दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 3

Drushti, drushtikon, ani, marathi, katha, kathamalika, sight, perspective, Viraj, Rujuta, Rohit, Party, office

मागील भागात आपण पाहिले ...

विराजशी बोलणे सुरू असताना ऋजुताला रस्त्याच्या कडेला हातात काठी घेतलेला, एक वृद्ध अंध माणूस बऱ्याच वेळापासून रस्ता क्रॉस करण्यासाठी ताटकळत उभा असलेला दिसला . ती गाडीतून उतरली आणि त्यांना रस्ता क्रॉस करून देऊन समोरच असलेल्या क्लिनिक मध्ये तिने पोचविले . यात वेळ जाऊन उशीर होत असल्याने विराज तिच्यावर भडकला होता. तिने शांत राहून परिस्थिती सांभाळली. क्लाएंट ऑफिसमध्ये उत्तम रीतीने प्रेझेंटेशन दिले. आणि विराज च्या टीम ने प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करून दिला. प्रोजेक्ट यशस्वी झाल्याबद्दल रोहितने ठेवलेल्या छोटेखानी पार्टी साठी टीमबरोबर जायचे ठरले. ऋजुताने त्यासाठी unique ठिकाण सुचविले.
चला तर मग त्यांच्याबरोबर आपणही जाऊ या ...

*****

दुसऱ्या दिवशी सकाळी

ऋजुता च्या घरी ...
ऋजू, चल ग , नाश्ता तयार आहे  ", ऋजुताची आई ऋजुताला स्वयंपाकघरातून आवाज देत बोलवत होती. ऋजुता खोलीबाहेर येऊन आईच्या मागे येऊन तिच्या गळ्यात पडली . " माझी प्यारी मम्मी....  तूच माझी मदत करू शकतेस.... तुझ्या बेटीला किती मोठा प्रश्न पडला आहे ...", लहान मुलं बोलतात तशा आवाजात छोटासा चेहरा करून ऋजुता लाडिकपणे आईला म्हणत होती.

"हो का ? सांग , काय हवंय? आई तिच्याकडे वळत हसून  म्हणाली.

"अग हे काय? तयार नाही झालीस अजून ?", आईने आश्चर्याने विचारले.

"हं कळलं मला आता. तुला कोणता प्रश्न पडलाय ते .चल ... वेडी मुलगी ", असं म्हणत आई ऋजुताला खोलीत घेऊन गेली .
"हं सांग आज का एवढा प्रश्न पडलाय ?" , आई.

"अग आई कालपर्यंत आम्ही जो प्रोजेक्ट करून दिला ना, त्याचे क्लायंट रोहित... ते आज आम्हाला पार्टी देणार आहेत ... तर आज ना ऑफिसमधुन आम्हाला त्यासाठी जायचं आहे . तर एखादा चांगला ड्रेस सुचव ना कोणता घालू ते . म्हणजे जो फार झकपक ही नको, ऑफिसला चालायला हवा आणि पार्टी मध्येही चांगला वाटायला हवा . खूप खुश आहे मी आज ! मस्त तयार व्हावसं वाटतंय. खूप दिवसांनी असा शांततेचा वेळ मिळतो आहे ना ! ", ऋजुताने सांगितले.

आई तिच्या कपाटात ड्रेसेस बघत होती.

"हं हा घे . हा दोन्हीसाठी छान दिसेल.", आईने एक ड्रेस कपाटातून काढला.

"हं, हा खूप छान दिसेल. बघ मी म्हटलं ना ,तूच माझी मदत करू शकशील ...थँक्यू ....आता आलीच बघ पाच मिनिटात. बाबा, तू आणि मी सोबतच नाश्ता करू . बाबाही येतीलच ना तेवढ्यात फिरून. ", ऋजुता म्हणाली.

थोडया वेळाने ...
तयार होऊन बाहेर आलेल्या ऋजुताला आईसुद्धा बघतच राहिली. आईने सुचवलेला आकाशी रंगाचा, गळ्याशी बारीक सिल्वर एम्ब्रोईडरी असलेला सोबर आणि एलिगंट ड्रेस... त्यावर त्याच रंगाची शिफॉन ची ओढणी ...ओढणीवर मध्ये मध्ये सिल्वर कुंदन आणि किनारीला सिल्वर लेस लावलेली होती. कानात सिल्वर रंगाचे नाजूक कानातले... गळ्यात मॅचिंग नाजूक पेंडंट...  हलकासा लाईट मेक अप, डोळ्यांना बारीक लायनर ...नॅचरल लाईट पिंक रंगाची हलकीशी लिपस्टिक ... थोडे केस छोट्याशा क्लचरमध्ये लावून बाकी खांद्यावर मोकळे सोडलेले... खूपच सुंदर दिसत होती ऋजुता.

तेवढ्यात बाबाही आले. येताच म्हणाले," अरे वा! आज काही खास तयारी वाटतं ?...".

"हो , आज ऑफिसमधून एका पार्टीला जायचे आहे. त्यादिवशी  तुम्हाला सांगितले होते ना, त्या नवीन क्लायंट बद्दल... ते रोहित सर... त्यांनी सर्वांसाठी आज project success पार्टी ठेवली आहे. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अर्जंट प्रोजेक्ट होता हा", ऋजुता.

"छानच ! असेच छान काम करत राहा बेटा ", बाबा.
तिघांनीही सोबत नाश्ता केला आणि ऋजुता ऑफिस साठी निघाली.

तोपर्यंत विराजकडे घरी...

"विधी , हे थालीपीठ नेऊन दे दादाला ....त्यातले दही घे बरोबर थोडेसे" , एका भांड्याकडे निर्देश करत आई विधीला म्हणाली.

विधीने प्लेट विराजला दिली.

"आई ,अमूल बटर दे ना यावर", विराज थालीपीठाकडे बघत म्हणाला.

"अरे बटर संपले आहे. यावेळी सामानाच्या यादीत लिहायला मी विसरले होते. त्यामुळे बाबांनी ते आणले नव्हते.", आई.

"ए काय ग, तुला माहिती आहे ना, मला थालीपीठ बरोबर अमूल बटर फार आवडते ", विराज नाराज होत म्हणाला.

"चुकून राहिलं रे ते या वेळी ... तू तर कधी लक्षही देत नाहीस घरात काय सामान हवं आहे ते आणि असा ओरडतोस? आज दह्याबरोबर खा ना. ते पण छान लागतं", आई समजावत म्हणाली. विराज थालीपीठ दह्याबरोबर खाऊ लागला.

"दादा, झाला का रे मग तो नवीन क्लायंटचा प्रोजेक्ट पूर्ण? इतक्यात रोज बराच उशीर होत होता ना तुला यायला. कालही जेवून लगेच झोपलास. त्यामुळे काही बोलणंच झालं नाही आपलं", विधीने डायनिंग टेबल वर त्याच्याजवळ येऊन बसत  विचारले.

"हो, कालच झालं ते सगळं पूर्ण. म्हणूनच काल जरा निवांत झोप हवी होती ग", विराज खाता खाता सांगत होता.

"अँड यू नो व्हॉट, क्लायंट ने आज पार्टी सुद्धा ठेवली आहे आमच्या पूर्ण टीम साठी .

"वाह दादा , मस्तच ना" , विधीलाही आनंद झाला होता. "ऋजुताही येईल ना मग तुझ्याबरोबर ? मज्जा आहे बाबा !", विधी विराजला चिडवत हसत म्हणाली.

" तू ना , आजकाल फारच बोलायला लागली आहेस ", विराज रागावला .

"आई येतो ग मी.", असे म्हणून विराजने बॅग खांद्याला अडकवत कारची चावी घेतली आणि ऑफिसला निघाला.

ऑफिसमध्ये....

ऋजुता ऑफिसला तिच्या जागेवर पोचली. क्युबिकलमध्ये ऋजुताच्या बाजूलाच निकिता बसायची ."हाय निकिता, गुड मॉर्निंग ", ऋजुता खांद्यावरची बॅग काढून डेस्क वर एका बाजूला ठेवत निकिताला म्हणाली.

निकिता मागे वळत "गुड मॉर्निंग... wow!!  किती सुंदर दिसते आहेस आज ऋजुता !! कोणाची विकेट उडवायचा इरादा आहे मॅडम?".

"कसली विकेट बिकेट ग ? सहज असाच मूड झाला आज छान तयार होण्याचा. आणि खूप दिवसांनी शांततेचा वेळसुद्धा मिळाला. ", ऋजुता आपला लॅपटॉप काढून सुरू करत म्हणाली.

"आणि तूसुद्धा एकदम छान आणि एकदम फ्रेश दिसत आहेस  , charming as usual...", ऋजुता तिला छानसे स्मितहास्य देत म्हणाली आणि मेल बघू लागली.

"ऋजुता मॅडम, तुम्हाला विराज सर केबिनमध्ये बोलवत आहेत " , ऑफिस बॉय रघूने निरोप दिला .

"ठीक आहे, जाते मी . का रे मूड कसा दिसतोय सरांचा?", अचानक बोलवल्यामुळे ऋजुताने विचारले.

"ठिक तर वाटतंय, जावा तुम्ही ", रघू म्हणाला .

"हा प्रोजेक्ट तर झाला. आता कशाला बोलावलं असेल जमदग्नींनी आल्याआल्याच... ", मनाशी पुटपुटत ऋजुता विराजच्या केबिन कडे यायला निघाली .

ती येताना विराजला केबिन मधूनच दिसली.

"छानच दिसते आहे ही आज . पण एकटीच काय बडबड करते आहे कोणास ठाऊक", विराज मनाशी विचार करत होता.

"काही काम होतं , सर?", ऋजुताने केबिन मध्ये येत विचारले.

"हो, ये. ऋजुता, रोहितचा प्रोजेक्ट कोण मॉनिटर करत आहे आपल्या टीममधून? ", विराजने विचारले.

"मी प्रसादला सांगितलं आहे, कालपासून तो नीट मॉनिटर करतो आहे. गरज वाटली तर निकिताची मदत घ्यायला सांगितलं आहे", ऋजुता.

"ओके. तुला तर माहिती आहे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे...आपण कशा परिस्थितीत आणि कशाप्रकारे हा प्रोजेक्ट पूर्ण करून दिला आहे...", विराज.

"हो सर, आपला आधीचा प्रोजेक्टही सुरु असल्यामुळे अर्धी टीम काही दिवस त्यामध्ये व्यस्त होती ", ऋजुता म्हणाली .

"आपण सर्वांनी दिवस-रात्र मेहनत करून हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला आहे..... ", ऋजुता पुढे म्हणाली.

"हं... हो आणि फक्त अर्ध्या टीमकडून हा प्रोजेक्ट पंचेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे आपण राकेशच्या टीममधल्या दोघांना यात काही दिवसांसाठी सामील करून थोडसं काम वाटून दिलं होतं. पण... या सर्व गोष्टी आपल्या कंपनीच्या खाजगी किंवा इंटर्नल गोष्टी आहेत..... आज पार्टीच्या वेळी याबद्दल तिथे बोलायचं नाही.... ", विराजने ताकीद दिली.

"हो, ना, प्रोफेशनलिझम तर फक्त यांनीच घोटून प्यायलंय ना. असे सांगताहेत जसे काही मला तर काही कळतच नाही ...", ऋजुता मनातच विचार करत होती.

"हो, सर मला कल्पना आहे की इंटर्नल गोष्टी शक्यतो इंटर्नल च ठेवाव्यात. मी नाही बोलणार काही त्याबद्दल " , ऋजुता म्हणाली.

"हं, तू तर शिकली आहेस हे सर्व आता... पण बाकी टीमलाही तशी कल्पना देऊन ठेव, खास करून ज्युनिअर मेंबर्स ना. ... ", विराज.

"अच्छा तर .. कळतंय तर तुम्हाला ... नशीब माझं", ऋजुता पुटपुटली.

"काय म्हणालीस?", विराज.

"अं, काही नाही , ओके म्हणत होते... ओके सर ", ऋजुता दचकून म्हणाली.

"आणि आणखी एक, रोहितचा फोन आला होता . त्यांच्या एच आर ने त्या हॉटेलशी बोलून संध्याकाळी पार्टीची व्यवस्था केली आहे . त्यामुळे आपल्याला संध्याकाळी जायचं आहे . सर्वांना सांगून दे. साडेसहा वाजता सर्वांना जाण्यासाठी तयार राहायला सांग. राकेशच्या टीम मधल्या त्या दोघांनाही बोलावून घेशील", विराज म्हणाला.

"ओके सर, सांगते मी सर्वांना...", ऋजुता म्हणाली आणि कॅबिनमधून बाहेर पडली.

जागेवर पोचताच निकिताने विचारले , "काय म्हणाले ग जमदग्नी, गरजले तर नाही ना?"

"नाही ग, तेच सांगतेय मी आता सर्वांना", ऋजुता.

"Team, please come here.",  ऋजुताने तिच्या क्युबिकल मध्ये उभे राहत सर्वांना एका ठिकाणी बोलावले.

"सर्वांसाठी जमदग्नींनी एक ताकीदवजा सूचना दिली आहे , आपण प्रोजेक्ट पूर्ण करताना वेळेच्या बाबतीत किंवा इतरही बाबतीत ज्या काही अडजस्टमेंट्स केल्या होत्या ... त्यांच्याबद्दल किंवा कंपनीच्या इतर खाजगी आणि इंटर्नल गोष्टींबद्दल क्लायंट कडे वाच्यता करायची नाही. आणि तसंही हे नवीन क्लायंट आहेत " , ऋजुताने सांगितले.

"आता हे काय आम्हाला कळत नाही का?", प्रसाद खांदे उडवत म्हणाला.

"कळतं ना रे, पण आठवणीत राहावं आणि टीममधल्या नवीन लोकांनाही कळावं म्हणून निरोप पाठवला आहे."

"इंटर्नल गोष्टी म्हणजे?", एका ज्युनिअर ने शंका विचारली.

ऋजुताने मग त्याला समजावून दिले आणि विराजचे म्हणणे पण सांगितले...

"आणि हं, सर्वजण आपापली महत्वाची कामे जी असतील ती आधी आटपून घ्या. त्या कामांना उशीर व्हायला नको. रोहित सरांचा निरोप आलाय की संध्याकाळी पार्टी ठेवली आहे .  साडेसहा वाजता जायचं आहे".

"यार, I am so excited!! कधी एकदा निघतोय पार्टीला असं वाटतंय.", निकिता उत्साहाने म्हणाली.

"Yes. Now that we have worked hard, we will party .... ?", ऋजुताने भुवया उंचावत आणि एक हात टाळीसाठी उंचावत उत्तरादाखल टीमकडे पाहिले.

"Harder ...", सर्वजण टाळी देत आनंदाने एकसुरात पण थोडया हलक्या आवाजात ओरडले.

"शू ss जरा हळू ...", ऋजुता हसत म्हणाली. "ऑफिसमध्ये आहोत ना, जास्त गोंधळ नको. इतर लोकांना त्यांच्या कामात व्यत्यय नको न यायला ".

"चला आता कामाला लागू या", ऋजुता म्हणाली आणि आपल्या कामाला लॅपटॉपकडे वळली.

"ओके", म्हणून सर्वजण आपापल्या जागी जाऊन कामाला लागले.

संध्याकाळी ...

सहा वाजले तसे सर्वजण पार्टी मूड मध्ये आले. विराजच्या गाडीत बसतील तेवढे जण गाडीने, तर बाकी सर्व आपापल्या बाईकने जायला निघाले.

"ऋजुता, तू समोर बस. मला रस्ता सांग ", विराज ऋजुताला म्हणाला.

ऋजुता समोर बसली आणि तिने GPS सुरू करून त्यात ठिकाणाचे नाव टाकले आणि बाजूला  विराजलाही बघता येईल असे ठेवले.

"मी फक्त एकदाच गेलेली आहे तिथे बऱ्याच दिवसांपूर्वी, थोडाफार रस्ता आठवेल मला.

गाडीतही सगळेजण मस्ती मूडमध्ये होते. हसणे, गप्पा मारणे  सुरू होते. पण विराज फारसा बोलत नव्हता.

"किती गोंधळ करताहेत!!!  जशी काही कधी पार्टी मिळतच नाही यांना ... कशाला मी या सर्वांना म्हटले की माझ्या गाडीने एकत्र जाऊ ... कलकलीने डोकं दुखायला लागलं आहे ", असे वाटून विराजच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले.

पण तो कोणाला रागवूही शकत नव्हता. आतामात्र विराजला कोणी घाबरत नव्हते. कारण सर्वांनी त्याच्या म्हणण्यानुसार काम तर केलेच होते ना!  सर्वांच्या मते , Now celebration means only celebration!!

"ए याच रस्त्यावर एक Naturals icecream ही आहे पुढे. आपण येताना खाऊ या ना", एक जण म्हणाला. त्याला सर्वांनीच "हो ss" करून दुजोरा दिला.

अशीच मस्ती करत ते सांगितलेल्या ठिकाणी पोचले. कार पार करून सर्वजण उतरून तिथे गेले....

बारीक पाने असलेल्या शोभेच्या झाडांचे कंपाऊंड .... त्याच्या आतल्या बाजूला सुंदर रंगीबेरंगी फुले फुललेल्या फुलझाडांच्या कुंड्या रांगेने ठेवलेल्या ... चारही कॉर्नरमध्ये शुभ्र रंगाच्या सुंदर शिल्पाकृती उभ्या केलेल्या ...  मध्ये कारंजे आणि त्याभोवती असणारे रंगीबेरंगी लाईट्स ... मधोमध पांढऱ्या शुभ्र आणि गुळगुळीत दगडांची पायवाट तयार केलेली .... तिच्या दोन्ही बाजूंना हिरवेगार लॉन .... दोन्ही बाजूंच्या लॉन वर एकेक खळखळणारा छोटा कृत्रिम धबधबा ... हिरवळीवर टेबल आणि त्याभोवती खुर्च्या मांडलेल्या ... त्या सर्वांना पांढरेशुभ्र कव्हर घातलेले ... टेबल वरती सुरेख फुलदाण्या ठेवलेल्या...

येणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रसन्न करणारी अशी ती सगळी सजावट ... ती बघता बघता सर्वांचे डोळे दिपून गेले होते...

"so beautiful !!!", विराज उद्गारला.

"किती सुंदर आहे ना ही जागा! Wow!!", निकिता आनंदून प्राचीला म्हणाली.

तेवढ्यात रोहितचा विराजला फोन आला. "हॅलो विराज, आम्ही सर्व आलो आहोत. तुम्ही कुठे आहात ? किती वेळ आहे पोचायला? ".

"आम्ही पण आलोय . लॉन मध्ये उभे आहोत. पण तुम्ही कोणी तर दिसत नाही आहात...", विराज.

"अच्छा आलात का, आत या मग रिसेप्शन रूम मध्ये", रोहित.

सर्वजण गुळगुळीत दगडाच्या पायवाटेने आत हॉटेलमध्ये गेले. तिथे रिसेप्शन रूम मध्ये  खिडक्यांना सुंदर पडदे सोडलेले होते. खोलीमध्ये मंद प्रकाशाच्या दिव्यांनी सजावट केलेली होती. मधोमध गुलाबी ,निळा , पिवळा असे एका वेळी एका रंगाचे  मंद लाइट्स लागणारे झुंबर लावलेले होते. त्याचा आळीपाळीने कधी गुलाबी, कधी निळा , कधी जांभळा, पिवळा असा रंगीबेरंगी प्रकाश खोलीभर पडत होता. मंद आवाजात वाद्यसंगीत सुरू होते . एका ठिकाणी रिसेप्शन काउंटर होते.  त्याच्या बाजूला एक भरपूर ड्रॉवर्स असलेले कपाट होते. खोलीच्या चारही बाजूंनी रांगेत भिंतीशी पांढऱ्या रंगाच्या खुर्च्या ठेवलेल्या होत्या . आणि रोहित आणि त्यांची टीम त्यातल्या काही खुर्च्यांवर बसलेले होते.

विराज आणि सर्वजण येताच रोहित उभा राहिला आणि "वेलकम, वेलकम एव्हरीवन", म्हणत सर्वांचे स्वागत केले.

"खूपच सुंदर जागा आहे सर ही  ", निकिता म्हणाली . "आम्हाला इथे इन्व्हाईट केल्याबद्दल थँक यू सर".

" सर्वजण आलेत का सर तुमच्या गृप मधले ?" , रिसेप्शनिस्टने विचारले.

"हो , आलेत", रोहित.

"ओके, या माझ्या मागे", रिसेप्शनिस्टने सर्वांना तिथल्या एका हॉल मध्ये नेले.

हॉल मध्ये काही खुर्च्या मांडलेल्या होत्या. भिंतीवर वेगवेगळ्या फ्रेम्स मध्ये सुरेख चित्र लावलेले होते. एका बाजूला एक दोन संदूकवजा पेट्या होत्या. खिडक्यांना पडदे लावलेले होते.

"रूही, आलेत सर्वजण. तू करू शकते आता सुरवात", रिसेप्शनिस्ट तिथल्या एका मुलीला म्हणाली.

"हॅलो एव्हरीवन... मी रूही. आपण आता काही गेम्स खेळणार आहोत", रूही.

"Wow, गेम्स सुद्धा!!", प्राची.

"सो आर यू ऑल एक्सइटेड?", रूही.

"येस", सर्वजण मोठ्याने म्हणाले.

"पहिला गेम कसा आहे ऐका ...
मी काही वस्तूंच्या जोड्या बनवून या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या आहेत. मी या काचेच्या वाटीतल्या चिठ्ठ्यांमधली एक एक चिठ्ठी उचलणार. त्या चिठ्ठी वर असलेल्या वस्तूंची नावे वाचून दाखवणार. ती वस्तू ज्यांच्याकडे आहे अशा दोघांनी पुढे यायचं आणि एका गाण्याचं एक कडवं किंवा  काही ओळी गायच्या.", रूही.

"चला, सोपा वाटतो मग तर", प्रीती.

"हं, पण आता गाणं कसं गायचं आहे ते बघा....
जर समोर येणारे दोघे जण दोघेही पुरुष असतील, तर त्यांनी असं गाणं गायचं , की जे गाणं गाणारे दोघेही गायक पुरुष असतील.

जर पुढे येणाऱ्या दोघीही मुली असतील तर त्यांनी असं गाणं गायचं की जे दोन गायिकांनी एकत्र गायलेलं आहे.

आणि असेच नियम एक मुलगा आणि एक मुलगी अशा जोडीसाठी सुद्धा लागू होतील. त्यांनीही एक युगलगीत गायचं, वस्तू शोधून काढणे, दाखवणे आणि गाणे आठवून ते गाणे यासाठी मिळून दीड मिनिटे मिळतील... ओके? करायची सुरवात?", रूही.

"हो..", प्रीती , निकिता, प्रसाद उत्साहाने म्हणाले.

"ओके ... तर पहिल्या चिठ्ठी वर काय लिहिलंय बघू या...", काचेच्या मोठ्या वाटीतून एक चिठ्ठी काढत रूही म्हणाली...

"पेन आणि डायरी... हे ज्यांच्याकडे आहे त्यांनी पुढे यावे", रूही.

रोहित कडे पेन होता आणि प्रसादच्या खिशात छोटीशी डायरी होती.. त्यांनी हात वर करून त्या वस्तू दाखवल्या.

"पुढे येऊन गाणं गायचं आहे तुम्हाला... या लवकर"

दोघेही पटकन पुढे आले , गाणं मात्र दोघांनाही पटकन आठवेना... एक मिनिट संपला ... तेवढ्यात रोहितला गाणं आठवलं आणि त्याने पटकन सुरू केलं, त्यामगोमाग प्रसादनेही ते गाणं गायला सुरवात केली.

  "ये दोस्ती हम नही तोडेंगे ...तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे ....", रोहित, प्रसाद.

सर्वांनी टाळ्या वाजवत आणि त्यांच्याबरोबर गाणं गुणगुणत दोघांना साथ दिली.

"Nice song!!
पुढच्या चिठ्ठीवर आहे अंगठी आणि गळ्यातली चेन", रूही.

"माझ्याकडे आहे" , गळ्यातली  नाजूकशी सिल्वर चेन दाखवत ऋजुता उत्साहाने म्हणाली आणि पुढे आली.

विराजच्या बोटात दोन अंगठ्या होत्या. तोही त्या दाखवत पुढे आला...

" गुड चला आता गाणं", रुही म्हणाली

विराजने लगेच गाणे सुरू केले .

"न जाने मेरे दिल को क्या हो गया
अभी तो यहीं था अभी खो गया ", विराज.

"ओ हो .... विराज यू रॉक ", टाळ्या वाजवत रोहित जागेवरून म्हणाला ..

"न जाने मेरे दिल को क्या हो गया
अभी तो यहीं था अभी खो गया ", विराज.

"हो गया है तुझको तो प्यार सजना ...
लाख कर ले तू इनकार सजना
दिलदार सजना, है ये प्यार सजना ... " , ऋजुता

"Wow such a lovely song it is...", रूही.

दोघेही परत आपापल्या जागेवर बसले.

" Next, लिपस्टिक आणि फेस पावडर " , रूही.

निकिताच्या पर्समधील लिपस्टिक होतं. तिने ते काढून दाखवले . फेस पावडर प्रीतीच्या पर्स मध्ये सापडली. . दोघी पटकन समोर आल्या आणि गाणे गायले

"हे डोला रे डोला रे डोला रे डोला
हाय डोला दिल डोला मन डोला रे डोला", प्रीती, निकिता.

सर्वजण गाण्यावर ताल धरत टाळ्या वाजवत प्रतिसाद देत होते. एक कडवे गाऊन दोघीही आपल्या जागेवर जाऊन बसल्या.

अशाच आणखी काही गाण्यांनंतर हा गेम संपला.

"आता यानंतर आपण खेळणार आहोत पुढला गेम .. तुम्ही सगळे मिळून तीन ग्रुप्स बनवा. प्रत्येक ग्रुपमध्ये काही मुले आणि काही मुली असे असावे. पहिला क्लू सापडल्यानंतर पुढचे क्लू शोधत शोधत खजिना शोधायचा आहे", रूही.

एक गृप ए रोहितचा : त्यात प्रीती,  पवन आणि मानव 
दुसरा गृप बी विराजचा : त्यात प्राची, प्रियंका आणि रवी आणि
तिसरा गृप सी ऋजुताचा : त्यात निकिता, प्रसाद आणि एक मुलगा . असे तीन गृप बनले.

सर्वांना रूहीने गेम समजावून दिला.
"ए गृपने निळ्या, बी गृपने पिवळ्या आणि सी गृपने गुलाबी रंगाचे क्लू लिहिलेले कागद शोधायचे . प्रत्येक क्लू सापडलेल्या ठिकाणी पुढचा क्लू शोधायचा. शेवटच्या क्लू नंतर खजिना ज्या गृपला सर्वात आधी मिळेल तो गृप जिंकेल. प्रत्येक क्लू शोधल्या नंतर त्यासाठी पॉइंट्स मिळतील. ज्या ग्रुपला पॉइंट्स जास्त तो रनर अप म्हणजे उपविजेता होईल. चला सुरू करू...", रूही. तिने तिघांना एक एक चिठ्ठी दिली. त्यावर पहिला क्लू लिहिला होता.

मी कधी चुकणार नाही
खोटे कधी सांगणार नाही
जे दिसेल तेच खरे असेल
पटले तर माना नाहीतर नाही

सर्वजण विचार करत इकडे तिकडे बघायला लागले. ऋजुताच्या डोक्यात एकदम चमकले. हॉलमध्ये दोन भिंतींवर सुंदर डिझाइन असलेले गोलाकार आरसे बसवले होते. तिने निकीताच्या कानात काहीतरी सांगितले. आणि त्या दोघीही एकेका आरशाजवळ जाऊन शोधू लागल्या. निकिताला पुढचा क्लू सापडला. तिने तो ऋजुता आणि तिच्या टीमला दाखवला आणि ते पुढे शोधायला लागले.

तोवर इकडे ए आणि बी टीमही आपापल्या मार्गाला लागल्या होत्या.

दृष्य असे बहु सुंदर
थेंब थेंब पडता
आणी शहारा अंगावर

विराज ला हा क्लू मिळाला होता, त्याने टीमला दाखवला. ते विचार करू लागले... थेंब ... म्हणजे पाणी.. नळ...पण हे तर काही इकडे दिसत नाही आहे ... अचानक विराजला हॉटेल मध्ये येतानाचे दृष्य आठवले.. येस येस आय गॉट इट  ! चला  ... तो टीमला घेऊन कारंजा जवळ गेला. तिथे एका दगडाखाली प्राचीला पुढची चिठ्ठी सापडली.

खऱ्याचे प्रतिबिंब जणू
कला ही अतिसुंदर
प्रेक्षकही तिज हवा
दृष्टीने कलाकार

टीम ए मधल्या रोहितला हा क्लू सापडला... प्रीतीने हळूच सर्वांचे लक्ष समोरच्या पेंटिंग्ज कडे वेधले... आणि तिथे गेल्यावर त्यांना पुढचा क्लू सापडला.

अशा रीतीने गेम पुढे सुरू राहिला. हिरवळीवरच्या शिल्पाकृती जवळ , फुलझाडांच्या कुंडीत , गुलाबाच्या झाडावर, अशा अनेक ठिकाणी क्लू शोधत शोधत हा गेम शेवटी संपला.

ऋजुताची टीम खजिन्यापर्यंत सर्वात आधी पोचून या गेम मध्ये विजयी झाली तर रोहितची टीम सर्वात जास्त पॉइंट्स मिळवून उपविजेता ठरली.

टीममध्ये सिनिअर असूनही रोहित सर्वांबरोबर किती आनंदाने आणि खेळीमेळीने राहतो, हे गेम्स खेळताना विराजच्या लक्षात आले. ऋजुता, निकिता, प्रसाद आणि बाकी टीम यांचा उत्साह तर आल्यापासून नुसता ओसंडून वाहत होता.

आता रुहीने सर्वांना वेगवेगळे प्रॉप्स दिले . त्यात कागद कापून बनवलेला मोठ्ठा रंगीत  चष्मा, कागदाच्या मोठमोठ्या मिशा, लाल कागदाचे हार्टस , परीकडे असते तशी जादूची कांडी, मिकी आणि मिनी माऊस चे मास्क , हॅट इत्यादी अनेक गोष्टी होत्या.  वेगवेगळ्या प्रॉप्स सोबत सगळ्यांनी एकत्र भरपूर फोटो काढले.

"आय होप , यू ऑल एंजॉईड द गेम्स", रूही.

"येस येस. खूप मजा आली आम्हाला  ", सर्वजण.

"थँक यू सो मच", रोहित आणि ऋजुता म्हणाले.

एवढी सगळी मस्ती झाल्यानंतर आता पोटात भुकेची जाणीव सर्वांनाच झाली होती.

"इथे बसून घ्या सर थोडा वेळ". रुहीने सर्वांना रिसेप्शन रूम मध्ये सोडले आणि निरोप घेतला.

रिसेप्शन रूम मधली कल्पक , रंगीत आणि मंद प्रकाशयोजना सुखावून जात होती. सर्वजण खुर्च्यांवर बसून गप्पा मारायला लागले.

पाच दहा मिनिटांनी रिसेप्शनिस्टने रंगीत लाईट्स बंद करून अगदी थोडे छोटे लाइट्स लावून खोलीत मंद प्रकाश केला.

आणखी पाच मिनिटांनी तिने आतून तिथे काम करणाऱ्या एका माणसाला बोलावले.

"तुमच्या जवळच्या सगळ्या वस्तू , फोन वगैरे सगळं इथे या कपाटात ठेवा ",  त्या माणसाने सर्वांना  सांगितले.  त्या माणसाचा आवाज करडा वाटत होता, दिसायलाही तो जरा आडदांड वाटत होता...

विराज चमकला, "हे  सगळं कसं काय इथे ठेवायचं? आणि माझा आयफोन सुद्धा ?", विराजला वाटून गेले.

पण तोपर्यंत रोहित आणि इतरांनीसुद्धा आपले सामान ठेवलेले दिसले. मग त्यानेही नाराजीनेच सगळे तिथे ठेवले.

एका ट्रे मध्ये व्यवस्थित मांडलेल्या काळ्या पट्ट्या घेऊन रिसेप्शनिस्ट पुढे आली आणि तिने त्या माणसाला इशारा केला. त्याने भराभर रोहित, विराजसहित सर्व माणसांच्या डोळ्यावर काळी पट्टी पक्की बांधली. तर रिसेप्शनिस्टने सर्व मुलींच्या डोळ्यावर पट्टी बांधली ...  सर्वजण फारच गोंधळून गेले होते. हे काय चाललंय कोणालाच काही कळत नव्हतं....
इकडे जेवायची वेळ झालीय.... पोटात कडकडून भूक लागली आहे .... आणि हे जेवायला द्यायचं सोडून पट्ट्या का बांधताहेत? ....

क्रमशः


©  स्वाती अमोल मुधोळकर

वाचकांच्या भरपूर आणि चांगल्या प्रतिक्रिया ह्याच लेखकांना लिखाणासाठी ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात . त्यामुळे कथेत आतापर्यंत काय काय आवडले हे सढळ हाताने लिहून जरूर कळवत जावे.

🎭 Series Post

View all