दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 22

Drushti, Drushtikon, ani, Rujuta, Viraj, Rajat, Vidhi, Rohit, love, blindness, marathi, katha, kathamalika, story

मागील भागात ...


"अग ए, माझ्याबद्दल सगळं जाणून घेतलंस, स्वतः बद्दल तर काही सांगितलंच नाहीस" , रजत असे म्हणतोय तोपर्यंत विधी गायब झाली सुद्धा.

रजत मात्र आज हवेतच होता. "किती गोड आहे न ही, अन बोलते तर एवढी मस्त... गुंतूनच जातो समोरचा. पण काय , जशी अचानक आली तशी अचानक निघूनही गेली. आता पुन्हा कधी बोलणं होईल कोणास ठाऊक. चला, काहीतरी बोलायला मिळालं हेही नसे थोडके" , रजत उठत स्वतःशी हसत म्हणाला.

*****
आता पुढे ...

तिकडे रजत हवेत होता आणि इकडे विधीलाही एक अनामिक खुशी होती. सातासमुद्रापार असलेल्या त्याची ही तर फक्त शब्दभेट होती . तिच्या चेहऱ्यावर अवखळ हसू पसरले होते. मनात सतार वाजायला लागली होती आणि पोटात फुलपाखरे उडायला लागली होती. स्वतःशीच हसत ती गिरक्या घेऊ लागली. असे कसे , जणू मन कळीप्रमाणे उमलले होते, पंख लावून वाऱ्यावर उडू पाहत होते. ही कोणती नवीनच भावना तिला जाणवायला लागली होती?

असेच काही दिवस गेले . मध्यंतरी विधी आणि रजतचे एक-दोनदा मेसेजेस मध्येच हसतखेळत थोडेफार बोलणे झाले होते. त्यात विधीने कॉलेजबद्दल, परीक्षेबद्दल वगैरेही सांगितले होते. रजतला वाटले की तिने यात न गुंतता सध्या अभ्यासात लक्ष द्यावे. म्हणून तिची परीक्षा होईपर्यंत खोलवर काही बोलायचे नाही, मध्ये मध्ये एखाद्या वेळी मेसेज करूया असे त्याने ठरवले .

ऋजुताच्या ऑफिसमध्ये नवीन टीम मेंबर्स टीम मध्ये जॉईन झाले होते. त्यांचे प्रोजेक्टवर ट्रेनिंग सुरू होते. बाकी टीम PACE वरती काम करत होती. त्याची पहिली फेज होऊन दुसरीचे काम सुरू झाले होते .

एका रविवारी ऋजुकडे ...

"ऋजू,  अग ऋजू , काय करते आहेस?", रेखाताई विचारत होत्या.

"काही नाही ग आई . दीपाली आठवते का तुला ? माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे बघ . ती म्हणाली की फेसबुक वर तिने तिच्या लग्नाचे फोटो पाठवले आहेत. तेच बघत होते".

"हो का ? बघ तू. मी येते जरा शेजारच्या काकूंकडे जाऊन", रेखाताई.

"ठीक आहे ये , पण लवकर ये हं, मला करमत नाही तू नसली की", ऋजुता.

"वेडाबाई, येते लवकरच, हे एवढे नेऊन देते त्यांना", रेखाताई चप्पल घालत म्हणाल्या.

सुटीचा दिवस असल्यामुळे ऋजुता निवांत होती. बऱ्याच दिवसांनी तिने फेसबुक उघडले होते . असेच बघता बघता तिला  रजतच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये विधीचे नाव ऍड केलेले दिसले आणि तिला आश्चर्य वाटले.

"दादा आणि विधी यांची कशी काय बरं ओळख ? तो तर कधी भेटलाही नाही तिला. दादालाच विचारावं लागेल", ऋजुता मनातच म्हणाली.

तिने रजतला फोन केला. थोडसं इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर ऋजुताने त्याला प्रश्न केला,

"दादा तू विधीला कसे काय ओळखतोस? तुझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये आहे ती."

रजत गडबडला, "अगं तुझी मैत्रीण आहे ना ती , म्हणून.  त्या दिवशी आपल्याकडे आली होती ना? ".

"दादा , माझ्या इतर मैत्रिणींनाही ओळखतोस तू. अशा माझ्या किती मैत्रिणी आहेत तुझ्या लिस्टमध्ये? एकही नाही. खरं सांग बरं आता तू", ऋजुता गंभीरपणे म्हणाली.

कधीतरी तर सांगावेच लागेल म्हणून तो पुढे म्हणाला,

"ऋजू, खरं तर तिला तेव्हाच पहिल्यांदा पाहिलं आणि त्यानंतर दोन-तीनदा आम्ही थोडंफार असंच नॉर्मल बोललो चॅट मध्ये. मला आवडते ती", रजत सांगताना ब्लश करत होता.

"काय? सापडून सापडून हीच सापडायची होती का तुला?" ऋजुताने डोक्याला हात लावला. " तू सांगितलेस का हे तिला?"

"नाही ग. पण कदाचित तिलाही ...", रजत.

"बरं झालं तू काही बोलला नाहीस ते आणि बोलूही नकोस. दादा मी तुला सांगून ठेवते, गुंतू नकोस तिच्यात. ती आधीच कमिटेड आहे", ऋजुता घाईने म्हणाली.

"काय? खरं सांगतेस का? तुला नक्की माहिती आहे ?", रजत आश्चर्याने म्हणाला.

"हो रे. मी त्यालाही ओळखते आणि आम्ही सगळे एकदा मंदिरात भेटलो होतो तेव्हा तिनेच सांगितलं होतं की त्याचं तिच्यावर प्रेम आहे ", ऋजुता खात्रीपूर्वक म्हणाली.

रजतचा पडलेला चेहरा बघून तिला वाईट वाटले. "दादा, फार भावनिक गुंतवणूक होण्याआधी लवकर कळलं ते बरं झालं ना? तू नाराज नको होऊ ", ऋजुता.


"ऋजू, पहिल्यांदा असं झालंय की कोणी दिसली आणि मी तिच्यात अडकलो. पहिल्या नजरेतच असं वाटून गेलं की हीच आहे ती जिची मनाला वाट होती, हिलाच कदाचित मी शोधत होतो", रजत निराशेने म्हणाला.

"हं ठीक आहे रे दादा, काही दिवस लागतील तुला सावरायला . तुला एक गंमत सांगू का? अरे आई तर वाटच बघते आहे तू येण्याची. तुझ्या लग्नात वरमाय बनून हौस मौज करून घेण्याची स्वप्नं पाहत असते ती . तू इकडे आलास की एकापेक्षा एक मुली येतील तुला सांगून. तू आता जास्त विचार करू नको तिचा. तू मस्त बाहेर फिरून ये, सुट्टीच आहे न आज?", ऋजुता त्याला समजावत म्हणाली.

"हं ठीक आहे ग, बघतो. पण आधी तुलाच सासरी पाठवणार आम्ही", रजत तिला चिडवत म्हणाला.

"ए नाही हं", ऋजुता.

तेवढ्यात रेखाताई परत आल्या आणि रजतचा फोन बघून त्याच्याशी बोलायला लागल्या. बोलणं झाल्यावर रजतने फोन ठेवला आणि तो एकदम उदास झाला. नशिबात नव्हती तर भेट तरी का घडवलीस? समोर तरी का आणलस ? आतापर्यंत होतो ना मी माझा चांगला? तो देवाला म्हणू लागला. मनाला उभारी मिळावी म्हणून थोड्या वेळाने तो घराबाहेर पडून एका पार्कमध्ये तळ्याशेजारी बेंचवर जाऊन बसला. समोरचे दृश्य पाहत काही वेळ असाच विचारात निघून गेला. पाण्यात एक एक खडा टाकत तो कितीतरी वेळ पाण्यातल्या तरंगांकडे बघत राहिला. त्याच्या मनातही विचारांचे तसेच तरंग उठत होते. शेवटी त्याने ठरवले की विधीला आता स्वतःहून मेसेज करायचा नाही. तिचा आला तर तेवढ्यापुरते बोलून सोडून द्यायचं. मन शांत झाल्यावर तो घरी परत आला.

इकडे विधीला मात्र या सगळ्या गोष्टींची काही खबर नव्हती. तिचे आपले रोजचे रूटीन सुरू होते. काही दिवस निघून गेले. बरेच दिवस झाले रजतचा काही मेसेज नाही असं बघून विधीने त्याला मेसेज केला.

"Hi रजत, कसे आहात?"

"ठीक आहे. तू कशी आहेस?", रजत.

"मी एकदम मस्त", विधी.
"बरेच दिवसांत तुमचा काही मेसेज नाही ? आठवण नाही आली वाटतं आमची", विधी.

"हं, सध्या बिझी आहे कामात", रजत.

"अच्छा. पण आज तर सुट्टी असेल ना रविवारची?", विधी.

"...." , रजतने काही उत्तर दिले नाही.

विधीने थोडा वेळ वाट पाहिली. "आज हा काही भरभरून बोलत नाहीये आधीसारखा. काय झालं कोणास ठाऊक. जाऊ दे , असेल काहीतरी ऑफिसचा प्रॉब्लेम", विधी विचार करत होती.

"ठीक आहे मग , नंतर बोलू या ?", विधी.

"ओके बाय", रजत.

"आज काय झालंय याला. आतापर्यंत दोनतीनदा बोललो तर कसा बोलायचा, वाचतानादेखील शब्दाशब्दातून उत्साह जाणवायचा. आपलेपणा वाटायचा, खरेपणा जाणवायचा. आज कोरडेपणा का वाटतोय", विधी स्वतःशीच विचार करत होती.

तेवढ्यात तिला विराजने दिलेली ताकीद आठवली आणि निमूटपणे तिने अभ्यासाचे पुस्तक हाती घेतले. " बरं झालं दादा नाहीये घरी . नाहीतर रागावलाच असता. अरेच्चा पण गेलाय कुठे हा केव्हाचा? आजकाल सुट्टीच्या दिवशीही स्वारी घरात सापडत नाही. कुठे जातोय काही सांगत नाही, पण फारच बिझी दिसतो आजकाल", विधी विचार करत होती. "जाऊ दे ,आपल्या अभ्यासाला लागावं हेच खरं! " , असे म्हणून ती अभ्यासाला लागली.


विराज जी तारीख जाहीर होण्याची वाट बघत होता ती आता जाहीर झाली होती. ती यायला आता जास्त अवकाश नव्हता. त्यामुळे तो आता जोमाने तयारीला लागला होता. सुट्टीचा दिवसभरही तो तिकडेच व्यस्त रहायचा. आपल्या कर्मभूमीपासून म्हणजे त्याच्या ऑफिसपासूनच नवी सुरवात करावी असा त्याचा मानस होता. त्याने भराभर सगळ्या permisisions घेतल्या होत्या आणि आता तो इकडे तयारीला लागला होता. सर्वांना त्याने आपापले काम, कोण काय करणार, कसे करणार, हे सर्व नीट समजावून दिले होते. स्वतःला पहिल्याप्रथमच काहीतरी भव्य करायला मिळणार या उत्साहात सर्वांची तयारी सुरू होती. इतके दिवस कसेबसे दम धरलेल्या विराजलाही खूप उत्सुकता होती. आई , बाबा, विधी, ऋजुता आणि त्याची टीम या सर्वांना हे कळेल तेव्हा त्यांची प्रतिक्रिया त्याला बघायची होती . या त्याच्या ध्येयासाठी गेले कित्येक दिवस, महिने त्याने अविरत कष्ट घेतले होते. काय असेल त्याचे ध्येय? काय करणार आहे विराज?


क्रमश:


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

हं, वाचकहो, गोंधळात पडलात का? ऋजुताने रजतला असे का सांगितले? कथेच्या 5 व्या भागात या प्रश्नाचे उत्तर आहे बरं का?  ( प्रत्येक पार्ट च्या खाली series details मध्ये कथेचे सगळे पार्टस दिसतात.)

विराज कुठेतरी मनात ऋजुतालाही आवडतो पण तरीही विराजचे तिच्यावरचे प्रेम ऋजुताच्या लक्षात का येत नाहीये ? वाचकहो, आता आलं ना लक्षात?

विराजची त्याच्या ध्येयाकडे वाटचाल जोरात सुरू आहे. काय असेल त्याचे ध्येय? काय करतो आहे विराज? सर्वांना कळल्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल?

Do not miss the next parts  :-)
मिळाला नाही तर मला सांगा.  पुढील पार्ट अंदाजे 3 दिवसांनंतर. हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा. स्वस्थ रहा, आनंदी रहा, वाचत राहा आणि असेच कळवत रहा.

🎭 Series Post

View all