मागील भागात ...
"आणखी .... कोणी .... आलं .... होतं का त्यांच्याबरोबर? ", रजत जरा अडखळत शेवटी विचारता झाला.
"अं, हो. विधी आली होती . ", ऋजुता.
"येस, येस्स ", मनातच म्हणत रजत हातानेच येस ची ऍक्शन करत जागेवरच उड्या मारायला लागला.
बिचारा रजत! त्या दिवशी आईने वीणाताईचं नाव सांगितल्यानंतर त्याने शोधण्याचा प्रयत्न केला होता. पण काय, "आईची मैत्रीण आईसारखीच ! प्रत्यक्षच संबंध जपणारी. मोहमयी आभासी मायाजालात न फसणारी ! " , शेवटी त्याला ऋजुतालाच विचारावे लागले होते. निदान नाव तरी कळले. आता पुढे बघू या काय होतं ते.
*****
आता पुढे ...
"ऋजू, तुला उशीर होतोय ना, जा आता. घरी पोचलीस की फोन कर मग", रजत . त्याला आता घाई झाली होती . कधी एकदा विधीला शोधतो.
आपले काम संपवून, खांद्याला लॅपटॉपची सॅक अडकवून विराज रमतगमत आपल्या पार्किंगमध्ये असलेल्या गाडीकडे जायला निघाला होता. आताही त्याला आज दिवसभर ऋजुतासोबत बसून केलेले काम, मस्करी असे सगळे डोळ्यापुढे येत आठवत होते. चेहऱ्यावर स्माईल आले होते. नकळत एक हात केसातून फिरवत तो एक एक गोष्ट आठवत पुढे जात होता. आपल्या गाडीजवळ पोचता पोचता त्याचे लक्ष टू व्हिलर पार्किंग कडे गेले. त्याला तिथे ऋजुता उभी आहे असे वाटले.
"काहीही काय विराज , आता ती समोरही दिसायला लागली की काय तुला? तिचे भासही व्हायला लागलेत ! ती तर कधीचीच निघून गेलीय. एव्हाना घरी पोचलीही असेल. चला निघा आता", स्वतःशी हसत डोक्यावर टपली मारत विराज म्हणाला. तरीही तिकडे बघण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. त्याने पुन्हा बघितले. त्याला ऋजुता तिथेच दिसत होती. फोन ठेवून ऋजुता गाडी काढायला लागली होती .
"अरेच्चा, खरंच आहे वाटतं ही तिथे", विराज . त्याने तिला आवाज दिला. ऋजुताने वळून बघितले.
"चला, मिस्टर विराज, म्हणजे या दुनियेत आहात तर तुम्ही अजून !" . विराज गालात हसून स्वतःशी बोलत ऋजुताच्या गाडीच्या दिशेने गेला .
"काय ग? तू अजून इथेच ? केव्हाची निघाली होतीस ना? काही प्रॉब्लेम झालाय का गाडीला? ", विराजच्या आवाजात काळजी डोकावत होती.
"अरे, अरे, किती प्रश्न !" , ऋजुता हसून म्हणाली . "डोन्ट वरी. फोन आला, तर इथेच थांबून बोलत होते . गाडी चालवताना फोनवर बोलणे योग्य नाही ना ? म्हणून इथे आहे मी अजून", ऋजुता त्याला म्हणाली.
"ओह ओके. मी पण चाललोय तुझ्या घराकडेच. येतेस का बरोबर?"
"मी जाईन रे", ऋजुता.
"अग पाऊसही सुरू झालाय . भिजशील तू. चल ना सोडतो तुला आणि मग जातो पुढे", विराज.
"ओहो एवढी काळजी ! ", ऋजुता.
"हो मग, भिजून आजारी वगैरे पडलीस तर मग सुट्टी द्यावी लागेल ना तुला? मग कसे होणार ? त्यापेक्षा हे परवडेल ना मला? ", विराज हसत म्हणाला.
"तू पण ना ! ओके, चल", ऋजुताही हसत म्हणाली.
दोघेही विराजच्या कारने निघाले.
रिमझिम पावसात भिजलेली संध्याकाळची वेळ... बऱ्यापैकी लॉंगच असलेला ड्राईव्ह ... गाडीत सुरू असलेली हळुवार आवाजातली लताजी आणि मो. रफी यांच्या स्वरातली जुनी मधुर सदाबहार गाणी ... आणि अशा वेळी आपल्या आवडत्या व्यक्तीची असलेली सोबत ... विराजची तर जणू लॉटरीच लागली होती. या वेळेचा क्षण अन क्षण तो जणू मनात साठवत होता. तंद्री लागली होती जणू त्याची.
या क्षणी दुसरा कोणताही विचार त्याच्या मनात डोकावणे शक्य नव्हते. कधीकधी एखाद्या व्यक्तीचं फक्त निःशब्द पणे सोबत असणंही किती सुखावह आणि समाधान देणारं असतं ना? दहा पंधरा मिनिटे अशीच निःशब्द शांततेत गेली. विराज आपल्या मनातच त्या शांततेचे भाषांतर करत होता... मनाच्या भाषेत ... प्रेमाच्या दुनियेत हरवला होता तो.
"काय रे, एकदम शांतसा आहेस? ", ऋजुता.
"अं, ..... काही नाही ग .... ड्राईव्ह करतोय ना .... म्हणून", विराज त्याची तंद्री भंगल्यामुळे गडबडला होता.
"हं , छान आहे ना वातावरण?", ऋजुता.
"हो ना, कधी संपूच नये असं वाटतंय", विराज आपल्याच विचारात होता .
"अं? काय संपू नये?", ऋजुता.
"हेच ग, इतक्या छान वातावरणातला तुझ्या सोबतीचा हा प्रवास संपूच नये असं वाटतंय", विराजने हसून , सावरण्याचा थोडाफार प्रयत्न केला.
ऋजुताच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल आली होती.
"ऋजू", विराज.
"हं, बोल ना", ऋजुता त्याच्याकडे बघत म्हणाली.
"काही नाही", विराज.
"अरे काय म्हणतोय? बोल ना."
"अं ..... हेच ... की .... "
"की?"
झालं, गळालं अवसान विराजचं ! आता तो बहाणा शोधायला लागला.
"की .....की ...., हं ss " , काहीतरी सुचल्यासारखं करत तो म्हणाला, "उद्या येते आहेस न ऑफिसमध्ये?"
"हो ss, का रे?" , ऋजुता न समजून म्हणाली.
"अग काही नाही, तेच विचारत होतो, उद्या कामं आहेत ना, म्हणून", विराज.
"अच्छा, चला आलं माझं घर. थँक्स. बाय , सी यू टुमारो " , ऋजुता सीट बेल्ट काढत बॅग घेत म्हणाली.
"हं, बाय , सी यू", विराज.
"विराज, कुछ नही हो सकता तुम्हारा. थोडं शांतपणे घ्यायला हवं. तू आधी ठरवले तेच बरोबर आहे. तसेच कर. आधी आपले ध्येय पूर्ण करायचे आणि नंतर पर्सनल गोष्टींकडे वळून मग तिकडे जोर लावायचा. एकाच वेळी दोन्ही करायला जाशील आणि दोन्ही बिघडवून ठेवशील. नको नको असे नकोच. तिलाही सध्या वेळ लागेल अजून कदाचित" , विराज पुढे जाता जाता विचार करत होता.
इकडे रजतची शोधाशोध चालली होती.
"ऋजूने अजूनही ऍड केलेले दिसत नाही हिला फ्रेंड्स मध्ये. हं, बरोबर आहे , किती बिझी असते ती , बऱ्याच दिवसात बघितलेही नसावे तिने. " , रजत विचार करत होता. बऱ्याच विधी ना इंटरनेट वर शोधल्यावर शेवटी त्याला हवी ती विधी सापडली . पण प्रोफाइल लॉक ! मग त्याने स्वतः ची ओळख करून देणारा एक मेसेज टाकुन ठेवला आणि आपल्या कॉल्स आणि मीटिंग्समध्ये व्यस्त झाला.
विराज आपल्या नेहमीच्या ठिकाणी पोचला. तास दोन तास त्याने तिथे आपले काम केले. ते झाल्यानंतर निघताना एकाशी बोलायला लागला.
"विराज , ज्या स्पीडने तू सगळं स्ट्रीमलाईन करून यांची तयारी करून घेतो आहेस, मला वाटतं की लवकरच तयार होतील हे सगळे. "
"हो ना. मी तारीख जाहीर होण्याची वाट बघतोय. पण त्या आधी व्यवस्थित तयारी करून घेतली म्हणजे वेळेवर काळजीचे काम नाही. एकदा चांगली सुरवात झाली , आत्मविश्वास आला, की मग नोबडी कॅन पुल देम बॅक", विराज.
"आज आणखी चार जण दाखल झाले आहेत. त्यात दोन लहान मुले आणि एक तरुण आणि एक वयस्कर आहेत."
"हो , मी भेटलो त्यांना . मग आता सगळे मिळून पंचेचाळीस जण झालेत, बरोबर ना? ", विराज.
"हो, पंचेचाळीस जण झालेत. "
"हं, गुड", विराज.
क्रमशः
© स्वाती अमोल मुधोळकर
कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
Let us always count our blessings and be greatful for them.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा