दृष्टी आणि दृष्टिकोन - भाग 1

Drushti, Drushtikon, Drishti, perspective, katha, marathi, kathamalika, Rujuta, Viraj, Blind, blindness

विराज आणि ऋजुता हे एकाच ऑफिसमध्ये काम करणारे दोघे जण.... नावाप्रमाणेच ऋजुताच्या स्वभावात एक ऋजुता होती. दिसायला मुळात सुंदर आणि अतिशय चुणचुणीत असलेली ऋजुता आपल्या सहृदय, मनमिळावू आणि हसऱ्या स्वभावामुळे डिपार्टमेंटचे जणू चैतन्यच होती.  कोणालाही गरजेला मदत करण्याच्या तिच्या स्वभावामुळे सहकाऱ्यांमध्येही प्रिय होती .

विराज हा प्रोजेक्ट मॅनेजर होता . ऋजुता त्याच्या हाताखाली प्रोजेक्ट मध्ये टीम लीडर म्हणून काम करायची. विराज उंचपुरा, देखणा तर होताच आणि त्यात त्याची राहणीसुद्धा एकदम स्टायलिश !... ऑफिसमध्ये  हुशार, शिस्तप्रिय पण खडूस स्वभावाचा म्हणून प्रसिध्द होता. त्याला थोडेही इकडे तिकडे झालेले किंवा कोणी वेळ घालवलेले आवडत नसे. लगेच कोणाहीसमोर रागवायला , ओरडायला तो कमी करत नसे. त्यामुळे सगळे त्याला वचकून असत . धाक , दबाव ठेवून समोरच्याकडून काम करून घेण्याची त्याची पद्धत होती. मीच कसा ग्रेट, सर्वांपेक्षा वरचढ.... हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असे.

याउलट टीम ने हसतखेळत आनंदाने काम केले तर ते जास्त चांगल्या प्रकारे होते असे ऋजुताचे मत होते.

त्यादिवशी ...

ऋजुता जरा घाबरत घाबरतच विराजच्या केबिनमध्ये गेली. विराजला सुट्टीसाठी विचारायचे म्हणजे तिला टेन्शनच आले होते.  विराज कधी कोणावर ओरडेल याचा काही नेम नसायचा. मग छोटेसेही कारण पुरायचे त्याला त्यासाठी. विराज लॅपटॉपवर काम करत होता. ऋजुता विराजला म्हणाली, "सर... ते.... मला उद्या सकाळी एक महत्त्वाचे काम आहे.... तर.... तर मला ऑफिसला यायला थोडा उशीर होईल.... चालेल का सर?"

लॅपटॉप कडेच बघत विराज म्हणाला, "नो, नाही चालणार. उद्या तर नाहीच".

"प्लीज सर, उद्याचा एकच दिवस", ऋजुता.

"पण उशीर का? असे काय काम आहे ? उद्या दुपारी आपली महत्त्वाची क्लायंट मीटिंग आहे. लक्षात आहे ना तुला? वेळेत जायचं आहे आपल्याला. उद्याच्या मीटिंग मध्ये तुला प्रेझेंटशनही द्यायचे आहे. ", विराज.

"हो सर, लक्षात आहे. Actually मी एका मुलीसाठी पेपर लिहिण्याचे काम करते आहे. तर तिचा उद्या शेवटचा पेपर आहे. तो आटपला की मी लगेच ऑफिसला येईल", ऋजुता जरा घाबरतच म्हणाली.

"दुसऱ्या मुली साठी तू पेपर लिहिणार ? ते का?", विराज.

"सर त्या मुलीला दिसत नाही. त्यामुळे मी तिच्यासाठी पेपर लिहिणार", ऋजुता.

"ओके, पण मग इथलं काम? आणि प्रेझेंटेशन ची तयारी? साधारण कधी पर्यंत येशील ऑफिसमध्ये?", विराज.

"सगळं करेन मी. उद्या साडेबारा पर्यंत येईन. सर, तीन वाजता जायचं आहे ना मिटींगला? मी त्याची तयारी आजच करुन घेते. आणि तुम्ही काळजी करू नका. मी येईन वेळेवर", ऋजुता म्हणाली.

"ठीक आहे. सांगितलेल्या वेळेत ऑफिसला ये. त्यापेक्षा उशीर करू नकोस.", विराज.

"ओके. थँक्यू सर", ऋजुता.

"आणि हं, आज प्रेझेंटेशन तयार झाल्याशिवाय घरी जायचं नाही.  झाले की मला पाठव, काही ऍडिशन्स असतील तर सांगेन मग", विराज.

"ओके", ऋजुता.

ऋजुता केबिनच्या बाहेर आली आणि शेवटी परवानगी मिळाल्यामुळे तिने हुश्श केले . कपाळावरचा घाम रुमालाने पुसत आपल्या जागेवर जाऊन भराभर कामाला लागली.

दुपारपर्यंत खपून तिने प्रेझेंटेशन तयार केले आणि विराजला पाठवले. विराजने तिला केबिन मध्ये बोलावले. प्रेझेंटेशन तिच्याबरोबर डोळ्याखालून घालत कुठल्या मुद्द्यावर बोलताना आणखी काय सांगायचे इत्यादी सर्व गोष्टींची चर्चा करून त्याने ते प्रेझेंटेशन फायनल केले.


दुसऱ्या दिवशी सकाळी विराज च्या घरी...

"हा इस्त्री वाला सुद्धा  ना, नीट इस्त्री करत नाही शर्टला, किती सळा दिसत होत्या पडलेल्या, शेवटी मलाच इस्त्री करून घ्यावा लागला पुन्हा ", विराजची खोलीतून बाहेर येत बडबड सुरू होती.

"आई लवकर देना नाश्ता मला ऑफिसला लवकर जायचे आहे", विराज.

"हो तयारच आहे. हे घे.", आईने पोह्यांची फ्लॅट विराज च्या हातात देत म्हटले.

" ए काय ग आई , आज पुन्हा पोहे केलेस?", विराज वैतागुन म्हणाला.

"अरे तुला घाई होती ना, म्हणून मी लवकर होतील म्हणून पोहे केले. हे घे तुझा डबाही भरला आहे.", आई.

"गुड मॉर्निंग दादा. आज लवकर तयार झालास?", विधी, विराजची लहान बहीण डायनिंग टेबलवर बसत त्याला म्हणाली.

"हो. लवकर जायचे आहे जरा ऑफिसला . कामं असतात म्हटलं आम्हाला...  तुमच्यासारखं नाही, थोडासा अभ्यास केला की झालं!", विराज तिला वेडावत म्हणाला.

"आई, मीठ कमी झालय ग जरा पोह्यामध्ये. आणि कोणती भाजी दिली आहेस डब्यात?", विराज.

"दोडक्याची".

"काय? दोडक्याची? तुला माहित आहे ना ,मला अजिबात आवडत नाही ती भाजी . तरी नेहमी तीच देत असते" , विराज वैतागून म्हणाला.

"आता चिडू नकोस रे बाबा. अरे घरी आज दुसरी कुठलीच भाजी नव्हती आणि तुला घाई असल्यामुळे जी आहे ती करावी लागली मला.

"जे असेल ते आनंदाने खावं रे माणसाने, कुरकुर , तक्रार करत राहू नये सारखं असं.... कितीदा तुला सांगावं ", आई बाबांसाठी चहा करता करता स्वयंपाकघरामधून बोलली.

"आई, याच्या ऑफिसमध्ये लोक कसे सहन करत असतील ना याला ?" विधी विराजकडे बघत हसत म्हणाली .

"हे घे दादा, मीठ... थोडं घाल तुझ्या पोह्यांमध्ये", विधी त्याला मिठाची डबी देत म्हणाली.

"आई तुला आठवते का ग , या आधी दोडक्याची भाजी कधी केली होती ते? पंधरा वीस दिवस तर नक्कीच झाले असतील ना? मला तर आठवत सुद्धा नाही , आणि हा म्हणतो नेहमी डब्यात देते" , विधी विराजकडे बघून हसत म्हणाली आणि तिने बाबांना पोह्यांची प्लेट आणून दिली.

"हो, हो, कळलं, आईची लाडाची लेक ना तू ? ", विराज.

"हो मग? आहेच मी लाडाची. मी असे नखरे नाही करत म्हटलं. मदत पण करते आईला. आणि तू... सकाळ होत नाही तर तुझी चिडचिड चालू ...", विधी त्याला वाकुल्या दाखवत म्हणाली.

"हो. इकडे तू , अन तिकडे ऑफिसमध्ये ती ऋजुता. दोघीही डोकं भंडावून सोडता माझं. " , विराज.

"मुलांनो , झालं का सुरू तुमचं सकाळी सकाळी ", हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले बाबा पोह्यांचा घास घेत हसत हसत म्हणाले.

"काय झालं दादा? ", विधी.

"काही नाही ग, इकडे ऑफिस चे कामं राहिले आणि ही मुलगी महत्त्वाचे काम आहे म्हणून समाजसेवा करायला गेलीय. आली पाहिजे वेळेवर म्हणजे मिळवली. प्रेझेंटशन ती देणार आहे ना ", विराज.

"हं , दादा, स्मार्ट आहे का रे ती?", विधीने हळूच विचारलंच.

"गप्प बस तू आता", विराज डोळे मोठे करत तिला म्हणाला.

"आई येतो ग. बाबा येतो मी , आज महत्वाची क्लायंट मीटिंग आहे. नवीन क्लायंट आहेत. बाय ग नकटू. आणि भांडू नकोस कॉलेजमध्ये कोणाशी , माझ्याशी भांडतेस तसं" , विराज.

"सावकाश जा रे", आई.

"ऑल द बेस्ट दादा", विधी डोळे मिचकावत म्हणाली.
विराज ऑफिसमध्ये गेला.

इकडे ऋजुता परीक्षा सेंटर वर पोचून परीक्षा हॉलच्या बाहेरच थांबलेल्या त्या मुलीला म्हणजे निशाला भेटली. तिला धीर देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि हॉल मध्ये तिला घेऊन जागेवर बसली. थोड्याच वेळात पेपर सुरू झाला. निशा सांगेल तसेतसे सगळे लिहून पेपर संपल्यावर निशाला हॉलबाहेर घेऊन आली.  निशाची आई येऊन बाहेर वाट बघतच होती. निशाला आनंदात बघूनच आईला कळले की तिचा पेपर चांगला गेलाय.

"निशा , तुझा चेहराच सांगतोय की पेपर छान झाला तुझा", निशाची आई.

"हो आई. ऋजुता ताईमुळे मला परीक्षा देता आली यावर्षी. नाहीतर कोणीच मिळत नव्हते मला पेपर लिहायला , इतका अभ्यास करूनही माझे वर्ष वाया जाण्याचीच भीती वाटत होती मला. पण ही देवासारखी धावून आली".

"आम्ही तर जास्त नाही शिकू शकलो पण माझ्या मुलीने शिकून तिच्या पायावर उभे राहावे अशी माझी खूप इच्छा आहे . तुझे खूप खूप आभार बेटा ऋजुता, देव तुला नेहमी सुखी ठेवो. ", निशाची आई.

"निशा निकाल लागला की कळवा हं  मला.", ऋजुता.

"हो ग ताई, सर्वात आधी तुलाच पेढे द्यायला येईन मी", निशा.

"काकू आणि निशा मी आता निघते ,  मला लवकर पोचायचे आहे ऑफिसमध्ये", ऋजुता त्यांचा निरोप घेऊन ऑफिस ला जायला निघाली.

सव्वा बारा तर इथेच वाजले होते. आता तिला ऑफिसला पोचायची घाई झाली होती. कशीबशी ती ऑफिसला पोचली. ट्रॅफिकमुळे थोडासा उशीरच झाला होता. विराज घड्याळाच्या काट्याकडे  बघत तिची वाटच बघत होता. त्याला तिच्याशी काही मुद्द्यांवरती चर्चा करायची होती.

विराज च्या केबिन मध्ये चर्चा करून झाल्यानंतर विराज म्हणाला,  "आपण थोडं लवकरच निघू या अडीच वाजता".

"ठीक आहे सर", ऋजुता.

दुपारी दोघेही विराजच्या कार ने मिटींगला जायला निघाले. विराज गाडी चालवत होता तर ऋजुता बाजूला बसली होती. त्यांची कामाबद्दल थोडीफार चर्चा सुरू होती.

जाताना बोलता बोलता मधेच ऋजुताने विराजला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि खाली उतरली.

क्रमश:

*****
© स्वाती अमोल मुधोळकर

कामाबद्दलची चर्चा सोडून  गाडी का थांबवली ऋजुताने अशी मधेच? तेही विराज चिडेल हे माहीत असताना ....
बघू या पुढच्या भागात.

पुन्हा एकदा एक वेगळा विषय कथेतून मांडण्याचा प्रयत्न करते आहे. याआधीच्या कथांप्रमाणेच याही कथेला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.
 

🎭 Series Post

View all