दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 23

Drushtikon, Drushti, ani, marathi, kathamalika, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, Love, Prem, blindness

मागील भागात

विराज जी तारीख जाहीर होण्याची वाट बघत होता ती आता जाहीर झाली होती. ती यायला आता जास्त अवकाश नव्हता. त्यामुळे तो आता जोमाने तयारीला लागला होता. सुट्टीचा दिवसभरही तो तिकडेच व्यस्त रहायचा. आपल्या कर्मभूमीपासून म्हणजे त्याच्या ऑफिसपासूनच नवी सुरवात करावी असा त्याचा मानस होता. त्याने भराभर सगळ्या permisisions घेतल्या होत्या आणि आता तो इकडे तयारीला लागला होता. सर्वांना त्याने आपापले काम, कोण काय करणार, कसे करणार, हे सर्व नीट समजावून दिले होते. स्वतःला पहिल्याप्रथमच काहीतरी भव्य करायला मिळणार या उत्साहात सर्वांची तयारी सुरू होती. इतके दिवस कसेबसे दम धरलेल्या विराजलाही खूप उत्सुकता होती. आई , बाबा, विधी, ऋजुता आणि त्याची टीम या सर्वांना हे कळेल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया त्याला बघायची होती . या त्याच्या ध्येयासाठी गेले कित्येक दिवस, महिने त्याने अविरत कष्ट घेतले होते. काय असेल त्याचे ध्येय? काय करणार आहे विराज?


****

आता पुढे ...

सरतेशेवटी तो दिवस येऊन ठेपला. 25 नोव्हेंबर. विराजला त्यादिवशी ऑफिसला सुट्टी होती. पण तो अगदी सकाळपासूनच कोणत्यातरी गडबडीत दिसत होता. सुटी असूनही सकाळी लवकर तयार होऊन, नाश्ता करून तो भर्रकन घराबाहेर निघून गेला होता. जाता जाता म्हणाला,

"आई तुला लक्षात आहे ना आज संध्याकाळी आपल्या सर्वांना कुठे जायचे आहे ते?"

"हो रे , आहे लक्षात. तू आहेस ना बरोबर मग झालं तर", आई.

"आई, तू, बाबा आणि विधी, बरोबर या ना तिकडे . मला जरा काम आहे .मी आता जातोय. मग मी डायरेक्ट येईन तिकडे", विराज.

"अरे दादा, पण ते आम्हाला आत कसे येऊ देतील तू बरोबर नसशील तर?", विधी.

"अगं मी रजिस्टर केले आहे तुमच्या नावासहित . तुम्ही माझं नाव सांगा आणि आयडी चेक केले की ते येऊ देतील तुम्हाला. मी आत राहीनच तिथे, फक्त कामात असेन कदाचित. तू आहेस ना बरोबर सगळी प्रोसेस करायला. हवं तर ऋजुतालाही सांगून ठेवतो तुम्हाला सोबत करायला . एकत्रच बसा सगळे" , विराज.

विराजने सॅकमध्ये काही कपडे आणि इतर आवश्यक सामान रात्रीच भरून ठेवले होते. ती उचलून खांद्याला अडकवून तो फुर्र  झालासुद्धा.

त्याची घाई बघून वीणाताई विचारात पडल्या होत्या "आज आल्यावर त्याला विचारायला हवं , त्याचं काय चाललंय, कशाची एवढी गडबड चाललीय ते".

थोड्याच वेळात विराज आपल्या नेहमीच्या ठिकाणी पोहोचला. एका गृप मधल्या सर्वांना बोलावून त्याने विचारले, "सर्वांचं सामान आलंय ना व्यवस्थित? चेक केलत ना? तपासून पाहिलं ना?"

"हो ss ", सर्वांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर त्याचे समाधान झाले. "काही प्रॉब्लेम नाहीये ना? चला मग आता आपण एक फायनल राऊंड घेऊया. पंधरा मिनिटात सर्वजण तयार होऊन या. मी आणि हा तोपर्यंत इथलं सेटिंग करून ठेवतो", विराज.

मग दुसर्‍या ग्रुप कडे वळून म्हणाला, "मावशी पॅकिंग झालय ना? प्रत्येक गोष्टी मोजून घ्या आणि लिहून ठेवा".

"तू प्रत्येक बॉक्सवर वस्तूच्या नावाचे स्टिकर लावून ठेव म्हणजे तिथे गेल्यावर शोधायला, गरज पडली तेव्हा  काढायला आणि तिथे लावायला सोपे जाईल", विराजच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडे वळून तो म्हणाला. "आणि हं, जाताना आणि परत येताना या लिस्टप्रमाणे सर्वांची हजेरी घे", एक कागद त्याच्या हातात देत विराज म्हणाला. "सुदर्शन किती वाजता येतोय ? ".

"हो, चारपर्यंत" , तो.

"चल आता आधी इन्स्ट्रुमेन्ट्स लावून घेऊ , एक राऊंड झाला की पॅक करायला बरे पडेल", विराज.

दोघांनी ते लावून घेतले. तोपर्यंत पहिला गृप तयार होऊन आला. सगळे छान दिसत आहेत बघून विराज खूष झाला. चला आता बसा आपापल्या ठिकाणी आणि घ्या बरं पटापट एकेक. कसे घ्यायचे लक्षात आहे ना?

सर्वांनी होकार दिल्यावर सुरवात झाली. काही वेळाने सगळे नीट आटपले तेव्हा विराजच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकले. "छान ! अगदी असच करायचं हं तिथे. सर्वांना ऑल द बेस्ट" त्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या. तोपर्यंत बॉक्सेस ही बांधून तयार झाले.

नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीमधली ती शनिवारची संध्याकाळ होती. त्यादिवशी विराजच्या ऑफिसमध्ये अन्युअल गेट टुगेदर होते. संध्याकाळी ऑफिसमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिवारासोबत आमंत्रण दिले गेले होते. पारंपरिक वेशभूषा म्हणजे ट्रॅडिशनल वेअर असे थीम सर्वांसाठी ठेवण्यात आले होते. ऑफिसच्या मोठ्या ओपन स्पेसमध्ये स्टेज आणि त्यासमोर ऑडिटोरिअम सारखी बैठक व्यवस्था करण्यात आली होती . रांगेमध्ये मखमली चॉकलेटी रंगाच्या खुर्च्या मांडल्या होत्या. स्टेजला पडदे सोडण्यात आले होते. सर्वांना व्यवस्थित दिसावे यासाठी स्टेजच्या बाजूला एक मोठे स्क्रीनही लावण्यात आले होते.  आजूबाजूच्या झाडांवर रंगीबेरंगी लायटिंग करण्यात आली होती. काही अंतरावर जेवणासाठी टेबलांवर बुफेची  व्यवस्था केली गेली होती. ऑडिटोरिअम मधला कार्यक्रम संपल्यावर इकडे जेवण मांडले जाणार होते. त्याच्या बाजूलाच काही आणखी टेबल मांडले गेले होते. दुसऱ्या बाजूचा एक भाग लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. तिथे मुलांसाठी स्वतः हून खेळता येतील असे काही गेम्स , puzzles वगैरे ठेवले होते . चार पाच व्हॉलँटिअर्स तिथे सज्ज होते.

संध्याकाळी साडेपाच वाजतापासूनच लोकांची चहलपहल सुरू झाली होती. रंगीबेरंगी पारंपारिक वेशभूषा केलेल्या मंडळींमुळे परिसर अगदी फुलून गेला होता. सर्वजण सजावट वगैरे बघून प्रसन्न दिसत होते. मुले तर children एरिया बघून तिकडे धाव घेत होती.

पण ऋजुता कुठे आहे?
विराज कुठे आहे? विधी आणि सर्वजण कुठे आहेत?

विराज तर तास दोन तास आधीच आला होता . त्याने आपल्या देखरेखीखाली सोबत आणलेले सामान आधीच ठरल्याप्रमाणे बुफे एरिया च्या बाजूला असलेल्या टेबलांवर मांडून घेतले होते. प्रत्येक वस्तूवर किंमतीचे लेबल लावलेले होतेच. तिथे त्याने प्रत्येक टेबलासमोर दोन जणांना सामान देणे, पैसे घेणे इत्यादींसाठी बसविले. सर्वांना धीर दिला आणि निश्चिन्त होण्यास सांगितले . आणि मदतनीसाला सांगितले, "इथे सर्व नीट झालंय. दुसरा ग्रुपही तयार आहे. ते इन्स्ट्रुमेन्ट्स  स्टेजच्यामागे नेऊन ठेवा आणि दुसऱ्या ग्रुपला तिथे एका बाजूला एकत्रच थांबायला सांगा. म्हणजे लगेचच जाता येईल. सगळे सेट झाल्यावर विराजला हायसे वाटले.
त्याने घड्याळात बघितले तर कार्यक्रम सुरू व्हायला दहा पंधरा मिनिटे शिल्लक होती.

त्याने विधीला फोन केला, "विधी, आलात का तुम्ही? कुठे आहात ? "

"हो आताच आलोय. बसलो आहोत ऑडिटोरिअम मध्ये. ऋजुता आणि काका काकू पण आहेत इथेच", विधी .

"गुड, आलोच मी" , विराज.  तो तिथे गेला. सर्वजण दिसले. ऋजुताच्या आईबाबांना त्याने हसून अभिवादन केले. ऋजुतालाही त्याची नजर शोधू लागली . प्रसाद त्याच्या बायकोबरोबर आला होता तर प्राचीही तिच्या आईवडिलांबरोबर आली होती.  ऋजुताचं त्या सर्वांशी बोलून झालं होतं. ती जरा दूर निकिताच्या आईवडिलांशी आणि तिच्याशी बोलताना विराजला दिसली.

"दादा, हँडसम दिसतो आहेस हं. किती मस्त आहे तुझं ऑफिस ! मला तर खूप आवडली ही अरेंजमेंट ", विधी.

"हो पण किती दमल्यासारखा दिसतोय! विधी जा बरं त्याच्यासाठी जरा पाणी किंवा ज्यूस काही असेल तर घेऊन ये जरा", वीणाताईनी सांगितले. शेवटी आई ती आईच ना. बरोबर त्यांच्या लक्षात आले. विधीला सांगून त्या आणि ऋजुताची आई रेखाताई पुन्हा आपल्या गप्पांमध्ये गुंतल्या. एकीकडे दोघांच्याही बाबा लोकांच्या गप्पा रंगल्या होत्या.

विराजचे इकडे लक्षच कुठे होते? तो तर तिकडेच एकटक बघत होता. दोन तीन ओळी सोडून मागे असलेल्या, बोलत असलेल्या ऋजुताकडे. बोलणे आटपून ऋजुता परत तिच्या जागेवर यायला वळली आणि येऊ लागली. आता विराजला तिचा पूर्ण चेहरा दिसला आणि विराजचे होश उडाले. मरून रंगाच्या सॉफ्टसिल्कच्या सोनेरी काठापदराच्या आणि मधे मोतीवर्क केलेले बुट्टे असलेल्या एलिगंट साडीमध्ये गौरवर्णी ऋजुता खूपच सुंदर दिसत होती. केसांचा बन, त्यावर साजेसे आभूषण, कानाच्या बाजूला येणाऱ्या कुरळ्या केलेल्या बटा , कानात कर्णफुले, गळ्यात नाजूक सर, हातात मॅचिंग बांगड्या, साजेसे हलकेसे लिपस्टिक, आणि चेहऱ्याला खुलवणारी चंद्रकोर टिकली. विराजचा आ वासलेलाच राहिला.

"एखादा पाणीपुरीवाला असता ना समोर , तर इतका वेळ आ वासलेला पाहून स्वतःच एक पाणीपुरी भरवली असती तुला. तोंड बंद करा आता ", विधी त्याला धक्का देत हसून म्हणाली. विराज भानावर आला पण अजूनही तिकडेच बघत होता.

"उ हु उ हु , आम्ही पण साडी नेसून चांगलं तयार झालोय म्हटलं, पण कोणाला काहीच नाही त्याचं" , विधी त्याला म्हणत त्याचं लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत होती. नाही म्हटलं तरी असं एकटक बघणं म्हणजे जरा रिस्कीच होतं ना विराजसाठी. शेवटी त्याने नजर वळवून विधीकडे बघितलं. तेव्हा कुठे विधीच्या जीवात जीव आला. आणि आता विराजचं लक्ष विधी किती छान तयार झालीय त्याकडे गेलं. "अरे, खरंच की किती छान दिसतेय माझी वेडुली ! बाप रे, खरच माझं तर लक्षच गेलं नाही. जाम रागावणार आता ही. नाकाचा शेंडा लाल होईपर्यंत ! घरी गेलो की काही खरं नाही. पण खरंच ना बिचारीने माझ्यासाठी आपल्या अभ्यासातून वेळ काढला इथे यायला, एवढी छान तयार होऊन आलीय इथे , आणि मी, चुकलंच बहिणाबाई " , तो मनात म्हणाला. "खरंच ग खूप गोड दिसतेय विधी तू", विराज तिला म्हणाला.  तोपर्यंत ऋजुता आपल्या जागेवर पोचली होती.

"Hi विराज, Looking handsome, as always ! कुठे गायब होतास रे? काकूंनी सांगितलं की तू आधीच आला आहेस", ऋजुता.

"अग हो, थँक्स, इथेच होतो ग मी", विराज स्मित करत म्हणाला.

विधीला कुठेतरी निघालेली बघून ऋजुता  म्हणाली , "कुठे निघालीस विधी?"

"अग जरा कोल्ड्रिंक काउंटर शोधते", विधी.

"चल, मी येते तुझ्या बरोबर काउंटर ला. आपण सर्वांसाठीच आणू, घेतील ना सगळेच?", ऋजुता म्हणाली आणि तिच्यासोबत गेली.

"खूप गोड दिसते आहेस विधी, रॉयल ब्लू साडीमध्ये. हेअर स्टाईल सुद्धा खूप आवडली मला तुझी", ऋजुताने जाता जाता विधीचे कौतुक केले.

"थँक यू आणि तुला सांगू का, मी आत्ता तुला अगदी हेच म्हणणार होते, की खूप सुंदर दिसते आहेस तू, हा रंग खूप खुलतोय तुझ्यावर", विधी तिला म्हणाली . विधीची कळी खुलली होती. तिच्या चेहऱ्यावर इतके गोड हसू उमटले ना, की काय विचारता !क्रमश:


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. कथेला देत असलेल्या सर्व प्रतिक्रियांबद्दल वाचकांना मनापासून धन्यवाद .

🎭 Series Post

View all