दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 21

Drushti, Drushtikon, sight, vision, perspective, Viraj, Rujuta, Rajat, Vidhi, love, blindness, marathi, katha, kathamalika


मागील भागात ...

ही  घाबरत घाबरत माझ्याकडून परवानगी मागणारी ऋजुता आता मला उशिरा येण्याबद्दल जाबही विचारायला लागली आहे", विराज तिला चिडवत हसत म्हणाला.
ऋजुताही हसायला लागली.

"बरं , तुझे सकाळचे कामं झाले असतील तर मला सांग , काल कोणत्या कामाबद्दल म्हणत होतास?", ऋजुता.

"हं, आपल्याला दोन ज्युनिअर असोसिएट्स घ्यायचे आहेत टीममध्ये. तर त्यासाठी तू जॉब डिस्क्रिप्शन तयार करून मला दे. मग मी एच आर ला सांगून इंटरव्ह्यू शेड्युल करतो. आणि तू काही सोपे काही कठीण असे टेक्निकल प्रश्न काढून ठेव. उद्या परवा मध्ये इंटरव्ह्यू घेऊया", विराज.

"ठीक आहे. करते मी हे आणि पेढा पण देते सर्वांना. आणि आणखी एक , आमच्या माँसाहेबांनी तुम्हा सर्वांसाठी स्वीट डिश पाठवली आहे लंचमध्ये खायला . सो डोन्ट मिस इट ", ऋजुता केबिनच्या दाराकडे जात , स्माईल करत म्हणाली आणि बाहेर टीमकडे गेली.

"किती निरागस आणि अवखळ आहे ही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद मानते, स्वतःसोबतच इतरांनाही त्या आनंदात सामील करून सभोवतालचं चैतन्य टिकवून ठेवते. तुझ्या अशा गुणांनी मी दिवसेंदिवस अधिकाधिक खेचल्या जातोय ग ऋजुता ", विराज ती निघून गेली त्या दिशेने बघत मनात विचार करत होता.

****

आता पुढे....

विराजची त्यादिवशी रात्री लिहिलेली डायरी एन्ट्री

"आज सकाळीही काम अगदी व्यवस्थित झाले. काही दिवसांपूर्वी  गोंधळलेले, दिशाहीन झाल्यासारखे असणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू आत्मविश्वास दिसायला लागला आहे. हसू फुलतय निरागस चेहऱ्यांवर. जसा विचार केला होता, ठरवले होते, तसतशा सगळ्या गोष्टी, प्रोग्रॅम्स होताना पाहून एक वेगळेच समाधान मिळतेय. आणि हेच समाधान मनाला  आणखी काहीतरी करण्याची आगळीच ऊर्जा देऊन जातंय.

***
.... तर आज मॅडम नी वाट बघितली आपली. आणि तिला न कळवता उशिरा आल्याबद्दल खडसावलेही.... भीती पळालेली दिसतेय ... प्रगती आहे म्हणायची . खरं तर ऋजुता खूष आहे अन पेढे देतेय म्हटल्यावर एकदम धस्सच झालं होतं. लग्न वगैरे ठरलं की काय हिचं ? असं वाटून गेलं होतं क्षणभर.... आणि कासावीस होणं म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं, ते काही क्षण .... पण तिने कारण सांगितले आणि मग जीव भांड्यात पडला. निशा पास झाली म्हणून सर्वांना पेढे दिले तिने.

.... इतरांच्या आनंदातही खूष होतेस, त्यांना मदत करून त्यातही आनंद शोधतेस ... आणि आपला आनंद इतरांसोबत वाटून वातावरणच आनंदी बनवून टाकतेस ....

अशी कशी आहेस ग तू?
गोड, निरागस ,
अवखळ पण
समजूतदारसुद्धा,
उच्शृंखल पण
जबाबदारसुद्धा.
रोजच्या रोज
विकेट घेतेस माझी ...
एकही चान्स तू
सोडत नाहीस ना,
मला प्रेमात पाडण्याचा  ....
मग मीही एकही चान्स
सोडणार नाही
तुझ्या प्रेमात पडण्याचा ....

तुझं माझ्यासोबत असणं ...
काहिली होत असताना
आलेल्या गार वाऱ्याच्या
झुळुकेसारखं ...
आतुर करणारं ...
वाट बघायला लावणारं ...
माझ्यातल्या 'मी'ला
विसरायला लावणारं ....
तरीही सुखावणारं ....
अशीच नित्य माझ्यासोबत....
राहशील ना?"चार पाच दिवस असेच निघून गेले. विराज आणि ऋजुताने मिळून काही इंटरव्यू घेतले. इंटरव्यू घेताना ऋजुताने असे काही प्रश्न विचारले की ज्यातून अगदी नीट कळेल की कॅंडिडेटचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे? म्हणजे त्याने त्या गोष्टी वरती प्रत्यक्ष काम केलेले असले तरच त्याला त्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. फक्त पुस्तकी ज्ञान असून तिथे उपयोग नव्हता. कॅंडिडेटची नीट पारख होईल असे प्रश्न ती विचारत होती. विराजदेखील वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निकल प्रॉब्लेम्स सोडवायला देऊन त्यांची सोडवण्याची पद्धत बघत होता. अशा पद्धतीने दोन नवीन ज्युनिअर मेंबर प्राजक्ता आणि नंदन यांना टीममध्ये घेण्यात आले. ऋजुताचे सखोल टेक्निकल ज्ञान बघून विराज प्रभावित झाला होता. आधीच विकेट गेलेला विराज पुन्हा एकदा क्लीन बोल्ड झाला होता  .


इकडे विधीचे त्याच्या मेसेजला उत्तर कधी येते याची रजत वाट बघत होता . चार पाच दिवस गेले तरी विधीने मेसेज बघितलाच नव्हता. त्यादिवशी विधीचे कॉलेजचे टेस्ट्स वगैरे आटपले होते . सहज म्हणून तिने मेसेजेस बघायला सुरवात केली तर तिला आधीच कधीतरी आलेला रजतचा मेसेज दिसला आणि ती उडालीच ! कधीतरी कल्पना केलेली , आवडलेली पण खूप दूरवर असलेली गोष्ट अचानकपणे समोर यावी तसा आनंद तिला झाला होता.

"Hi विधी. मी रजत राजशेखर कुलकर्णी. त्यादिवशी तुम्हाला माझ्या घरी बघितले."

"चला थोडी मजा घेऊ या बरखुरदारांची  . "असा विचार करत विधीने न समजल्याचा आव आणत त्याला उत्तर दिले.

"Hi रजत. पण मी तर लंडनला गेलेच नाहीये कधी अजून ". विधी.

इकडे रजतकडे मेसेज पॉप झाला आणि व्हिडीओ मीटिंग मध्ये असलेला रजतच्या गालावर मधेच हसू पसरले. मीटिंगमधल्या त्याच्या सहकाऱ्याने त्याला विचारले, " Rajat, what happened?" तेव्हा तो भानावर आला "No, no, nothing...", म्हणत पुन्हा मीटिंग मध्ये लक्ष देऊ लागला . दहा मिनिटांनी मीटिंग संपली आणि मग रजतने मेसेज ओपन केला.

"ओह तर मॅडमची माझ्याबद्दलची स्टडी आधीच झाली आहे", रजतच्या गालावर स्मित झळकले आणि त्याने उत्तर दिले,

" हं, पण मी तर लंडनमधल्या घराबद्दल काही बोललोच नाही. म्हणजे माझ्याबद्दल सगळी माहिती आधीच काढून झाली आहे तर ! :-) (एक स्मायलीही टाकला त्याने)"

आता मात्र विधी स्वतः च गडबडली आणि तिने उत्तर दिले , "नाही नाही , असे काही नाही. मला तर हे पण माहिती नाही की तुम्ही TechnoSystems या कंपनीत  सिनिअर आर्किटेक्ट म्हणून काम करता."

आता तर रजत खळखळून हसायलाच लागला . खूपच गोड आहे ही तर  आणि खरच अल्लड आहे. म्हणजे तिच्या डोळ्यात एक अल्लड झाक दिसली होती ती उगाच नव्हे. पण कदाचित तिलाही मी आवडलोय का... त्याने काही न बोलता फक्त एक हसणारा स्मायली पाठवला.

"  :-D  "

"का हसताय ?"

" माझी इतकी सगळी माहिती का मिळवलीस सांग ना", रजत.

"अं ... ते.... हं, तुम्ही ऋजुताचे भाऊ आहात ना म्हणून. माझी आई आणि तुमची आई दोघी मैत्रिणी आहेत ना."

"अच्छा हेच की आणखी काही कारण आहे? ", रजत.

"हो. आणखी काय असणार  :-) ", विधी.

"ते मला कसं कळणार ? ते तर तुलाच सांगावं लागेल ना" , रजत.

" तुम्ही मला मेसेज का केला हे तुम्हाला सांगावं लागेल आधी. पहले मेसेज आप खुद करते हो और कारण मुझसे पूछ रहे हो", विधी.  आपली विधी चंचल आहे पण काही कमी हुशार नाहीये हं.

" मी तर .… ते ... तू ऋजूची मैत्रीण आहेस , माझ्या घरी पण आली होतीस म्हणून केला." , रजतने पण हसून सावध पवित्रा घेतला.

" अच्छा. म्हणजे तुम्ही तिच्या सगळ्याच मैत्रिणींची अशीच खबर घेता तर? ", विधी.

"ए नाही ग, बाई", रजत गडबडून म्हणाला.

"मग आणखी काही खरं कारण?", तो गडबडल्याचे जाणवून विधीला आता हसू आवरत नव्हते.

"सध्या तरी नाही", रजत स्माईल करत होता.

"मग कधी असेल? ", विधी.

"जेव्हा तुझ्याकडे तुझं कारण असेल तेव्हा (स्मायली)", रजत. आता रजतची स्माईल रुंदावली होती.

"शब्दांत बरोबर पकडता हं तुम्ही :-D ", विधी हसून.

"मी इकडे अन तू तिकडे तर मग शब्दातच पकडणार ना?", रजत.

"काय? " , विधी गोंधळून म्हणाली.

"अग म्हणजे शब्द तर लागतीलच न बोलायला", रजत लगेच सारवासारव करत म्हणाला आणि त्याने स्वतः लाच टपली मारली .

"म्हणजे कारण असणार आहे तर तुमच्याकडे कधी न कधी :-)  ", विधी.

"हा हा हा , बघू या :-D", रजत हसून .

"फ्रेंड्स???" रजत.

"अं ... देखूंगी, सोचूंगी कल परसो बोलूंगी" , विधी.

"इतना आसान नही है मिस्टर, थोड़े पापड़ तो बेलने पड़ेंगे आप को, इंतजार कीजिए थोड़ा ", विधी हसतच मनात म्हणाली.

तेवढ्यात विधीला आईने आवाज दिला.

"आई बोलावतेय, बाय" , विधी.


"अग ए, माझ्याबद्दल सगळं जाणून घेतलंस, स्वतः बद्दल तर काही सांगितलंच नाहीस" , रजत असे म्हणतोय तोपर्यंत विधी गायब झाली सुद्धा.

रजत मात्र आज हवेतच होता. "किती गोड आहे न ही, अन बोलते तर एवढी मस्त... गुंतूनच जातो समोरचा. पण काय , जशी अचानक आली तशी अचानक निघूनही गेली. आता पुन्हा कधी बोलणं होईल कोणास ठाऊक. चला, काहीतरी बोलायला मिळालं हेही नसे थोडके" , रजत उठत स्वतःशी हसत म्हणाला.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. कथेला देत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. स्वस्थ रहा, आनंदी रहा , वाचत रहा आणि असेच कळवत रहा.

Fathers day निमित्त पितृत्वाच्या वेगवेगळ्या रंगच्छटा विशद करणाऱ्या माझ्या अति लघु कथा (अलक) नक्की वाचा आणि  अभिप्राय कळवा.

पितृच्छाया - रंगच्छटा पितृत्वाच्या

🎭 Series Post

View all