दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 2

Drushti, drushtikon, Drishti, katha, marathi, kathamalika, blindness, Viraj, Rujuta, perspective

मागील भागात आपण पाहिले...

दुपारी ऋजुता आणि विराज विराजच्या कार ने मिटींगला जायला निघाले होते. विराज गाडी चालवत होता तर ऋजुता बाजूला बसली होती. त्यांची कामाबद्दल थोडीफार चर्चा सुरू होती. जाता जाता मधेच ऋजुताने विराजला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि खाली उतरली.

आता पुढे...

उतरताना ऋजुताने गाडीत असलेली पाण्याची बाटली पटकन काढून सोबत घेतली होती.
विराजशी बोलणे सुरू असताना ऋजुताला रस्त्याच्या कडेला हातात काठी घेतलेला, एक वृद्ध अंध माणूस बऱ्याच वेळापासून रस्ता क्रॉस करण्यासाठी ताटकळत उभा असलेला दिसला . कोणीही त्याच्या मदतीसाठी थांबत नव्हते. तो बिचारा एकटाच उभा होता. गाड्या भराभर पुढे निघून जात होत्या. उन्हाची वेळ होती.  कदाचित त्यामुळे असेल,  त्यांना गरगरल्यासारखे होऊन तोल जातोय असे वाटत होते. ऋजुताला हे दिसताच ती मागचा-पुढचा कोणताही विचार न करता त्यांच्याकडे गेली . त्यांना बाटलीतले पाणी पाजले . किंचीत हुशारी वाटल्यावर त्यांना
विचारले, "आजोबा, कुठे निघालात एकटेच आणि तेही एवढ्या उन्हाचं?".

"पोरी, समोरच्या रस्त्यावर एक दवाखाना आहे ना तिथे जायचं होतं म्हणून थांबलोय इथे . दोन दिवस झाले तब्येत बरी नाही. हा सर्वात जवळ आहे आणि ओळखीचे आहेत इथले डॉक्टर साहेब. म्हणून इथेच जात होतो. पण गाड्यांची वर्दळ फार जाणवते आहे. कोणी रस्ता क्रॉस करून देईना. तासभर तरी झाला असावा इथे थांबून. उन्हामुळे चक्कर सुद्धा यायला लागली होती. तू पाणी दिलंस ना आता थोडी हुशारी वाटते आहे", आजोबा.

"कोणता दवाखाना? अच्छा तो समोरचा का? चला मी पोचवते तुम्हाला.", ऋजुता समोर दवाखाना शोधत म्हणाली.

रस्ता क्रॉस करून देऊन समोरच असलेल्या क्लिनिक मध्ये तिने त्यांना पोचविले .


"मधेच कुठे गेली आता ही ? ", असे बडबडत विराज सुरवातीला तिला गाडीच्या साइड मिरर मध्ये बघत होता. त्यात दिसेनाशी झाल्यावर खिडकीतून मागे वळून ऋतुजा काय करते आहे ते बघत होता. इकडे जसजसा वेळ पुढे जात होता तसतसा विराजचा पारा चढायला लागला होता.

त्या आजोबांना रस्ता क्रॉस करून देऊन ऋजुता परत कारकडे यायला निघाली . रस्ता परत क्रॉस करून झाल्यावर तिने घड्याळा कडे बघितले. वेळेकडे लक्ष जाताच तिची धाकधूक वाढली.  या गोष्टींमध्ये दहा पंधरा मिनिटे तरी निघून गेली होती . विराज भरपूर ओरडेल तिला आता , याचा तिला अंदाज आला.

मनात म्हणाली , " बाप रे, काही खरं नाही आता.... देवा, वाचव आता या जमदग्नीच्या प्रकोपा पासून !....".

ऋजुता आणि तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणी आपल्या कोड लँग्वेज मध्ये विराजला जमदग्नीचा अवतार म्हणायच्या.

ती कारमध्ये बसताच त्याने कार सुरू केली आणि ते निघाले.

"झालं? की काही शिल्लक आहे अजून? ऋजुता ,सगळी समाजसेवा तुलाच करायची असते का ग? खूपच पुळका येतो तुला. काय गरज होती तुला त्या म्हाताऱ्याला मदत करायची? पाहिलं असतं त्याचं त्याने. उशीर होतोय ना आपल्याला.... ", विराज ओरडत म्हणाला.

"सॉरी सर. समाजसेवा वगैरे नाही.... ते आजोबा, त्यांना बरं वाटत नसल्यामुळे समोरच्या रस्त्यावरच्या क्लिनिक मध्ये जायला निघाले होते.... उन्हामुळे आजोबांना आणखी त्रास होत होता आणि दिसत नव्हते त्यांना डोळ्यांनी ... म्हणून मी त्यांची मदत करायला गेले... आपण जाऊ या ना आता लगेच...", ऋजुता त्याच्या नजरेला नजर न देता आवाज खालीच ठेवत शांतपणे म्हणाली. वाद वाढवून आता दोघांचाही मूड घालवण्यात अर्थ नाही हे तिला कळले होते. म्हणून ती शक्य तितकी शांत राहण्याचा प्रयत्न करत होती.

"हा क्लाएंट वेळेचा अगदी पक्का आहे आणि महत्वाची डील आहे आपली ....हातातून निघून जाईल अशा मूर्खपणामुळे ....I don't want to take a single chance." , विराज चिडलेलाच होता.

ऋजुताने पाण्याची बाटली विराजला देऊ केली.
"प्लीज शांत व्हा ना सर. असं काहीही नाही होणार.... मीटिंग चार वाजता आहे ना, आपण अर्धअधिक अंतर तर आधीच आलोय.... नाहीतरी तिथे वेळेआधी पोचून आपण फक्त वाट बघत बसलो असतो त्यांची.....आणि मी अगदी छान प्रेझेंटेशन देईन , निश्चिन्त रहा तुम्ही.... कधीकधी कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी रोजच्या जगण्यातले फक्त पाच दहा मिनिटं ही पुरेसे असतात सर..... जास्त काहीच करावं लागत नाही... . आपल्याला दृष्टी असूनही जर या गोष्टी दिसल्या नाहीत ....आणि आपण दृष्टीहीन असलेल्यांना मदत केली नाही तर काय फायदा? ..... आपण लवकर निघालोय ना, पोचू आपण वेळेवर....", ऋजुता त्याच्या चेहऱ्याकडे न बघता शक्य तितक्या शांतपणे म्हणाली.

"ही कशी काय इतकी शांत राहू शकते ? आणि कुठून आणते एवढा आत्मविश्वास ? " , विराजला वाटून गेले .
खरंच एखादे चांगले कृत्य केल्यानंतर मिळणारे समाधान आपल्यातील आत्मविश्वास वाढवत असावे. नाही का?  विराजचे मन दुसरीकडे वळवण्यासाठी ऋजुताने गाडीतला रेडिओ सुरू केला. त्यावर गाणं सुरू होतं....

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना
हम चलें नेक रस्ते पे, हम से भूलकर भी कोई भूल हो ना...

हे गाणं लागलेलं ऐकताच ऋजुताने डोक्याला हात लावला, आणि मनात म्हणाली " आता रेडिओलाही हे आताच सांगायचं होतं का, आधीच तर जमदग्नी चा अवतार झाले आहेत सर. ज्वालामुखीचा उद्रेक झालाय नुसता ! कठीणच आहे बाबा, आज तर काही खरं नाही ऋजुता तुझं ".

पण झाले मात्र उलटेच होते. गाण्याच्या या ओळी कानावर पडल्यावर विराजचा राग थोडा कमी झाला होता .  ऋजुताची त्याला शांत करण्याची धडपड बघून त्याला किंचित हसू येत होते. पण चेहऱ्यावर मात्र तसे काही दाखवले नाही त्याने. डोळ्याच्या कोपऱ्यातून विराजकडे बघत तिने चॅनल बदलविले.

जब कोई बात बिगड जाये,
जब कोई मुश्किल पड जाए
तुम देना साथ मेरा...ओ हमनवाss

गाणे वाजू लागले.. आता ऋजुताचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. खरंच  विराजची बात तर बिघडलेलीच होती ना ! एखादे उडते, हलकेफुलके गाणे ऐकले तर त्याचा मूड ठीक होईल या अपेक्षेने तिने रेडिओ लावला होता . पण ... ती पुन्हा चॅनल बदलवणार तोच तो म्हणाला,

" राहू दे ते, its my favourite one". तो गुणगुणायला लागला आणि गाण्याबरोबर शीळही वाजवायला लागला.

हे बघून ऋजुता ला हायसे वाटले. " देवा, वाचवलंस , थँक यू ", ती मनात म्हणाली. विराजचे हे रूप तर नवीनच होते तिच्यासाठी.

काही वेळात ते क्लाएन्ट कंपनीत पोचले. रिसेप्शनिस्ट ने त्यांचे स्वागत करून त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसवले. आणि मिस्टर रोहित शर्मांना फोन करून विराज आल्याचं सांगितले. मिस्टर शर्मा आणि त्यांची टीम लगेच तिथे आली .

व्यवस्थित, नीटनेटक्या आणि मोहक फॉर्मल पेहरावात असलेल्या विराज आणि ऋजुताला बघून मिस्टर शर्मांच्या चेहऱ्यावर एक समाधान पसरल्याचं विराजच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही.

जुजबी ओळख झाल्यानंतर ऋजुताने लॅपटॉप प्रोजेक्टरशी कनेक्ट करून त्यावर एकदम आत्मविश्वासाने पूर्ण प्रेझेन्टेशन दिले. मिस्टर शर्मांनी काही प्रश्न विचारले , त्यांना ऋजुता आणि विराज दोघांनीही समाधानकारक उत्तरे दिली. नंतर विराजने कंपनी पॉलिसी , डील इत्यादींबद्दल बोलणी केली.  त्यानंतर,

"मिस्टर विराज , सो द डील इज फायनलाइज्ड.  कॉंग्रेचुलशन्स", मिस्टर शर्मा विराजशी हस्तांदोलन करत म्हणाले. आमच्याकडून प्रीती आणि मी तुमच्याशी
co-ordinate करू. पंचेचाळीस दिवसांत आम्हाला हा प्रोजेक्ट तयार करून द्या. गरजेनुसार आठवड्यात एकदा आपण इथे प्रत्यक्ष मीटिंग घेऊ शकतो . त्यात प्रोग्रेस बघता येईल आणि काही अडचणी असतील तर त्याही सोडवता येतील", रोहित.

"पंचेचाळीस दिवस ... Ok", विराज थोडा विचार करत म्हणाला.

कॉफी आणि स्नॅक्स झाल्यानंतर मीटिंग संपली . उत्साही आणि हसऱ्या रोहितने एकदम खेळीमेळीच्या वातावरणाने विराज आणि ऋजुताचे टेन्शन घालवले होते. विराज  ऋजुताला घरी सोडायला निघाला. विराज खूष दिसत होता. पण ऋजुताने एवढं छान प्रेझेंटेशन देऊनही  कौतुकाचे शब्द मात्र निघाले नाहीतच त्याच्या तोंडून !... जाता जाता त्यांची आता पुढे कामाची योजना कशी  आखावी जेणेकरून दीड महिन्यात काम पूर्ण करून देता येईल यावर थोडीफार चर्चा झाली .

दुसऱ्या दिवशी ऑफिस कॅन्टीनमध्ये जेवणासाठी ऋजुता आणि तिच्या मैत्रिणी एकत्र बसलेल्या होत्या. विराज काही यांच्याबरोबर येत नसे. सिनिअर होता ना ! ऋजुता आणि मैत्रिणींच्या जेवणासोबत गप्पा  चालल्या होत्या.

"काय ऋजुता, कालचे प्रेझेंटेशन तर छान झाले म्हणे तुझे. डील मिळाली ना?", एक मैत्रीण निकिता.

"हो मिळाली . काम सुरुही केलं मी. पण काल तर ज्वालामुखीचा चांगलाच उद्रेक झाला होता माझ्यावर . काय सांगू, कसंबसं सावरलं", ऋजुता न राहवून सांगू लागली.

"OMG , काय झालं ग? कोण ते जमदग्नीचा अवतार का?", प्राची.

"हो ना , अग झालं असं की...", ऋजुताने मैत्रिणींना सर्व सांगितले.

"बाप रे, पण काहीही म्हण हं ऋजुता, त्या परिस्थितीतही दोन चांगल्या गोष्टी सांगितल्याच तू त्यांना... आणि शेवटी ज्वालामुखी थंडही केलास, फक्त तुलाच जमू शकतं हे" , त्यांच्याबरोबर जेवायला बसलेला ऋजुताच्या टीममधला प्रसाद हसत म्हणाला.

"क्लाएंट पेक्षा तर यांच्याशीच जुळवणे कठीण आहे. ते तर एकदम हसरे आणि खेळकर वाटतात. पण काय करणार, आपल्याला यांच्याबरोबरच काम करायचं आहे ना, जुळवून तर घ्यावं लागेल  ", ऋजुता.

जेवण आटपून सगळे पुन्हा आपल्या डेस्कवर गेले.

त्या दिवसापासूनच कामाला सुरुवात झाली होती. ऋजुताने प्रोजेक्टचे वेगवेगळे मॉड्युल टीम मधल्या लोकांना करायला वाटून दिले आणि त्यांना काम समजावून सांगितले.  कोणालाही अडचण आली की ऋजुता पटकन तेथे जाऊन सोडवत असे. विराज, ऋजुता आणि त्यांच्या टीमची वरचेवर कामाबद्दल मीटिंग होत असे. ऋजुताची कामातली तत्परता बघून विराजचे तिच्याबद्दल हळूहळू चांगले मत तयार होऊ लागले. रोहित आणि त्यांच्या टीमशी पण आता चांगली ओळख झाली होती आणि सुरवातीचा अवघडलेपणा जाऊन कामातही एक सहजता आली होती.

दीड महिन्यानंतर प्रोजेक्ट बनवून झाला . मिस्टर रोहित सगळे नीटनेटके काम बघून एकदम खुश झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी विराज ऋजुताला टीम लंच पार्टी साठी आमंत्रण दिले.

"मिस्टर विराज, you and your team please join us for project success party tomorrow . I will tell our H.R. to find some unique location for the party. ", रोहित.

"सर, तुमची हरकत नसेल तर मी एक वेगळी जागा सुचवू का?", ऋजुता उत्साहाने म्हणाली.  विराजने तिच्याकडे एक रागाने कटाक्ष टाकताच शांत झाली.

"नो. नो . मिस्टर विराज. सांगू द्या ना त्यांना. आम्हालाही आवडेल", रोहित.

ऋजुताने जागा सांगितली. कोणीही ती जागा आधी बघितलेली नव्हती . त्यामुळे रोहित म्हणाले, "अरे वा, अगदी नवीन आहे तर. चला ठरलं तर मग, इथेच जाऊया उद्या. आम्ही येतो. तुम्हीही परस्पर पोचा तिकडेच.

"हो सर, एक unique experience मिळेल सर्वांना. माझी खात्री आहे", ऋजुता म्हणाली.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

बघूया तर मग आता हे सर्वजण कुठे जातात आणि तिथे त्यांना काय अनुभव येतो....

हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all