Login

दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 40

Drushti, Drushtikon, ani, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, Veena, Vinit, love, blindness, prem, Marathi, katha, kathamalika

मागील भागाचा सारांश

विराज निघण्याआधी रेखाताईंनी ऋजुबरोबर लाडू पाठवल्यामुळे त्याची आणि ऋजुताची छोटीशी भेट झाली. विधीने आधी केलेल्या खोडीसाठी ऋजुताची आणि विराजसमोर माफी मागितली. पण पुन्हा एकदा नवीन खोडी केली. विराज जातानाच्या या भेटीत विराज आणि ऋजुता यांच्या भावभावनांचे हिंदोळे जाणून घेण्यासाठी मात्र भागच वाचायला हवा. "तो गेला आणि मन सैरभैर झाल्यासारखं होतंय. काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटतंय. एकटं एकटं वाटतंय. असं का वाटतय मला?". असे बरेच प्रश्न मनात घेऊन ऋजुता घरी पोचली.


पुढे....

संध्याकाळी ...

ऋजुता अस्वस्थपणे सारखी आत बाहेर करत होती. तिचं कशातच मन लागत नव्हतं. रिकामं झाल्यासारखं, काहीतरी पोकळी निर्माण झाल्यासारखं तिला वाटत होतं. एखादा मेसेज तरी यावा त्याचा, तिला वाटत होतं. पुन्हा पुन्हा बघत होती ती. पण विराज कसला मेसेज वगैरे करतोय! ठरवले तसे अंमलबजावणीला काहीशी सुरवात करण्याचा प्रयत्न करत होता तो. महत्प्रयासाने त्यानेही रोखून धरले होते स्वतःला .

विराज आणि सर्वांनी मध्ये थांबून जेवण करून घेतले. विधी हळूच विराजच्या कानात म्हणाली, "दादा, सरप्राईज कसं होतं?" आणि ती डोळे मिचकावत, भुवया वर खाली करत, मिश्किल हसत त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली.

विराजच्या चेहऱ्यावर लगेच हास्य पसरले. "म्हणजे ते ... ते तू जमवून आणलंस? ऋजुताला घरी तू बोलावलंस? कसं काय मॅनेज केलंस ग?" , आश्चर्याने विराजने विचारले.

"मग मी तुला असं इतकं दुःखी कसं पाहू शकणार होते? कुछ तो करना ही पडेगा न? आता बघ कसं समाधानाचं तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावर", विधी मिश्किलपणे म्हणाली.

"पण कसं केलंस? सांग ना", विराजची उत्सुकता वाढली होती.

"अरे, मी रात्रीच ठरवलं होतं, की सकाळी एकदा ऋजुताकडे काकूंना फोन करून ते आलेत का पाहू या. मग आईला काकूंना सांगण्याची आठवण दिली अन लगेच फोन लावलासुद्धा. तर ते सगळे गावाहून आलेले होते. पण ऋजुताशी बोलावं तर ती घरीच नव्हती. मग मी पटकन काकूंना सांगून दिलं की तू आज लंडनला जाणार आहेस."

"आणि काकूंना त्रास दिलास लाडू करायला लावून? कशाला असं करायचं विधी?", विराज समजावण्याच्या स्वरात म्हणाला.

"नाही रे, ते मी नाही सांगितलं त्यांना. ते आईशी बोलणं झालं त्यांचं आणि मग त्या स्वतःहूनच मी पाठवते म्हणाल्या. ठीक आहे न दादा, प्रेमाने करून पाठवलेत त्यांनी . पुढे जाऊन तू जावई झालास की करतीलच ना, तसंच समज ना मग", विधी गालात किंचित हसत म्हणाली. "आणि मुख्य म्हणजे त्या करताना त्यांना ऋजुतानेही मदत केलीय ना, मग काय , सोन्याहून पिवळेच! वो साथ नही है , ना सही. उसके हाथ के बने लड्डू तो हैं ना?"

"हं, हो ना . खूपच गोड फीलिंग आहे ही", विराज गालात हसत म्हणाला. "एकदा भेट झाली. ऑफिसच्या कामाबद्दलही बोलणं झालं ते बरं झालं. तिलाही ऑफिसमध्ये गेल्यावर धक्का बसला असता नाहीतर. थँक्स टू यू."

"आणि दादा , मला तिला सॉरी म्हणून ते सॉर्ट आऊटही करायचं होतंच . तेही झालं.", विधी म्हणाली.

"हो ग", विराज.

"आणि काय रे, तू तर एकदम , माझी वाट बघशील का वगैरे... हं?", आता विधी चिडवण्याच्या मूडमध्ये होती.

"हं, ते...", विराज केसातून हात फिरवत किंचित लाजत होता.

"ओ हो! काय ब्लश करतोय दादा! अरे, निघण्याची वेळ झाली होती आणि बाबाही विचारत होते, म्हणून मला डिस्टर्ब करावं लागलं. काश ! और थोडा वक्त अपने पास होता!", विधीचा स्वर किंचित उदासवाणा झाला होता.

"अग विधी, ठीक आहे ग. माझ्यासाठी एवढेही खूप आहे सध्या. एनर्जी बूस्टर मिळाले मला. आता एकदम छान राहीन मी. काळजी करू नकोस तू", विराज म्हणाला.

तेवढ्यात वीणाताई आणि विनीत आले. वीणाताईंनी विचारले, "विराज, कधी पोचशील तू?"

"अग आई , दुपार होईल मला . मध्ये हॉल्ट सुद्धा आहे ना, फ्लाईट बदलायचं असल्यामुळे . बाबांकडे मी सगळे डिटेल्स दिले आहेत. ", विराज.

"बरं. पोचल्यावर कळव. तोपर्यंत काही चैन पडणार नाही आमच्या जीवाला."

"आई, मी सांगेनच पोचलो की. सरळ हॉटेलमध्येच जाईन ग, नको ना एवढी काळजी करू. मी करेन सगळं बरोबर.

"श्रीमतीजी, मोठा झालाय आपला बाळ आता, करेल तो सगळं नीट", विनीत म्हणाले.

"अहो, परदेश आहे ना तो, त्यात पहिल्यांदा आणि एकटाच जातोय. मग काळजी नाही का वाटणार?", वीणाताई.

"आई, तिथली मुख्य भाषा पण इंग्लिशच आहे, त्यामुळे तीही अडचण नाही. वाटलं तर विचारता येतं कोणालाही. निर्धास्त रहा तू .", विराज समजावत म्हणाला.

"बरं, अरे रेखाताईंचा रजतही आहे न तिथे? त्यांच्याकडून त्याचा नंबर तरी घेतला असता. लक्षातच राहिलं नाही माझ्या", वीणाताई डोक्याला हात लावत म्हणाल्या.

"डोन्ट वरी आई, मी पाठवेन दादा तुला रजतचा नंबर", विधी सहजपणे म्हणाली. तसे विराज आणि सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागले की हिच्याकडे कसा असेल नंबर?

त्यांना तसं बघताना पाहून विधीच्या डोक्यात प्रकाश पडला की ती काय बोलून गेलीय . तिने मनात म्हटले, "झालं, झाली गडबड! आता कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणजे मिळवलं."

"अरे, म्हणजे ऋजुताकडून घेऊन पाठवेन थोडया वेळात , दादा आता सगळ्या फॉर्मालिटीज मध्ये बिझी होईल ना, म्हणून मी घेऊन पाठवते असं म्हटलं मी", विधीने सारवासारव केली.

"हं, पाठवून देशील", वीणाताई.

तेवढ्यात ते विमानतळावर पोचले. विराजला सोडून विधी, वीणाताई आणि विनीत परत निघाले .

असेच दोन तीन तास गेले. विराज एअरपोर्टला सगळे सोपस्कार आटपून बोर्डिंग सुरू होण्याची वाट बघत बसला होता. आणखी बराच वेळ होता. तो सहज फोन चाळू लागला. तेवढ्यात त्याला ऋजुताच्या नावासमोर typing ....
म्हणजे ऋजुता काहीतरी मेसेज लिहितेय असं दिसलं. त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलं. स्माईल करतच तो वाट बघू लागला. पण हे काय, मेसेजही नाही अन आता Typing सुद्धा नव्हतं. तो काहीसा खट्टू झाला. पुन्हा एक मिनिटाने Rujuta typing .... पण पुन्हा तसंच. ती मेसेज काही पाठवत नव्हती.

"आठवण तर येतेय मॅडमना , पण मेसेज करण्याची हिंमत होत नाहीये तर!  वेडू, इतकं वाटतय तर बोलावं ना", विराज विचार करता करता गालात हसत होता.

शेवटी त्यानेच मेसेज केला, "काय ग, काय मेसेज लिहिते आहेस केव्हाची? आणि पाठवत मात्र नाहीये?"

"अं, काही नाही. मला वाटलं बिझी असशील तर ... म्हणून नाही केला", ऋजुता.

"तुझ्यासाठी नेहमीच वेळ आहे ग :-)
बोल , काय म्हणतेस? ", विराज.

"सहजच. निघालेत का काका काकू परत? झालं का चेक इन वगैरे?", ऋजुता.

"हो, गेले ते थोडया वेळापूर्वी.  माझंही झालं सगळं , बसलोय आता फ्लाईटची वाट बघत . ", विराज.

"अच्छा. ",ऋजुता.

"अग तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. आपल्या टीमने काल मला इतकी छान पार्टी दिलीय न! माझ्यासाठी खूप खूष होते सगळे. मी फोटो पाठवतो तुला.", विराज.

"अरे वा, छान झालं पार्टी दिली तर. पाठव फोटो. खूप एक्साईटेड असशील ना तू?", ऋजुता.

"हो ना", विराज.

"माझा तर खूप गोंधळ उडतोय", ऋजुता.

"का ग? काय झालं?"

"असं काहीसं रिकामं रिकामं , एकटं वाटतय. एकटंच प्रवाहात पडल्यासारखं वाटतय. रिकामंही वाटतय अन एवढी मोठी जबाबदारी येऊन दडपून गेल्यासारखंही वाटतंय, दोन्ही एकाच वेळी", ऋजुता.

"ये तो शुरुआत है मॅडमजी, आगे आगे देखो होता है क्या." विराज गालात हसत मनाशी म्हणत होता." वेडू, सॉरी ग, तुला असा त्रास देतोय. पण बिलीव्ह मी, आपल्यासाठीच करतोय मी असं. बाबांचं म्हणणं पटतंय मला", तो मनाशी म्हणाला.

"ऋजू, काळजी करू नकोस. विचार करणं सोड अन मस्तपैकी झोप आता. मला तर खूप झोप येतेय", विराज.

"ए तू नको झोपूस आता, नाहीतर फ्लाईट पोचेल लंडनला अन एक्साईटेड विराज राहील इथेच :-D" , ऋजुता हसत म्हणाली.

विराजही हसला.

"तू म्हणशील तर थोड्या वेळानंतरचा अलार्म लावून ठेवू का मी? म्हणजे तू गेलास की इथेच राहिलास झोपेत, ते चेक करायला ", ऋजुता हसून म्हणाली.

"ही ही ही, काहीही हं, इथे इतकी गर्दी आणि चहलपहल आहे ,  की आरामात जागा राहीन मी" , विराज .

"वेडू, आजची इतकी सुंदर भेट डोळ्यासमोर असताना झोप कशी येईल मला", तो मनात म्हणाला.

"बरं, हॅपी जर्नी अँड टेक केअर. बाय", ऋजुता.

"बाय", विराज.

काही वेळाने,

विराज विमानात आपल्या जागेवर बसून स्थिरस्थावर झाला होता. आता झोपावे म्हणून त्याने डोळे मिटले. तर डोळ्यासमोर ऋजुता डोकावली आणि त्याच्या चेहऱ्यावर आपसूक हसू उमलले. "झोपू देणार नाहीसच न तू मला?", मनात म्हणत खुषीतच तो निद्रादेवीची आराधना करू लागला.

चार पाच तास उलटले होते. विराज आपल्या जागेवर बसलेला होता. त्याला दिसले, की ऋजुता त्याच्यासमोर स्माईल करत उभी आहे आणि त्याला ऑरेंज ज्यूस देतेय. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि ज्यूसचा ग्लास हातात घेण्याचे सोडून तो एकटक तिच्याकडे पाहतच राहिला. एक दीड मिनिटे अशीच गेली असतील. मग ती म्हणाली,

"सर, धिस इस युअर ऑरेंज ज्यूस अँड ब्रेकफास्ट. डू यू वॉन्ट एनिथिंग एल्स लाईक टी ऑर कॉफी?"

विराज गडबडला. क्षणभरात त्याला आठवले की आपण कुठे आहोत. मग तो भानावर आला .आजूबाजूला बघितलं तर सकाळ होत होती. विराजची झोप अर्धवट झाली होती. त्याला दिसले की एअर हॉस्टेसेसची सर्व प्रवाशांना चहा कॉफी आणि ब्रेकफास्ट देण्याची लगबग सुरू होती. कारण थोड्या वेळात फ्लाईट लॅन्ड होणार होते. त्याला कळले की एक एअर हॉस्टेस आपल्याला ज्यूस आणि ब्रेकफास्ट देतेय. मग लगेच सावरून बसत त्याने ते घेतले आणि म्हणाला.

"थँक यू. धिस इज इनफ " , मग जरा थांबून पुढे म्हणाला, "सॉरी, आय वॉज थिंकिंग अबाउट समवन एल्स सो इट हॅपन्ड बाय मिस्टेक . आय एम सॉरी."

"येस, आय कॅन अंडरस्टँड, इट्स ओके", असं म्हणून हसून ती एअर होस्टेस पुढे गेली.

ब्रेकफास्ट करता करता विराज स्वतः शीच म्हणाला, "काय विराज, काय वाटलं असेल त्या बिचाऱ्या एअर होस्टेसला? तिला काय माहिती की तिच्या जागी तुला ऋजुता दिसत होती. यापुढे सांभाळून वाग."

चुकूनही कधी चुकीचे न वागणारा विराज . त्याच्याकडून अनावधानाने, अर्धवट झोपेत असताना जरा एकटक बघितल्या गेले तेवढ्याचेसुद्धा त्याला वाईट वाटत होते. आणि मला असं काय होतंय, असा ऋजूचा भास होतोय, ती समोर असल्यासारखी वाटतेय, तिचं निखळ, निर्व्याज हसू आठवतंय, मी कसा होतो अन असा कसा होतोय, असं म्हणून त्याला स्वतःचं हसूही येत होतं.

काही वेळाने फ्लाईट लॅन्ड झाली . विराजने उतरताना पुन्हा एकदा त्या एअर होस्टेसची माफी मागितली आणि तो बाहेर आला.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.

सर्व वाचकांना अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद. 

🎭 Series Post

View all