर थोडासा उदास वाटत होता. ते विराजला जाणवले.

तो म्हणाला,"बस, इतकंच ना? मी पाच मिनिटानी फोन करतो तुला पुन्हा".

फोन ठेवून तो पटकन फ्रेश व्हायला गेला. घाईघाईने पाणी तोंडात घेतले तर पाणी एकदम बर्फासारखे गार! तरीसुद्धा ते तसेच घेत त्याने आटपले. मग बॅगमधून काहीतरी काढले. पुन्हा ऋजुताला फोन केला आणि म्हणाला, "हं, काढ तुझी कॅडबरी आता". तिने कॅडबरी काढलेली पाहून मग त्यानेही आपल्या हातात काहीतरी घेतले.

"हं आता म्हण , ओम् कॅडबरये स्वाहा" आणि मग खा. मी पण खातो इकडे", विराज.

ते ऐकून ऋजुता खळखळून हसायला लागली. "तू न वेडा आहेस . अन तू काय खाणार आहेस ते पण दाखव ना", ऋजुता.

विराजने स्माईल करत त्याच्या हातातला लाडू दाखवला. "कॅडबरी तर नाही आता माझ्याकडे. पण सुरवात गोड होणे महत्त्वाचे. तू दिलेलाच लाडू आहे. खा आता कॅडबरी" , असं म्हणून विराजनेही लाडू खाल्ला.

ऋजुताच्या चेहऱ्यावर स्माईल आले. "ओम कॅडबरये स्वाहा, आहा !" म्हणत हसून कॅडबरी खाता खाता ऋजुताने विचारले, "ए त्या ग्रीटिंग कार्डवरचे अक्षर तुझंच आहे का?"

"नाही ग, मी एका जणाला भाड्याने आणलं होतं ते लिहायला." विराज हसून म्हणाला. ऋजुताही खळखळून हसली.

"काय विचारतेस ग? तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट मी तिथे असल्यावर माझ्याच हाताने करणार ना?अक्षरही माझं आणि कविताही माझीच आहे.", विराज.

"Wow! अरे ते खूपच सुंदर होतं ना म्हणून थोडी शंका आली", ऋजुता मिश्किलपणे म्हणाली आणि पुन्हा दोघेही हसले.

काही वेळाने विराज म्हणाला,"बरं, आता मी पण आटपतो आणि तूही कर तुझं काम. मॅडम अकरा वाजता मीटिंग असते . आतापर्यंत मी असायचो मीटिंगला. आता यापुढे तुला जायचं आहे सगळीकडे."

"अरे हो, तयारीही करावी लागेल त्यासाठी. अरे आणि टीमने साडेअकरा वाजता पार्टीही ठेवली होती माझ्यासाठी. त्यांनाही सांगावं लागेल. "

"हो , सांगून दे, बारा-साडेबारा नंतर करा म्हणावं", विराज.

"आज मीही बघतो जरा इकडचे. मग उद्यापासून हॅन्ड ओव्हर सुरू करू या", विराज पुढे म्हणाला.

"हो . ऑल द बेस्ट फॉर द न्यू प्रोजेक्ट. एज  यूज्युअल यू विल विन हार्ट्स विथ युअर चार्म. हॅव अ गुड डे, बाय", ऋजुता.

"थँक्स. बाय", विराज स्माईल करत म्हणाला आणि हसतच तयारीला लागला.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा किंवा कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

बासरीवादनाची लिंक दिली आहे , डोळे मिटून ऐकून ऋजुताच्या फीलिंग्सचा जरूर अनुभव घ्या. ( हव्या तशा इफेक्ट साठी खूप शोधून लिंक दिलीय ! )

हा भाग कसा वाटला नक्की कळवा. अजिबात कंजूषी करू नका :-) . आपल्या अभिप्रायांकरिता मनापासून धन्यवाद.

🎭 Series Post

View all