दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 20

Drushti, Drishtikon, Drushtikon, Rujuta, Viraj, Rajat, Vidhi, love, marathi, katha, kathamalika, blindness

मागील भागात ..

"विराज , ज्या स्पीडने तू सगळं स्ट्रीमलाईन करून यांची तयारी करून घेतो आहेस, मला वाटतं की लवकरच तयार होतील हे सगळे. "

"हो ना. मी तारीख जाहीर होण्याची वाट बघतोय.  पण त्या आधी व्यवस्थित तयारी करून घेतली म्हणजे वेळेवर काळजीचे काम नाही. एकदा चांगली सुरवात झाली , आत्मविश्वास आला, की मग नोबडी कॅन पुल देम बॅक", विराज.

"आज आणखी चार जण दाखल झाले आहेत. त्यात दोन लहान मुले आणि एक तरुण आणि एक वयस्कर आहेत."

"हो , मी भेटलो त्यांना . मग आता सगळे मिळून पंचेचाळीस जण झालेत, बरोबर ना? ", विराज.

"हो, पंचेचाळीस जण झालेत. "

"हं, गुड", विराज.

****

आता पुढे...

"उद्या सकाळी येऊन सकाळचेही थोडंफार बघेन मी काही वेळ. उद्या काही मीटिंग्स , कॉल्स नाहीयेत सकाळी. तर ऑफिसमध्ये अकरा वाजेपर्यंत पोचलो तरी चालेल मला. ", विराज.

"ग्रेट"

"ओके चल आता निघू या", विराज. 


विराज घरी पोचला तो खुषीतच. खांद्याला सॅक अडकवून, शीळ वाजवत, बोटात कारची चावी फिरवत तो घरात प्रवेशता झाला. विधी आईला कामात मदत करत होती. तिचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्याला खुषीत बघून तिच्याही चेहऱ्यावर स्माईल आले. आईसमोर नको, पण नंतर विचारूया असे ठरवून टाकले तिने.

विराज फ्रेश होऊन आला आणि डायनिंग टेबलवर ताट घेऊन बसला.

"बाबा, चला जेवू या", विराज.
बाबाही आले आणि बसले. दोघेही जेवू लागले.

"आई, कढी छान झालीय ग", वाटीत कढी घेत विराज आईला म्हणाला.

"अरे आज विधीने केलीय कढी", आई.

"अरे वा , छानच", बाबा.

"आई, आता तुला पोळ्या वगैरेसाठी मदतीला एखादी बाई लावतेस का? म्हणजे तुझीही सकाळी संध्याकाळी धावपळ होणार नाही. इतकी वर्षे तू करतच आहेस ना", विराज.

"नको रे, होतं ना सगळं व्यवस्थित", आई.

"अग आई, आता तू तुझी धावपळ कमी कर ना. विधीलाही अभ्यासाला जास्त वेळ द्यायला पाहिजे आता. थोडाथोडका अभ्यास नसतो ग. परीक्षा येईल लवकरच. शेवटचे वर्ष आहे ना, जितका जास्त अभ्यास होईल तितका फायदाच होईल तिला", विराज.

"चिरंजीव बरोबर बोलताहेत श्रीमतीजी. लावून घ्या एखादी मदतनीस. मदत होईल तुम्हाला. विधीला सुट्ट्यांमध्ये ट्रेनिंग द्या उरलेसुरले. येताजाता थोडीफार मदत करेल ती , पण आता अभ्यास जास्त महत्त्वाचा", बाबा.

"बरं बरं, ठीक आहे. बघते मी", आई.

जेवण वगैरे झाल्यानंतर काही वेळ गप्पा झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत गेले. विधी थोडा वेळ अभ्यास करत बसली आणि विराजने लिहायला आपली डायरी काढली . आजच्या दिवसातले सुंदर क्षण त्याने डायरीमध्ये जपून ठेवले. मग कपाटातून बासरी काढली आणि बाल्कनीमध्ये येऊन कठड्याला टेकून उभा राहिला. एकटे शांत बसावेसे वाटले की ही त्याची आवडती जागा असायची.

गार, ओलसर वाऱ्यामध्ये चंद्र आणि चांदण्यांची नक्षी निरखत हळुवार आवाजात तो बासरी वाजवू लागला. त्याच्या मनाला झालेला आनंद हळूहळू बासरीच्या सुरातून उमटू लागला. वाजवता वाजवता नकळत मिटलेल्या डोळ्यांसमोर ऋजुताचे निखळ निरागस हास्य तरळले. मन:चक्षूंनी ते निरखत तो बासरी वाजवत होता. हरवून गेला होता त्या मोत्यांच्या ओघळण्यामध्ये आणि बासरीच्या सुरांमध्ये .

बाजूच्याच खोलीत बसलेल्या विधीला बासरीचा आवाज येत होता. हे आनंद उमटविणारे सूर ऐकून तिला मोह आवरला नाही. ती हळूच पाय न वाजवता त्याच्या खोलीत आली . तो पाठमोरा बाल्कनीत बासरी वाजवत उभा असलेला दिसला. ती येऊन तिथे बसून त्याचे वाजवणे संपण्याची वाट बघू लागली.  थोडया वेळाने विराज थांबला आणि त्याने डोळे उघडले तर विधी त्याच्यासमोर एक हात कमरेवर ठेवून उभी होती. तिने डोळ्यांनीच खुणावत , भुवया वर करत दुसऱ्या हाताने त्याला 'क्या बात है?' असा मूक प्रश्न केला.

विराजच्या गालावर हसू उमटले. किंचित ब्लश करत तो बाल्कनीतून आत आला आणि बासरी कपाटात ठेवायला लागला.

"दादा, सांग ना. काय झाले? आज एवढा खूष का आहेस?मी मघापासून बघतेय , प्लीज सांग ना, मला राहवत नाहीये". विधी त्याच्या मागे उभी राहत त्याला उत्सुकतेने विचारू लागली.

"विधी , आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास , मग तो थोडा  का असेना,  मिळाला तर आनंद होईल ना?", विराज.

"काय, आज कसा एकत्र वेळ घालवता आला तुम्हाला? ऑफिस नव्हतं का?", विधीला आश्चर्य वाटलं.

"अग माझी आई, ऑफिस तर होतच ग, आणि दणकून कामही होतं. पण आज सोबत बसून काम करावं लागलं आम्हाला आणि संध्याकाळी घरीही सोडलं मी तिला. झालं समाधान? ", विराज कोपरापासून तिला हात जोडत चिडवत म्हणाला.

त्याचे हात तसेच आपल्या दोन्ही हातांनी पकडत ती म्हणाली, "wow ! सही रे दादा!"

"असे क्षण मनाच्या कप्प्यात आठवणींच्या कुपीत जतन करून ठेवले जातात. बस तेच करत होतो", विराजचा आवाज शांत होत गहिवरला होता.

"ए दादू, डोन्ट वरी. छान होईल सगळं. करू आपण. मी आहे ना?" , विधीला त्याच्या आवाजातला कंप जाणवला होता.

"हो ग माझी वेडुली", विराज तिच्या नाकावर प्रेमाने चिमटीने पकडत म्हणाला.

"वा रे वा! मी तर काहीच केलं नाहीये आणि मी वेडुली ? आणि वेड्यासारखं प्रेम करणारा हा कोण ? ", विराजकडे बोट दाखवत ती म्हणाली.

"वेडुला !! वेडुलीचा भाऊ वेडुला !! " , विराज म्हणाला , तसे दोघेही हसायला लागले.

"हं, तुझी तर झोप गेलीय पळून, पण मला मात्र खूप झोप येतेय आता. मी जाते झोपायला. गुड नाईट", विधी जांभया देत म्हणाली.

"हो , झोप लवकर. मी पण झोपतोय आता. गुड नाईट", विराज.


दुसऱ्या दिवशी सकाळी ...

ऋजुता ऑफिसमध्ये आली ते आनंदातच . आल्या आल्या तिला विराजला एक चांगली बातमी द्यायची होती. आधी त्याला देऊन मग ती पेढा खाणार होती. पण आज तर तो आलेला नव्हताच अजून. केबिन बंदच होते त्याचे. ऋजुताने तिच्याकडच्या चावीने केबिन उघडले. आज सकाळी काही वेळ इथूनच काम करावे नाहीतरी विराज नाहीच इथे अजून.  असा विचार करून ती आत आली आणि तिला काल दिलेल्या दुसऱ्या टेबलवर तिने आपले बस्तान बसवले. येताना फूलवालीकडून आणलेली जरबेराची वेगवेगळ्या रंगांची तीन फुले तिने छोट्याशा काचेच्या फुलदाणीत खोवून ती टेबलावर समोरच ठेवली. ऋजुताला फुले फार आवडत. तसे तर झाडावरची फुले झाडावरच सुंदर दिसतात म्हणून तोडायची नाही ती. पण अशी आनंदात असेल तर मात्र फूलवाल्या आजीबाईकडून ती एकदोन फुले घ्यायची आणि आपल्या डेस्कवर ठेवायची. दिवसभरात कामांच्या रगाड्यात अधेमध्ये त्यांच्याकडे नजर गेली की तेवढेच तिला फ्रेश वाटायचे.

तर तिने फुले लावली, तोपर्यंत लॅपटॉप सुरू झाला आणि ती आपल्या कामाला लागली. साडेनऊ झाले तरीही विराज आला नव्हता.

"रोज तर नऊच्या आधीच हजर असतात साहेब. आज काय झाले ? असू दे, येईल थोडया वेळाने", विचार करत ती पुन्हा आपल्या कामाला लागली .

"पावणेअकरा वाजले तरीही हा आला नाही अजून ?", तिचे हातातले काम संपले तसे घड्याळात बघत ती आश्चर्याने उद्गारली. "निकीताला विचारावे जाऊन", असा विचार करत लॅपटॉप वगैरे घेऊन ती आपल्या क्यूबिकल मधल्या डेस्क वर येऊन बसली. येताना केबिन पुन्हा लॉक केले .


"निकी, विराज आज येणार नाहीये का ग ? काही निरोप दिला आहे का?"

"अग हो, सॉरी, मी विसरलेच तुला सांगायला. अकरा वाजेपर्यंत येईन असा निरोप दिला होता त्यांनी सकाळीच", निकिता.

"ओह अच्छा. ", ऋजुता.

"का , ग ? काही काम होतं? " , निकिता.

"हो ना, अग काल म्हणाला की काहीतरी काम आहे नवीन. माझे मॉर्निंग रुटीन्स झालेत करून . लवकर कळलं तर बरं पडेल ना ग आटपायला पुढचं काम सुद्धा", ऋजुता.

"हं, येतीलच मग इतक्यात", निकिता.

दहा पंधरा मिनिटांनी विराज आला . केबिन उघडून आत जाताच त्याला एक वेगळा दरवळ जाणवला. बॅग वगैरे जागेवर ठेवत त्याने इकडेतिकडे नजर फिरवली. तर समोरच्या टेबलवर मस्त टवटवीत रंगीबेरंगी फुले दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आले.

"मॅडम येऊन गेल्यात तर इथे. तरीच हा फ्रेशनेस आहे एक इथे. रात्रभर बंद असलेल्या केबिनमधली मरगळ जी नेहमी आल्या आल्या जाणवते ती तर आज कुठल्या कुठे पळून गेलीय.  नाईस ! ", विराजचे ओठ रुंदावले होते.

लॅपटॉप ऑन करत तो खुर्चीवर सेटल होऊन तो कामात गर्क झाला. पंधरा वीस मिनिट झाले असतील तोच ऋजुताने केबिनच्या दारावर टकटक केले.

"कम इन", विराज.

ऋजुता आत येत म्हणाली, "आज उशिरा येणार होतास का? का रे एवढा उशीर ? सांगितलं नाहीस मला? तब्येत तर ठीक आहे ना ? मी किती वेळापासून वाट बघत होते कधी येतोस ते". तिच्या हातात एक डबीही होती.


"अग हो, हो,  तूफान एक्सप्रेस सुरू झाली की काय प्रश्नांची ? की नेहमी मी विचारतो तुला तर त्याचा बदला घेते आहेस आज मी उशिरा आलो तर?" , विराज.

"अगदी बायको असल्यासारखी झडती घेते आहे माझी प्रश्न विचारून विचारून .... खरच बायको झाली तर काही खरं नाही तुझं विराज", विराजच्या मनात विचार आला तशी त्याच्या चेहऱ्यावर खोडकर स्माईल आली.

"सगळं ठीक आहे. मला जरा काम होतं म्हणून उशिरा आलो. तसं सांगितलं होतं मी पुनीत सरांना आणि निकिताला. खरं म्हणजे तुझ्या डेस्कवरच फोन केला होता पण निकिताने घेतला होता तो. बरं माझी झाडाझडती घेऊन झाली असेल तर वाट का बघत होतीस तेही सांग आता", विराज हसत म्हणाला.

"अरे हो , हे घे  ", डबी उघडून विराजसमोर धरत ती म्हणाली.

"अरे वा! कशाप्रीत्यर्थ ? ", विराज त्यातला पेढा घेत विचारता झाला.

"आज मी खूप खूष आहे विराज", ऋजुता.

"अग कशासाठी ते सांगशील का आता?", विराजची उत्सुकता वाढली होती.

"अरे ती निशा आहे ना, तिचा परीक्षेचा निकाल लागला आणि छान मार्क्स मिळाले तिला", ऋजुता.

"ही निशा कोण आता?", विराज.

"तुला आठवतं ? काही दिवसांपूर्वी मी तुझ्याकडून परवानगी घेऊन एका मुलीला पेपर लिहिण्यात मदत केली होती. ही तीच ... निशा", ऋजुता.

"रिअली? ग्रेट न्युज. कॉंग्रेट्स"

"थँक्स. ती आणि तिची आई काल पेढे घेऊन आल्या होत्या घरी. तू मला त्यादिवशी परवानगी दिली म्हणून झालं न हे? म्हणून आधी तुला द्यायला आणला मी पेढा", ऋजुता.

"अग पण सगळी मेहनत तिची आणि तुझीच आहे. तूच सगळी कामं, वेळ ऍडजस्ट करून केलंस ते. खा तू पण पेढा" , विराज .

"हं, खरं सांगायचं तर ते ऐकल्यापासून खूप समाधान आणि आनंद वाटतोय मनातून. माझी छोटीशी मदतही तिच्यासाठी किती मोलाची ठरली . आता तिला तिच्या आवडत्या कोर्सला ऍडमिशन घेता आली आहे.", ऋजुता.

"छानच ग", विराज.

"आणखी एक गोष्ट झालीये तेव्हापासून आतापर्यंत", विराज पेढा तोंडात टाकत म्हणाला.

"कोणती?", न कळून ऋजुताने विचारलं.


"ही  घाबरत घाबरत माझ्याकडून परवानगी मागणारी ऋजुता आता मला उशिरा येण्याबद्दल जाबही विचारायला लागली आहे", विराज तिला चिडवत हसत म्हणाला.

ऋजुताही हसायला लागली.


"बरं , तुझे सकाळचे कामं झाले असतील तर मला सांग , काल कोणत्या कामाबद्दल म्हणत होतास?", ऋजुता.

"हं, आपल्याला दोन ज्युनिअर असोसिएट्स घ्यायचे आहेत टीममध्ये. तर त्यासाठी तू जॉब डिस्क्रिप्शन तयार करून मला दे. मग मी एच आर ला सांगून इंटरव्ह्यू शेड्युल करतो. आणि तू काही सोपे काही कठीण असे टेक्निकल प्रश्न काढून ठेव. उद्या परवा मध्ये इंटरव्ह्यू घेऊया", विराज.

"ठीक आहे. करते मी हे आणि पेढा पण देते सर्वांना. आणि आणखी एक , आमच्या माँसाहेबांनी तुम्हा सर्वांसाठी स्वीट डिश पाठवली आहे लंचमध्ये खायला . सो डोन्ट मिस इट ", ऋजुता केबिनच्या दाराकडे जात , स्माईल करत म्हणाली आणि बाहेर टीमकडे गेली.


"किती निरागस आणि अवखळ आहे ही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद मानते, स्वतःसोबतच इतरांनाही त्या आनंदात सामील करून सभोवतालचं चैतन्य टिकवून ठेवते. तुझ्या अशा गुणांनी मी दिवसेंदिवस अधिकाधिक खेचल्या जातोय ग ऋजुता ", विराज ती निघून गेली त्या दिशेने बघत मनात विचार करत होता.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेला देत असलेल्या प्रतिक्रियांबद्दल सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि असेच कळवत रहा.

🎭 Series Post

View all