दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 41

Drushti, ani, Drushtikon, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, love, blindness, andh, prem, katha, marathi

मागील भागात ...

चुकूनही कधी चुकीचे न वागणारा विराज . त्याच्याकडून अनावधानाने, अर्धवट झोपेत असताना जरा एकटक बघितल्या गेले तेवढ्याचेसुद्धा त्याला वाईट वाटत होते. आणि मला असं काय होतंय, असा ऋजूचा भास होतोय, ती समोर असल्यासारखी वाटतेय, तिचं निखळ, निर्व्याज हसू आठवतंय, मी कसा होतो अन असा कसा होतोय, असं म्हणून त्याला स्वतःचं हसूही येत होतं.

काही वेळाने फ्लाईट लॅन्ड झाली . विराजने उतरताना पुन्हा एकदा त्या एअर होस्टेसची माफी मागितली आणि तो बाहेर आला.

आता पुढे...

भव्य असा पॅरिस एअरपोर्ट पाहून विराजचे डोळे दिपून गेले होते. इथून त्याला पुढच्या विमानात बसायचे होते. पण त्यासाठी तीन तास अवकाश होता. विराजने विचार केला की खूप मोठा एअरपोर्ट दिसतोय. आपले फॉर्मालिटीज वगैरे करून घेऊ आणि मग थोडं फिरता येईल . ते आटपून तो आपले टर्मिनल आणि बोर्डिंग गेट शोधत शोधत पुढे निघाला. भव्य अशा भुयाराच्या आकाराच्या मार्गाला काचेच्या भिंती होत्या . त्यातून विमान थांबलेले एअरपोर्टचे बाहेरचे दृश्य दिसत होते. चालण्यासाठी लांबच लांब स्वयंचलित रस्ते म्हणजे ऑटोमटेड वॉकवेज होते. त्यावर उभे राहिले की काही वेळाने दुसऱ्या टोकापर्यंत माणूस स्वतः न चालताही पोचणार. बऱ्याच ठिकाणी वर खाली जाण्यासाठी स्वयंचलित पायऱ्या होत्या. म्हणजे इतक्या मोठ्या एअरपोर्ट मध्ये फिरताना वेळेची आणि श्रमाची बचत व्हावी अन ज्येष्ठांनाही जरा सुकर व्हावे या दृष्टीने चांगली रचना आहे, विराजला वाटून गेलं. असे अनेक वॉक वेज ओलांडून, वेगवेगळ्या स्क्रीनवर बघत बघत विराज शेवटी आपल्या  बोर्डिंगच्या ठिकाणी येऊन पोचला.

तिथे बसण्याची व्यवस्था होती. दोन्ही बाजूंना लाल कार्पेट आणि त्यावर रांगेने ठेवलेल्या आरामदायी लाल कव्हर असलेल्या खुर्च्या. मधोमध फिरण्यासाठी रस्ता. लोकांची ये जा सुरू होती. विमानाला उड्डाणासाठी अवकाश असल्याने बरेच जण , अर्थात विदेशी लोक, इथे खुर्च्यांवर बसून वाट बघत होते. कोणी मॅगझीन वाचत होते, तर कोणी बसलेले होते तर कोणी चक्क डोळे मिटून झोप काढत होते. विराजने घड्याळाकडे पाहिले. बराच वेळ होता. वाट पाहत तिथे तसंच बसण्याऐवजी तो आसपासच्या दुकानांमध्ये एक चक्कर टाकायला गेला. इथली आठवण म्हणून काहीतरी घेता येईल या हिशोबाने तो बघत होता. तेवढ्यात विराजला चॅनेल आणि Christian Dior या परफ्यूम ब्रँडचं दुकान दिसलं. मग तिथून त्याने त्याच्या आवडीचे काही परफ्यूम त्याच्यासाठी अन घरच्यांसाठी घेतले. एक सुगंधी आठवण, नाही का?

"किती खूष होईल माझी नकटू, नक्कीच नाचायला लागेल", वाटून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आलं. त्यानंतर बरेच परफ्यूम बघून त्याने एक स्पेशल निवडून काहीतरी मनाशी विचार करत , स्वतःशी हसत तोही घेतला.

खरेदी आटपून मग एका ठिकाणी कॉफी घेऊन तो बोर्डिंग गेटजवळ येऊन लाल खुर्चीत बसून वाट बघत बसला. काही वेळाने बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली आणि मग रांगेत लागून तोही विमानात बसला. जागेवर स्थिरस्थावर झाला. हवाईसुंदरी हातवारे करत विविध सूचना देऊ लागली. मिनिटभर झाला असेल तो विराजला तिच्याजागी ऋजुता उभी राहून हातवारे करताना दिसू लागली. तो तिच्याकडे एकटक बघत राहिला. मिनीटभराने त्याच्या ते लक्षात आले नि आता परत काही गडबड होऊ नये म्हणून त्याने घाबरून पटकन गॉगल लावून घेतला आणि हुश्श करून एक निःश्वास टाकला. मात्र त्याला असे गॉगल्स लावताना बघून बाजूचा सहप्रवासी मात्र गोंधळून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहत होता. तसे विराजने खिडकीतून येणाऱ्या उन्हाकडे आणि उन्हामुळे चमकत असलेल्या बाहेरच्या पत्र्याकडे बोट दाखवले आणि म्हणाला, " It is glaring". मग तो सहप्रवासी शांत झाला. मग मात्र विराज उंचावरून दिसणारे पॅरिस आणि नंतर आजूबाजूला असलेले निळ्या आकाशात पांढऱ्याशुभ्र कापसाच्या पुंजक्यासारखे दिसणारे ढग बघण्यात मग्न झाला .

काही वेळाने विमान लंडनमधील हीथ्रो एअरपोर्टला पोचले. तो विमानातून बाहेर आला. हे एअरपोर्टसुद्धा अतिशय भव्य आणि चकचकीत होते. इथे बॅग्स कॉन्व्हेअर बेल्ट वरून उतरवून घेऊन त्याने सगळ्या फॉर्मालिटीज आटपल्या. बराच वेळ गेला होता . आता मात्र त्याला कधी एकदा हॉटेलमध्ये पोचतो असे झाले होते. टॅक्सीत बसून तो निघाला. जाताना त्याची नजर बाहेरचे दृश्य टिपून घेत होती. मोठमोठ्या उंचच उंच काचेच्या इमारती, ऑफिसेस, नीट बांधलेले रस्ते, गाड्या, सायकल आणि पादचाऱ्यांसाठी असलेले वेगवेगळे रस्ते आणि त्यावर असलेले सिग्नल्स, शिस्तीत धावणारी सगळी ट्रॅफिक. सगळे स्वतःहून अंत:प्रेरणेने व्यवस्थित नियमाप्रमाणे चालताहेत. कुठेही खोळंबा नाही की कर्कश हॉर्नचा आवाज नाही. तो बघत होता. काही वेळात तो कॅनरी व्हार्फ मधल्या Kovotel नावाच्या निर्धारित हॉटेलमध्ये पोचला . रूम मध्ये पोचल्यावर सामान ठेवून लगेचच त्याने वीणाताईंना फोन करून सुखरूप पोचल्याचे घरी कळवले. मग फ्रेश होऊन त्याने जेवण मागवले आणि जेवून घेतले. हे सर्व आटपेपर्यंत दुपार उलटून गेली होती. थोडा वेळ आराम करून तो जवळपास फिरायला बाहेर पडला.

इकडे ऋजुता त्याच्या मेसेजची वाट बघत होती. संध्याकाळ झाली तरी अजूनही त्याचा पोचल्याचा तिला काही मेसेज आला नव्हता. त्यामुळे तिला बेचैन झाल्यासारखे वाटत होते. "असा कसा हा? पोचला असेल की नाही अजून? आतापर्यंत तर पोचायला पाहिजे होते. घाईघाईत फ्लाईटचे डीटेल्ससुद्धा घेतले नाही मी . अन याने काही कळवले पण नाही. काय करू? विधीलाच विचारते काही मेसेज आलाय का ते." , असं म्हणून तिने विधीला फोन केला.

"हॅलो, विधी, विराजचा पोचल्याचा काही मेसेज आला का ग? ", ऋजुताने एका दमात विचारून टाकले.

"हो ऋजुता, आताच फोन आला होता. तो थोड्या वेळापूर्वी पोचलाय लंडनला हॉटेलमध्ये. ", विधीने उत्तर दिले.

"Actually बराच वेळ झाला ना , मला वाटलं की सकाळी पोचला असेल तर एव्हाना मेसेज यायला पाहिजे होता . ", ऋजुता म्हणाली.

"अग त्याला फ्लाईट बदलून जायचं होतं आणि मध्ये पॅरिसला हॉल्ट होता. त्यामुळे उशीर झाला", विधी.

"हं, अच्छा. बाकी सगळं ठीक ना?", ऋजुता.

"हो", विधी.

फोन ठेवला आणि ऋजुता जरा रिलॅक्स झाली.

इकडे विधीने विराजला मेसेज केला. "दादा, तू पोचल्यावर ऋजुताला सांगितलं नाहीस का ? ती विचारत होती."

"नाही ग, लक्षात नाही राहिलं. थकलो होतो, आल्यावर जेवून लगेच झोपलो.", विराज म्हणाला.

"ओह, तिला वाटलं सकाळीच पोचलास आणि अजून सांगितलं नाही", विधी.

"मॅडम मेसेजची वाट बघत  होत्या तर!", विराजच्या चेहऱ्यावर स्माईल आले. "काय करावे? सांगू का पोचलोय ते? भरपूर वाट पाहिलीय तिने. आतापासून जास्त छळायला नको न बिचारीला. चार पाच दिवस जरा ती ऑफिसमध्ये स्थिरावू देऊ या.", विराज विचार करत होता.

त्याने ऋजुताला मेसेज केला.

"Hi, ऋजुता, मी नीट पोचलोय दुपारी".

"ओके. मग आत्ता सांगतोय का? मी विचारलं विधीला शेवटी", ऋजू नाराजीने म्हणाली.

"सॉरी ग, झोपही झालेली नव्हती अन पॅरिस आणि लंडन दोन्ही एअरपोर्ट इतके मोठे आहेत , की चालून फिरून दमलो होतो ग. मग थकल्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोप लागली मला", विराजने उत्तर दिले.

"ओह ओके, काही त्रास नाही न झाला? म्हणजे सामान वगैरे ?", ऋजुता.

"नाही , मला कुठे काही प्रॉब्लेम आला नाही. पण माझ्यासमोरच एक दोन जणांचे सामान उघडून चेक केले एअरपोर्टला.", विराज.

"ओह. ठीक आहे काळजी घे. बाय", ऋजुताने मेसेज केला.


दुसऱ्या दिवशी सोमवारी ,
ऋजुता सकाळी पावणेनऊ वाजता नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये पोचली. तितक्यात टीममधले सर्वजण तिथे आले आणि एकसाथ म्हणाले

"कॉंग्रेच्युलेशन्स!" .

"थँक यू", म्हणत ऋजुता आपल्या डेस्कवर लॅपटॉप लावू लागली तोच निकिताने तिचा हात धरून तिला थांबवले.

"इथे नाही काही, प्रोजेक्ट मॅनेजर मॅडम", निकिता मिश्किलपणे म्हणाली. "तुम्हाला आता नवीन जागा मिळालीय. चला", निकिता.

"काय? नवीन जागा? कोणती?", ऋजुता आश्चर्याने म्हणाली.

"राजमहाल ! चल तर खरं", निकिता हसून म्हणाली.

ऋजुताने आपली सॅक घेतली आणि निकीताबरोबर गेली. प्रसादही मागेच होता. निकिता तिला विराजच्या केबिनजवळ घेऊन आली.

"ऋ जु ता कु ल क र्णी"

केबिनच्या बंद दारावरच्या नेमप्लेटकडे लक्ष वेधून , त्यावर बोट ठेवून ऋजुताकडे बघत , स्माईल करत, प्रसाद वाचत होता.

ऋजुताच्या आश्चर्याला पारावार नव्हता. हे तर तिला अपेक्षितच नव्हते. खूप आनंद झाला होता तिला. निकिताने आपल्याजवळच्या चावीने केबिनचे लॉक उघडले आणि चावी ऋजुताला दिली. विराजने जाण्यापूर्वी निकिताला चावी दिली होती आणि ऑफिस बॉयला सांगून ऋजुताच्या नावाची नेमप्लेटही लावून घेतली होती. आणि हे मात्र ऋजुतासाठी सरप्राईज असणार होते. ऋजुता आणि तिच्या मागोमाग निकिता, प्रसाद दोघेही आत गेले.

केबिन स्वच्छ नीटनेटके होते. टेबलावर एका फुलदाणीत फ्रेश फुले ठेवलेली होती. खिडकीतून सकाळच्या उन्हाचा कवडसा येत होता. प्रसन्न वाटत होते.

"हा आपला राजमहाल, आणि हे आपले सिंहासन ! काय मॅडम , आवडला का मग राजमहाल?", निकिता हाताने संपूर्ण केबिन दाखवत आणि खुर्चीकडे निर्देश करत हसत म्हणाली.

ऋजुताही "हो " म्हणून हसण्यात सामील झाली. "किती सुंदर फुलं आहेत. तू ठेवलीस?", ऋजुता.

"हो. बरं, तू आता तुझी अर्जंट काय कामं असतील ती आटपून घे . मग साडेअकरा वाजता आपण सगळे कॅन्टीनमध्ये जाऊ या", निकिता.

"साडेअकरा वाजता , कॅन्टीनमध्ये, कशाला ?"

"अरे काय मॅडम, काही पार्टी, सेलिब्रेशन वगैरे पाहिजे की नाही ? एवढं प्रमोशन झालंय ना? नाही, तुम्हाला चालत असेल तसं, पण आम्हाला नाही चालणार बरं का? सेलिब्रेशन हे व्हायलाच हवं", प्रसाद नेटाने म्हणाला.

"अरे हो, हो, मी कधी नाही म्हटलंय? ठीक आहे , जाऊ या", ऋजुता हसत म्हणाली. " तुम्ही सर्वांनी विराजलाही खूप छान पार्टी दिली ना? आय मिस्ड इट . मी पाहिलेत फोटो. छान केलंत. खूप आनंद झाला त्याला त्यामुळे. त्यानेही खूप काही केलंय आपल्यासाठी आतापर्यंत. सगळं शिकवलंय आपल्याला.", ऋजुता टीमची आणि विराजचीही तारीफ करत म्हणाली.

"हो ग, खरंच आणि तूच तर शिकवलंय न , मेहनतीच्या वेळी कसून मेहनत करायची आणि आनंद मात्र नक्की साजरा करायचा. मग तू नसली म्हणून काय झालं, विराज सरांना ऍप्रिसिएट तर करायला हवं ना ग आपण. म्हणून आम्ही सर्वांनी त्यांच्या नकळत प्लॅन केला. अगदी घाईमध्ये. त्यांना अजिबात अपेक्षित नव्हतं. भारावल्यासारखे वाटत होते.", निकिता.

काही वेळात प्रसाद आणि निकिता आपल्या जागी जाऊन कामाला लागले. ऋजुतानेही आपले लॅपटॉप वगैरे सामान लावून रोजची प्राथमिक कामे करायला सुरुवात केली. तासाभराने तिचे आटपले. आटपले कसले, थोडा ब्रेक घेतला तिने. "पुनीत सरांनाही भेटायला हवंय. पण सर मीटिंग मध्ये आहेत. संपल्यावर जावं लागेल", ऋजुता विचार करत होती.

ती खिडकीतून बाहेर सहजच इकडे तिकडे पाहत होती. सहजच तिने टेबलाचे वरचे ड्रॉवर उघडून पाहिले. तो तिला त्यात काहीतरी दिसले आणि ती आश्चर्यचकित झाली. मग तिने खालचेही ड्रॉवर उघडले. त्यात बघून ती अजूनच आश्चर्यचकित झाली.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथा किंवा कथेतील कुठलाही भाग कॉपी करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

ऋजुताला ड्रॉवरमध्ये काय दिसले असेल ? तुम्हाला काय वाटते , कमेंटमध्ये कळवा.

हा भाग कसा वाटला नक्की कळवा. आपल्या अभिप्रायांकरिता धन्यवाद.

ईरा दिवाळी अंकातील "सूनमुखदर्शन" ही विनोदी कथा आणि "दीप : एक नवी आशा"  एक नवा दृष्टिकोन देणारी ही कविता हे माझे साहित्यही नक्की वाचा . दृष्टी आणि दृष्टिकोन या कथेच्या कमेंटमध्येच त्याबद्दलही अभिप्राय कळवता येईल .

🎭 Series Post

View all